माझी पाककृती


तसा मला स्वैपाक करण्याचा नेहमीच कंटाळा येतो. 

आई-बाबांचे घर सोडून, सासरी आल्यावर नाईलाजाने चुलीची संगत धरावी लागली. अनेक वर्षांच्या सरावानंतर आता कुठलाही पदार्थ करणे तितकेसे अवघड वाटत नाही.  तरीही कधी कधी जुनी नावड डोके वर काढतेच. विरंगुळा म्हणून ही सोप्पी पाककृती.  

नाव : बटाटा फ्राईज (नावावरून कळले असेलच की पाककृती सुपरहिट असणार.) 

याला फ्रेंच फ्राईज असेही म्हणतात. (का ते कुणाला माहिती आहे का?) 

मी चीन पासून अमेरिकेपर्यंत ज्या ज्या देशात प्रवास केला, तिथे मला हा पदार्थ मिळाला. काही ठिकाणी तर अनेक अनोळखी पदार्थांची नावे वाचून.. हे नक्की काय असेल हे कळेनासे झालेले असताना, फ्राईज दिसल्यावर कुणीतरी ओळखीचे भेटल्या प्रमाणे आनंद झाल्याचे स्मरते.  

तर आता प्रस्तावना पुरे झाली. 

साहित्य: 

(१) बाजारात तयार मिळणारे फ्रोजन फ्राइज. मी फार्मलॅन्ड चे क्रिंकल कट आणले. सरळ पण मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीच्या ब्रॅण्डचे विकत आणा. काही पाककुशल व्यक्ती घरी देखिल तयार करू शकतात. 

(२) एअर फ्रायर - पाककृती आरोग्यदायी, तेलविरहित करायची म्हणून. अन्यथा मोठ्या लोखंडी कढई मध्ये तेल तापवून स्टेनलेस स्टीलच्या झाऱ्याने तळले तरी चालते. (खरं म्हणजे तळलेले जास्त चांगले लागतात, पण असो)

(3) मीठ -- "नमक हो टाटाका -- टाटा नमक" (माझा स्वदेशी बाणा)  

कृती : फ्रोजन फ्राइज डीफ्रॉस्ट करून घ्या. फ्रायरच्या बास्केट मध्ये त्या ठेवा, परंतु बास्केट शिगोशीग भरू नका (नाहीतर खालचे फ्राइज ओलसर आणि कच्चे राहू शकतात ). साधारण २०  मिनिटे - १८० तापमानावर ठेवा. 20 मिनिटा नंतर बास्केट बाहेर काढून पहा. पाहिजे असल्यास अजून ५मिनिटे ठेवा .

तयार झालेले फ्राइज प्लेटमध्ये काढून त्यावर मीठ पसरवा ( प्रमाण: आवडीनुसार)

टोमॅटो-चिली सॉस बरोबर जास्तं चांगले लागतात.  

या पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजे .. उरलेला पदार्थ वेगळ्या डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवण्याची उस्तवार करावी लागत नाही. कारण कितीही केले तरी संपून जातातच. वाटणी करताना संयम आणि शांतता राखा नाहीतर वादवादी (भांडणे) होण्याची शक्यता असते.

आहे की नाही सोप्पी आणि आरोग्यपूर्ण पाककृती?

तयार करण्यासाठी लागणारा कालावधी फक्तं ३० मिनिटे.

(छायाचित्रे आहेत परंतु चिकटवता आली नाहीत म्हणून क्षमस्व)