अखईं तें जालें ● तुकाराम: हिन्दुस्तानी परिवेशात


उपोद्धात

मराठी भाषा आणि लोकजीवनाचा विचार करू जाता म्हांइभट, महदंबा, ज्ञानेश्वर, मुकुंदराज, केसोबास, नामदेव अशी लोकभाषिक साहित्याची परंपरा पुढे तुकारामांच्या कवितेत उत्कर्ष पावलेली आहे. ह्या कवितेची लोकभाषा पुढे आधुनिक मराठीत उत्क्रांत हो‌ऊन जनजनांची संवाद वाहिनी झालेली दिसून येते. तुकारामांची शब्दकळा, वाक्यप्रयोग आणि प्रतिमा/रूपकांचा आवाका प्रचंड आहे. तत्कालीन जनजीवनातल्या प्रतिमा आणि रोजच्या व्यवहारातले शब्द तुकारामांनी सढळ हाताने वापरले आहेत. ह्यातले अनेक शब्द आता भाषेच्या वळणाबाहेर गेल्याने बऱ्याच कवितांचा समाधानकारक अर्थ लावणे कठीण हो‌ऊन बसलेले आहे. हा खरेतर एक मोठाच विरोधाभास आहे; एकीकडे लोकोक्ती बनून बसलेल्या तुकारामांच्या सुलभ-सरस कवनांची संख्या मोठी असली, तरी एक युगद्रष्टा कवी म्हणून असलेलं तुकारामांचं कर्तृत्व ह्या पलीकडचं आहे. त्याला केवळ कवितेचेच नव्हे तर भाषेचे देखील आयाम आहेत. मोठा कवी केवळ कविता लिहीत नसतो, तो भाषाही घडवत असतो - प्रचलित भाषेला ठाशीव, रेखीव आकार देत असतो; आणि हे करत असताना भवतालच्या सामूहिक सुखदुःखांचे बखान देखील करीत असतो. ऐतिहासिक दृष्ट्या सुंदोपसुंदीने भरलेल्या सतराव्या शतकात, एकीकडे आधीच्यांची शब्दवेल्हाळ, दृष्टांतकी कविता आणि दुसरीकडे धगधगणारे सामाजिक वास्तव, ह्या सांदणदऱ्याच्या मधोमध पाय रोवून ठामपणे उभे असलेल्या तुकारामांच्या लेखन व्यवहाराचा व्याप मोठा आहे. गाथेवरील ह्या आधीच्या व्याख्याकारांनी तुकारामांच्या अर्थनिर्णयात मौलिक काम करून ठेवलेले असले, तरी ढोबळ आध्यात्मिक अर्थांच्या बाहेर पडून कवितेच्या मानुषी रंगात तुकारामांचे कवित्व बघितले जाण्याची नितांत आवश्यकता होती. सदर ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाने ही निकड बऱ्याच प्रमाणात पूर्ण केली आहे असे वाटते. तुकारामांचे लेखन एखाद्या महासागराप्रमाणे विशाल आहे. ह्या पसाऱ्यातून बहुस्तर रचना निवडून त्यांचा सखोल परामर्श घेणे सोपे नाही. हे प्रचंड आवाक्याचे आणि अनेक नव्या वाटांकडे निर्देश करणारे काम मराठी साहित्यासाठी एक ठाशीव उपलब्धी बनून उतरले आहे.

कुठल्याही भाषेतलं, कुठल्याही कालखंडातलं मोठं साहित्य सामाजिक अथवा भौगोलिक पोकळ्यांमधून बनत नाही. जाणता कवी जागा असतो, डोळस असतो. जगाकडे बघण्याची त्याची दृष्टी बहुस्तरीय आणि लोकोन्मुख असते. त्याचे बह्वंशी काम एकांतात होत असले तरी जगण्याच्या, भाषेच्या आणि सामाजिक संकेतांच्या पलीकडे जा‌ऊन त्याचे सततावलोकन सुरू असते. तुकारामांच्या कवितेचा विचार महाराष्ट्री भूगोल आणि लोकजीवनापुरता मर्यादित न ठेवता हिन्दुस्तानी काव्यजीवनाच्या पटलावर करून चव्हाण यांनी अभ्यासक तसेच वाचकांना एक नवा दृष्टिकोन दिला आहे. कधी मीर, गालिब, कबीर ह्या हिंदुस्तानी किमयागारांच्या काव्यप्रतिभेच्या, तर कधी प्राचीन दर्शनांच्या मनोहारी तत्वचिंतनाच्या उजेडात तुकोबांची कविता आकळू बघणारे हे चिंतन अभिनंदनास पात्र आहे.

संशोधनात्मक साहित्याचे काम स्वतःच्या संकल्पना इतरांपुढे मांडणे नसून प्रस्थापित विचारसरणी आणि दृष्टिकोनांमध्ये मूलगामी बदल घडवून आणणे होय. तुकारामचिंतनाच्या नव्या पा‌ऊलवाटा शोधू बघणारे हे संशोधन ह्या दृष्टीतून देखील महत्त्वाचे ठरते.

अनंत ढवळे

हर्डंन, व्हर्जिनिया

...

समीक्षाग्रंथः अखईं तें जालें ● तुकाराम: हिन्दुस्तानी परिवेशात
लेखकः समीर चव्हाण
आवृत्ती : पहिली | हार्ड बाऊंड |खंड १: पृष्ठे ३५०, खंड २: पृष्ठे ६००
प्रकाशकः शुभानन चिंचकर, स्वयं प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठः भास्कर हांडे
छायाचित्रे: रुपेश शेवाळे
प्रकाशनः २२ जुलै, ६.०० वा. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

या समीक्षाग्रंथाचे दोन्ही खंड प्रिन्टिंगला गेले आहेत. मूळ किंमत १४००/- तर सवलतीत १०००/- (पोस्टेज या समीक्षाग्रंथाचे चार्जेस सहित) मध्ये देत आहोत. प्रकाशनानंतर दोन्ही खंड लगेच पाठवले जातील. बुकिंग साठी ९७९३४७१७५१ या क्रमांकावर पेटीएम्/गूगलपे करून मेसेज शेअर कराल. सोबत पत्ता आणि मोबाईल क्रमांक द्याल. बुकिंग कन्फर्म केले जाईलच.