पनीर भात

  • पनीर पाव किलो
  • कांदे तीन (मध्यम आकाराचे)
  • लसूण पाकळ्या दहा (मोठ्या)
  • तिखट हिरव्या मिरच्या चार
  • शिजवलेला आणि थंड केलेला भात दोन मध्यम वाट्या (बासमती / कोलम)
  • खमंग भाजलेल्या दाण्याचे भरड कूट पाच टेबलस्पून
  • तेल एक पळी
  • कांदा लसूण मसाला एक चमचा
  • जिरे, हळद, हिंग, मीठ गरजेपुरते
१ तास
दोन जणांसाठी

भात शिजवून मोकळा नि गार करून घ्यावा.

तेल तापवून ज्योत बारीक करून त्यात जिरे, बारीक कापलेल्या लसणीच्या पाकळ्या, उभ्या मध्ये कापलेल्या हिरव्या मिरच्या, हळद नि हिंग हे या क्रमाने घालावे.

ज्योत मोठी करावी नि मिरच्या तडतडायला लागल्यावर लगेच मध्यम कापलेला कांदा घालावा. कांद्यातून वाफ यायला लागेल. ज्योत बारीक न करता कांदा परतत रहावे. कांद्याचा रंग बदलल्यावर ज्योत बारीक करून मीठ घालावे.

त्यात पनीर घालून हलवून घ्यावे.

कांदा लसूण मसाला घालून नीट हलवून घ्यावे.

साधारण पंधरा मिनिटे हलवत रहावे.

दाण्याचे कूट घालून नीट हलवावे.

त्यात शिजलेला भात घालून नीट हलवावे.

पंधरा मिनिटे मधून अधून हलवत रहावे.

झाले.

(१) पनीर ताजे असावे, गोठवलेले नको. स्वतः केल्यास म्हशीचे दूध वापरावे.

(२) यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायला हरकत नाही. लिंबू पिळायलाही नाही. खवलेले खोबरे नको.

(३) सोबत भाजलेला उडदाचा पापड वा तळलेला पोह्याचा पापड/मिरगुंडे वा बटाटा वेफर्स उत्तम.

(४) आवडीप्रमाणे दाण्याचे कूट वाढवायला हरकत नाही.

स्वप्रयोग