अवंतिकाबाईंची समाजसेवा

आज अवंतिका बाईंची फार म्हणजे फारच लगबग चालू होती . स्वतःचा अवजड देह ( शक्यं तितक्या) चपळाईने हालवत त्या कामे उरकीत होत्या . सकाळी सकाळी त्यांनी आधी निर्मलाबाईंना नाश्त्याचा मेन्यू सांगितला. रामूला घराची साफ - सफाई नीट करण्याच्या सूचना दिल्या. ही महत्वाची दोन कामे उरकल्या नंतर नाही म्हणले तरी त्यांना थोडासा शीण आला होताच. म्हणून त्यांनी निर्मलाबाईंना आले घालून चहा करायला सांगितला. तेव्हढा चहा घेण्यापुरत्या काय ते त्या जरा सोफ्यावर विसावल्या . नंतर लगेच माळ्याला बागेच्या निगराणी संबंधी सूचना देण्यासाठी स्वतः बंगल्याच्या (चार ) पायऱ्या उतरून बागेत आल्या. तो पर्यंत नऊ वाजत आले होते, आणि ऊन तापायला सुरुवात झाली होती. तशा उन्हामुळे त्वचेला अपाय होईल याची पुरेपूर कल्पना असूनही, त्याची पर्वा न करता जवळ जवळ १५ मिनिटे त्या माळ्याला सूचना देत होत्या. नोकरांवर लक्ष ठेवले नाही तर ते त्यांना दिलेली कामे नीट करत नाहीत, असा त्यांचा ठाम विश्वास होता. पण तेव्हढ्या श्रमानेही त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा होऊ लागले होते. मग गॅरेजकडे न जाता गंगाधर ड्रायव्हरला तिथेच बोलावून, गाडी नीट स्वच्छ पुसून तयार ठेवायला सांगितले.       

 
आता मात्र अवंतिका बाईंना विश्रांतीची नितांत आवश्यकता होती, पण कर्तव्यं पूर्तीचा आनंद काही औरच.. काही क्षण, दररोज ढासळत्या तब्येतीची चिंता त्यांच्या मनात दाटून आली. आजकाल त्यांच्या छाती मध्ये अधून मधून बारीकशी कळ येत होती .. आणि काही वेळा जीव घाबरा होत असे. डॉक्टर कडे गेले तर म्हणतात, म्हणे ऍ‍सिडिटी आहे.. तेलकट मसालेदार खाऊ नका, चहा , कॉफी कमी प्या ..
"या डॉक्टरांना काही म्हणजे काहीच कळत नाही." 
त्यांनी त्यांच्या आवडत्या सिद्धांताचा मनाशीच पुनरुच्चार केला.
"मला खात्री आहे , मला हार्टच आहे (म्हणजे र्‍हुदय रोग बरं, हे अवंतिका बाईंचे स्पेशल इंग्लिश). एखादे दिवशी अ‍ॅटॅक आला म्हणजे होईल त्यांना पश्चात्ताप, माझ्या तक्रारी कडे दुर्लक्ष केल्याचा. अ‍ॅसिडिटी म्हणे .. हं "  


अवंतिका बाई त्यांचे नाक आक्रसत आणि कपाळाला आठ्या घालीत हॉल मध्ये आल्या. त्यांच्या तब्येतीबद्दलच्या विचारांनी त्यांना कसंतरीच होऊ लागले होते. नीटसपणे सजवलेल्या एअर कंडिशन्ड हॉल मध्ये आल्यावर त्यांना जरा बरे वाटले. तिथल्या मऊ, आरामशीर सोफ्यावर त्या जरा विसावल्या. नाही म्हणले तरी त्यांना त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे जरूरच होते. त्यांच्या शिवाय हे घर, हा संसार चालणार तरी कसा? शिक्षणासाठी हॉस्टेलवर असलेल्या दोन मुलींची आणि घरात असलेल्या थोरलीची - सोनालीची त्यांना आठवण झाली. तीन मुली .. मुलगा नाहीच, त्या मनोमन खंतावल्या. मुलगा व्हावा म्हणून त्यांनी आणि त्यांच्या सासूबाईनी सुद्धा किती व्रत वैकल्ये केली, पण काही उपयोग नाही. एक हिमालयात तप करणारे योगी आले होते. अवंतिकाबाईंना त्यांच्याकडे जाऊन त्यांचे आशिर्वाद प्राप्तं करण्याची  फार इच्छा होती. न जाणो त्यांच्या कृपेने पुत्रलाभ झालाही असता. .. तर ह्यांचं भलतच -- म्हणे मुलगा आणि मुलगी यात काही फरक नाही .. आणि मुलगा नसला म्हणून काही बिघडत नाही. यांचं काय जातंय असं बोलायला? माझ्या दोन्ही धाकट्या जावांना मुलगे आहेत. त्यांच्यात मला कसं वाटत असेल? अवंतिका बाईंनी सुस्कारा सोडला. त्यांना आता अगदी भरून येत होतं ..        
" किती दु:खी आहे मी? वरकरणी दाखवत नसले म्हणून काय झाले?"  
त्यांना त्यांच्या मनोनिग्रहाचे फार कौतुक वाटले, डोळे भरून येतायत की काय असे उगीचच वाटले. म्हणजे मग त्यांना त्या कादंबरीतील नायिकेप्रमाणे मोठ्या निकराने आपले अश्रू परतवून मंद हास्य  करायचे होते. पण नाही डोळे कोरडेच होते.   
नाश्ता हॉल मध्येच आणून द्यायला त्यांनी निर्मलाबाईंना इंटरकॉम वरून सांगितले, आणि मग पाय पसरून जरा ऐसपैस विसावल्या. सकाळपासून झालेल्या श्रमाने त्यांना हलकीशी झोप लागली. तेव्हढ्यात त्यांचे पती, मनोहरराव सकाळचा नाश्ता करून कचेरीकडे रवाना झाले होते. अवंतिकाबाईंना जाग आली तेव्हा निर्मलाबाई आदबीने बोलत होत्या, 
"मॅडम आहो मॅडम , उठताय ना ? नाश्ता निवून जाईल."
आवाज ऐकून त्यांनी डोळे उघडले. क्षणभर बेडरूम मधून इथे हॉलमध्ये त्या कशा आल्या, याचा त्यांना बोध होईना. पण मग त्या सावरल्या. (शक्य तितक्या) चपळाईने टी पॉय वरचे पाय खाली घेत त्यांनी निर्मलाबाईंकडे पाहिले.
" साहेब गेले ? "
" मगाशीच .."
" काही सांगून गेले का ? "
"नाही, काही नाही."
" बरं! जा तुम्ही , आणि आज रात्रीचा स्वैपाक करू नका बरं का. आम्ही बहुतेक बाहेरच जेवून येऊ."
बरं, असे म्हणत निर्मलाबाई स्वयंपाकघराकडे निघून गेल्या.


निर्मलाबाई त्यांच्याकडे जवळ जवळ २० वर्षांपासून काम करत होत्या. पहिले काही वर्षे त्या अवंतिका बाईंना वहिनी म्हणत असत, ते त्यांनी चालवून घेतले. पण नंतर मात्र त्यांना आणि घरातील इतर नोकरांना सक्त ताकीद दिली, की त्यांना मॅडमच म्हणायचे.  
"वहिनी? .. हूं ! ई .. बाई कसंतरीच वाटतं नै? अगदीच ब्याकवर्ड . एव्हढ्या मोठ्या बंगल्याची मालकीण, आणि वहिनी? छे .. अगदी नथ्थिंग डुईंग." 
मानेला (त्यांच्या मते) नाजूकसा झटका देऊन अवंतिका बाईंनी नाश्त्याची प्लेट हातात घेतली. सकाळपासून झालेल्या श्रमाने त्या दमून गेल्या होत्या, आणि आता त्यांना भूक सुद्धा लागली होती. मनसोक्त नाश्ता झाला .  
निर्मलाबाईंच्या हाताला चव फार छान आहे हं! आणि अगदी प्रामाणिक बाई, सगळं स्वयंपाकघर त्यांच्या हातात .. पण कधी चिमूटभर साखर काही घेतली नाही स्वतःसाठी. त्या जर काम सोडून गेल्या तर .. ? 
ती कल्पना त्यांना नकोशी झाली. गेल्या वर्षीच त्या काम सोडून निघाल्या होत्या, तेव्हा मोठ्या मिनतवारीने त्यांना थांबवण्यात अवंतिका बाईंनी यश मिळवले होते. पण त्या साठी त्यांना पगारवाढ द्यावी लागली होती. आणि त्यांना दिली म्हणून इतर नोकरांना सुद्धा .. हं !  
त्या नकोशा आठवणीने अवंतिका बाईंचा चेहरा त्रासिक झाला. मग त्यांनी मोठ्याने हाक दिली,
" सखू ए सखू .. कुठे गेली ही? वेळेवर कामाला येईल तर शपथ." 
त्यांचा त्रागा चालू असतानाच ओचे, पदर घट्टं बांधत सखू हजर झाली.
"काय वं म्याडम? म्या हतंच हाय की .. दिसंना जनु तुमास्नी .."
"गप, आगाऊपणे बोलू नकोस" अवंतिका बाई ओरडल्या
" काल माझ्या ड्रायक्लीनिंग च्या साड्या आणायला सांगितलं होतं ना तुला?"
" व्हय म्याडम, कंदीच आणल्यात त्या, वरी ठिवल्यात ना."
" बरं बरं जा तू ." अवंतिका बाई कारवदल्या .
ही सखू महा आगाऊ आहे, निर्मलाबाईंसारखी मवाळ नाही. प्रश्नाला उत्तर, आणि उत्तराला प्रत्युत्तर देण्यात पटाईत. पण काय करणार ? सांभाळून घ्यावे लागते ना आजकाल ?
अवंतिका बाई सुस्कारल्या, आपल्याला किती सहन करावं लागतं? हे आठवून त्यांना अगदी भरून आलं. 
मग मोठ्या निकराने त्या उठल्या, गाऊन सावरत जिन्याकडे निघाल्या. खरे तर ह्यांना गाऊन वापरणे बिलकूल पसंत नाही. तसं केस कापलेले ही त्यांना आवडले नव्हतेच. पण मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. स्त्रियांनी किती म्हणून स्वतःचे मन मारून जगायचे? त्या क्लबमधल्या सुधाताई सांगतात ना,   
" स्त्री ने पुरुषांच्या गुलामगिरीतून आणि रूढी, परंपरांच्या जोखडातून मुक्तं व्हायलाच पाहिजे ... " 
सुधाताई बरंच काही बोलतात, सगळंच नाही बाई कळत. पण त्यांचे भाषण ऐकले ना, की कसं अगदी स्त्री मुक्ती केल्यासारखं समाधान वाटतं. हे सारखी चेष्टा करत असतात, म्हणतात -  
"मी कधी तुला कसली बंधनं घातली आहेत का? मग तुला कशातून मुक्तं व्हायचय?" पण मी त्यांच्याकडे लक्षच देत नाही. नाहीतरी सुधाताई म्हणतातच, 
"पुरूष तुमच्या मार्गात अडथळे आणतील, कारण मुक्त स्त्री ला ते गुलामा सारखं वागवू शकत नाहीत. तुम्ही त्यांची पर्वा न करता पुढे जायचे, जोखडातून मुक्तं व्हायचे.."  
जोखड म्हणजे काय हे जरी अवंतिकाबाईंना नीटसं कळलं नव्हते, तरी कशातून तरी मुक्त व्हायचे आहे, म्हणजे कोणाला तरी विरोध करायचा एव्हढे कळले.


क्लबची आठवण येताच त्यांनी घाईघाईने पावले उचलायचा प्रयत्नं केला. पण गुडघ्यातून एक तीक्ष्ण चमक आली, वाकलेली कंबरही चटकन सरळ करणे त्यांना जमेना. कितीतरी दिवसांपासून हे दुखणं त्यांच्या पाठीशी लागले होते. अनेक उपाय केले. कसली कसली तेलं, कोरफडीची जेल , .. कश्शा कश्शाचा उपयोग झाला नाही. सर्वं प्रकारच्या डॉक्टरांकडे गेले. - आयुर्वेदिक, अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी, कुठले कुठले बाबा, आचार्य, स्वामी ... सगळे मेले एका माळेचे मणी ... म्हणतात कसे ?  
काकू .. जरा वजन कमी करा, रोज फिरण्याचा व्यायाम करा ... हं! 
आणि म्हणे काकू .. इतकी का मी म्हातारी दिसते? या डॉक्टरांना काही कळत नाही ... मला इतक्या वेदना होतात.. आणि याचं भलतंच, म्हणे रोज चालायचा व्यायाम करा .. आता घरी कार असताना मी का म्हणून चालत जाऊ ? 
तेव्हढ्यात फोन खणखणला. दुखर्‍या कमरेवर हात ठेवित अवंतिकाबाई फोनकडे वळल्या. फोन त्यांच्या जावेचा, सुमनचा होता.
"आहो वहिनी, आनंदाची बातमी.. आपल्या मिनीचं लग्नं ठरलं बरं का !"
"हो का? अरे वा!" अवंतिकाबाईंनी ओढून ताणून त्यांच्या आवाजात आनंद आणला. खरे तर त्यांना ती बातमी अजिबात आवडलेली नव्हती. 
मग कोण मुलगा? कुठे असतो ? काय करतो ? इ. माहिती विचारून, ऐकून झाली.
फोन क्रेडलवर ठेवताना नाही म्हणलं तरी त्यांचा मूड गेलाच. ही सुमन, त्यांची धाकटी जाऊ, घरात सगळ्यांची लाडकी. नोकरी करून घर सांभाळते म्हणून सगळ्यांना तिचे फार कौतुक , अगदी ह्यांना सुद्धा .
हं .. मी नोकरी करत नसले म्हणून काय झाले? किती बिझी असते मी ? माझा क्लब , माझे सोशल वर्क. .. पण माझे मेलं कुण्णा कुण्णाला कौतुकच नाही .... सगळे नुसते परधार्जिणे. अवंतिका बाई सुस्कारल्या. आता तर काय मिनीचं लग्नं ठरलंय. ही मिनी सोनालीपेक्षा दोन वर्षांनी लहानच की ..पण सोनालीचा योग काही अजून येत नाहीये. तशी ती मिनी एव्हढी शिकलेली नाहीये .. पण ग्रॅज्युएट आहेच की. आणि दिसायला ... अं ? म्हणजे स्मार्टच की, अग्गदी माझ्यासारखी . .. अजून लोळते आहे वाटतं अंथरूणात. अवंतिका बाई स्वतःशीच बोलल्या. 

 
आज असे नाराज होऊन चालणार नव्हते , क्लब मध्ये त्यांचा सत्कार होता. म्हणजे सत्कार प्रसिद्ध समाजसेविका सुधाताईंचा होणार होता आणि त्यांच्या हस्ते अवंतिकाबाईना पारितोषिक मिळणार होते. त्यांच्या क्लब ने स्त्रियाच्या उन्नती साठी पाककला स्पर्धा आयोजित केलेली होती. त्यात अवंतिका बाईंना उत्तेजनार्थ तिसरे पारितोषिक मिळाले होते. अशा अलवार साटोऱ्या ‍ केल्या होत्या त्यांनी ... खरं म्हणजे त्यांनाच प्रथम पारितोषिक मिळायला हवं होतं असं अवंतिका बाईंचं स्पष्ट मत होतं ... पण छे ! सगळीकडे नुसती वशिलेबाजी .... पण जाऊ दे म्हणत अवंतिकाबाईनी जिन्याच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. 


अवंतिकाबाई त्यांच्या खोलीत आल्या. जिना चढून आल्यामुळे त्यांना किंचित धाप लागलेली होती, म्हणून काही क्षण त्या विसावल्या. सखूने धोब्याकडून आणलेल्या साड्यांचा गठ्ठा त्यांनी नीट पाहिला. मग कपाट उघडून हँगर वरच्या साड्या पाहिल्या. नक्की कोणती साडी आजच्या समारंभासाठी चांगली दिसेल हे त्यांना ठरवता येईना.   
शेवटी एक अंजिरी रंगाची, प्युअर सिल्कची साडी त्यांनी नक्की केली. त्यावर बदामी रंगाची पश्मिना घ्यावी .. की पांढरी बरी दिसेल? त्या परत विचारात पडल्या. शेवटी बदामीच घ्यायची ठरवली. सध्या काही थंडीचे दिवस नाहीत, पण मोठ्या मोठ्या समाजसेविका नेहमीच शाल घेताना त्यांनी पाहिले होते म्हणून ...  साडीला मॅचिंग लिपस्टिक, रूमाल, पर्स, सँडल्स इ ची जुळवाजुळव झाली आणि मगच त्यांचे समाधान झाले.
"हुश्श! झाली बाई सगळी तयारी." मोठ्या समाधानाने त्या म्हणाल्या.


अवंतिकाबाई दुपारी जेवणा नंतर हॉल मध्ये टी. व्ही समोर रिमोट घेऊन बसलेल्या होत्या. एक एक चॅनल बदलत उगाचच वेळ घालवत होत्या. आज त्यांना टी. व्ही. वरील सासवा-सुना रिझवत नव्हत्या. मनात विचारचक्र चालू होते, 
"येतील ना हे वेळेत ? नाहीतर विसरून पण जातील, काही सांगता येत नाही. खरं म्हणजे सोनाली ने सुद्धा यायला हवं, पण ती सुद्धा अगदी तिच्या बा.. अं वडिलांच्या वळणावर गेली आहे. प्रत्येक गोष्टीत चेष्टा करण्यासारखं काय मिळतं यांना ? देव जाणे ...
पण यांनी निदान काल कबूल तरी केलंय येण्याचं. सकाळी भेट झाली नाही कामाच्या गडबडीत .."
अवंतिका बाईंना स्वतः बद्दल कौतुक वाटलं.
"किती जबाबदाऱ्या ‍ सांभाळायला लागतात मला?" त्या मनातल्या मनात म्हणाल्या. 
"फोन करावा का ह्यांना? नको बाई त्यांना आवडत नाही ऑफिस मध्ये फोन केलेलं".
मग बराचवेळ त्या उगीचच वेगवेगळे चॅनल्स बघत राहिल्या.
अपेक्षे प्रमाणे संध्याकाळी मनोहर रावांचा फोन आलाच ..
"तू पुढे हो .. मी माझी मीटिंग आटपून येतोच."
अवंतिका बाई अगदी खट्टू झाल्या. म्हणजे आता रिक्षेने जायला पाहिजे .
तशा त्या नेहमी रिक्षेनेच जात, पण आजतरी त्यांना त्यांच्या प्रशस्त कार मधून जाण्याची इच्छा होती. आज सुधाताईंचा सत्कार, मालतीबाईंचे भाषण .. आणि बक्षीस समारंभ, म्हणजे झाडून साऱ्या ‍या क्लबच्या सदस्य असणाऱ्या बायका येणार. सगळ्याच उच्चभ्रू ..त्यांच्या समोर ऐटीत कार मधून उतरताना किती छान वाटलं असतं? हं जाऊ दे .. आमचं मेलं नशीबच असलं, अवंतिकाबाईची धुसफूस चालू होती, पण इलाज नव्हता.


अगदी कसोशीने अवंतिका बाई तयार झाल्या. साडी, शाल, मेक अप , पर्स, रूमाल .. आणि हलकासा सेंट सुद्धा लावला. आरशात बघताना, मनोहर रावांच्या फोनमुळे आलेली नाराजी काहीशी कमी झाली होती.
अवंतिका बाई क्लब मध्ये पोहोचल्या, पण अजून सुधाताई आलेल्याच नाहीत असे कळले. कदाचित येणार नाहीत कारण ते कुठलं तरी स्त्रियाचे आंदोलन चालू आहे, तिथे व्यस्त आहेत म्हणे त्या.. 
"त्या स्त्रियांना देखील आंदोलन करायला आजचाच मुहूर्त मिळाला ना?" अवंतिकाबाई मनोमन वैतागल्या होत्या, पण वरकरणी हसतमुखाने इतर सदस्य महिलांबरोबर काहीबाही बोलत राहिल्या. 
बराच वेळ वाट बघून, शेवटी मालतीबाईंच्या हस्ते पारितोषिके देण्याचे ठरले. त्यातही फक्त पहिल्या तीन क्रमांकाच्या पुरस्कार विजेत्यांना मंचावर बोलावून पारितोषिके देण्यात आली. उत्तेजनार्थ पारितोषिके फक्त जाहीर करण्यात आली, कारण वेळ फारच कमी शिल्लक होता. मालती बाईंना देखील सुधाताईंच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा द्यायला जायचे होते. त्यांनी सुधाताईंचा संदेश वाचून दाखवला, पण अवंतिका बाईंचे लक्षच नव्हते. मग पुढची मीटिंग कधी घ्यायची ते ठरवून सगळ्याजणी पांगल्या. अवंतिका बाई रिक्षेनेच घरी आल्या कारण मनोहर राव आलेलेच नव्हते. खरे तर ते आले नाहीत हे चांगलेच झाले असे अवंतिकाबाईंना वाटत होते. त्यांचा तर कित्ती अपेक्षाभंग झाला होता, किती मेहेनतीने त्यांनी त्या साटोऱ्या केलेल्या होत्या. 


घरी आल्या तेव्हा मनोहरराव  हॉलमध्येच टी.व्ही वर न्यूज बघत/ऐकत होते. अवंतिकाबाईंकडे न पाहताच म्हणाले ..
"अग मीटिंग खूपच लांबली, मग विचार केला तुझा समारंभ तर संपलाच असणार म्हणून घरीच आलो .."
अवंतिका बाई गप्पच राहिल्या..त्यांना काही बोलावेसेच वाटत नव्हते.
"चल आपण लवकर जेवून घेऊ या, नंतर मला आणखी थोडे काम करायचे आहे, त्या मराठयांनी घातलेला घोळ निस्तरायचा आहे." बातम्या ऐकता ऐकता ते बोलत होते. 
अवंतिका बाईंच्या मनात निराशा दाटली होती.
"काहीच माझ्या मनासारखं का होत नाही? कुणालाच माझी पर्वा नाही, की कसलं म्हणून कौतुक नाही. त्या क्लब साठी किती केलं मी? स्त्रियांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, त्यांचे पाककला, शिवणकाम, विणकामाचे वर्ग .. काय अन् काय. आणि आज मला पारितोषिक मिळाले तर कुणाला त्याचे काही नाही, मंचावर सुद्धा बोलावलं नाही. आणि घरी? साधं विचारलं पण नाही, की कसा झाला समारंभ ते. माझ्यापेक्षा यांना त्या जगभरातल्या बातम्या महत्वाच्या .. 
आणि ही सोनी कुठे उधळलीय कोणास ठाऊक , एक दिवस पाय घरात टिकेल तर शप्पथ."
अवंतिका बाईंचा नुसता संताप, संताप झाला होता. त्या नुसत्याच न बोलता बसून राहिल्या. बऱ्याव वेळाने मनोहररावांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. काहीतरी बिनसले आहे हे त्यांच्या लक्षात आले. आता टी. व्ही बंद केला नाही तर रामायण- महाभारत घडेल हे त्यांना अनुभवाने माहीत होते. 
टी. व्ही. बंद करून त्यांनी विचारले, " काय गं ? काय झालं?"
त्यांच्या या प्रश्ना बरोबर अवंतिका बाईंचा आत्ता पर्यंत रोखून धरलेला बांध फुटला.
त्यांनी मनातलं सगळं, सगळं बोलून घेतलं. परत कुणा कुण्णाला आमचं कौतुक नाही, तर कशाला काही करायचं? हे पालुपद होतच.
मनोहरराव समजुतींच्या स्वरात म्हणाले,
"अगं इतकी नाराज कशाला होतेस? आपण काम करावं, फळाची अपेक्षा करू नये. तुला साटोऱ्या ‍करताना आनंद मिळाला की नाही?  झालं तर मग.  समजायचं तेच तुझे पारितोषिक. आणि बाहेरच्यांना नसे ना का ? मला तर आहे ना तुझं कौतुक. तुझा स्वैपाक ... म्हणजे तू हल्ली करत नाहीस .. पण चांगला व्हायचा. मला तर निर्मलाबाईनी केलेल्या पदार्थापेक्षा, तू केलेले पदार्थाचं जास्ती आवडतात. पण असू दे ते, आज तू निर्मला बाईंना सुट्टी दिलीयस ना? मग आपण कुठे तरी बाहेर जाऊ या, की मिर्च-मसाला मधून जेवण मागवूया?" 
मनोहररावांच्या समजूतदार शब्दांनी अवंतिकाबाईचा राग जरा शांत झाला होता, पण तरीही त्या म्हणाल्याच --
" काही नक्को, करीन मी घरीच ... ती सोनी पण यायची आहे अजून " 
"मग असं कर, सगळं करत नको बसू आता, नुसता साजूक तुपातला शिरा कर. खूप दिवसात तू केलेला शिरा खाल्ला नाही. निर्मलाबाई पदार्थ चांगले करतात, पण तुझ्या हाताला जी चव आहे त्याची सर नाही ..."      
या स्तुतीने मात्र अवंतिका बाई सुखावल्या. मोठ्या उत्साहात पदर खोचत त्या स्वयंपाकघराकडे निघाल्या. चालताना परत गुडघ्यात कळ आली, पण आता त्यांचे तिकडे लक्ष नव्हते. त्यांनी  रवा कढई मध्ये घेऊन कढई शेगडीवर चढवली. रवा भाजता भाजता त्या म्हणत होत्या,
"काही नको मला तो क्लब, ती समाजसेवा आणि ते पारितोषिक .. मी जशी आहे तशीच  बरी आहे.. त्यातच मला सुख मिळेल. कुणा परक्यांनी कौतुक करावे म्हणून धडपड करण्यापेक्षा माझ्या घरच्यांचे समाधान मला जास्त मोलाचे आहे."     
खमंग, केशरी, गोड शिऱ्याचा सुवास घरभर दरवळत होता.***