मुक्ती आणि अपरिवर्तनीयता (५)

उडणाऱ्या पक्षाचा ज्याप्रमाणे आकाशात काहीही मागोवा रहात नाही, तद्वत सत्याचा उलगडा झालेलं जीवन असतं, असं एक अनमोल झेन वचन आहे.

भारतीय अध्यात्मात इतकी भरारी कुणीही मारलेली नाही. फक्त ओशोंचं "इशान : नो फूट प्रिंटस इन द ब्लू स्काय" नांवाचं एक पुस्तक आहे, पण त्यात ओशोंनी काय वाट्टेल ती ठोकाठोकी केली आहे. त्या पुस्तकातल्या प्रकरणांची नुसती शीर्षकं वाचून ते लक्षात येईल. Talks on Zen या लिंक दिलेल्या पानावर पुस्तकाची अनुक्रमणिका आहे आणि पहिल्या प्रकरणाचा गोषवारा देखिल आहे. तिथे ओशो म्हणतात, आत शोधा, कारण सिद्ध त्याच्यामागे कोणत्याही पाऊलखुणा ठेवत नाही !

ही सॉलिड भंपकगिरी आहे कारण, आत काय की बाहेर काय, कुठेही कुणीही नाही. अस्तित्व ही स्वयंचलित प्रणाली आहे. या क्षणी तुम्ही शांत बसा, श्वासोत्छ्वास आपोआप चालू आहे. कुणीही कुठलाही प्राणायाम केला तरी ती दैहिक क्रिया आहे. आपण प्राणायाम करतो हा व्यक्तिगत भ्रम आहे. आपण क्रियाशून्य आकाश आहोत आणि देहात कोणताही बदल घडला तरी आकाशात काहीही बदल घडत नाही, नो फूट प्रिंटस इन द ब्लू स्काय चा नेमका अर्थ हा आहे.

आकाश ही केवळ एक सार्वभौम स्थिती आहे. नजरेला ते देहाबाहेर वाटलं तरी ते देहाच्या आरपार आहे. देहच काय ते सारी पृथ्वी आणि चराचर व्यापून आहे. आपल्याला आपण देहात आहोत असा जो विभ्रम झाला आहे त्यामुळे आकाश देहाबाहेर भासतं. वास्तविकात फक्त आकाशच आहे. आकाशच सार्वभौम असल्यानं सर्व आकाशच आहे. कुणाच्याही देहात कुणीही नाही.

आकाश ही निर्वस्तू असल्यानं त्याचं विभाजन होऊ शकत नाही त्यामुळे व्यक्तिगत जीवनाच्या ज्या काही पाऊलखुणा उमटतात त्या फक्त सदर व्यक्तीच्या मेंदूत कालबद्ध स्वरूपात असतात आणि ती अत्यंत उपयोगी व्यावहारिक सोय आहे. पण आकाश ही अनिर्मीत स्थिती आहे त्यामुळे ती कालरहित आहे. मेंदूत स्मृतीबद्ध झालेला व्यक्तिगत डेटा आकाशात कोणताही बदल घडवत नाही.

या विधानाची कोणतीही प्रचिती नसतांना अध्यात्मिक ग्रंथात काय वाट्टेल त्या कल्पना लढवल्या आहेत. उदा. सिद्धाचा फोटो ब्लॅंक येतो किंवा त्याचा फोटोच येऊ शकत नाही. ओशोनी पण अशीच शक्कल लढवून सिद्ध आपल्या पाऊलखुणा ठेवत नाही असं म्हटलंय. सगळ्या अज्ञानमूलक विधानांचा आधार देह केंद्र मानून सत्याचा वेध घेण्यात आहे. सत्याचा उलगडा झालेला देह निर्वस्तूशी समरूप झालेला असतो, त्यात कुणीही नसतं. पण सर्वजण देहातूनच देहाकडे पाहात असल्यानं त्यांना व्यक्तीच दिसते आणि व्यक्तीच्या पाऊलखुणा उमटणारच. पण सत्याचा उलगडा झाला की तो देह इतरांना व्यक्तीरूप भासला तरी, त्या उलगडा झालेल्या स्थितीवर, व्यक्तीगत घडामोडींच्या पाऊलखुणा उमटत नाहीत.

उलगडा झालेला देह सुद्धा जगतांना व्यक्तीसारखाच जगतो. त्याचे नित्य व्यावहार तसेच चालू राहतात आणि त्या घडामोडींची नोंदही मेंदूत होते, पण खुद्द त्याच्यावर कोणतीही पाऊलखूण उमटत नाही. ही मोठी विलोभनीय (आणि तरीही वास्तविक) स्थिती आहे. मी चा शोध आणि मुक्ती (४) या लेखातून मुक्त स्थितीचा उलगडा झाला की देह हळूहळू विरत जातो. एका अर्थानं ते देह विरत जाणं आहे आणि दुसऱ्या बाजूनं ते निर्वस्तूचं देहाच्या आरपार होत जाणं आहे. मुळात निर्वस्तू देहाच्या आरपार आहेच, ती देह जाणत असली तरी देहरूप झालेली नाही. आपण देहात आहोत या भ्रमामुळे, मुक्तस्थिती (किंवा निर्वस्तू) देहाकार झाल्यासारखी भासते. एकदा का ही मुक्तस्थिती (किंवा निर्वस्तू) देहाच्या आरपार असल्याची प्रचिती आली, की आपण व्यक्ती नसून ती मुक्त स्थितीच आहोत हा उलगडा होतो. मग या जीवनाच्या रंगमंचावर आपण जरी पात्र म्हणून वावरत असलो तरी मुळात आपण रंगमंच आहोत हे लक्षात येतं. ज्याप्रमाणे पात्राच्या जीवनातल्या व्यक्तीगत घटनांचा रंगमंचावर कोणताही परिणाम होत नाही, तद्वत, मुक्तस्थिती कायम अस्पर्शित आणि अपरिवर्तनीय राहते. व्यक्तीगत घडामोडींच्या पाऊलखुणा त्यावर उमटत नाहीत. हा "नो फूट प्रिंटस इन द ब्लू स्कायचा" नेमका अर्थ आहे.