अजन्मा (६)

हा लेख शांतपणे वाचून त्यावर मनन केलं तर वाचकाला स्वरुपाचा उलगडा होऊ शकेल.

आपण कधीही जन्म घेत नाही. 

स्वरूप (किंवा नॉन - मॅटर) कायम आकारशून्य आणि क्रियाशून्य आहे. कितीही प्रयत्न केला तरी ते प्रकट होऊ शकत नाही. 

ज्याप्रमाणे, शांतता ही सार्वभौम स्थिती आहे आणि जे प्रकट होतं तो ध्वनी किंवा शब्द असतो. खुद्द शांतता कधीही प्रकट होत नाही. तव्दत, आपल्यात देह प्रकट होतो पण आपण कायम अप्रकटच राहतो.

तुम्ही आतापर्यंत लिहिलेलं नुसतं शांतपणे वाचलंत तरी एका क्षणात देहापासनं मोकळे व्हाल.

मोकळं होणं आणि वेगळं होणं यात महद अंतर आहे आणि ते समजणं अत्यंत आगत्याचं आहे. 

एकजात सर्व सिद्धांनी म्हटलंय की आपण देहापेक्षा वेगळे आहोत. ती अज्ञानाची परिसीमा आहे. त्यातून देहाप्रती अनास्था निर्माण होण्यापलिकडे काहीही साधत नाही. देहाप्रती एक दुजाभाव निर्माण होतो आणि जीवनात निरसता येते.

विवाह बंधनाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी लोक घटस्फोट घेतात. हे वेगळं होणं झालं. पण वैवाहिक जीवनाच्या स्मृती नाहीश्या होत नाहीत. त्यामुळे देहानी दोघं एकमेकांपासून विभक्त झाले तरी मनानी होऊ शकत नाहीत. एकमेकांविषयी कटुतेचं का असेना, नातं राहतंच ! थोडक्यात, ते एकमेकांपासून वेगळे होतात पण एकमेकांपासून मोकळे होऊ शकत नाहीत.

वस्तुस्थिती अशी आहे की विवाह ही तुमची मान्यता आहे. ती उपयोगी समाज व्यवस्था नक्कीच आहे. पण वास्तविकात या मान्यते खेरीज कुणी पती नाही की कुणी पत्नी नाही. या मान्यतेला धुडकावून लावण्याची गरज नाही फक्त तीला उरात किती खोलवर न्यायची इतकाच प्रश्न आहे. मान्यतेला वस्तुस्थिती समजलं की तीचं ओझं होतं. हे एकदा लक्षात आलं की तुम्ही घटस्फोट न घेता त्या बंधनातून मोकळे होता. मग पत्नीनं ती धारणा कितीही लादली तरी त्याचा परिणाम होत नाही, मोकळीक एकदा झाली की झाली. किंवा द अदर वे, कारण आकलन हीच मोकळीक आहे.

अगदी याच प्रमाणे आपला जन्म झाला ही आपली मान्यता आहे.  प्रत्येकाची अशीच मान्यता असल्यानं आणि जगाचे सर्व व्यावहार याच धारणेतून चालले असल्यानं ती खोलवर रुजली आहे. जगातल्या सर्व भाषा आणि सगळी शास्त्रं, आपला जन्म झाला या अज्ञानमूलक धारणेतूनच निर्माण झाली आहेत.  आपण तीच भाषा वापरतो आणि ती शास्त्र प्रमाण मानून जगतो त्यामुळे आपला जन्म झाला हा भ्रम कायम होत जातो.  ज्याप्रमाणे विवाह बंधनातून मोकळं होण्यासाठी घटस्फोटाची गरज नाही, तव्दत देहापासनं मोकळं होण्यासाठी कोणत्याही साधनेची गरज नाही. आपला जन्मच होऊ शकत नाही या वस्तुस्थितीयं आकलन झालं की प्रश्न संपला !

मग देहही हलका होतो आणि तुम्हीही सर्व दैहिक विवंचनातून मुक्त होता. मृत्यूच्या धसक्यातून तुम्ही एका क्षणात मोकळे होता.