समाधी !

आध्यात्मिक जगात, समाधी ही संत-महंतांनी स्वतःच्या अज्ञानाने निर्माण केलेली सर्वोच्च भ्रामक कल्पना आहे. 

अमक्यानं समाधी घेतली, ही तमक्याची समाधी आणि गैरसमजाची परिसीमा म्हणजे संजीवन समाधी अशा एकसोएक भंपक कल्पना सर्वांच्या मनात, पूर्वापार धारणा होऊन बसल्या आहेत ! थोडक्यात काय तर समाधी ही कुणा पुण्यात्म्याला, देहान्तानंतर प्राप्त होणारी अवस्था आहे अशी सार्वत्रिक कल्पना आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की समाधीचा देहाशी सुतराम संबंध नाही. ते आता या क्षणी, कायम आणि अपरिवर्तनीय असणारं आपलं आणि सर्व अस्तित्वाचं रूप आहे. 

समाधी हा सर्व प्रकटीकरणाचा आणि घटनांचा आधार आहे. ती निर्वस्तू असलेली स्थिती आहे. व्यक्तीचा जन्म समाधीत होतो, आयुष्याचा सारा जीवनपट समाधीत उलगडतो आणि देह समाधीतच विलीन होतो पण समाधी जशीच्या तशी राहते. या अपरिवर्तनीय स्थितीचा उलगडा म्हणजे समाधी आहे. ती देहाच्या जन्मापूर्वीही होती आणि आता देह जिवंत असतानाही आहे.

 आपण आणि समाधी एक आहोत हा जिवंत असताना झालेला उलगडा संपूर्ण जीवन रंगीत करतो. अमृत हे पेय नव्हे तर तो समाधी या जन्म किंवा मृत्यूनं यत्किंचितही न बदलणार्‍या स्थितीचा उलगडा आहे.

समाधी ही सर्व देहांच्या आरपार असलेली कायम स्थिती आहे त्यामुळे सर्व अस्तित्वच समाधिस्थ आहे. शिवाय ती देहांच्या आरपार असल्यानं आपण आणि समाधी असं द्वैत नाही. आपण स्वतःला व्यक्ती समजत असलो तरी या क्षणी आणि कायम समाधीच आहोत, समाधी घ्यायला देहाच्या मृत्यूची गरज नाही. अहं ब्रह्मास्मी हे विधान सर्वथा चूक आहे. ब्रह्मच असी, तस्मात अहं ब्रह्म असी असा सरळ आणि साधा मामला आहे. म्हणजे मला उलगडा होवो न होवो, समाधीच आहे आणि त्यामुळे मी देखील समाधी आहे कारण समाधी कुणाच्या उलगडा होण्यावर अवलंबून नाही. ज्याला उलगडा होईल तो आनंदात जगेल, ज्याला होणार नाही तो अस्वास्थ्यात जगेल, पण त्यानं समाधीत बदल होत नाही.

समाधी देहाच्या आरपार असल्यानं व्यक्तिमत्त्व हा वैयक्तिक भ्रम आहे. थोडक्यात, समाधीला आपण देहात बंदिस्त असल्याचा भास म्हणजे व्यक्तिमत्त्व. अहंकार ही पूर्वापार चालत आलेली एक भंपक आध्यात्मिक धारणा आहे. अहंकार अशी काही भानगडच नाही, सर्वत्र असणार्‍या आणि त्यामुळे नक्की अशा कुठेच नसणार्‍या समाधीला आपण देहात असल्याचा होणारा भास म्हणजे अहंकार. ती अस्तित्वात नसलेली भासमय कल्पना आहे, तिला हटवण्याचा उपायच नाही. आपण स्वप्न हटवू शकत नाही, निद्रेत सत्य वाटणारा तो भास आहे. तद्वत, अहंकार हा समाधीला झालेला भास आहे हे लक्षात येता क्षणी तो संपतो, घनघोर आध्यात्मिक साधनांनी तो हटवता येत नाही. 

अखिल प्रकटीकरण व्यापणारी समाधी कायम अप्रकट आहे कारण प्रकटीकरण तिच्यात आहे, ती स्वतः कशात प्रकट होणार ? समाधी प्रकट व्ह्यायला जागाच नाही. म्हणजे संगीत शांततेत प्रकट होतं पण शांतता कशी प्रकट होईल, ते असंभव आहे. नाटक रंगमंचावर प्रकट होईल पण रंगमंच प्रकटच आहे, तो सर्व नाट्य व्यापून आहे, तो आणखी काय प्रकट होणार ? 

भक्तीमार्गीयांचा आणखी एक भंपकपणा म्हणजे तो सर्व घडवतोय! समाधी निर्वैयक्तिक आहे, ती शून्य आहे त्यामुळे तिच्या आत किंवा बाहेर कुणीही नाही. थोडक्यात, आपण देहात आहोत हा जसा व्यक्तिगत भ्रम आहे, तसा भक्तीमार्गीयांचा तो म्हणजे समाधी व्यापून उरणारा, समाधीच्या बाहेर उभा असलेला कुणी तरी आहे. सर्व प्रकटीकरण आणि चलन समाधीच्या अंतर्गत असल्यानं ते सर्व आपोआप आहे. जसा व्यक्तिमत्त्वाचा भ्रम घटना घडवू शकत नाही तद्वत ईश्वराचा भ्रम अस्तित्व चलायमान करू शकत नाही. ते स्वयेच प्रकट होतंय, विहरतंय आणि विलीन होतंय. 

आपण हे करतोय, आपण ते करू, आपल्याला तसं करण्याशिवाय गत्यंतर नाही हा समाधीला होणारा कर्त्याचा भास आहे. स्वयेच घडणार्‍या घटनांना, समाधी घडवण्याचा किंवा विरोध करण्याचा व्यर्थ प्रयत्न करते आहे. 

थोडक्यात, तुम्हाला देहरूपी एक सुरेख ऑटोपायलट, ड्रायवरलेस कार मिळाली आहे, तुम्ही नाहक गेयर टाकून, अ‍ॅक्सलेटर वाढवून आणि ब्रेक मारून ती चालवण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे दुहेरी पेच निर्माण होतोय. एक म्हणजे तुम्ही समाधी आहात याचं तुम्हाला सतत विस्मरण होतंय. आणि दुसरं म्हणजे व्यक्तिमत्वाच्या भासात तुम्ही काही तरी आध्यात्मिक प्रयास तरी करताय किंवा कुंडली दाखवून आपलं काय होईल याची चिंता करताय. आणि अगदीच काही नाही तर बिपी, शुगर, कोलॅस्टोरल, वजन आणि मृत्यूचा धसका अशा भलत्याच गोष्टींनी, ऊगीच व्यथित होतांय !

तर सारांश काय ? बुद्धानं कार ड्रायवरलेस आहे हे सांगितलं (शून्य म्हणजे कुणाच्या आत कुणीही नाही) पण कार ऑटोपायलट आहे हे सांगितलं नाही. भक्त कार ऑटोपायलट आहे हे मानतात पण त्यांना ती ड्रायवरलेस आहे हे मंजूर नाही. त्यांचा ड्रायवर कुठे तरी अंतरीक्षात आहे. देह ही एक सुरेख ऑटोपायलट आणि ड्रायवरलेस कार आहे हे तुम्हाला फक्त मंजूर होण्याचा अवकाश आहे की तुम्ही समाधीत जगू लागता.