स्टॅंड-अप कॉमेडीतील काही स्त्री कलाकार

स्टॅंड-अप कॉमेडी हा प्रकार भारतात गेल्या वीसेक वर्षांत हळूहळू रुजला आहे. आणि त्यांच्यातही बरेच प्रकार-उपप्रकार आहेत. राजकीय अंगाने जाणारे काही, विनोदासाठी विनोद एवढा माफक हेतू असलेले काही, एखाद्या भाषिक/सामाजिक गटावर टोमणे मारणारे काही, सांस्कृतिक सरसकटीकरण करणारे काही, ठरवून अश्लील वाक्प्रचार वापरणारे काही, 'पोलिटिकली इनकरेक्ट' असल्याचा झेंडा मिरवणारे काही....

स्त्री कलाकारांकडे पाहिले तर जेमतेम पाच-सहा नावे मिळतात. त्यांची थोडी ओळख करून देण्यासाठी हा प्रपंच.

यातील सर्व क्लिप्स यूट्यूबवर उपलब्ध आहेत.

स्वाती सचदेवची 'लव्ह इज लव्ह' ही छोटीशी क्लिप बायसेक्शुऍलिटीबद्दल थोडी बोचरी आणि बरीचशी खेळकर टिपणी करते. तिच्या हिंदी उच्चारांवर दिल्लीची अमिट छाप आहे. तिचाच २४ जून २०२२ची एक मुलाखतही उपलब्ध आहे. तिच्याबद्दल अजून माहिती मिळवण्यासाठी चांगली.

रूपाली त्यागीची 'प्रेग्नन्सी' ही क्लिप हिंदीपेक्षा इंग्रजीतच जास्ती आहे. रूपालीचा चेहरा कठोर आहे, विनोद बराचसा काळा आहे, सादरीकरण उत्तम आहे.

उरूज अश्फाक ही नवी मुंबईकर. मुंबईची अशी एक संस्कृती आहे. तितकी घट्ट नवी मुंबईची नाही. पण मुंबईत कामाला जाऊन परत घरी येताना जाण्यायेण्यात तीन-चार तास घालणारी मंडळी पूर्वी फक्त विरार-पालघर-डहाणू टप्प्यात असत. आता नव्या मुंबईतही आहेत. उरूज मुस्लिम आहे. आणि 'उबर ड्रायव्हर ऍंड ग्रॅंडमदर' या क्लिपमध्ये ती त्यावर एका वेगळ्याच दृष्टीकोनातून सामोरी येते. त्यातल्या तिच्या इस्लामवरच्या काही कॉमेंट्स ओवैसी बंधूंपर्यंत पोहोचल्या नाहीयेत हे सुदैव.

अंकिता श्रीवास्तव ही सर्व दृष्टीने मध्यममार्गी. तिचे विनोदही, तिचे दिसणे-बोलणेही, तिची एकंदर समजही. गोबऱ्या गालांची, बेबीफॅट मिरवणारी अंकिता 'आपण फार काही मूलभूत मांडत नाही ना' या विचाराने धास्तावलेली दिसते. पण रोमकॉम हा प्रकार ज्यांना आवडतो त्यांना उत्तम. आणि मधून अधून ती टोमणे नव्हे, पण टपल्या नक्की मारते (पॉझिटिव्ह थिंकिंग, आत्मनिर्भर इ). तिची एक क्लिप इंटरेस्टिंग आहे - तीच तिच्या एका क्लिपचे समीक्षण करते आहे अशी.

जीया सेठीच्या 'ब्रेक अप स्पेशल'मध्ये स्वतःवर हसणे एवढा चांगला गुण आहे. ते सोडता बाकी फारसे काही हाती लागत नाही.

शेवटी एका क्लिपबद्दल लिहावेच लागेल.

२०१५ साली अपलोड झालेली 'व्हाय रेप इज अ प्रॉब्लेम इन इंडिया' ही क्लिप. सादरकर्तीचे नावही दिलेले नाही.

२०१५ साली केलेली ही क्लिप आजही तेवढीच अस्वस्थ करणारी आहे यापलिकडे लिहीत नाही.