ऍक्टिव्हा

एकवीस डिसेंबरची सकाळ. कांचन मॅडम ऑफीसमध्ये अजून आल्या नव्हत्या. मॅडम आल्यावर काॅल करायला, असिस्टंटला सांगून बाहेर पडलो. रिलॅक्स पाॅईंटमध्ये जाऊन चहा घेतला. थोडा वेळ बसलो. दिलेली वेळ उलटून चालली होती. असिस्टंटचाही काहीच काॅल नव्हता. पुन्हा ऑफीसमध्ये आलो. असिस्टंट डेटाबेसमधून माझा नंबर शोधत बसलेली. मला पाहताच मॅडम उशिरा येत असल्याचा आताच आलेला निरोप असिस्टंटनं सांगितला. थोडा भटकून येतो सांगून बाहेर पडलो.

बाहेर पडलो खरा पण कुठं जायचं हा प्रश्नच होता. इकडं तिकडं पाहिलं. नर्‍हे गाव बरंच वाढत चाललेलं होतं. पुण्यापेक्षा पुण्याची उपनगरंच जास्त वाढत चाललीत. इथंही तेच दिसत होतं. रिलॅक्स पाॅईंटच्या उजवीकडं पाहिलं. छोट्याशा कमानीवर कसलासा बोर्ड दिसला. वेळ घालवायचाच होता. पुढे सरकलो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे इंग्लिश मीडियम स्कूल असल्याची ओळख बोर्ड करून देत होता. शेजारीच संस्थेच्या शाखांची यादी एक बोर्ड दाखवत होता. लहान मुलांची शाळा म्हणजे एकट्यानं न थांबण्याचं ठिकाण. सिक्युरिटी लगेच चौकशी करत बसतात. पुढे निघालो. रस्ता वळून पुढे जात होता. तिथेच दुसरा एक रस्ता येऊन मिळत होता.

दुसर्‍या रस्त्यावरून एक ऍक्टिव्हा चालली होती. अचानक थांबली.

“सर, तुम्ही इकडं कुठं ?” ऍक्टिव्हावरून माझ्याकडं आलेला प्रश्न. प्रश्नासोबत एक भपकारा नाकात शिरला. देशी की विदेशी ते मात्र कळलं नाही.

मी गोंधळात पडलो. एकतर नर्‍हे गाव माझ्यासाठी नवखं. कोणी ओळखीचं भेटावं अशी आशा नव्हती. त्यात शिक्षण क्षेत्रात नोकरी असेल तर आणखी एक अडचण असते. भेटणारी व्यक्ती कधी आणि कुठे भेटेल ते सांगता येत नाही. त्या व्यक्तीला आपण ओळखलं नाही असं दाखवून चालतही नाही. विद्यार्थी वा पालक असेल तर तो “सर” म्हणूनच हाक मारतो. हे गृहस्थही सर म्हणत होते. पन्नाशीच्या घरातल्या मला सर म्हणून हाक मारणारे हे गृहस्थ चाळीस-पंचेचाळीसचे असावेत. म्हणजे ते माझे विद्यार्थी असण्याची शक्यता नव्हती. कदाचित एखाद्या जुन्या विद्यार्थ्याचे पालक असावेत. काहीही असलं तरी आपण गोंधळलो आहोत, त्यांना ओळखलेलं नाही असं दाखवून चालणारं नव्हतं. काहीतरी बोलणं भागच होतं.

“आलो होतो इकडं. काम होतं फॅशन टेक्नाॅलाॅजीमध्ये.” मी.

“हो का ? मग झालं का ?“

“ नाही. तिथल्या मॅडम अजून यायच्यात”.

“मग घरी चला ना.”

“घरी ? नाही. नको.”

“सर, चला ना. इथंच तर आहे.”

“अहो, नको. मॅडमनी दहाची वेळ दिली आहे. “

“बरं. निदान चहा तरी घ्या.” बोलता बोलता त्यानं चेहर्‍यावरून हात फिरवला.

“नको. मी परत येईन.”

“जस्ट दोनच मिनिटं. अर्धा कपतरी घ्या.” शेवटी त्याच्या गाडीवर बसावं लागलं. मनातल्या कसल्या कसल्या शंकांची वळणं वळत गाडी एका लहानशा टपरीपाशी थांबली.

“आक्का, सरांसाठी कप घ्या.” टपरीवाल्या आक्कांचं हे रोजचं गिर्‍हाईक असावं. ऍक्टिव्हावाल्याची भाषाही ऍक्टीव्ह होती.

“बसा. सर.” एक खुर्ची माझ्याकडे सरकली. बसलो.

“आक्का, हे आमचे सर आहेत बरं का !”

आक्का पातेल्यातला उकळता चहा ढवळत होत्या. ढवळता ढवळताच मानेनं “माहितीय” अशा भावानं मान उडवली गेली. ऍक्टिव्हावाल्यानं हातानंच आक्कांच्या बाजूचं पाकीट उघडलं. पिवळा हत्ती भपकार्‍यासोबत धूर सोडू लागला.

“तुम्ही इकडं कुठं ?” हा कोण असावा हे समजून घेण्याचा माझा प्रयत्न त्याच्या उत्तराने वाया गेला.

“सर, माझी नाईट असते ना. सांगितलं होतं ना मागे.”

“अरे हां. नाईट असते. विसरलो मी. तुम्ही सांगितलं होतंत. मग आता घरी निघाले का.” माझ्या प्रश्नावर किंचित होकारार्थी हाललेल्या मानेजवळून धुराची दोन चार वर्तुळं फिरत फिरत वर गेली.

पिवळा हत्ती आता अर्ध्यावर आला होता. "जस्ट दोनची" पाच-सात मिनिटं झाली होती.

“सर, खरंच तुम्ही घरी चला ना.”

“नाही हो. वेळ होतोय.” मी मधून मधून घड्याळ बघत होतो.

“अहो, दोन मिनिटं चला. अपर्णाला बरं वाटेल तुम्हाला पाहून”. अपर्णा शब्द ऐकताच मी दचकलो. माझ्या मावस बहिणीचं नाव तो सांगत होता. माझी ती मावस बहीण सिंहगड रोड परिसरात धायरीला राहते. पण हे तर नर्‍हे गाव होतं. तरीही मी त्याच्याकडं निरखून पाहिलं. पाहतच राहिलो. पण हा चेहरा मात्र अपर्णाताईच्या नवर्‍याचा वाटत नव्हता. आणि अपर्णाताईचा नवरा मला घरातल्यासारखं “मिलिंद” म्हणून हाक मारतो. त्यानं सर म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

“काय करतात ताईसाहेब सध्या ?” त्यानं त्याच्या अपर्णाचं नाव काढल्यानं मला तिची चौकशी करावीच लागणार होती. नाहीतर बरं दिसलं नसतं.

“ट्यूशनचंच चालू आहे. अजून जमलं नाही कुठं. “

“जमेल. थोडा वेळ लागतो ट्यूशन म्हटलं की”, मी चहाचा कप परत आक्कांकडे देत घड्याळात पाहिलं.

“सर, बसा तुम्ही. दोन मिनिटांत तुम्हाला आणून सोडतो. नवं घर घेतलंय. बघून जा.” त्यानं माझा हात पकडला आणि ऍक्टिव्हाकडे चालू लागला.

“अहो, हे काय ? जायचंय मला.”

“सर, मी आणून सोडतो ना.” मी पुरता फसलो होतो. आता नाहीही म्हणता येत नव्हतं. निमूटपणाने त्याच्यामागे बसलो.

ऍक्टिव्हा चांगला रस्ता सोडून कुठून कुठूनशी चालू लागली. खड्ड्यांतून जाताना त्याला गाडीचा तोल सावरत नव्हता. मी सॅग चाचपू लागलो. सॅगमध्ये शेदीडशे रुपये असावेत. लॅपटाॅप रात्री घरात ठेवायचा विसरला होता हेही जाणवलं. चालत्या गाडीवरच मोबाईलची बॅटरी तपासली. बर्‍यापैकी फुल्ल होती. सेव्ह केलेले कुठले कुठले नंबर्स शोधू लागलो. धडधडत्या गाडीवर स्वतःला सावरत मधून मधून “हो का ?”,”मग बरोबर आहे” वगैरे प्रतिसाद देत होतो. एका बंगल्यापाशी ऍक्टिव्हा थांबली. उतरलो.

“सर, हे आपलं घर.”

“वा! चांगलंय ना, स्वतःचं घर .”

“स्वतःचं कुठलं सर ? रेंटल आहे.” ऍक्टिव्हा एव्हाना स्टँडवर आली होती. चावी काढून त्यानं खिशात ठेवली.

“या सर.” बंगल्याच्या कंपाउंडचे दार उघडून तो पुढं गेला. मी मागे गेलो. बंगल्याचं त्यानं उघडलेलं दार मी नुसतंच लोटून घेतलं.

बंगल्यात अजून कामं चालली असावीत. फळ्या, खिळे, फेव्हिकाॅल वगैरे बरंच काही होतं. इकडं तिकडं पाहिलं. कामगार दिसत नव्हते. ऍक्टिव्हावाला जिन्याच्या पायर्‍या चढून वरती चालला होता. पाठीवरची सॅग काढून सर्व चेन्स तपासल्या. लावून घेतल्या.

वर जाताच त्यानं हलक्या हातानं कडी वाजवली.

“बेल अजून बसवायचीय.” आपला बंगला अजून तयार नाही याचं वैषम्य अजून न बसवलेल्या बेलनं दाखवलं.

“ओके”, मला काहीतरी बोलणं भागच होतं.

आतून दार उघडलं गेलं.

“सर आलेत” एक साधारण चाळिशीच्या महिलेनं “हो का, या या” म्हणत माझं स्वागत केलं.

“या सर, बसा.” मी घराचं निरीक्षण करत होतो.

“आम्ही दोघंच असतो सर इथं”. म्हणजे दार उघडणार्‍या त्या बाईच अपर्णा नावाच्या ट्यूटर होत्या, हे कळलं.

“ दोघंच ?”

“ हो. अवंती आता इथं नसते ना.”

“अच्छा.” अवंती म्हणून अजून एक सदस्य केव्हातरी इथं असायची हे कळलं.

"अवंतीचं काय चाललंय सध्या ?" हेरगिरी करण्याबरोबरच वेळ काढायला असे प्रश्न छान उपयोगी पडतात.

"प्रॅक्टिस करते ना ती." म्हणजे अवंती विशीपेक्षा मोठी असावी. माझी 'मास्तरकी' सुरू होऊन वीस वर्षे झाली आहेत. म्हणजे अवंती माझी विद्यार्थिनी असण्याची शक्यता कमी झाली होती.

"हो. बरोबर. " हो म्हणणं भागच होतं.

"प्रॅक्टिस छान चालली असेल. तशी हुशार ती." नुसतं 'हो बरोबर' म्हणणंही असभ्यपणाचं दिसलं असतं.

"खूप चांगले चांगले क्लायंट्सेत सर तिचे." डाॅक्टरच्या गिर्‍हाइकांना 'पेशंट्स' म्हणतात. अवंतीच्या गिर्‍हाइकांना 'क्लायंट्स' म्हटलं गेलं होतं. म्हणजे अवंती डाॅक्टर नसावी.

“अपर्णा, चहा”.

“अरे, नको. आताच घेतला ना.”

“सर, तुम्ही घरातून तसेच जाणार का ?”

“नाही मी परत येईन.”

“अपर्णा, सरांशी बोलून घे ट्यूशनचं.”

“काय ?” मी धास्तावलो होतो.

“हो सर. तुम्ही आणि अपर्णा मिळून ट्यूशन घ्या.”

“हे कसं जमणार ?”

“जमवाच सर तुम्ही.”

“अहो, पण माझी ड्यूटी ?”

“तुम्ही शिकवू नका हवंतर. तुमचं नाव तर राहू द्या.”

“अहो, काय बोलताय?”

“हो सर. इथंच जवळ एक शाॅप घेतोय मी. तिथं बॅनर लावायचा. बॅनरवर तुमचं नाव पहिलं आणि वरती असेल.”

तो काय बोलतोय, काय चाललंय तेच मला कळत नव्हतं.

“अपर्णा म्हणते सध्या घरीच घेऊ या. सर, तुम्हाला काय वाटतं ?”

“बरोबर आहे त्यांचं.” मी त्या महिलेकडं पाहत म्हटलं. त्या मला निरखून पाहत असाव्यात.

“अपर्णा, बघ आता. तू आणि सर मिळून ठरवा.”

“नाही. घरीच ठीक आहे.” त्या बाईंचा घराचा बराच आग्रह चालला होता.

“सर, वरच्या मजल्यावर बरीच जागा आहे. या दाखवतो.”

“अहो, फिरवताय काय त्यांना. बसू द्या ना”. त्या महिलेला वरची बरीच मोठी जागा मला दिसू द्यायची नसावी.

“नाही. असू दे. सरांची नजर चांगलीय. ट्यूशनची वरची जागा तेच ठरवतील.”

आता त्याच्या पाठोपाठ वरती जावं लागणार होतं. सॅग तिथंच ठेवली. थोडं मोकळं वाटत होतं.

वरची जागा दाखवून त्यानं टेरेसवर नेलं. टेरेसवरून बराच दूरचा परिसर दिसत होता.

“ते इंग्लिश मीडियम का ?” मला मघाशी पाहिलेली कमान दिसत होती.

“हो. सर, तिथं तुमची ओळख आहे का ?”

“का ?”

“मुलं मिळतील ना ट्यूशनची.”

“अहो, मग समोर जेएसपीएम आहे. त्यांचं ब्लाॅझम स्कूल आहे ना.” मला जेएसपीएमचा भलामोठा बोर्ड दिसत होता.

“हो सर. तिथंपण ओळख आहे का तुमची ?”

“बघायला लागेल.” मी पुन्हा घड्याळ पाहिलं. टेरेसवरून खाली उतरायला सुरुवात केली.

“बघ अपर्णा. सरांची जेएसपीएममध्येही ओळख निघेल.”

आम्ही परत खाली आलो होतो.

“हो. का ?” बाई फार बोलत नव्हत्या.

"अहो, अवंतीच्याही ओळखी असतील ना ?" माझी ओळख त्यांच्यावर ढकलण्याचा एक प्रयत्न करून पाहिला. पण पुढच्याच उत्तराने तो वाया गेल्याचंही जाणवलं.

"नाही सर. अवंती किती दोन वर्षच होती. आपल्याकडं."

"असंय का ?"

"हो, सर. अवंती आपल्याकडं पीजी होती."

म्हणजे अवंतीची ही तरफदारी फारशी उपयोगी पडणार नव्हती. आता अवंतीपुराण गुंडाळायचं होतं.

"ती पीजी होती ?" खोटं आश्चर्य दाखवून कार्यक्रमाच्या भैरवीचा माझा प्रयत्न.

"हो."

मी चेहर्‍यावरही आश्चर्य दाखवलं.

"लोक फसायचे सर. घरातल्यासारखी राहायची ती."

"मलासुद्धा ती तुमच्या रिलेटिव्ह्जसारखी वाटली होती."

ऍक्टिव्हाला मीही फसल्याचं क्षणिक सुख मिळून गेलं. मलाही हेच हवं होतं.

"कुठलीय ती?"

"इचलकरंजी !"

"अच्छा!"

काही क्षण तसेच जाऊ दिले.

"पण दोन वर्षांत तिनंही ओळखी वाढवल्या असतील नं?"

"पण सर आता ती नाहीय ना"

"हो. बरोबरय तुमचं. पण तिनं राहण्याचं ठिकाण सांगताना आपलंच घर सांगितलं असणार ना ? तिच्या ओळखीच्या लोकांचीही मदत होईल ना ?" माझा प्रयत्न वाया गेल्याचं दोघांच्याही भावनाशून्य चेहर्‍यांनी सांगितलं. आता सावरून घ्यावं लागणार होतं. "बघू या. मी मित्रांशी बोलतो."

"तिचं न् तुमचं छान जमायचं सर." हो किंवा नाही ही दोन्ही उत्तरं संकटात टाकणारी ठरली असती. मी उसनं हासू दाखवून विषय सोडून दिला.

"आपण तर प्रयत्न करूच, पण आणखीही सोर्सेस शोधू या." मी सॅग हातात घेतली.

“सर, तुम्ही परत केव्हा याल ?”

मी शांत.

“तुम्ही सकाळी फिरायला येता ना ?” त्या बाईंनी अवघड प्रश्न विचारला होता. मला उत्तर देताच येत नव्हतं. मी हसून विषय सोडून दिला.

“हो सर. काकूपण येतात ना ?”

“काकू ?” त्याच्या काकूंना माझ्याही आधी त्यानं पाहिलं असावं. त्याचा काॅन्फिडन्स सांगत होता.

“तुम्ही स्वामी नारायणाला येता ना ?” त्या बाई अवघड प्रश्न फिरून फिरून विचारत होत्या.

“केव्हातरी.” त्यांच्या प्रश्नांची सावधपणानं उत्तरं द्यावी लागत होती. सारखं हसून विषय सोडून देणंही जमणारं नव्हतं.

“काकू मात्र रोज येतात हं”. स्वामी नारायणाचं स्मरण करत मी मान डोलवली. सॅग पाठीवर टाकली. ऍक्टिव्हावाला माझ्या शेजारून चालू लागला. तोंडातला भपकारा असह्य वाटत होता. मघाशी वरच्या मोठ्या जागेतही रिकाम्या बाटल्यांची एक रांग दिसत होती. बहुधा ट्यूटरच्या परवानगीनंच बाटल्यांचा तो संग्रह होत असावा. मी सॅग सावरली.

“सर, या परत”. येस म्हणत मी बाहेर पडलो.

“आणि ट्यूशनचं लक्षात ठेवा हं.”

“होय.” मी जिना उतरू लागलो, त्या वेळी “सरांना सोडून येतो” असे शब्द ओझरते ओझरते अपर्णाकडे गेले. “हो” या एकाक्षरी तुटक प्रतिसादाने मला निरोप दिला. पाठोपाठ दारही आपटलं गेलं.

पुन्हा एकदा धडधडता तोल सावरत आम्ही फॅशन टेक्नाॅलाॅजीजवळ आलो.

“सर, सोडू इथं ?”

“थँक्यू”. मी उतरलो.

“सर, परत या हं. आणि काकूंना घेऊन या.”

“नक्कीच !”

“बाय सर. नीट जा हं.”

मला नीट जायला सांगून ऍक्टिव्हा निघून गेली. मी पाहत राहिलो. ऍक्टिव्हा दूर दूर जात होती.

माझ्या डोळ्यांसमोर अपर्णाताईंचा बॅनर तरळू लागला होता. मोठ्या अक्षरांत वरती लिहिलेलं माझं नाव प्रोफेसर वगैरे शब्दांसह माझ्यासमोर वार्‍यावर झुलू लागलं होतं. मला घरीच ठीक चाललेली ट्यूशन दिसू लागली. घराच्या बाहेर लावलेली ऍक्टिव्हा खिडकीतून दिसत होती. अपर्णा एका विद्यार्थ्याला माझी ओळख करून देत होत्या. तोंडातून बाहेर पडणार्‍या भपकार्‍यासह तो विद्यार्थी माझ्याकडं पाहत माझी ओळख करून घेत होता. मी उभ्यानंच त्याच्याकडे पाहत होतो.

“सर, बसा ना.”

अचानक आलेल्या मोठ्या आवाजानं मी दचकलो. कांचन मॅडम मला बसायला सांगत होत्या.