ज्याचे त्याचे आयुष्य ...

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात असे म्हणतात. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आणि वेगळी असते. फक्त रंग, रूपा मध्ये फरक असतो असे नाही, तर स्वभाव, आवडी-निवडी, बुद्धी, सहनशक्ती इत्यादी देखील अगदी वेगळे असतात. जसे एकाच्या हाताचे ठसे, दुसऱ्या कुणाच्या हाताच्या ठशाबरोबर जुळत नाहीत. तद्वतच प्रत्येक व्यक्तिमत्व देखील भिन्न असते. अगदी जुळी भावंडे देखील एकमेकांपेक्षा खूप वेगळी असतात. परंतु तरीही तुलना केली जाते. एकजण दुसऱ्यासारखा असला पाहिजे अशी अपेक्षा केली जाते. ही अगदी पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे.


काळ बदलला, आधुनिक ज्ञान-विज्ञान घरोघरी पोहोचले. जुन्या प्रथा, रीती एक एक करून मोडीत निघाल्या. नव्या पिढीने नव्या संकल्पनांचा स्वीकार करून जुने ते सारे नाकारले.आम्ही रूढीवादी नाही, आम्ही परंपरा मानत नाही असे म्हणत बंडखोरी सुरू केली. अर्थात यात वाईट, अयोग्य अथवा अनैसर्गिक असे काहीच नाही, कारण बदल हा काळाचा स्थायीभावच आहे.


परंतु या आधुनिकतेच्या देखील रूढी निर्माण होऊ लागल्या आहेत असे जाणवते. नवीन पायंडे पडतात आणि त्याचे अनुकरण सर्वजण करतातच. आणि त्यानुसार वर्तन नसलेला, आपोआप बाजूलाच राहतो. समाजाच्या मुख्य प्रवाहात वाहून जाण्यास नकार देणारा, किनाऱ्यावरच राहतो. आधुनिक विचार आणि जीवन पद्धती योग्य आहे आणि सर्वांनी त्यानुसारच असले पाहिजे, वागले पाहिजे, जगले पाहिजे असा एकप्रकारचा नवीन दहशतवादच अस्तित्वात येतो आहे.
याचाच अर्थ, कितीही आणि कोणतेही बदल घडोत ... मनुष्यस्वभाव मात्र अजूनही तसाच आहे. स्वतःच्या इच्छेनुसार इतरांनी वर्तन करणे योग्य आहे अशा समजुतीमध्ये असणे, स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, आवडी, निवडी स्वीकारण्याची इतरांवर जबरदस्ती करणे, मी बरोबर, माझेच सारे योग्य आणि इतर सगळे चूक असे सतत सांगत राहणे, ही प्रवृत्ती आदिम आहे.


समाजाबरोबर राहायला हवे, तर चार चौघे जसे वागतात, बोलतात तसेच व्हायला पाहिजे. विचार आणि सवयी देखील तशाच असायला हव्यात. एखादा कुणी जर त्यानुसार गुणधर्म असलेला नसेल, तर त्याला समज दिली जाते... "असा कसा तू? तुझ्याबरोबरचे जसे आहेत तसा तू का नाहीस? तुझ्यात काहीतरी कमी आहे. तू प्रयत्न कर तुला बदलण्याचा." अशी शिकवणूक दिली जाते. वेगळेपण नेहमी चांगलेच असते, किंवा नेहमी वाईटच असते असे नाही. पण ते सहजपणे स्वीकारले जात नाही हे वास्तव आहे.


एक सुविचार वाचलेला आठवतोय (शब्द नेमके नाहीत) --- "न पटणारे, विरोधी विचार, कल्पना, तत्त्वे इत्यादी स्वीकारले नाही तरी त्यांचा कुठलाही नकारात्मक परिणाम होऊ न देता, तुम्ही समजून/ऐकून घेऊ शकत असाल, तर तुम्ही प्रबुद्ध आणि प्रगल्भ आहात असे म्हणायला पाहिजे."


सकारात्मक टीका किंवा तुलना, व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक असते असे म्हणतात. परंतु त्याचे प्रमाण किती असावे? हे मात्र ज्याने त्याने स्वतःची विवेकबुद्धी वापरून ठरवायचे असते. अतिरेकाचे परिणाम नेहमीच वाईट असतात, परंतु याचे भान प्रत्येकाला असतेच असे नाही. हल्लीच्या स्पर्धेच्या युगात, टिकून राहायचे असेल तर गुणवत्ता, योग्यता अद्ययावत ठेवणे जरुरी असते. त्यामुळे या तुलना अस्त्राचा वेळोवेळी प्रयोग होत असतो.


"अरे अनिश ... तो रोहन बघ अभ्यासात अव्वल असतोच आणि चांगला खेळाडू म्हणून नावाजला जातोय. आजकाल नोकरी देताना फक्त गुणपत्रिका बघत नाहीत रे. तू का नाही असं काही करत? या सेमिस्टरला तुला फक्त ८५% मिळाले, आणि रोहनला ९२%."


"पल्लवी तुझी चित्रे अगदीच सर्वसामान्य वाटतायत ... त्या रोहिणीची बघ जरा."


"नेत्रा जरा नीटनेटकं राहावं ... ती स्वाती बघ कशी टिपटॉप असते नेहमी."


असे संवाद नेहमीच ऐकू येतात. यामध्ये तुलना करणाऱ्याचा हेतू वाईट नसतो.. पण ज्याची तुलना केली जाते त्याच्यात न्यूनगंड तयार होण्याची शक्यता असते. याच्या परिणाम स्वरूप व्यक्तिमत्त्वामध्ये दोष निर्माण होऊ शकतो. काही वेळेला स्वभावात दोष उत्पन्न होतो. आत्मविश्वास नसलेली, भयग्रस्त व्यक्तिमत्वे घडवली जातात. इच्छा-आकांक्षांना पुरेसा वाव मिळू शकत नाही. गुण आणि कौशल्ये योग्य प्रकारे विकसित होऊ शकत नाहीत. महत्त्वाकांक्षा, स्वप्ने खुरटली जातात.

हेटाळणी अथवा द्वेषाने केलेली तुलना तर फारच वाईट असते. त्यामुळे क्रोध, तिरस्कार, शत्रुत्व इत्यादी तामसी भावना निर्माण होतात. काही वेळेस उदासीनता, आत्मसन्मान नसणे अशा मानसिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे समाजस्वास्थ्य निरोगी राहू शकत नाही.


एकंदरीत तुलना करणे वाईटच असते. प्रत्येक व्यक्ती ही एकमेव असते. बुद्धी, कुवत, कौशल्य प्रत्येकाची वेगळी असतात. आवड, निवड, वृत्ती-प्रवृत्ती, स्वभाव इत्यादीमध्ये फरक असतो. परिस्थिती, अनुभव, उपलब्ध साधने आणि संधी सर्वांसाठी एकसमान असू शकत नाही. असे असताना एक व्यक्ती दुसऱ्या कुणासारखी असावी, कुणीएक जे करू शकेल ते आणि तसेच दुसऱ्याला देखील जमायलाच हवे, ही अपेक्षा करणे चूक असते. अशा अपेक्षांचे ओझे कुणावर लादणे हा अपराधच आहे.

याच अनुषंगाने शहेनशहा अकबर आणि चतुर बिरबल यांची एक कथा आठवते आहे.


कथा :


हिंदुस्थानचे बादशहा अकबर, त्यांच्या लवाजम्यासह शिकारीसाठी निघाले होते. राजधानी दिल्लीतील दररोजच्या आखीव दिनक्रमातून काही काळ दूर जाणे हा हेतू होता. सैनिक, रक्षक, दास, दासी यांच्याबरोबरच हाकारे, नगारेवाले आणि काही सरदार देखील होते. बादशहांसोबत सेनापती देखील होते.


अरण्यात जरा दूरवर आल्यावर, मोकळी जागा बघून तंबू राहुट्या उभारल्या गेल्या. आचारी, पाणके भोजन व्यवस्थेत गुंतले. सैनिक आणि रक्षक देखील त्यांच्या सोबत असलेल्या अश्व आणि गजराजांच्या सेवेमध्ये व्यस्त झाले होते. स्वतः बादशहा, सेनापती आणि काही रक्षकांसमवेत पुढे निघाले. नगारे वाजत होते, हाकारे हाका घालीत होते. त्या गदारोळाने सैरभैर होऊन जंगलातील प्राणी सैरावैरा धावत होते. पक्षांचे थवे कलकलाट करीत उडत होते. काही लहानसहान प्राण्यांची शिकार झाली, परंतु एखादे मोठे जनावर काही टप्प्यामध्ये येत नव्हते.


शिकार शोधत शोधत बादशहा आणि इतर बरेच दूर आले होते. हाकारे आता मागे राहिले होते. नगाऱ्यांचा आवाज अस्पष्ट होत होत ऐकू येईनासा झाला होता. बराच काळ गेला पण शिकार मिळतच नव्हती. एका विस्तीर्ण वृक्षाखाली काही काळ विश्रांती घ्यावी म्हणून सर्वजण थांबले. जवळच कुठेतरी जलप्रवाह असावा, कारण पाण्याचा खळखळाट कानावर येत होता. सेवकांना पाणी आणायला सांगून, बादशहा तिथे विसावले होते. अरण्यातील शांतता आणि वृक्षाची शीतल छाया सुखावीत होती.


त्याचवेळी चाहूल लागली म्हणून बघितले, तर जरा दूर अंतरावर एक स्त्री, हातामध्ये गाठोडे आणि डोईवर वेताची टोपली घेऊन येताना दिसत होती. तिथल्याच जवळपास असलेल्या गावातील अथवा आदिवासी वस्तीमधील असावी. गर्भवती असावी, चालताना तिला कष्ट होत होते. परंतु त्या अवस्थेत देखील आजूबाजूला असलेल्या वाळक्या काटक्या, लहान झाडाच्या तुटलेल्या फांद्या ती तिच्या टोपली मध्ये जमा करीत होती. घरातील चूल पेटविण्यासाठी जळण वेचीत असावी. पुरेशा काटक्या जमल्यावर ती एका झाडाखाली थांबली. जमवलेल्या काटक्या आणि लाकडांची नीटनेटकी मोळी बांधून टोपलीजवळ ठेवली आणि काही काळ तिथेच विसावली. बादशहांना आश्चर्य वाटत होते, इतक्या भयंकर रानामध्ये ती एकटी स्त्री अगदी निर्भयपणे वावरत होती.


पाण्याच्या शोधार्थ गेलेले सेवक मातीच्या घड्यामध्ये पाणी घेऊन आले. बादशहा आणि सोबत इतरांची न्याहारी चालू होती, तितक्यात कुठूनतरी लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यांनी आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला. ती जळण वेचत असलेली स्त्री कुठेच दिसत नव्हती. काही वेळाने बाळाचा आवाज येईनासा झाला. असाच थोडावेळ गेला, आणि बाजूला असलेल्या झुडुपाआडून ती स्त्री संथ चालीने पुढे येताना दिसत होती. तिने तिची टोपली डोईवर घेतली होती आणि हातामध्ये कापडामध्ये गुंडाळलेले नवजात बाळ होते. बाळाला घेऊन ती स्त्री गावाच्या दिशेने जात होती. 

बादशहांच्या आश्चर्याला पारावार राहिला नव्हता. काही वेळानंतर सर्वजण माघारी मुक्कामाच्या ठिकाणी निघाले. काही दिवस शिकारीचा खेळ चाललेला होता. मिळालेली शिकार सोबत घेऊन सर्वांनी दिल्लीकडे प्रस्थान केले.


बादशहाचे नेहमीचे दरबारी कामकाज नियमित सुरू होते. नित्यनैमित्तिक कृत्ये करताना अजूनही जंगलातील शिकारीचे काही प्रसंग स्मरणातून जात नव्हते. जळणासाठी सरपण वेचणारी स्त्री त्यांच्या स्मरणात होतीच. ती आदिवासी स्त्री आणि त्यांच्या जनानखान्यातील बेगमा, यांची तुलना ते मनोमन करीत होते. त्यांना वाटले बेगमांना किती सुख सोयी आयत्या मिळत आहेत. खिदमतीसाठी अनेक दासदासी आहेत. आरामदायी आणि विलासी आयुष्य त्या उपभोगत आहेत. त्यांच्यावर कसली जबाबदारी नाही. त्यांना कुठलेही श्रमाचे काम देखील करावे लागत नाही. त्यांचा प्रत्येक दिवसच काय, प्रत्येक क्षण देखील सुखोपभोगात व्यतीत होतो आहे. त्या आदिवासी स्त्री प्रमाणे घनदाट एकाकी जंगलात त्यांना जावे लागत नाही. परंतु त्यांनी इथे राजधानीमध्ये, स्वतःच्या सुसज्ज हवेली मध्ये, किमान काही कामे करण्यास काय प्रत्यवाय आहे? इतके सारे दास दासी त्यांच्या दिमतीला कशासाठी असायला हवेत?


बादशहांच्या मनामध्ये अशा विचारांनी घर केले होते. एक दिवस त्यांनी निर्णय घेतला. हवेलीतील सर्व दास दासींना रजा देण्यात आली. बेगमांना सूचना देण्यात आल्या, की सर्व घरकाम आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडायच्या आहेत. त्यांच्या सेवेसाठी दास दासी येणार नाहीत.

जनानखान्यातील बेगमांवर आकाशच कोसळले. त्यांच्यापैकी कुणालाच, कधी, कसलेही काम स्वतः करायची सवयच नव्हती. माहेरी आणि सासरी, त्या सर्वांनी सारे आयुष्य वैभवातच व्यतीत केलेले होते. बादशहाची बेगम तर हैराण झाली होती. हिंदुस्थानच्या शहेनशहांची बेगम, आता रसोई मध्ये खाना तयार करण्यात गुंतलेली होती. सवय नसल्याने काहीच नीट जमत नव्हते.


असेच काही दिवस उलटले. बादशहांना अनेकवार विनवणी करूनही, त्यांच्या निर्णयामध्ये बदल होत नव्हता.
अखेर एक दिवस बेगमसाहिबांनी बिरबलला जनानखान्याच्या हवेलीमध्ये आमंत्रित केले. त्यांची आणि जनानखान्यातील सर्वांची कर्मकथा कथन केली आणि मदतीकरता साकडे घातले,

"बिरबलजी, मी तुमची धर्माची बहीण आहे असे समजा आणि या संकटातून मुक्ती मिळवून द्या." बेगमसाहिबांनी कळकळीची विनंती केली. 

मंत्री बिरबल विचारमग्न झाले. बादशहाच्या खाजगी बाबीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करणे योग्य नव्हते. तथापि बेगमसाहिबांची विनंती अव्हेरणे शक्यच नव्हते. अखेर या समस्येवर तोडगा शोधण्याचे आश्वासन देऊन बिरबलाने बेगमसाहेबांची रजा घेतली.


विचारात गर्क असलेले बिरबल जनानखान्याच्या हवेलीतून बाहेर आले. बादशहांचा खाजगी महाल तिथून काही अंतरावर होता. मधल्या जागेत सुंदर फळ आणि फुलांच्या झाडांनी बहरलेली बाग होती. बादशहाचे माळी त्या बागेची निगुतीने देखभाल करीत असत. रोजच्या राजकारणातून काही विसाव्याचे क्षण तिथे व्यतीत करणे बादशहांना सुखद वाटत असे. बगीच्याच्या मध्यावर एक लहानसा चौरस तयार करण्यात आला होता. त्यामध्ये फक्त गुलाब पुष्पांची अनेक रोपे होती. बादशहांनी मोठ्या हौसेनं निरनिराळ्या प्रांतातून आणि विदेशातून देखील अनेक रोपे जमा केलेली होती. त्या चौरसामध्ये त्यांची नीटस मांडणी करून शाही माळ्याने ती चांगली फुलवली होती. वेळोवेळी त्यांच्यावर खते, कीटकनाशके यांचे प्रयोग करून त्यांची उत्तम रितीने निगराणी केलेली होती. तिथले दृश्य अतिशय मोहक होते. वाऱ्याची शीतल झुळूक गुलाब पुष्पांचा सुगंध सर्वत्र पसरवीत होती. शहेनशहा अकबर यांना त्यांच्या या बगीचाचा विलक्षण अभिमान आणि कौतुक वाटत असे. 


बिरबलची चाल थोडी मंदावली होती. गुलाब पुष्पांनी बहरलेल्या सुंदर बगीच्यावर त्यांची दृष्टी स्थिरावली होती. काही क्षणांनंतर ते परत वेगाने चालू लागले. तिथेच बाजूला असलेल्या माळ्याच्या घराकडे त्यांची पावले वळली. प्रत्यक्ष मंत्री बिरबल घरी आल्याने माळी भारावलेला होता. पण बिरबलाने जे सांगितले ते त्याला मान्य होत नसावे. तो मान हालवून आणि हाताने देखील नकार दर्शवित होता. परंतु काही वेळाने त्याने मान्यता दर्शवली. बिरबल मोठ्या समाधानी चित्ताने स्वगृहाची वाट चालू लागले.


शहेनशहांना आज दरबारी कामकाजातून थोडी उसंत मिळाली होती. दुपारची उन्हे कलल्यावर ते बगीच्याकडे निघाले. तिथे आल्यावर जे दृश्य दिसले ते पाहून मात्र त्यांना संताप अनावर झाला होता, कारण सारा बगीचा वाळून गेलेला दिसत होता. काही दिवसांपूर्वी फळाफुलांनी लगडलेली झाडे निष्पर्ण दिसत होती. त्यांच्या वाळलेल्या काटक्या नजरेला बोचत होत्या. तातडीने माळ्याला बोलावणे पाठविले गेले. माळी आल्यावर त्याला विचारले,


"बगीच्याची अशी अवस्था होण्याचे कारण काय? नक्कीच तू कामचुकारपणा केलास. त्याची सजा तुला देण्यात येईल."
माळी भयातिरेकाने थरथरत होता. कसाबसा धीर गोळा करून म्हणाला, "बिरबल महाराजांनी सांगितले, बगिच्याची देखभाल करण्याची जरुरी नाही. झाडांना पाणी देणे बंद करा."

बिरबलाचे नाव ऐकून बादशहांना आश्चर्य वाटले. पण बिरबलवर त्यांचा स्वतःहून अधिक विश्वास होता. "नक्की काही कारण असणार...", बादशहांच्या मनात आले.

बादशहांनी बिरबलला निरोप दिला, "तातडीने महाली यावे".

बिरबल जणू बोलावण्याच्या प्रतीक्षेत होते. ते लगेचच महाली हजर झाले.

"बिरबल, काय मनात आहे तुमच्या. माळ्याला तुम्ही काम बंद ठेवायला सांगितले?" बादशहांनी विचारले.

"जी हुजूर!" बिरबलाने नम्रतेने उत्तर दिले. बादशहांच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे बघत पुढे म्हणाले,

"खाविंद मी विचार केला, तिकडे अरण्यात इतके महावृक्ष होते, अनेक वनस्पती, फुलझाडे बहरलेली होती. त्यांची कोणी देखभाल करीत नाहीत. मग या बगिच्यातील रोपांचे इतके लाड कशाला? त्यांनी स्वतःहून फुलावे, बहरावे... त्या रानातील झाडांप्रमाणे. माझी काही चूक तर होत नाही ना हुजूर?" बिरबलने नम्रतापूर्वक सवाल केला.

"असं आहे तर हे? बेगमसाहिबांच्या मदतीला प्रत्यक्ष चतुर बिरबल असताना आम्ही काय करणार? काळजी करू नये. उद्यापासून सर्व दास दासी सेवेला हजर असतील." बादशहा हसत हसत म्हणाले.


ताप्तर्य : प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आणि एकमेव असते. प्रत्येकाच्या गरजा, सवयी, परिस्थिती निराळे असतात. अशा प्रकारे त्यांची तुलना करणे व्यर्थ असते. त्यामुळे सर्वांना एकसमान नियम लागू होऊ शकत नाहीत.


***


किती समर्पक कथा आहे ना? ही कथा निव्वळ मनोरंजनासाठी वाचून विसरून जाऊ नये. यातील मतितार्थ ध्यानात घेणे जरुरीचे आहे असे मला वाटते. उपदेश करताना, अन्य कुणाची उदाहरणे उद्धृत करताना, कुणाला कमी लेखले जात नाही ना? कुणी दुखावले जात नाही ना? याचे भान आवश्य बाळगावे. नाहीतर उपदेशाचा उलट परिणाम होण्याची शक्यता असते.