पाव भुर्जी

  • अंडी (कच्ची) - २
  • तीन दिवस शिळे कणकेच्या पावाचे तुकडे (स्लाईस/बन) - २
  • कांदा (मध्यम) - १
  • हिरवी मिरची - १/२ (गरजेप्रमाणे)
  • लसूण पाकळ्या - ३
  • तेल - १/२ पळी
  • चीज - एक क्यूब
  • मीठ
  • कोथिंबीर
१५ मिनिटे
एकाला सकाळच्या खाण्याला

शिळ्या पावाचे कुस्करून तुकडे करावेत.

हा चुरा नॉन-स्टिक पॅनमध्ये कोरडा भाजून घ्यावा. आता तो रव्यासारखा होईल. हा चुरा ताटलीत काढून घ्यावा.

नॉन-स्टिक पॅनमध्ये अर्धी पळी तेल तापवावे. ते धुरावल्यावर ज्योत बारीक करून त्यात ठेचलेल्या लसूणपाकळ्या आणि कापले(ली/ल्या) मिर(ची/च्या) घालाव्यात. लसूण कुरकुरीत झाल्यावर मध्यम चिरलेला कांदा घालावा. ज्योत मोठी करून कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतावे.

कांदा गुलाबी झाल्यावर ज्योत बारीक करून मीठ घालावे. मीठ नीट हलवून घ्यावे.

कुस्करून भाजलेला पावाचा चुरा घालून नीट मिसळावे.

पाण्याचा हबका मारून झाकण ठेवावे. दोन तीन मिनिटांनी झाकण काढून नीट हलवून घ्यावे.

दोन अंडी फोडून त्यात घालावीत. हलवत रहावे. अंडी सगळ्या मिश्रणात नीट मिळून यायला हवीत.

सगळे सारखे झाल्यावर त्यावर एक चीज क्यूब किसून घालावा आणि ज्योत बंद करून झाकण ठेवावे.

दोन तीन मिनिटांनी झाकण उघडून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

(१) शिळा पाव कणकेचाच (होल व्हीट) हवा. मैद्याच्या पावाचा (व्हाईट ब्रेड) चुरा होत नाही, लगदा होतो.

(२) पुण्यात 'सिम्प्ली डेलिशस' या नावाचे कणकेचे बनपाव मिळतात ते फार उत्तम. पाव दोन दिवसांहून कमी शिळा असला तर चुरा होण्यास अडथळा येतो.

(३) चवीत थोडा बदल पाहिजे असल्यास लसूण-मिरचीबरोबर एक सेंमी आल्याचा तुकडा किसून घालावा.

(४) वडा-पाव म्हणजे बटाटवडा आणि पाव. पाववडा म्हणजे पावाचा वडा - बेसनात बुडवून तळलेला पाव - ऊर्फ ब्रेड पकोडा/पॅटिस. तसे भुर्जी-पाव म्हणजे अंडा भुर्जी आणि पाव. पाव भुर्जी म्हणजे पावाची भुर्जी.

स्वप्रयोग