आमचे धोत्रे गुरुजी (भाग १)

--------- स्टॅंडवर एसटी उभी होती. ऐन उन्हाची वेळ. मी गेली पंधरा मिनिटे आत बसून होतो. अडीचची एसटी पावणेतीन झाले तरी सुटत नव्हती. गावातल्या घराची विकटीक करून मी मुंबईला निघालो होतो. आई-वडील गेल्यापासून घर रिकामं पडलं होतं. गावात घर भाड्याने देऊन फारसं भाडं येणार नसल्याने मी ते रमणिकशेटला विकून आलो होतो. थोडंफार गलबलल्यासारखं झालंच होतं.नाही म्हटलं तरी ग्रॅज्युएशन पर्यंत मी तिथे दिवस काढले होते. गावाचा अखेरचा निरोप मी एकट्यानेच घेतला. माझी बायको दिशाला मी सोबत घेतलंच नव्हतं. तिला घर विकणं पसंत नव्हतं.कितीही कमी भाडं आलं तरी भाड्यानेच द्यावे असं तिचं मत होतं.असलेली प्रॉपर्टी का विकायची असं तिला वाटतं होतं. त्यामुळे ती सोबत आली नव्हती.घरावर कर्ज असल्याने रमणिकलालच्या नोटिसांना उत्तरं देऊन मी कंटाळलो होतो. आता तो ते कर्जापोटी ताब्यात घेणार असल्याने मी ते त्यालाच विकण्याचं ठरवलं. कर्ज वळता करून मी उरलेल्या पाच लाख रुपयांचा चेक घेऊन निघालो होतो. उघड्या खिडकीतून माझी नजर आजूबाजूला भिरभिरत होती. एकेक आठवणी मी डोळ्यात साठवून घेत होतो. बसच्या अवतीभवती नेहमी असते तशीच गर्दी होती. कोणी कोणालातरी निरोप द्यायला आलं होतं. तर कोणाची तरी मुलगी सासरी जाणार होती म्हणून आलं होतं. आत बसलेल्या जोडप्याच्या खिडकीभोवती बरीच गर्दी होती. संवाद चालू कानावर. पडत होते. "....मंदे, नीट जा बरं. सांभाळून राहा. सगळ्यांचं ऐक बरं. तुजा भांडखोरपणा बाजूला ठेव जरा. " अधूनमधून हुंदके, आणि वेगवेगळे संवाद होत होते. माझं अर्धवट लक्ष होतं. कोणी शिक्षणासाठी जात होतं म्हणून आई-वडील सोडायला आले होते. "....विन्या, काकाला त्रास द्यायचा नाही बरं. आणि काकीची कामं करत जा. पत्र पाठव पोचलास की. समजलं का न्हाई ?" माझं सावलीत उभ्या असलेल्या एका म्हाताऱ्या ‌माणसाकडे सहज गेलं. अगतिकपणे ते इकडे तिकडे पाहत होते. कोट टोपी धोतर या वेषात ते होते. डोळ्यावर जाड भिंगाचा चॉकलेटी फ्रेमचा चष्मा,खोल गेलेल्या डोळ्यांमुळे उगाचच गाल वर आल्यासारखे वाटत होते. सतत ओढलेल्या तपकिरी मुळे जाड झालेल्या नाकपुड्या आणि सारखा डावा डोळा पुष्कळसा मिटून जगाकडे कडवटपणे पाहण्याची सवय असलेले गृहस्थ  मला ओळखीचे वाटू लागले. गाव सोडून दहा वर्ष झाल्याने एकदम ओळख पटेना. मग अचानक डोक्यात आलं, " अरे, हे तर आपले धोत्रे गुरुजी..." असं स्वतःशीच थोडं मोठ्याने बोलल्याने शेजारी बसलेल्या प्रवाशाने मला विचारलं, " ओळखता की काय कुणाला जणू..." मी हो म्हणालो. मग विचार आला याला काय करायचंय ? पण मी काही न बोलता गुरुजींना भेटण्याचं ठरवत असतानाच कंडक्टर आत शिरला आणि ओरडला, " ज्यांना जायचं न्हाई त्यांनी गुमान उतरून जावा. बस सुटल्यावर कुणाचंच ऐकणार न्हाई बरं " . तेवढ्यात मी बस सोडण्याचं ठरवून उठलो. शेजारचा प्रवासी माझ्याकडे पाहत राहिला. मी हातातली बॅग सांभाळीत खाली उतरलो. मला रणरणत्या उन्हाची पर्वा नव्हती. मी भराभर चालत " गुरुजी " अशी हाक मारीत गुरुजींकडे धावलो. त्यांना नमस्कार केला. पण त्यांनी ओळखलं नाही. आश्चर्याने त्यांनी विचारलं " कोण रे बाबा तू ? "" गुरुजी, मी, मी प्रदीप.....". तरीसुद्धा त्यांना ओळख पटेना. " अहो कसे ओळखत नाही तुम्ही मला ? बारावी झाल्यावर काकूंनी घरी जेवायला बोलावलं होतं. खोबरं घातलेले रव्याबेसनाचे लाडूही केले होते. आठवत नाही ?".... अर्धा तास होत आला. अजूनही त्यांना माझी ओळख पटत नव्हती. मग मीच म्हटलं, " आपण काहीतरी खाऊ आणि चहा पण घेऊ. " आम्ही कॅन्टिनमध्ये शिरलो. खायला मागवलं, चहाही मागवला. बसल्यावर गुरुजी म्हणाले, " एक विनंती करू का , मला थोडी तपकीर आणून देतोस का ? दोन दिवस झाले रे, तपकीर मिळाली नाही. ". मग मी भटारखान्यातून एक कळकट कपड्यातला माणूस आला त्याला तपकीर आणायला सांगितली . त्यावर तो म्हणाला , " तुमी यांचे नातेवाईक असाल, तर त्यांना घरी घेऊन जा हो. " मग मी त्यांचा विद्यार्थी असल्याचं सांगितलं. " गेले वर्ष दीड वर्ष ते हितंच राहतात. त्यांना जेवायला घालतो. भटारखान्यात माज्याबरोबर झोपतात. अवो, एक दोन नवीन धोत्र पन आनून दिलीत. पन कशाचं बी भान नाय. खायाला घातलं तर खात्यात. न्हाई तर नुसतंच आढ्याकडं नजर लावून बसत्यात . तुमी बसा तपकीर आणाया पाठिवतो कोणाला तरी." माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. गुरुजी शांतपणानं चहा पीत होते. गुरुजी पुन्हा गप्प झाले. त्यांनी बोलावं म्हणून मी पुन्हा प्रयत्न करू लागलो. ते चहा पीत होते. मध्येच तपकीर आली. त्यांनी पुडी सोडून दोन्ही नाकपुड्या मध्ये बार भरला. मग एकदम तीन चार सटासट शिका आल्यावर ते थांबले. मी त्यांना विचारलं, " गुरुजी तुम्ही कधी मुलाकडे जाऊन आलात ? कधी त्यांनी तुम्हाला बोलावलं ?". त्यावर त्यांनी खिन्नपणाने नकारार्थी मान हालवली. "अरे, तुम्ही मुलं शाळेमधून बाहेर पडलात तेव्हा एक दुर्दैवी घटना घडली. तुला रमणिकशेट माहिती असेलच. त्याच्या मुलांनी परीक्षेत कॉपी केली. आणि मला पकडलं तर मारण्याची धमकी दिली. मी घाबरून स्वस्थ बसलो. तेवढ्यात चेकिंग स्क्वॅडचा राऊंड आला . त्यांनी त्याला पकडला. आणि मी कॉपी करू दिली म्हणून मला निलंबित केलं. चार वर्ष विभागीय चौकशी झाली. मी सुटलो. परत कामावर रुजू झालो. पण पूर्वी सारखा मला मान मिळेना. माझ्याकडे सहकारी शिक्षक आणि मुख्याध्यापक संशयाने पाहत. माझे विषय कमी केले. मी कसंतरी काम रेटत होतो. " मध्येच त्यांनी धोतराच्या सोडल्याने डोळे पुसले. मग म्हणाले, " या धक्क्यांनी माझी बायको गेली. मला शिकवण्यात राम वाटेना. "

              राहतं घर मी गहाण टाकलं होतं.त्याशिवाय, सदाशिव अमेरिकेला जाऊ शकला नसता. अर्थातच रमणीककडे.दुसरं होतंच कोण गावात ? मला सक्तीने निवृत्त  करण्यात आलं . फंडाचा एकही पैसा, माझं निलंबन झाल्याने मिळाला नाही. मी कोर्टात जाणार कुठून ? सडेकर वकील म्हणाले जिल्हा कोर्टात गेलात तर व्याजासहित सगळं वसूल करता येईल. पण पैसे आणणार कुठून ? शेवटी रमणीकनी कोर्टामार्फत घराचा ताबा घेतला आणि मी रस्त्यावर आलो. सदाशिवला कळवलं पण त्याचं उत्तर एकच आई असेपर्यंत बरेच पैसे पाठवलेले आहेत. तुमची पैशाची भूक कमी होत नाही. मी मरेपर्यंतचा ठेका घेतला नाही.मला पुन्हा फोन करू नका. इथे राहण्यासाठी फार पैसे लागतात.तरी मी नाकदुऱ्या काढून माफी मागितली. माझी चूक झाली असंही म्हटलं. तेवढं रमणीकचं कर्ज फेडण्या  इतके तरी पैसे पाठव.पण त्यांनी मानलं नाही. ". मी थोडावेळ जाऊन देऊन विचारलं." पण त्याला एवढा तुमचा राग का? "त्यावर डोळे पुशीत म्हणाले," अरे, त्याची आय आय टी मधून शिकण्याची इच्छा नसताना मी त्याला शिकवला.माझा एकच हेतू होता. आपलं आयुष्य ओढाताणीत गेलं तसं त्याचं जाऊ नये." नाक साफ करून गुरुजींनी परत एकदा तपकिरीचा बार भरला. त्यांचा चहा गार झाला होता. मी तो गरम करून आणायला सांगितला.

चहा घेतल्यावर त्यांची नजर आढ्याकडे असलेली पाहून मी विचारलं," पुढे?" . "पुढे काय ?, काही नाही, पत्र आणि फोन बंद झाले. माझा त्याच्याकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता " आढ्याकडील नजर माझ्याकडे वळवीत ते म्हणाले.विचारावं की नाही अशी चुळबूळ करीत मी म्हणालो, " गुरुजी माझं ऐका. "..... पडेल आवाजात ते म्हणाले, " काय ?" ..... " तुम्ही माझ्या घरी चला. तेही आत्ताच. आणि यापुढे माझ्याकडेच राहा."..... ते अविश्वास आणि अनिश्चिततेने पाहत राहिले.   " हवं तर मला तुमचा दुसरा मुलगाच समजा ना.   .मला एक मुलगा आहे. त्याला पण आजोबा होतील. बघा, मला काहीही कमी नाही. मी तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळीन.पण असे बेवारश्यासारखे राहू नका." मी त्यांचा हात हातात घेत म्हटलं.त्यांची मान खाली होती.त्यांना एवढ्या मोठ्या अवहेलने नंतर इतकी आस्था पचवणं कठीण जात असावं.ते परत दृष्टिहीन माणसासारखे शून्यात पाहू लागले.त्यांना हालवून मी विचारलं, " बोला ना गुरुजी, येता ना माझ्याबरोबर ? " मग भटारखान्यातून नोकर आला आणि म्हणाला, " आवो तेंना नका पुसू. तेंना काय बी समजत न्हाई, घेऊन जावा."मी तसाच बसून राहिलो. गुरुजींना एकदोनदा हालवलं. त्यावर ते भानावर येत म्हणाले," काही म्हणालास का ?". मी परत विचारलं," येता ना माझ्याबरोबर ? " त्यावर ते क्षीणपणे म्हणाले," अजून कोणा कोणाला त्रास देणार आहे मी, कुणास ठाऊक ? " मग मीच उठलो आणि त्यांना हात धरून उठवीत निघालो. ते पाय ओढीत माझ्यामागे चालू लागले. दुसरी बस लागली होती.भटारखान्यातील नोकरांच्या ओळखीने चांगल्या सिटा आम्हाला मिळाल्या. तो माणूस आम्हाला बसवून निघून गेला. जाताना एवढं मात्र बोलला, " गुरुजींनी लय भोगलंय . सांभाळून घ्या त्यान्ला.मुंगी सुदीक मारणार न्हाईत त्ये ." बोलता बोलता त्याचे डोळे ओलावले. त्याच्या  खांद्यावर मी थोपटलं.... संध्याकाळचे पाच वाजत होते. बस निघाली. वाऱ्याच्या मंद अर्धवट गरम झुळका खिडकीतून अंगावर येत होत्या. आता मी आणि गुरुजी गावाकडे परतणार नव्हतो.मला तर गाव इतिहासात जमा होत चालल्या सारखं वाटलं. कारण बस चालू झाल्याने ते मागे पडत चाललं होतं. ....अर्ध्या  तासातच गुरुजींना झोप लागली. किमान तीन तास तरी गाडी दादरला पोहोचेपर्यंत लागणार होते.आमचं बोलणं जवळजवळ होतंच नव्हतं.मध्ये एकदा तेवढा चहा आणी वडा मी खाली उतरून आणला. तेवढाच काय तो बदल. रात्रीचे आठ वाजलेआम्ही दादर स्टेशनला पोहोचलो. मी जवळच राहत असल्याने आम्हाला चालत जाता आलं. फ्लॅट घेऊन मला तीनचार वर्ष झाली होती.

(क्रमशः)