जिजामाता

⚔️? पोवाडा ?⚔️ 

 "जिजामाता"

पहिले पुष्प वाहतो गणरायाला

दुसरे वाहतो योगी महादेवाला

तिसरे पुष्प तुळजा भवानीला

चौथे वाहतो जिजामातेला

रं जी जी जी..‌‌.


गांव एक सिंदखेड राजा

लखुजी जाधवांचा तेथे गाजावाजा

पत्नी म्हाळसाबाई प्रिय लखुजीला

पोटी जन्म दिला साक्षात भवानीला

रं जी जी जी...


नाव तीचे त्यांनी ठेविले जिजा

ठसविले मनावर तिच्या तू तुळजा

शिकविले शास्त्र, शस्त्र, युद्धकला

पारंगत झाली न्याय निवाड्याला

रं जी जी जी...


तीने वरिले भोसले शहाजीला

निजामीत तोड नव्हती त्या योद्ध्याला 

पुणे जहागीर सोपविली जीजाऊला

दादोजी कोंडदेव दिमतीला

रं जी जी जी...


पुत्र झाला जीजाऊ-शहाजीला 

संभाजी होता त्यांना एक पहिला

शिवाजी नाव दिले दुसऱ्याला

तो शिवाचाच अवतार निघाला 

रं जी जी जी...


मोगलांनी कहर मांडलेला

स्वप्न शहाजी-जिजामातेला

स्वराज्य हवे प्रजा रक्षिण्याला

त्या 'दृष्टीने' घडविले शिवाजीला

रं जी जी जी...


वसा तैसा जिजामातेने घेतला

मित्र मावळे दिले शिवाजीला

ढाल तलवार दिली खेळायला

विररागिणीने वीर रस पाजिला

रं जी जी जी...


राजकारणाचा व्याप मांडीयेला

सिद्ध झाली न्याय निवाड्याला

हर्ष त्याला न्याय ज्याच्या बाजूला

नाराजी नसे दुज पक्षाला

रं जी जी जी...


संस्कार दिले एैसे शिवाजीला

 जैसे बालपणी मिळाले होते तीला

थारा न दिला कधी अंधश्रद्धेला

अर्पिले त्याज तुळजा भवानीला

रं जी जी जी...


शिवाजीनेही जाणले तमाला

शुर मावळे घेतले सोबतीला

गनिमी काव्याने भिडला शत्रुला

वीस-तीस भारी हजाराला

रं जी जी जी...


येता वयात व्याप मोठा मांडला

सह्याद्रीही पाही गर्वाने त्याला

विनम्र शिवा शरण असे 'श्री'ला

निर्मिले 'हिंदुपदपतशाही'ला

रं जी जी जी...


शरण आणले त्याने गनिमाला

सुखी केले त्रस्त रयतेला

चरित्र ऐसे, डाग नाही त्याला

पर स्त्रीत पाही तो जिजामातेला

रं जी जी जी...


अभिवादन त्या दूर दृष्टीला

अभिवादन स्वराज्य स्वप्नांना

अभिवादन त्या संस्कारांना

अभिवादन जिजामातेला

रं जी जी जी...


"प्रसंशानुज" प्रशांत

मनभा १२/०१/२३

९७६७५४३६८५