चप्पल चोर

      आईच्या बरोबर फिरायला जाणे म्हटले की मनात आनंद आणि भीती यांचे द्वंद्वयुद्ध चालू होते.आनंद अश्यासाठी की ती मला घेऊन बाहेर पडते ते काहीतरी खास खरेदीसाठी म्हणजे काहीतरी आवडीची वस्तू आणि तीही आईच्या विशेष पसंतीने घेतल्यामुळे छानच असणार याची खात्री ! मला एकटीला अजून खरेदीतलं काही कळत नाही हे तिचं मत ! आणि तसं तेही अगदीच चूक नाही,कारण मी माझ्यासाठी खास म्हणून काही वस्तु आणायला गेले तर मी घरी येऊन तिला ती वस्तु दाखवली की ती हटकून त्यातील दोषांचा पाढा वाचू लागते आणि तो ऐकून माझ्या डोळ्यातून गंगाजमुना वहायला लागल्या की मग मला ती पोटाशी धरून आपल्या सुगंधी रुमालानं माझे डोळे पुसते तेव्हां मात्र बरे वाटते आणि तसेही ती वस्तु आणताना काहीतरी गबाळेपणा माझ्या हातून झालेला असतोच. शिवाय प्रथम तिच्या कडक शिस्तीनुसार व्यवस्थित अंगभर कपडे,पैश्याचे पाकीट आणि त्यात बरोब्बर मोजकेच पैसे , मैत्रिणींबरोबर जाणार असले तर त्या मैत्रिणीनांही तिचे नियम पाळावे लागतात. आणि त्यामुळे मला बरोबर घावयास त्या फारश्या तयारच नसतात.
          तिच्या बरोबर जायचे असेल तर घरात कार असली तरी स्कूटरवरूनच जावे लागते.आणि कारची ऐट स्कूटरमध्ये थोडीच असणार,पण तिच्या मते पेट्रोलचे भाव इतके वाढले असताना दोघींसाठी कार वापरणे हा निव्वळ पैश्याचा अपव्यय,आणि अगदी जवळच जायचे असले तर स्कूटरही नाही तर सरळएक दो एक दो ! कारण एवढ्याश्या अंतरासाठी स्कूटर तरी काय करायचीय ? पण तरी तिच्या बरोबर चालत जातानाही मजा ही येतेच कारण रस्त्यात ती निरनिराळ्या गोष्टी दाखवून माझे मनोरंजन करते.तिच्या मते आपले रस्ते ही मोठी शाळाच असते त्यावरून चालले की जगातील सगळे ज्ञानभांडार आपल्यासमोर खुले होते,येऊन जाऊन चालायला मात्र थोडीच जागा असते आणि त्यामुळे रस्त्याच्या कडेलाच तिचा हात पकडून आणि तेही आतल्या बाजूकडून चालावे लागते. त्यादिवशी आमच्या दोघींसाठी चप्पाल खरेदी होती.मला खरे तर बूट किंवा सॅन्डल घ्यायची इच्छा होती पण आईच्या मते रस्त्यावरून चालायला मोकळेपणा चप्पलनेच वाटतो अर्थात माझ्या पटण्या न पटण्याचा प्रश्नच नव्हता.शिवाय आम्ही अगदी मध्यवस्तीत रहात असल्याने घराशेजारीची दुकानांची रांगच्या रांग हजर असताना स्कूटरची आवश्यकता नव्हती मग कार तर दूरच !             आईचे एक ठरलेले दुकान होते तिथे तिला अगदी हव्या तश्या चपला किंवा बूट मिळतात.कारण तिच्या पायांना अगदी विशिष्ट आकार असलेल्याच चप्पल किंवा बूट लागतात म्हणजे अगदी चप्पलचा तळ ठराविक जाडीचाच आणि तो जरासुद्धा कडक असता कामा नये,अंगठाही थोडाही घट्ट किंवा सैलही असून उपयोग नाही.तिला दहा जोड्या चप्पल अथवा बुटाच्या दाखवल्या तरी त्यातील एकही तिच्या पसंतीस उतरेल याविषयी खात्री नसे.याउलट  माझे ! पहिलीच जोडी पायात घालून बघितली की मी लगेच छान आहे म्हणून नाचायला लागे पण मग आईच “ छान काय छान तो अंगठा बघ किती बाहेर आलाय आणि टाचेच्या मागे काय कंपास बॉक्स ठेवायच्या इतकी जागा आहे,चल काढ आणि ती दुसरी जोडी बघ”असे म्हणून मला जी जोडी घ्यायला लावायची ती घालून खरोखरच दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मैत्रिणी म्हणायच्या “काय छान चप्पल आहेत गं तुझ्या मने (चांगले अनघा नाव त्यांना उच्चारता येतच नसे) ,कुठं घेतल्यास ?” अशी चौकशी करायला लागल्यावर मात्र माझी मान ताठ !
           अर्थात त्यादिवशीही आई मला तिच्या त्या खास दुकानातच घेऊन गेली आणि दुकानदारानेही तिचे “या ताईसाहेब ,आज काय दाखवू ?” म्हणून तिचे तोंडभर स्वागत केले.अर्थात त्याच्या स्वागताला दाद देईल ती आई कसली. “ अहो आम्हाला चप्पाल घालायच्या असतात नुसत्या दाखवायच्या नसतात.नुसतेच गोड बोलून काहीतरी माल गळ्यात अडकवता.गेल्यावेळच्या चपला वर्षभरही टिकल्या नाहीत आणि बूट तर माझ्या पायाची सालडी काढत होते,“हे काय ताईसाहेब,लगेच परत आणून नाही का द्यायचे ,आपण बदलून दिले असते ““ बर, बर आता मला आणि आमच्या ह्या पोरीला दोघानाही चप्पल घ्यायच्या आहेत तेव्हां जरा पायाला आरामशीर होतील अश्या आणि निदान वर्षभर तरी टिकतील अश्या जोड्या काढा” इति आई.
“अरेवा ! बेबीला तर अगदी लोण्यासारख्या लुसलुशीत जोडी काढतो.” दुकानदार “त्या लोण्यातून तिचा पाय उचलून तिला चालता येईल ना ?”अर्थात तो दुकानदारही आईला पुरता ओळखून होता,त्यामुळे आणखीनच हास्यमुद्रा करत “अहो ताई,बेबीला चालताना आपण फुलावरूनच चालतो की काय असे वाटेल” अर्थात बऱ्याच चपलांचे जोड त्याला काढायला लावून आईने अगदी तिच्या पायांच्या तळव्याला आणि अंगठ्याला अगदी खरोखरच फुलासारखे झेलेल अशी एक जोडी व माझ्यासाठीही तशीच एक छान जोडी खरेदी केली.किंमतीच्या बाबतीत ती घासाघीस मात्र करत नसे कारण बाबुलाल (दुकानदार) आपल्याला अगदी योग्य भावातच चप्पल काय किंवा बूट काय , देणार याविषयी तिला खात्री होती.मुख्य म्हणजे वस्तु चांगली असल्यावर योग्य दाम देणे ही आपली जबाबदारीच आहे असे तिचे मत ! बाबुलालही छापील किंमतीपेक्षा बराच कमी भाव ताईंसाठी लावायचा कारण आईच्या चोखंदळपणाची खात्री असल्याने तिच्या सगळ्या मैत्रिणी त्याच्याकडेच येणार अशी त्याची खात्री असे त्यामुळे असे गिऱ्हाईक जाता उपयोगी नाही याविषयी तो दक्ष होता. नेहमीप्रमाणे जुन्या चप्पल बांधून आणि नव्या घालून निघायचे तसे बाबुलालने दुकानातील त्याच्या सहकाऱ्याला सांगून तो बिल करायला बसला,पण आईने बेबीच्या नव्या चप्पलच बांधून द्या “असे सांगितल्यावर मी प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहू लागले कारण मलाही नव्याच चप्पल घालायच्या होत्या.”हे काय गं आई,मलाही नव्याच घालायच्या.” लगेच मी तक्रार केली.त्याबरोबर आई समजुतीच्या सुरात म्हणाली,अगं मध्ये एक दोन ठिकाणी थांबायचे आहे,तिथे तू काढून ठेवल्यास आणि त्या गेल्या तर ?” “ वा हे बरं आहे आणि तुझ्या गेल्या तर ?” मी तक्रारीच्या सुरात म्हटल्यावर तिचा नाइलाज झाला कारण शेवटी तिच्या मैत्रिणीकडे जाताना तिला नव्या चप्पल मिरवायच्या होत्या.अर्थात माझा हट्ट तिला मान्य करावा लागलाच.
       मध्ये आणखी काही खरेदी करण्यासाठी आम्ही एका कपड्याच्या दुकानामध्ये शिरलो आणि तेथे गाद्या पसरलेल्या असल्यामुळे दारातच “कृपया पादत्राणे बाहेर ठेवावीत “ असा फलक लावल्यामुळे मनात नसतानाही आम्हाला चपला बाहेर ठेवूनच आत शिरावे लागले. आईला नव्या साडीसाठी मॅचिंग ब्लाउजपीस घ्यायचा होता त्यासाठी तिने साडी बरोबर आणली होतीच.त्या साडीच्या विशिष्ट रंगाला अगदी बरोबर मॅचिंग ब्लाउजपीस घेण्यात नाही म्हटले तरी बराच वेळ गेला,पण दुकानदाराने कोपऱ्यात एक छान मत्स्यालय ठेवले होते व त्यात बऱ्याच प्रकारचे मासे होते व ते बघण्यात माझा वेळ अगदी छान गेला.आणि आईने “चला अनघाताई “ म्हटल्यावरच मी भानावर आले. तिला अगदी हवा तसा ब्ला.पी. मिळाल्यामुळे तिचा चेहरा खुलला होता. आम्ही दोघी बाहेर पडलो आणि दारात येऊन पहातो तो काय आईची चप्पल गायब ! माझी चप्पल मात्र जागेवर होती.तिच्या चप्पलच्या जागी एक जुन्या चप्पलचा जोड दिसत होता.आईने दुकान्दाराला हाक मारली आणि खडसावले,
”हे कायहो पादत्राणे बाहेर काढून या अशी पाटी लावल्यावर पादत्राणाची काळजी घ्यायची तुमची जबाबदारी नाही का ?’
 दुकानदार ओशाळला व गयावया करत म्हणाला,
” असं कधी होत नाही ताई बहुतेक दुसरे गिऱ्हाईक चुकून तुमच्या चप्पल घेऊन गेलं तो दुसरा जोड दिसतो आहे बघा तिथे.”
 “अहो पण माझ्या नव्या चप्पल होत्या,आत्ताच खरेदी करून तुमच्या दुकानात पाऊल ठेवलं,”
दुकानदाराने खूप गयावया केली पीसचे पैसे सोडून द्यायची तयारी दाखवली पण शेवटी आईला तो जुना चप्पलजोडच घालून बाहेर पडावे लागले “बघ तू मला म्हणत होतीस जुन्या चप्पल घाल म्हणून आणि आता तुझ्याच चपला गेल्या” आर्थिक नुकसानीचं मला सोयर सुतक नसल्यामुळे मी तिलाच डिवचलं. अर्थात यावर उत्तर देण्यासारखेच नसल्यामुळे आपला पराभव मान्य करून,
 “हो गं बाई,तुझीच लाल”खरे तर असे वाह्यात शब्दप्रयोग करण्याचा तिचा स्वभाव नव्हता पण तिच्या संतापाचा उद्रेक माझ्यावर करणे तिला शक्य नसल्यामुळे ती बोलून गेली. त्यापुढील आणखी एका दुकानात खरेदी करायची होती आणि तेथेही “पादत्राणे बाहेर ठेवणे : अशीच पाटी होती.खरे म्हणजे पावसाळ्याचे दिवस नसूनही अवेळी पडलेल्या पावसाने सर्वच दुकानदारांना आपल्या दुकानात चिखल येऊ नये अशी इच्छा असल्याचा तो परिणाम ! आम्ही चप्पल काढू्न आत शिरलो,कारण आता आईची चप्पल गेली तरी फारसा तोटा होणार नव्हता आणि माझी न्यायला माझ्यासारखीच छोटी मुलगीच बरोबर दुकानात येईल अशी शक्यता खूपच कमी होती.त्याशिवाय मी एकदा त्या तडाक्यातून वाचले होते.
        किराणामालाचे ते मोठे दुकान होते व येथील मालकही आईचा चांगलाच परिचित होता.आईला बऱ्याच गोष्टी पाहिजे होत्या त्यामुळे तिने एक यादीच आणली होती.दुकानात बरीच गर्दी असल्यामुळे ती यादी पाहून दुकानदाराने “ताई बरीच मोठी यादी दिसत्येय, मग असे करा ती ठेवून जा आणि संध्याकाळी आमचा माणूस सामान घेऊन तुमच्याकडे येईल “ अर्थात आईची तीच अपेक्षा होती आणि इतके सामान हातात घेऊन चालत घरी जाणे तिला शक्यही नव्हते त्यामुळे “पैसे त्या माणसाबरोबरच पाठवते त्याच्याबरोबर पेटीएम मशीन पाठवा “ असे तिने सांगितले व आम्ही दोघी बाहेर पडलो आणि काय आश्चर्य दारात पादत्राणाच्या गठ्ठ्यात आईच्या नुकत्याच घेतलेल्या चप्पलही दिसत होत्या,
”आई त्या बघ तुझ्या चप्पल” मी आनंदाने चित्कारले
“अगं खरंच की “ आईही तेवढ्याच आनंदाने उद्गारली.”बहुतेक ज्याबाईच्या चप्पल मागच्या दुकानात राहिल्या होत्या आणि माझ्या चप्पल जिनं घातल्या होत्या तीच आली असावी येथे.”
“चल ,मग त्याच घालून “ मी घाई करत म्हणाले. आता आईच्या मागे हिंडायचा मला कंटाळा आला होता.

“ तसं कसं आपल्याला जाता येईल.त्या बाईला काय घोटाळा झाला हे सांगूनच आपल्या चप्पल आपण घेऊन जाऊ “ आई म्हणाली. खरं म्हणजे आईच्या चप्पल ती बाई घालून (चुकून किंवा मुद्दामही असेल)म्हणजे ती चूक खरे तर त्या बाईची होती,असे असताना आपल्याच चप्पल घालायला तिची वाट पहाण्याची आवश्यकता नाही असे निदान मला तरी वाटत होते. पण आई पडली कमालीची तत्वशील !त्यामुळे आता त्या बाईची वाट पहाणे आवश्यक होते. “पण चप्पल पायात तरी घाल , ती बाई आली की तिला सांगून निघू.” मी त्यातल्या त्यात वेळ वाचवण्यासाठी म्हटले आणि शिवाय मी चप्पल घालून आणि आईने अनवाणी उभे रहाणे हे मला बरे वाटत नव्हते.माझे हे सांगणे कसे काय पण आईला पटले,आणि ती चप्पल घालू लागली,तॊच मागून आवाज आलाच,

” अहो.अहो.काय करताय ?” आम्ही दोघींनी आवाजाच्या दिशेने चमकून पाहिले तर त्याच दुकानातून बाहेर पडणारी एक पुरंध्री आमच्याकडे पाहून म्हणत होती.साधारण आईच्याच वयाची दिसत होती.“का,काय झालं ?” चप्पल चढवून आईने तिच्याकडे पहात म्हटले,”अहो तुम्ही चुकून माझीच चप्पल घातलीत.” ती स्त्री पुढे म्हणाली. आता आईने आपला बाणा दाखवत म्हटले,” अहो ही चप्पल माझीच आहे चुकून ती तुम्ही घालून आलात,मागील दुकानात ती अदलाबदल झाल्याचे तुम्हाला कळले नाही ,ह्या पहा तुमच्या चप्पल मी घालून आले आहे.मागील दुकानात चढवलेल्या चप्पलकडे निर्देश करत आई म्हणाली.
“ सोर्री, आपला काहीतरी गैरसमज होतोय,ह्या माझ्याच चप्पल आहेत. “ ती स्त्री आपलाच हेका चालवीत म्हणाली.”आणि आपण ज्या म्हणता आहात त्या माझ्या नाहीत.”“ त्या कदाचित तुमच्या नसतीलही,पण आता मी घातल्यात त्या मात्र माझ्याच आहेत, अगदी नव्या आहेत आई ठामपणे म्हणाली. “आणि तुम्हाला पुरावाच पाहिजे असेल तर ही पावती बघा “मिलन फूट्वेअर “ ची पावती पर्समधून काढून तिच्यापुढे फडकवत आई म्हणाली. “तुमच्याकडे पावती आहे का ?”
 “नाही “ त्या स्त्रीने खिन्न मुद्रेने म्हटले आणि पुढे ती म्हणाली,” मी ती दोन तीन दिवसापूर्वीच घेतली होती,आणि ती घेतल्याची पावती सारखी घेऊन फिरायचे मला काय कारण आहे ?तुमच्यासारखी सभ्य स्त्री असे करेल याची मला काय कल्पना !” आता आई काय करते याविषयी अंदाज करणे मला शक्य नव्हते.पण तिने मुकाट्याने चप्पल काढल्या आणि त्या बाईंना परत करत ती म्हणाली,”सॉरी, इतक्या सारख्या चप्पल असतील असे वाटत नव्हते,पण कृपया झाला प्रकार आपण विसरू या” त्या बाईचा चेहराही उजळला व तीही चेहऱ्यावर पुसट हास्य आणीत म्हणाली, ” “Its all right’let us forget about it, तुमच्या नुकसानीबद्दल मलाही दु:ख होते,मीही नव्या चप्पल अश्या गेल्या असत्या तर अशीच नाराज झाले असते.” मी आश्चर्याने आईकडे बघत राहिले,पण ती मात्र त्या सापडलेल्या चप्पल घालून परत वळली,मी आश्चर्याने म्हटले,” आई आपल्याला घरी जायचे आहे ना ?”“ हो ,पण ही चप्पल आपली नाही, तेव्हां ती घालण्याचा मला काय अधिकार ?” मला फरपटत ओढत मागील दुकानाकडे आई गेली आणि त्या मालकाला तिने आपण चुकून ही चप्पल घालून गेलो होतो व कुणी बाई चौकशी करायला आली तर तिला त्या द्या असे त्याला बजावून जुन्या चप्पला खोक्यातून बाहेर काढून त्या चढवून ती घराच्या दिशेने चालू लागली.
“आई तू असे का केलेस ?“ “ मी तिच्या जागेवर असते तर मला काय वाटले असते ? आणि चप्पलसारख्या चप्पल असू शकतात.”घराच्या दिशेने मला फरफटत ओढत नेत आई म्हणाली.पण माझा आजच्या खरेदीचा आनंद मात्र पार लयास गेला होता.                घराच्या जवळ  दाराजवळच असलेल्या  एका झाडाखाली आमच्या ओळखीचा एक चांभार चप्पल दुरुस्तीचे काम करत बसलेला असायचा,आम्ही जाताना तो नव्हता पण आता तो त्याच्या नेहमीच्या जागेवर बसला होता.“काय ताई कुठे गेला होता ?” त्याने नेहमीप्रमाणे मला हाळी देत म्हटले तेव्हां माझे त्याच्याकडे लक्ष गेले.आणि काय आश्चर्य,त्याच्या पुढ्यात अगदी आईने घेतलेल्या नव्या चप्पलसारखीच जोडी पडलेली होती.मी एकदम आनंदाने ओरडलेच “ अगं आई तुझीच चप्पल जोडी त्या मोचीकाकाच्या समोर दिसतेय ,आणि आईने पाहिले तर तीही म्हणाली,”अगं खरंच की “ आणि त्याला उद्देशून ती म्हणाली,”काय बजाबा ही नवी कोरी जोडी कुठून आली ? “ अहो बाईसाहेब,काय सांगू आत्ताच एक बाई हा जोड घेऊन आली आणि मला म्हणाली,” हा जोड ठेवून घे आणि तुला काय द्यायचे ते दे,मला पैश्याची लई नड आहे,मग मी तिला पंचवीस रुपये दिले आणि ठेवून घेतली.”
“ अगं आई हीच आता आपण तुझ्यासाठी घेतलेली चप्पल !” मी आनंदाने चित्कारलेच.
“ अहो बजाबा, आता आईसाठी नवी चप्पल घेतली आणि एका दुकानासमोर ती कुणीतरी पळवली आणि तीच येथे येऊन तुम्हाला विकली”“आसल आसल,तसच असल मग बाईसाहेब ही घेऊन जा ही तुमचीच वस्तू मला नगं”आईनं पर्समधून पन्नास रुपये काढून बजाबाला देत म्हटले.“खरंच नेऊ ना बजाबा ?”“आवं बाईसाहेब मी काय तुम्हाला आज ओळखतोय का ,तुम्ही थोडीच माझ्यासारख्या गरीब माणसाला फशीवणार,तरी मला त्या बाईचा संशेव आलाच होता की इतकी भारी चप्पल तिच्याकडे आली कुठून  ? आणि मी तिला पंचवीस रुपयेच दिले होते मग वर हे पंचवीस कश्यापायी ?” “ते तुझ्या पोरीला खाऊला दिले समज “ घराकडे वळताना आई मला म्हणाली.” बघ,मी चप्पल त्या बाईची होती तिला परत केली ते बरे झाले की नाही नाहीतर जन्मभर मला “चप्पल चोर म्हणून वावरावे लागले असते.” आई कधी कधी अशी वागते की आईला दैवत का म्हणतात ते माझ्या बरोबर ध्यानात येते>