परोक्ष आणि अपरोक्ष

प्रथम शब्दार्थ लक्षात घेऊ, परोक्ष हा शब्द सर्रास अपरोक्ष या अर्थी वापरला जातो. माझ्या अपरोक्ष घडले म्हणजे माझ्या नजरेआड घडले. पण शब्दार्थ नेमके उलट आहेत. परोक्ष म्हणजे (पर+अक्ष) नजरेआड, अप्रत्यक्ष आणि अ-परोक्ष म्हणजे नजरेसमोर, प्रत्यक्ष. थोडक्यात, परोक्ष म्हणजे जे समोर नाही ते (इनड’रेक्ट) आणि अ-परोक्ष म्हणजे जे प्रत्यक्ष आहे ते (ड’रेक्ट).

आध्यात्मिक अर्थानं मात्र थोडी मजा आहे, ती अशी की एखादी घटना जरी प्रत्यक्ष तुमच्यासमोर घडली आणि ते तुमचं प्रत्यक्ष ज्ञान   (अ-परोक्ष ज्ञान) असलं तरी ते तुमचं घटनेविषयीचं ज्ञान आहे, स्वतः विषयीचं नाही, त्यामुळे ते परोक्ष ज्ञान आहे

कुणीही आणि कितीही विद्वान असला तरी त्याचं सर्वच्या सर्व ज्ञान परोक्ष असतं ! आजपर्यंत ज्याच्या बुद्धिमत्तेला तोड नाही त्या आईन्स्टाईनचं सुद्धा सर्व ज्ञान, कशा तरी विषयीचं आहे. अर्थात, त्या ज्ञानाचे मानवतेवर उदंड उपकार आहेत यात वाद नाही. तरीही ते ज्ञान काय वाट्टेल ते झालं तरी आपण काय आहोत याचा उलगडा करू शकत नाही, कारण ते परोक्ष आहे.

रोजच्या जगण्यासाठी परोक्ष ज्ञानापरता पर्यायच नाही. भाषेच्या ज्ञानामुळे तर मी हा लेख लिहितोय आणि तुम्ही वाचताय ! पण लिहिणं आणि वाचणं हे भाषे विषयीच्या ज्ञानामुळे आहे.  म्हणजे लेख अ-परोक्ष ज्ञाना विषयी आहे पण तो समजायला परोक्ष ज्ञानाची मदत होते आहे. 

वैद्यकीय ज्ञानामुळे जगणं सुखाचं झालं आहे हे निश्चित परंतु ते देहा विषयीचं ज्ञान आहे ! कुणाही धन्वंतऱ्यानं त्याच्या वैद्यकीय ज्ञानाच्या जोरावर स्वतःची उकल करायला प्राण जरी पणाला लावले, तरी ते अशक्य आहे. कारण देहज्ञान हे देहाविषयी आहे, ते कशा विषयी तरी आहे, ते परोक्ष आहे .

तुम्ही रात्रंदिवस स्त्री किंवा पुरुष म्हणून जगताय आणि तुम्हाला यक्तिंचितही कल्पना नाही की देहाच्या अनुषंगाने तुम्ही स्वतःविषयी केलेली ती कल्पना आहे ! ते तुमचं स्वतःविषयीचं कशाच्या तरी आधारे ठाम झालेलं ज्ञान आहे, ते परोक्ष ज्ञान आहे.


एव्हाना तुम्हाला वरकरणी फालतू वाटणार्‍या या विषयाची गहनता लक्षात आली असेल ! किमान , आता हा विषय कुठे पर्यंत जाणार याची उत्सुकता लागायला तरी हरकत नाही !

थोडक्यात, इथे प्रत्येक जण स्वतःला जे काही समजतोय आणि अहोरात्र ज्या समजुतीतून वावरतोय ते सर्वच्या सर्व त्यानं स्वतःविषयी जमवलेलं परोक्ष ज्ञान आहे, इनड’रेक्ट नॉलेज आहे.एखादा स्वतःला कमनशिबी समजत असेल तर तो दिवसभर ते पटवण्याची स्टोरी सांगू शकेल पण ती त्यानं परिस्थितीवरून स्वतःविषयी केलेली निव्वळ कल्पना असेल. अर्थात, सर्व समाज परोक्ष ज्ञानालाच प्रमाण मानत असल्यानं लोक त्याला सहानुभूतीच दाखवतील. जगातला एकही संत त्याला सांगणार नाही की वत्सा, तू परिस्थितीवरून स्वतःविषयीची कल्पना करतो आहेस ! दुर्दैवाच्या फेर्‍यातून सुटायला त्यानं गीता वगैरे वाचली तर तो, ती पूर्वजन्माची कर्मफलं मानून आणखी गर्तेत जाईल ! पण एक साधी गोष्ट त्याच्या लक्षात आली की तो स्वतःविषयीच्या परोक्ष ज्ञानामुळे नाहक व्यथित होतोय, तर तो एका क्षणात त्या भ्रामक कल्पनेतून मुक्त होईल. आणि परिस्थिती बदलायला कितीही वेळ लागला किंवा ती बदलली जरी नाही तरी आनंदात राहील.

असो, तर हा बाह्य रंग झाला, अंतरंग तर आणखी बहारदार आहे ! मेंदूतले संभाषण तर शेवटच्या श्वासापर्यंत पिच्छा सोडणार नाही. त्यात कहर म्हणजे प्रत्येकाला आपणच मनातल्या मनात बोलतोय यात कणमात्र शंका नाही. एकाही परम ज्ञान्यानी आजपावेतो हे सांगितलं नाही की आपण उच्चारण शून्य आहोत ! कितीही प्रयत्न केला तरी आपण बोलू शकत नाही, सर्व प्रकट संभाषण विशुद्धीतून आहे आणि अप्रकट मेंदूत आहे, ते दोन्ही ही देहाचे अवयव आहेत, आपण पूर्णतः निरवयव आहोत, तस्मात, आपण परम शांतता आहोत.आता किमान हा वृत्तांत वाचून तरी तुम्हाला आपण आत काय की बाहेर काय, बोलूच शकत नाही हे लक्षात यायला हरकत नाही. 

हे लक्षात येता क्षणी तुम्हाला कळेल की रात्रंदिवस आपण स्वतःविषयी जी धारणा करून घेत होतो ते सर्व स्वतःविषयी परोक्ष ज्ञान होतं. मेंदूतल्या संवादाच्या अनुषंगाने आपण कोण आहोत हे आपण अविरतपणे ठरवत होतो आणि ती कल्पना सतत बदलत होती ! घडीत यशस्वी तर घडीत अपयशी, घडीत एकदम भारी तर पुढच्या क्षणी एकदम फालतू , घडीत संपन्न तर घडीत ती संपन्नता बिनाकामाची !

तर सांगायचं ते असं की आपण जाणण्याची क्षमता आहोत, आपण जे काही जाणतो ते सर्व कायम कशा विषयी तरी असतं. उदाहरणार्थ स्वतःला स्त्री किंवा पुरुष समजणं हे देहाला जाणणं आहे. देहाला जाणण्याने आपण स्त्री किंवा पुरुष होत नाही. 

तव्दत, परिस्थिती संपन्न आहे किंवा विपन्न आहे हे जाणण्याने आपण संपन्न किंवा विपन्न होत नाही तर आपण कायम जाणण्याची क्षमताच राहतो.जाणण्याची क्षमता जे जाणते ते कायम परोक्षच असतं. ती स्वतःला कदापिही जाणू शकत नाही कारण ती कायम अ-परोक्ष आहे.

थोडक्यात, अ-परोक्ष म्हणजे ड’रेक्ट, जे तुम्ही आहात ते, जाणण्याची क्षमता ! आणि परोक्ष म्हणजे इनड’रेक्ट, तुम्ही (जाणण्याची क्षमता) जे जाणता ते. जाणण्याची क्षमता स्वतःला जाणू शकत नाही कारण ती एकच आणि अविभाज्य आहे. जे जाणायचंय ते तिच्यात आहे पण ती स्वतः कशातही बद्ध नाही. म्हणजे तुम्ही अंतराळात कोणत्याही दिशेनं आणि कितीही दूर गेलात तरी जाणण्याच्या क्षमते पलीकडे जाऊ शकत नाही . तस्मात, तुमच्या पलीकडे काहीही नाही. जे तुम्ही जाणाल ते कायम जाणण्याच्या क्षमते अंतर्गत असेल. म्हणून स्वतःला जाणा वगैरे सांगणारे अज्ञानी आहेत, त्यांची सर्व शिकवण व्यर्थ आहे कारण जाणण्याची क्षमता स्वतःला कदापिही जाणू शकणार नाही.

आपण स्वतःच वय झालं असं म्हणतो तेव्हा ते आपलं देहाविषयीचं ज्ञान आहे, स्वतःविषयीचं नाही. मी हे केलं किंवा मी ते बोललो असं आपण म्हणतो तेव्हा ती क्रिया किंवा ते उच्चारण देहातून झालेलं असतं आणि आपण ते जाणतो; आपण जाणण्याची क्षमता आहोत, जे जाणलं जातंय ते कायम परोक्ष ज्ञान आहे. भाषेच्या दृष्टीनं तसंच म्हणायला हवं पण त्यामुळे कायम परोक्ष ज्ञान हेच निःसंदिग्धपणे अ-परोक्ष ज्ञान समजलं जातंय. ज्यांना समाज परमज्ञानी वगैरे मानतो त्यांना सुद्धा ही साधी गोष्ट लक्षात आली नव्हती त्यामुळे कर्मलेप काय, कर्मसिद्धांत काय, षड्रिपू काय आणि त्यांच्यावर विजय मिळवायचा काय अशा वाट्टेल त्या स्टोर्‍या लावून जीवनातला आनंदच घालवून टाकला आहे. जाणण्याची क्षमता पूर्णपणे क्रियाशून्य आहे त्यामुळे आपल्याला कर्मलेप, षड्रिपू असल्या कोणत्याही भानगडी स्पर्श सुद्धा करत नाहीत.  

आपण जे जाणतो त्यालाच आपण अ-परोक्ष ज्ञान समजतो ही सर्वात मोठी आध्यात्मिक गल्लत आहे. आपण जे जाणतो ते कायम परोक्ष ज्ञान आहे, ते कायम कशा तरी विषयी आहे. आपल्याला, आपण जाणण्याची क्षमता आहोत याचं विस्मरण झालं आहे. जाणण्याच्या क्षमतेला काही जाणायचं असेल तर देहातून उन्मुख व्हावं लागतं. जाणण्याची क्षमता नजरेतून उन्मुख झाली तर दृष्टी ज्ञान होतं, कानातून उन्मुख झाली तर ध्वनी कळतो किंवा त्वचेतून उन्मुख झाली तर स्पर्शज्ञान होतं; पण जे ज्ञान होतं ते कायम परोक्ष असतं कशा तरी विषयीचं असतं. या क्षणी तुम्ही डोळे मिटले आणि जाणण्याची क्षमता (म्हणजे तुम्ही) कोणत्याही ज्ञानेंद्रियातून उन्मुख झाला नाहीत तर तुम्हाला संपूर्ण देहाची जाणीव होईल. हे निरिंद्रीय जाणणं झालं. या अवस्थेत तुम्ही आणखी काही काल राहिलात तर तुम्हाला दोन गोष्टी कळतील :

१. जाणण्याच्या क्षमतेचं, देहामार्फत सतत जाणिवेत रूपांतरण करण्याच्या सवयीमुळे आपण देहात असल्याचा भास होत होता. जाणण्याची क्षमता आत किंवा बाहेर अथवा एखाद्या विविक्षित ठिकाणी नाही, ती सर्वत्र आहे.

२. एकदा का तुम्हाला हा उलगडा झाला की तुमच्या लक्षात येईल की आपण कुठेही नाही आणि कुणीही नाही. 

तुम्ही अत्यंत मन लावून आणि शांतपणे हा लेख वाचला, तर तुम्ही स्वतःला जाणण्याचा जो व्यर्थ आध्यात्मिक खटाटोप चालवलाय, तो या क्षणी संपेल. तुमच्या चेहेर्‍यावर एक मंद स्मित झळकेल आणि तुम्ही शांत व्हाल.