सर्वात सोपी आध्यात्मिक त्रिसूत्री

स्वरूपाची उकल न होण्याचं एकमेक कारण म्हणजे पुन्हा पुन्हा व्यक्तिमत्त्वाच्या आभासात येणं आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे ही सर्वात सोपी आध्यात्मिक त्रिसूत्री ! तुम्ही जर या तीन गोष्टी निश्चयानं सतत स्वतःशी उद्धृत करत गेलात तर प्रत्येक वेळी तुम्हाला अकारण आनंद होईल आणि तुम्ही व्यक्तिमत्त्वाच्या घेऱ्यात येणं तत्क्षणी थांबेल. 


१. आपला जन्म झालेला नाही.

ही खरं तर सगळ्या अध्यात्माची सुरुवात आणि शेवट आहे. आपण कायम आपला जन्म झाला आहेच या धारणेत जगतो. त्यामुळे आपल्याला आपण कायम देहात आहोत आणि देहातूनच वावरतो आहोत असा भास होत राहतो. वास्तविक आपला जन्मच झालेला नाही. जन्म आणि मृत्यू या दैहिक बाबी आहेत, आपला जन्म झालेला नाही त्यामुळे आपण कदापिही देहात असू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला मृत्यू नाही.

जो काही जन्म झाला आहे तो देहाचा आहे आणि तो एका अंतर्बाह्य व्यापून असलेल्या सार्वत्रिकतेत झाला आहे. ती सार्वत्रिकता निर्वैयक्तिक आहे त्यामुळे कुणाच्याही देहात कुणीही नाही. सार्वत्रिकतेत जाणण्याची क्षमता आहे, किंबहुना जाणण्याची क्षमता आणि सार्वत्रिकता एकच आहेत. 

या जाणण्याच्या क्षमतेमुळे व्यापकतेला (म्हणजे आपल्याला) देह जाणवतो आहे. आपण देह झालेलो नाही. ज्याप्रमाणे जन्मापूर्वीची आपल्याला काहीही स्मृती नाही तद्वत, मृत्यू पश्चातही आपली स्मृती शून्य होईल कारण त्यावेळी व्यापकता आणि जाणण्याची क्षमता या एकरूप झाल्या असतील.

रोज सकाळी उठल्यावर आपला जन्म झालेला नाही असं स्वत:ला बजावा, एका क्षणात तुम्ही देहातून मुक्त व्हाल. या गोष्टीचं दिवसातून जेव्हा जेव्हा फुर्सत मिळेल तेव्हा पुनर्स्मरण करत राहा म्हणजे तुमचा मूड कायम लाइट राहील आणि देह हलका होत जाईल.


रात्री झोपताना आपला जन्म झालेला नाही हे स्वत:ला निश्चितपणे बजावा. यामुळे तुम्हाला निवांत झोप लागेल. 


२.  आपण देह झालेलो नाही, आपल्याला फक्त देहाची जाणीव आहे.

ही अत्यंत उपयोगी वास्तविकता आहे. वावरताना आणि कार्यरत असताना तिचं कायम पुनर्स्मरण करत राहा. यामुळे तुमचं देहापासून वेगळेपण अबाधित राहील.  दिवसाच्या धकाधकीत आपल्याला देहाची जाणीव सर्वस्वी व्यापून टाकते आणि स्वत:ला व्यक्ती मानण्याच्या भ्रमामुळे ती आणखी सघन होत राहते. तस्मात, आपण देह झालेलो नाही, आपल्याला फक्त देहाची जाणीव आहे हे स्मरण नितांत आवश्यक आहे. 


या स्मरणानं तुम्हाला दैहिक जाणीव किंवा वैचारिक उहापोह त्रस्त करणार नाहीत, ते तुमचं अवधान सतत वेधून घेऊ शकणार नाहीत. भूक लागली याची आपल्याला जाणीव होते, आपल्याला भूक लागत नाही. तद्वत, देह चालतो आणि हालतो, आपल्याला त्याची जाणीव होते, खुद्द आपण निर्वस्तू (नॉन-मॅटर) आहोत, त्यामुळे आपली हालचाल असंभव आहे. आपल्याला फक्त समजतं आपल्यात काहीही बदल होत नाही. उदा. देहाला बालपण होतं, तारुण्य आलं आणि गेलं, आता देहातला जोम पूर्वीसारखा नाही पण हे सर्व आपल्याला फक्त जाणवतंय कारण :  आपण देह झालेलो नाही, आपल्याला फक्त देहाची जाणीव आहे.


३. सिद्ध म्हणजे कुणीही नाही.


तुम्ही आध्यात्मिक असाल किंवा नसाल पण अमका सत्पुरुष, तमका महाज्ञानी, फलाणा सिद्धपुरुष या कल्पना तुमच्या मनात नक्की आहेत.  आध्यात्मिक जगतात तर अशा लोकांना परमपदावर नेऊन ठेवलं आहे आणि अशा लोकांनी साधकांना मनमुराद स्वतःच सेवेत रत करून घेतलं आहे किंवा तद्दन निष्फळ साधनात गुंगवून ठेवलं आहे. हा सर्व अज्ञानाचा गहन पसारा आहे.


वास्तविकात सिद्ध म्हणजे कुणीही नाही. आपण व्यक्ती नाही हा उलगडा झाला की एक सार्वत्रिकता जी सर्व चराचर अंतर्बाह्य व्यापून आहे आणि जाणण्याची क्षमता या दोनच गोष्टी उरतात. त्या दोन्हीही निर्वयैक्तिक आहेत त्यामुळे सिद्ध म्हणजे कुणीही नाही.  या वस्तुस्थितीचं स्मरण कायम आवश्यक आहे. नाही तर पुन्हा सिद्ध व्यक्ती किंवा सिद्ध पुरूष असा असा भ्रमिष्टपणा चालू होतो.  व्यक्तिमत्त्व नाही म्हणजे नाही.  An Enlightened One is Nobody. 


तुम्हाला उलगडा होईल तेव्हा हीच गोष्ट लक्षात येईल "उलगडा झालेला मी, असा कुणीही नाही" किंवा कुणीही नाही असा उलगडा झाला आहे ! फक्त सार्वत्रिकता आहे, मुक्तता आहे, मुक्त झालेला असा कुणी नाही कारण मला मुक्त व्हायचंय हीच धारणा तुम्हाला व्यक्तिमत्त्वाच्या दायऱ्यात आणत होती आणि जगातल्या सर्व साधकांना याच भ्रमामुळे सर्वव्यापी निर्वैयक्तिक सार्वत्रिकतेचा उलगडा होत नाही.