गावोगावी ... (११)

सिंगापूर मध्ये येऊन आम्हाला आता जवळ जवळ एक वर्ष होत आले होते. इथले नियम, पद्धती ओळखीच्या झालेल्या होत्या. माझा मुलगा तर इथे चांगलाच रुळला होता. आमचे घर मध्यवर्ती भागात होते. घरासमोरच बसस्टॉप होता, थोड्या अंतरावर एम आर टी स्टेशन होते. अतिशय सोयीस्कर असे घर होते. आमचे घर बरेच मोठे होते. सर्व सोयी तर होत्या पण घरातली कामे करण्याकरता कुणी मदतनीस मिळणे कठीणच होते. सर्व कामे मलाच करायची होती.. नाईलाज होता.

माझा दिवस पहाटे ४ वाजताच सुरू व्हायचा. मुलगा आणि पती दोघेही जेवणाचा डबा घेऊन जात. त्यातच शाळेची तयारी, चहा, नाश्ता सारे काही असे. सकाळी ८ वाजता मात्र घर रिकामे होई, पण माझी बाकीची बरीच कामे असत. इतक्या मोठ्या घराची स्वच्छता करणे काही सोपे काम नव्हते. घरात फर्निचर खूप होते आणि घर अगदी रस्त्यालगत असल्याने की काय भरपूर धूळ असे. चादरी, अभ्रे, टेबल आणि सोफ्याची कव्हरे अशा सतराशे साठ गोष्टी सतत बदलणे आणि स्वच्छ करणे हे सुद्धा एक वैतागवाणे काम होते. काहीजण म्हणत मशीन काम करणार ना? मग इतके काय त्यात विशेष? पण त्यांना सांगायला पाहिजे की मशीन मध्ये सर्वकाही जादूने जात नाही. तसेच ते सुकवणे, घडी करून नीट ठेवणे आणि त्यांच्या ऐवजी नवीन आवरणे चढवणे हे करायला सुद्धा कुणी रोबोट येत नाही. घरातली स्वच्छतागृहे स्वच्छ करणे हे अजून एक जिकिरीचे काम होते. मला कधी असे वाटत असे की घरात फक्त तीन नाही तर किमान डझनभर तरी माणसे राहत असावी. आता तपशीलवार वर्णन करत नाही, पण कुणीही मान्य करेल की फार कष्टाचे काम आहे ते. ते काम मला रोजच्या रोज करावेच लागत असे. मला असलेल्या स्वच्छतेच्या सवयीचा त्रास मी भोगत होते. रोजची भांडी साफ करताना माझ्या हातांना साबण आणि पाण्यामुळे भेगा पडायला लागल्या होत्या (डिश वॉशर नव्हता माझ्याकडे तेव्हा, आता आहे पण नादुरुस्त आहे त्यामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे.). मग मी रबरी ग्लोव्हस वापरायला सुरुवात केली. माझ्याकडे मेड येत नव्हती, त्यामुळे काही इलाज नव्हता. काही दिवसांनी मात्र रोज रोज तीच ती शारीरिक श्रमाची कामे करून मला कंटाळा आला होता. त्यात माझा वेळ खूप जात असे आणि दमणूक होई ते निराळेच. नंतर परत संध्याकाळी स्वयंपाक करायचा असे. माझा पूर्ण दिवस फक्त घरकामातच जात होता. मला काही ते ठीक वाटत नव्हते. मग मी माझ्या घरकामाचे एक वेळापत्रकच बनवले. एका दिवशी ठराविकच कामे करायची असे ठरवले. त्यामुळे मला थोडा मोकळा वेळ मिळू लागला आणि मी त्याचा उपयोग करून घेतला.

मी रोज सकाळी जवळच्या घराजवळच्या एका पार्क मध्ये जायला सुरुवात केली. माझ्या जाण्याच्या वेळेस उन्हे चांगली तापलेली असतं, पण पार्क मध्ये भरपूर झाडे होती. मध्ये विस्तीर्ण जलाशय आणि त्याच्या बाजूने गोलाकार असा लाकडी फळ्यांनी तयार केलेला रस्ता होता. प्रवेश स्थानाजवळ दोन तीन लहान घरे होती. त्यांच्या कुंपणाजवळ रंगीत फुलझाडे लावलेली होती. आणि काही कोंबड्या तिथे फिरत असत, घरासमोर कुत्री सकाळचे कोवळे ऊन घेत पहुडलेली असत.
वर्दळ भरपूर असली तरी गोंगाट नव्हता. वाहने नसल्याने प्रदूषण (हवेचे आणि आवाजाचे) अजिबातच नव्हते. त्या जलाशयाची स्वच्छता करणारी एक नाव तिथे कायम असे. पाण्यात वाढलेल्या जलपर्णी साफ करणे हे मुख्य काम. प्रभात फेरी साठी अनेक ज्येष्ठ नागरिक तिथे येत. तसेच धावण्याचा सराव करणारे पण बरेच असत. जलाशयाच्या सर्व बाजूंनी उंच उंच वृक्षांची गर्दी होती. प्रत्येक वृक्षाच्या बुंध्यावर त्याच्या नावाची लहान पाटी होती. ठिकठिकाणी लावलेल्या लाकडी फलकांवर काही वनस्पतींची माहिती लिहिलेली होती.  
जलाशयाच्या भोवताली असलेल्या लाकडी रस्त्यावर जागोजागी लाकडी बाके ठेवलेली होती. जलाशयामध्ये काहीजण कायाकिंग करीत असत. तिथे त्याचे प्रशिक्षण केंद्र होते. दोनही बाजूला निमुळती असलेल्या अगदी अरुंद बोटीत एक किंवा दोघेजण बसू शकेल इतकीच जागा. बोटी (कायाक) वजनाला अगदी हलक्या असतात. एकदा डाव्या आणि नंतर उजव्या बाजूने हातातील वल्ह्याने पाणी मागे सारीत बोट चालवीत असत. कधी कधी त्यांची स्पर्धा देखील असे. त्यांच्यामुळे तो शांत परिसर गजबजून जात. काहीजण नियमित धावण्याचा सराव करीत असत. बरेचसे आजी, आजोबा तिथे येत, हातात छत्री किंवा काठी असे. सिंगापूर मध्ये कधी उन्हाचा ताप असतो तर कधी पाऊस. ऊन आणि पावसा पासून संरक्षण करण्यासाठी छत्री नेहमीच उपयोगी असते.

जलाशयामध्ये मासे आणि कासवे होती. लहान मोठी खूप कासवे होती तिथे. अगदी छोटी पिल्ले मोठ्या कासवांच्या आजूबाजूला तरंगत असत. कासवांची वसाहतच असावी ती. काही वेळा भली मोठ्ठी मॉनिटर लिझार्ड दिसत असे. एकदा तर बाजूच्या उतारावरून घसरत लाकडी रस्त्याच्या खालून ती पाण्यात पडली.
तिथे मी अगदी बारीक (काडी सारखे) साप पण पाहिले. एकदिवस लाकडी वॉक वे वरून जाताना दोन तीन पायऱ्या चढून पुढे जायचे होते. मी कठड्याला धरण्यासाठी हात पुढे केला आणि झटकन मागे घेता. त्या कठड्यापेक्षाही (रुंदीला) बारीक पण लांब असा साप होता. त्याचा रंग त्या कठड्याच्या रंगामध्ये मिसळलेला होता. आणि हालचाल न करता निपचित पडला होता. एकदा तसाच पण पोपटी हिरव्या रंगाचा साप झाडाच्या फांदीवर होता. त्या फांदीवरच्या हिरव्या रंगाच्या शेवाळ्यामधे वेगळा दिसतच नव्हता.

बाजूच्या विशाल वृक्षांवर पोपट, मैना आणि बरेच वेगवेगळे पक्षी दिसत. तिथे मी सुतार पक्षी पाहिला आणि सुबकसे घरटे विणणारी सुगरण पण पाहिली. उंच आकाशात विहरणारी घार देखिल तिथे दिसत असे.बगळे तर खूपच असत, आणि लहान लहान निळ्या, पिवळ्या रंगाचे असंख्य पक्षी दिसत असत. त्या शांत वातावरणात त्यांच्याच चिवचिवाटाचा आवाज असे. माकडेपण खूप होती तिथे. उंच झाडांवर त्यांचा मुक्त संचार असे. कधी खाली घोळका करून बसलेली असत. कधी फांदीवरून त्यांच्या शेपट्या लोंबत असत. एकदा एका बाईची पिशवी माकडाने पळवली. त्यातले सगळे सामान उपसून न्याहाळून पाहिले, आणि मग ते सगळे तिथेच टाकून पळून गेले. मला त्या माकडांची भीती वाटत असे. एकदा मी तिथल्या झाडाखालून जात असताना एका खाली झुकलेल्या फांदीवर बरीच माकडे पाहिली. त्यातली दोन तीन खाली उड्या मारीत परत झाडावर जात, परत खाली उड्या मारीत. मी काही वेळ त्यांचा खेळ बघत थांबले पण तो खेळ संपेना. मग मी माघारी वळले. तिथे एक आजी आल्या होत्या, हातात काठी होती. म्हणाल्या घाबरू नकोस, ती माकडे काही करत नाहीत, बघ मी काय करते, असे म्हणून त्यांनी ती काठी तिथल्या लाकडी फळीवर आपटली. माकडे खेळ थांबवून पाहू लागली. मग त्या जरा पुढे गेल्या परत काठी जमिनीवर आपटली. तीनचार वेळा असे केल्यावर सर्व माकडे तिथून लांब जाऊन बसली. मग त्या आजी पुढे चालू लागल्या, पण मी मात्र माघारी आले. न जाणो आली परत ती माकडे तर...?   

मी काहीवेळा तिथल्या एखाद्या लाकडी बाकावर विसावा घेत असे. त्या शीतल शांततेत विचारांची चुकार जळमटे झटकली जात. शांतता असली तरी ती निरव अथवा निस्तब्ध नव्हती. त्या शांततेला एक नाद होता, त्या परिसरातील नैसर्गिक रहिवाशांची चाहूल होती. जलचर, उभयचर, भूचर आणि उड्डगण एकमेकांच्या अधिवासावर अतिक्रमण न करता शांततेने राहात असत.
एक प्रसिद्ध हिंदी गीत आहे, या परिसराचेच वर्णन असावे असे...
सूरजकी पहेली किरनसे - आशाका संदेसा जागे
चंदाकी किरनसे धुलकर - घनघोर अंधेरा भागे ।
कही धूप खिले, कही छॉव मिले  नन्हीसी डगरके तले
जहॉं गम भी न हो, आसू भी न हो - बस प्यार ही प्यार पले ।।

जलाशयाशेजारीच एका गोलाकार जागेवर रबरी मॅट लावलेले होते. तिथे काही व्यायामाची साधने होती. मुले माणसे त्याचा वापर करीत असत, काहीजण मौज म्हणून तर काही त्यांच्या स्वास्थ्य वर्धनासाठी.
भोवताली काही बाके होती. चालण्याचा व्यायाम संपवून ज्येष्ठ मंडळी तिथल्या बाकांवर विसावलेली असतं. मला पाहिल्यावर सुरुवातीला ते " गुड मॉर्निंग, वणक्कंम" असे म्हणत. सिंगापूर मध्ये तमिळ लोक खूप आहेत. तिथल्या चार अधिकृत भाषांमध्ये एक तमिळ भाषा आहे. मी भारतीय आहे म्हणून त्यांना वाटत असावे मी तमिळ आहे.
सिंगापूर मध्ये "टायपुसंम" नावाचा उत्सव साजरा केला जातो. रस्त्यावरून वाजत गाजत मिरवणूक निघते. लिटिल इंडिया नावाच्या प्रभागात बरीच हिंदू मंदिरे आहेत. तिथे सर्व भक्तमंडळी भरजरी कपडे परिधान करून येतात. स्त्रिया मोठठाले गजरे माळतात, पूजा, मंत्रपठण, प्रसाद वगैरे धार्मिक प्रथा यथासांग पार पडतात. पण तेव्हा मला त्याबद्दल काही माहिती नव्हती. एकानी मला त्या बद्दल विचारले, मी सांगितले त्याबद्दल मला माहिती नाही, तर त्यांना आश्चर्य वाटले. मग मी सांगितले मी भारतीय असले तरी तमिळ नाही. त्यांनी मग आणखी प्रश्न विचारले. मी सांगितले मी पुण्यातून, महाराष्ट्रातून आले. पण पुणे त्यांना माहितीच नव्हते आणि बराच वेळ त्यांना महाराष्ट्र शब्द कळेना. मग सांगितले मुंबई, बॉम्बे .. आत्ता त्यांना समजले कारण त्यांना मुंबई माहिती होती. त्यानंतर ते "गुड मॉर्निंग, नमस्ते" असे म्हणायला लागले.

रोजची ती प्रभात फेरी मला आनंददायी वाटत असे. खरे तर माझे पाय खूप दुखत असत (गुडघे आणि पाउले), डोके दुखी तर कायमचीच होती, पण तरी मला तिथे जाणे चुकवावेसे वाटत नसे.  

घरगुती गरजेच्या वस्तू , किराणा इत्यादींची खरेदी करणे हे कामच होते. पुण्यासारखे सुख इथे नाही.. दूध, पेपर घपोच मिळतात, भाजी विकणारे घराच्या दारासमोर असतात, जवळच्या दुकानदाराकडे यादी दिली की किराणा घरी पाठविला जातो. इथे म्हणजे "स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही" अशी स्थिती. त्यावेळेस आमच्या घराजवळ भारतीय सामान विकणारी दुकाने फारशी नव्हती. आणि घरपोच सेवांबद्दल माहिती नव्हती. तसेही मी ऑनलाईन शॉपिंग वगैरेंच्या वाटेस कधी गेले नव्हते. कोविड काळात सारेच बंद असल्याने पहिल्यांदा मी त्याचा वापर केला. दुकानात जाऊन वस्तू निवडून, पारखून घेणे मला अधिक बरे वाटते. घराशेजारी एक भाजी मार्केट होते. तिथे मांस, मासे, भाजी वगैरे मिळत असे. तिथे एक भारतीय सामान विकणारे एक दुकान होते. पण ते मार्केट पहाटे पाच वाजता सुरू होऊन दुपारी १२ वाजता बंद होत असे. मग एकाच पर्याय, तो म्हणजे लिटिल इंडिया. पण तिथे जाणे सोपे नव्हते, बस, किंवा टॅक्सीने जावे लागत असे. तिथेच मुस्तफा शॉपिंग सेंटर आहे. ते २४ तास चालू असते. .. कोविड काळात ते रात्री बंद असे .. आता माहिती नाही ..पण तेव्हा तरी ते २४ तास चालू असे. कुठल्याही वेळेस गेले तरी प्रचंड गर्दी असते. तिथे मी वाणीसामान, भाजी, फळे वगैरेची खरेदी करीत असे. तिथेच प्रवेश द्वारा जवळ त्यांचे एक उपहार गृह आहे. तिथल्या फ्राईज, आणि चहा, कॉफी चांगले असते. इतरही बरेच पदार्थ मिळतात.

मुस्तफाचा कारभार अजस्त्र आहे. तिथे सुई पासून कंप्यूटर, मोबाईल फोन पर्यंत सारे काही मिळते, आणि ते सुद्धा प्रत्येकाच्या बजेट मध्ये बसेल असे. तिथे अती स्वस्त वस्तू मिळतात तशाच अती महाग वस्तू देखील मिळतात. त्यामुळे सर्व थरातील माणसांची तिथे गर्दी असते. तिथे मिळणाऱ्या भाजी, फळे, किराणा आणि इतरही अनेक खाद्य पदार्थांची प्रत नेहमीच उत्तम असते. इतक्या वर्षांमध्ये मला कधी तिथे काही खराब वस्तू मिळाली असे कधीच घडले नाही. आणि विविधता खूप असते, त्यामुळे निवडीला चांगला वाव असतो.

सिंगापूर मध्ये प्रत्येक प्रभागा मध्ये समृद्ध आणि सुसज्ज ग्रंथालये आहेत. सभासद वर्गणी अगदीच अल्प असते. विविध विषयांची अनमोल पुस्तके तिथे उपलब्ध असतात.
ग्रंथालया मध्ये जाणे हा माझा आवडता उद्योग होता. जेव्हा शक्य असेल तेव्हा मी तिथे जात असे. मग माझा कितीतरी वेळ ग्रंथालयात जात असे. काही वेळा एखादे पुस्तक घेऊन तिथे वाचत असे. त्यावेळी मला एकावेळी पाच पुस्तके घरी नेता येत असत. तिथे माहितीपट, चित्रपट तसेच बोलती पुस्तके पण असंख्य आहेत.
लहान मुलांचा वेगळा विभाग आहे. तो विभाग देखील विविध प्रकाराच्या आणि विषयांच्या पुस्तकांनी सुसज्ज असा आहे. मुलांना आवडतील अशी रंगीबेरंगी जाजम अंथरलेली असतात. लहान लहान खुर्च्या, टेबले त्यावर फुले, पाने कार्टून्स चितारलेली. असंख्य चित्रे असलेली पुस्तके, तक्ते इत्यादी तिथे आहेत. लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक व्यवस्था केलेली दिसते. माझ्या भारतातील लहानग्यांसाठी देखील असे काही असायला हवे असे नेहमी वाटते.
मासिके आणि वर्तमान पत्रे वाचण्याची सोय आहे. प्रशस्त, वातानुकूलित आणि वाचन, लेखनासाठी सुयोग्य अशी बैठक व्यवस्था असलेली दालने आहेत. स्वच्छता आणि शांतता कसोशीने सांभाळली जाते. ग्रंथालयामध्ये जाणे हा एक सुखद अनुभव असतो.

सिंगापूरची जीवनपद्धती आता चांगलीच परिचयाची झाली होती. सिंगापूर मध्ये चिनी आणि मलय (मलेशियन) बहुसंख्य आहेत. पिढ्यानपिढ्या तिथेच राहिलेले तमिळ पण खूप आहेत. याचबरोबर अनेक देशातील माणसे इथे दिसतात. इंडोनेशिया, ब्रम्हदेश, बांगलादेश, श्रीलंका,फिलिपाईन्स, थायलंड, जपान, कोरिया असे विविध आशियाई देशवासी नोकरीनिमित्त इथे आलेले आहेत. काही युरोप, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणांहून पण आलेले असतात. भारतीयांमध्ये दक्षिण भारतीय, पंजाबी, गुजराथी समाजातील लोक जास्ती दिसतात. त्यातील काही प्रथितयश व्यावसायिक आहेत. मराठी लोक पण पुष्कळ आहेत आणि अर्थात महाराष्ट्र मंडळ आहेच. दिवाळी, दसरा, गुढी पाडवा, गणपती इत्यादी उत्सव जल्लोषात साजरे केले जातात. अगदी सुरस आणि रुचकर पक्वान्नाच्या भोजनासह सर्व काही असते.
सुरुवातीला क्वचित कधीतरी आम्ही तिथल्या उपहार गृहात किंवा फुडकोर्ट (हॉकर सेंटर) मध्ये जायचो, कारण आमचे पूर्ण आठवड्या प्रमाणेच शनी- रवी सुद्धा व्यस्त वेळापत्रक असलेले असत. माझ्या पतीला जास्तकरून घरचे भोजन पसंत असे, पण मला आणि माझ्या मुलाला बाहेर जायला आवडतं असे.

माझ्या मुलाला मॅकडी, के एफ सी, बर्गर किंग वगैर अतीप्रिय. आम्ही बऱ्याचवेळा रात्री मॅकडोनल्ड्सच्या आईस्क्रीमचा आस्वाद घ्यायला जात असू. तिथेच 'कॉफी बीन' आहे. अनेक प्रकारच्या थंड, गरम कॉफी तिथे मिळतात. पिझ्झा हट मध्ये बऱ्याचवेळा आम्ही जायचो. त्यावेळी तिथे सँलड बार असे (हल्ली नसतो ). माझ्या घराजवळच कॅनेडीयन पिझ्झा मिळत असे. आमच्या घराजवळ ' मापू दोफु ' नावाचे चिनी उपाहार गृह होते. तिथले स्टीम बोट फार प्रसिद्ध होते. प्रत्येक टेबलवर एक स्टोव्ह आणि त्यावर सूप उकळत असलेले भांडे असते. त्या भांड्याचे देखील दोन भाग असतात. एका बाजूला स्पायसी (तिखट) सूप आणि दुसऱ्या भागात साधे सूप असते. तिथे दोन तीन डाव ठेवलेले असतात. टेबलाच्या बाजूला ट्रॉली ट्रे असतो. त्यावर तुम्ही मागवलेले आणि अर्धे शिजलेले पदार्थ जसे की ब्रोकोली.बटाटे, चिकन, फिश वगैरे असते. एका लहान वाडग्यात पांढरा शुभ्र भात असतो. त्या ट्रे मधील पदार्थ उकळत्या सूप मध्ये सोडायचे आणि काही वेळाने डावाने एका लहान थाळीमध्ये काढून घ्यायचे. त्याच्याबरोबर वेगवेगळे सॉस घेता येतात. तिथले फूड कोर्ट किंवा हॉकर सेंटर मधले पदार्थ चांगले परिचयाचे झाले होते. त्यातही चिकन राईस, स्लाईस्ड् फिश सूप, पेपर लंच, साबा फिश सेट , चायनीज व्हेज राईस, यांग तौफू, हॉट पॉट असे काही आवडीचे झाले आहेत.

सिंगापूरची खाद्यसंस्कृती समृद्ध आहे. ज्याची जी गरज आहे त्या प्रकाराचे अन्न इथे उपलब्ध आहे. खूप स्वस्त आणि अती महाग असेही पर्याय उपलब्ध आहेत. पण स्वस्त आहे म्हणून दर्जामध्ये तडजोड नसते. स्वच्छ आणि ताजे अन्न अगदी कमी किमतीत आणि सर्व जागी उपलब्ध होऊ शकते हे विशेष. अनेक भारतीय उपहार गृहे इथे आहेत. उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, पंजाबी, गुजराथी असे सर्व पर्याय आहेत. फूड कोर्ट, हॉकर सेंटर मध्ये भारतीय स्टॉल असतोच. बहुदा इडली डोसा वगैरे तिथे मिळते. तिथे केसरी नावाचा एक पदार्थ मिळतो.. तो म्हणजे गोडाचा शिरा.
सिंगापूर मध्ये भारतीय उपाहार गृहे आहेत पण माझ्या घरापासून दूर अंतरावर. तसेच भारतातील पदार्थ आणि तिथे मिळणारे भारतीय पदार्थ यांच्या चवीत काहीवेळा थोडा फरक असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षात अनेक पदार्थ घरी तयार करायला मी शिकले आहे. हॉटेल मध्ये मिळणाऱ्या पदार्थाची चव घरी तयार केलेल्या पदार्थाला येत नाही म्हणे. याच वाक्याचा व्यत्यास पण तितकाच खरा आहे.

(क्रमशः)