भारतात मिरची कधी आली?

बहुतेक 'तज्ञ' याचे उत्तर 'पोर्तुगीजांनी आणली' असे देतात.

हे उत्तर मान्य करायचे झाले तर अजून एक गोष्ट मान्य करावी लागेल - कालयंत्राचा शोध.

पोर्तुगीज भारतात आले १४९७ साली - केरळमध्ये. तेव्हा त्यांनी जर प्रथम मिरची भारतात आणली असेल तर त्यांनी अजून एक गोष्ट केली. कालयंत्रात बसून दोनशेहून अधिक वर्षे मागे आणि हजारेक किलोमीटर ईशान्य-उत्तर दिशेला जाऊन तिथल्या माळ्यांना मिरची दिली.

कारण १२९५ साली निधन पावलेल्या सावता माळ्यांनी खालील ओळी लिहून ठेवल्या आहेत.

कांदा मुळा भाजी ।

अवघी विठाबाई माझी ॥ १ ॥

लसूण मिरची कोथिंबिरी ।

अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥

मोट नाडा विहीर दोरी ।

अवघी व्यापिली पंढरी ॥ ३ ॥

सावता म्हणे केला मळा ।

विठ्ठल पायीं गोंविला गळा ॥ ४ ॥