गावोगावी ...(१०)

जमिनीमध्ये रुजलेले रोपटे मुळासकट उखडून दुसरीकडे पेरायचे. त्याची काळजीपूर्वक निगराणी करायची, नवीन जागी ते रुजेल याची काळजी घ्यायची हे सर्व जिकिरीचे काम आहे. त्याला भरपूर वेळ द्यायला लागतो, आणि कष्टपण घ्यावे लागतात. बागकामाची नवीन तंत्रे विकसित होत आहेत. आता एखादे पूर्ण वाढ झालेले झाड देखील मुळासकट काढून दुसरीकडे रुजवण्याची पद्धत विकसित झालेली आहे. त्यात ते झाड मरून जाण्याचा धोका देखील असतोच.

माझे पुण्याहून सिंगापूरमध्ये जाणे तसेच काहीसे होते. माझे जन्मगाव जरी अहमदनगर असले, तरी माझे माहेर - सासर पुण्यातच. इथे आमचा वडिलोपार्जित वाडा होता. आजवरच्या आयुष्यात पुणे सोडून दुसरीकडे रहाण्याची -- बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी - कधीच वेळ आली नव्हती. त्यामुळे आता दुसऱ्याच कुठल्या देशात, शहरात राहायला जाण्याची कल्पना मला असह्य होत होती. परंतु आता इलाज नव्हता. त्यातल्या त्यात एक सुख होते, ते म्हणजे मला सिंगापूर मध्ये राहायचे होते.

सिंगापूर हे एक सुंदर आणि नीटनेटके शहर आहे. इथे शांतता आणि स्वच्छता सगळीकडेच आढळते. नागरिकांच्या गरजा ओळखून सर्व सोयी सुविधा पुरविणारे कुशल आणि तप्तर प्रशासन इथे आहे. नियम आणि कायद्याच्या चौकटी ज्यांना मान्य आहेत, त्यांना इथे रहाणे नक्कीच सुखकर वाटते. सिंगापूर एक प्रगत देश आहे ज्यात सामान्यातल्या सामान्य नागरिकांच्या गरजांचा विचार झालेला दिसतो. आर्थिक समृद्धी आणि प्रगती बरोबरच इथे लोककल्याणालाही तितकेच महत्त्व देण्यात आलेले आहे हे विशेष.

तर अशा सुंदर आणि संपन्न देशांमधे काही काळ तरी वास्तव्याची संधी मला प्राप्त झाली म्हणून मी परमेश्वराचे आभार मानत होते. पण नवीन देशात सारे काही स्थिरस्थावर होण्यासाठी काही काळ जातोच. मुलाची शाळेची प्रवेश प्रक्रिया, नवीन घर आणि इतरही काही लहानमोठ्या गोष्टी मार्गी लागल्या होत्या. आणि नाताळची सुट्टी सुरू होत होती. आजवर उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आणि माझा मुलगा, त्याच्या बाबाकडे (तो ज्या गावात, शहरात, देशात असेल तिथे) जात असू. नाताळच्या सुट्टीत आम्ही दोघे पुण्यात आणि माझे पती अन्य कुठल्या शहरात अथवा देशात अशीच स्थिती असे. आजवर एकत्र प्रवासाचा योग देखील क्वचितच आलेला होता... पण त्या वर्षी परिस्थिती निराळी होती.

यावेळी आम्ही इंडोनेशिया मधील बाली येथे जाण्याचे निश्चित केले. प्रवासाची तशी फारशी तयारी करायची नव्हतीच, आणि आम्ही जकार्ताला जाणाऱ्या विमानात बसलेले होतो. सिंगापूर- जकार्ता अंतर जेमतेम दोन तासांचे.. आणि तिथून पुढे बाली.

निसर्ग सौंदर्याने नटलेले बाली, प्रथम दर्शनीच भुरळ घालते. सर्वत्र हिरवागार निसर्ग, सुबक ठेंगणी घरे आणि माणसे सुद्धा. बालीमध्ये महाभारत कथेतील अनेक पात्रांचे पुतळे जागोजागी आढळतात. तिथे मी ब्रम्हाचे मंदिर पाहिले आणि विष्णुचे देखील.

बालीतील नागरिक काही हिंदु आणि बरेचसे मुस्लिम आहेत. तिथे हिंदु देवदेवतांची मंदिरे आहेत, नित्यनेमाने पूजासुद्धा केली जाते.. अर्थात त्यांच्या पद्धतीने. तिथले सर्वजण कलाकारच असावेत, अगदी दुकानातून एखादी वस्तू विकत घेतली तर ती अशी सुंदर पद्धतीने वेष्टनात बांधून देतात की बघत राहावे.

वेताच्या वस्तू, लाकडी मूर्ती, पाना फुलांची सजावट सारे काही सुंदरच. तिथल्या एका मंदिरात सुंदर आणि सुडौल बालिनीज युवक आणि युवतींचे नृत्य बघण्याचा योग आला. खरे म्हणजे ती नृत्य नाटिकाच होती. वेगवेगळे मुखवटे लावून त्यांनी महाभारतातील एका प्रसंगाचे सादरीकरण केले होते. छोटासा वाद्यवृंद आणि संवाद बोलणारे बाजूला होते. नृत्य करणारे कलाकार बोलल्या जाणाऱ्या संवादावर अथवा वाद्यवृंदाच्या संगीतावर अभिनय करीत होते. जरतारी आणि चकचकीत रंगांचे त्यांचे पोशाख होते, तसेच दागिने देखील. स्त्रियांनी त्यांच्या मस्तकावर उंच मुकुटासारखे काहीतरी घातलेले होते. त्यांचा नाट्यप्रवेश संपल्यावर त्यातल्या एका स्त्री कलाकाराने आम्हा तिघांबरोबर फोटो काढून घेतला, तो एका चीनी मातीच्या गोलाकार थाळीवर छापला. मला वाटले आम्हाला ती तो देणार ..तसा दिलाही पण विकत, असो.

बाली मध्ये काही जिवंत, मृत आणि निद्रिस्त ज्वालामुखी आहेत, आणि ते पाहण्यासाठी प्रवाशांची नेहमी गर्दी असते. डोंगर चढून जाऊन ज्वालामुखीचे दर्शन करणे माझ्यासाठी तरी अशक्य होते, मग माझ्यासारख्या हौशी पण आळशी प्रवाशांना पहाता येईल असा ज्वालामुखी पहाण्याचे ठरले. अर्थात त्यावेळी तो ज्वालामुखी निद्रिस्त होता हे सांगायला हवे का?

तिथल्या किंतामणी नावाच्या गावाजवळ असलेला हा माऊंट बतोर किंवा बातोर किंवा बाटोर. अनेक वेळा लाव्हा वाहिल्याने तो डोंगर पूर्णपणे काळा झालेला आहे, त्यावर गवताचे एक पात देखील नाही. डोंगराच्या पायथ्याला एक लहानसे क्षुधाशांती गृह होते, म्हणजे अक्षरशः घरच वाटावे असे. त्याच्या व्हाराड्या मध्ये दोन तीन मेजे होती आणि भोवताली खुर्च्या .. सारे वेताचेच. तिथे आम्हाला थंड पाणी आणि काही पदार्थ दिले. इतर प्रवाशांनी रंगीत पेये घेतली होती. भात आणि चिकन चा काहीतरी पदार्थ होता, आणि नावालाच काही शाकाहारी पदार्थ. पण जेवणाचा स्वाद अप्रतिम आणि ते जेवण असे कलात्मक पद्धतीने वाढलेले होते की बघूनच डोळे निवले.

बाली मध्ये तानालॉट नावाचे एक विष्णूमंदिर आहे. मी बराच वेळ त्या नावाची उत्पत्ती कशी झाली असावी, कशाचा अपभ्रंश असेल वगैरे शोधण्याचा प्रयत्न केला.. पण काहीच सापडले नाही. संध्याकाळची वेळ होती. मंदिर समुद्र किनाऱ्यावर आहे. अजून तरी समुद्र शांत होता. आमच्यासारखे अनेक प्रवासी तिथे होते. तिथे एका भलामोठा अजगर आम्ही पहिला. तो जिवंत होता म्हणे.. पण निद्रिस्त होता. मुले माणसे त्याच्या अंगावर बसत होते, उभे रहात होते .. फोटो घेत होते पण त्या अजगराने जराही हालचाल केलेली मी पाहिली नाही. पु.लंच्या अंतू बरवा ची आठवण झाली, "परांजप्या जागा आहेस का झाला तुझा अजगर?"

आता पाण्यावर सूर्यकिरणांचा खेळ सुरू झाला होता. अथांग सागराच्या लाटा जणू आकाशाला स्पर्श करण्याकरता उसळत होत्या. आम्ही मंदिर असलेल्या खडकावर उभे होतो तीन बाजूने समुद्राच्या लाटा उसळून त्या खडकावर आदळत होत्या, त्यांचा शुभ्रधवल फेस सर्वत्र पसरत होता. लालभडक सूर्यबिंब समुद्रात बुडत होते. ते सगळे दृश्य माझ्या आठवणींमध्ये कोरले गेले आहे. शांत वातावरणात गंभीर पण थोडे भय उत्पन्न करणारी समुद्राची गाज ऐकू येत होती. पूर्ण अंधार व्हायच्या आधीच आम्ही माघारी परतलो होतो.

बालीचे म्हणजेच इंडोनेशियाचे चलन रुपिया. पण त्या रुपियाचे गणित तिथे असेपर्यंत मला गोंधळात टाकत होते. एक सँडविच घ्यायला गेले.. किंमत ९००० रूपिया, थंड पेयाची बाटली १२००० रूपिया. मी आधी ते भारतीय चलनात किती होतात ते मोजत होते, मग लक्षात आले माझ्याकडे (सिंगापूर)डॉलर्स आहेत. पण शेवटी मी तो प्रयत्न सोडून दिला.

बाली एक नितांत सुंदर प्रदेश आहे. अनेक कला कौशल्ये अवगत असलेली तिथली माणसे आहेत. त्यांचा निर्वाहासाठी प्रमुख व्यवसाय म्हणजे तिथे येणाऱ्या प्रवाशांची खातिरदारी करणे, निरनिराळ्या युक्त्यांनी त्यांना रिझवणे. तिथली माणसे आहेत मात्र कष्टाळू. अगदी लहान लहान घरातील महिला, मुले, वयस्क माणसे काही ना काही उद्योगात मग्न असतात.

एका कॉफीच्या मळ्यात आम्हाला नेण्यात आले होते.बांबूने बांधलेले लहानसे खोपटे तिथे होते. शेजारी एक उंच झाड आणि त्याच्याखाली काही लाकडी बाके ठेवली होती. चीनीमातीच्या लहान पेल्यामधे आम्हाला वेगवेगळ्या कॉफीची चव घेण्याची संधी मिळाली. आमच्यापैकी कुणीच कॉफी एक्स्पर्ट नसल्याने आम्हाला त्यात फारसे गम्य नव्हते, पण तो अनुभव खूप छान होता.

आम्ही रहात असलेले हॉटेल तसे साधेसुधे होते पण ठिकठिकाणी कलात्मकता दिसून येत होती. तिथल्या स्वागत कक्षात मांडलेल्या वेताच्या कोचावर ठेवलेल्या लहान लहान उशा, वेताच्या तिवइवर सुबक काच ठेवून तयार केलेले टेबल, जागोजागी ठेवलेल्या लाकडी मूर्ती, सुंदर फुलदाण्या सारे काही मन प्रसन्न करणारे. पुण्यातल्या वाड्यासारखीच त्या हॉटेलची रचना होती. चहूबाजूने दोन (किंवा तीन असतील) मजली इमारती आणि मधोमध चौक. तीन बाजूला ओसरी सारखी जागा आणि लाकडी खांब होते. त्याच्या पलीकडे पाहुण्यांच्या खोल्या. चौकात एक लहानसा गोलाकार तलाव. त्या तलावाच्या आत बसण्यासाठी पायरी अथवा कट्टा बांधलेला होता. बऱ्याचवेळा काहीजण तिथे पेये आणि खाद्य पदार्थ घेऊन रात्री उशिरापर्यंत मौजमजा करीत असत, बालीमधील उष्ण हवा त्या थंड प्रदेशातून आलेल्या पाहुण्यांना सोसत नसे.

आमच्या हॉटेलच्या आसपास अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स होती. तिथल्या रस्त्यावरचे दिवे मंदप्रकाशी होते, मोठ्या मोठ्या झगमगणाऱ्या शहरातून आलेल्यांना तो प्रकाश सुखद वाटत असणार. आसपास अनेक लहान लहान दुकाने किंवा स्टॉल्स होती. त्या दुकानातून तिथल्या कलावंत माणसांच्या हातून घडलेल्या अमूल्य अशा लहानमोठ्या कलाकृती मांडलेल्या होत्या. 

बालीमध्ये आल्यापासून निनिराळी ठिकाणे पहाण्यासाठी एका खाजगी वाहनातून प्रवास चालू होता. घरी परतण्याचा दिवस अगदी उद्यावर आला होता. साध्या, सुंदर बालीने आम्हाला मोहून टाकले होते. 

त्या दिवशी हॉटेल जवळच असलेल्या (म्हणजे अगदी चालत जाता येईल इतक्या अंतरावर असलेल्या) समुद्रकिनाऱ्यावर जायचे ठरले होते. किनाऱ्यावर लाकडी होड्या ठेवलेल्या होत्या, शोभेसाठी. खुर्ची-टेबल ऐवजी विश्रांतीसाठी त्या वापरायच्या. तिथे वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स चालले होते. तोवर थोडासा कंटाळलेला आमचा छोटा क्रीडापटु उत्साहात होता. "बाबा तिकडे चल, बाबा मला तिथे जायचे आहे, .." असे चालू होते. त्याचा बाबा लाडक्या लेकाचा हट्ट तितक्याच उत्साहाने पुरवत होता. मी मात्र एका लाकडी होडीमध्ये बसून तो सर्व नजारा पहात होते. तिथे काचेचा तळ असलेली बोट होती, त्यातून खूप खोलवर असलेले समुद्री जग पाहता येत होते. 

आज तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर जेवण घ्यायचे ठरले. बाली मधले सर्व दिवस प्रवासात गेले होते. आजचा दिवस जरा निवांत होता, दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरू होणार होता.

किनाऱ्यावरील वाळूत एक गोलाकार टेबल मांडले होते, त्या भोवती तीन खुर्च्या. काचेच्या उंच पेल्यामधे आम्ही तिघांनी मागवलेली पेये आणून दिली. तिथे आमच्या प्रमाणे बरेच प्रवासी होते, पण प्रत्येक टेबलाच्या मध्ये भरपूर अंतर होते. त्यामुळे गर्दी असूनही काहीसा शांत एकांत होता. ओहोटीची वेळ होती. लहान लहान लाटा किनाऱ्याला स्पर्शून माघारी जात होत्या. तिथे काही मेणबत्त्या आणि थोडेफार पिवळसर प्रकाश देणारे दिवे इतकाच प्रकाश बाकी सर्वत्र अंधार होता. समोरचा समुद्र तर काळ्याकुट्ट अंधारात हरवलेला होता. किनाऱ्यावरील सारेजण काही न बोलता हातातील पेयाचा आस्वाद घेत होते. वातावरणच असे होते की न बोलता फक्त अनुभवावे. आवाज होता फक्त समुद्रातून किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांचा.

आमच्यासमोर पदार्थ मांडण्यात आले, ते काय होते आता माझ्या लक्षात नाही. तितक्यात तिघेजण वाद्ये घेऊन तिथे आले. आमच्या टेबल जवळ उभे राहून, त्यांनी त्यांची वाद्ये सज्ज केली आणि निरनिराळ्या सुरावटीनी सारे वातावरणच जादुमय केले होते. आम्ही शांतपणे त्या अनोख्या वातावरणात संगीताचा आस्वाद घेत होतो. सुरुवातीच्या काही अनोळखी सुरावटी नंतर त्यांनी एक नवीन सुरावट छेडली. मला ती ओळखीची वाटत होती, काही क्षणानंतर खात्रीच झाली.. एका हिंदी चित्रपटातील गाण्याची धून होती ती. त्यातल्या एकाने विचारले.. तुला ओळखीची वाटली का धून? मी म्हणाले अर्थात. मग त्याने हसत म्हणले "राज कपूर .. बरोबर ना व्हेरी गुड म्युझिक व्हेरी गुड" एका भारतीय कलाकाराचा चाहता अशा दूरदेशी आहेे, हे बघून खूप छान वाटले. संगीताला भाषा नसते हे खरेच.

बालीचा आणि माझा सहवास तेव्हढाच होता, आम्हाला आता घरी परतायची ओढ होती. विमानतळावर आम्हाला नेणाऱ्या विमानाची वाट बघत होते. सुंदर आठवणींचा खजिनाच मी माझ्याबरोबर घेऊन जात होते. बाली मधील वास्तव्यात डोळ्यात भरलेला हिरवा रंग, मनात उतरून पाचू सारखा लखलखत होता.


(क्रमशः)