भुताची वेबसाईट

पुण्याच्या पश्चिमेला असलेल्या औंध या उपनगरात कोटबागी इस्पितळ होते. सध्या नाही. नूतनीकरणासाठी बंद असल्याची भुमका आहे. हे माहीत नसल्याने मी आंतरजालावरून माहिती मिळवून तिथे जाण्याचा यत्न केला तेव्हा जे झाले ते असे.

कोटबागी हॉस्पिटल या नावाने दोन वेबसाईट आहेत. डॉट ऑर्ग आणि डॉट कॉम ही दोन शेपटे असलेल्या. दोन्ही वेबसाईट सुरक्षित (सिक्युअर) नाहीत यावरूनच संशय आला.

पण वेबसाईटवरची माहिती नि छायाचित्रे पाहून वाटले की ही नजरचूक असेल.

ओपीडीमधल्या डॉक्टरांची वेळ घ्यायची होती म्हणून मी तिथे दिलेल्या फोन क्रमांकांवर संपर्क साधण्याचा यत्न करू लागलो. दोन वेबसाईटवर मिळून एकूण सहा नंबर मिळाले. त्यातले चार अस्तित्वातच नाहीत. 9545205338 हा क्रमांक कोटबागी हॉस्पिटलचा नाही, 'रॉन्ग नम्बर' आहे. शेवटचा क्रमांक (9561044751) एकदाचा लागला. तिकडच्या व्यक्तीने काय पाहिजे हे गुरगुरून विचारले. 'कोटबागी हॉस्पिटल का?' असे विचारल्यावरचे त्याचे उत्तर नीट ऐकू आले नाही. मी रेटून ओपीडीतल्या डॉक्टरांची वेळ पाहिजे अशी गाडी मारली. तिकडून काय, कुणासाठी अशी चौकशी इंग्रजीतून झाली. आणि "डू यू नो हू यू आर टॉकिंग टू? डोन्ट टॉक बुलशिट ऑन माय फोन" असे गर्जून त्याने फोन ठेवला.

मी वेबसाईटवर दिलेल्या तमाम ईमेल पत्त्यांवर ईमेल्स धडकावल्या. त्या तत्परतेने परत आल्या.

आता कोणत्या भुताकडे या वेबसाईटचे ऍडमिन हक्क असतील याचा विचार करतो आहे...