आमचे धोत्रे गुरुजी (भाग २)

आमचे धोत्रे गुरुजी (भाग २).

रात्रीचे आठ वाजले. आम्ही दादर स्टेशनला पोहोचलो. मी जवळच राहत असल्याने आम्हाला चालत जाता आलं. फ्लॅट घेऊन तीनचार वर्ष झाली होती. अंघोळ वगैरे करून मी ऑफिस साठी तयार झालो. चहा नाश्ता टेबलावर मांडला होता. मग कीर्तीला गुरुजींना घेऊन यायला सांगितलं. फारसं काही न बोलता चहा नाश्ता झाला. जाताना गुरुजींसाठी नवीन कपडे आणायला दिशाने सांगितलं. त्याचबरोबर मी तपकीरही लक्षात ठेवली. गुरुजींना सांगून मी निघालो. मला तरी ते शांत वाटले. इथे राहणं त्यांना आवडायला मात्र हवं. ते नक्की काय विचार करीत होते,हे कळतं कठीण होतं. पण आता त्यांना कीर्ती आणि दिशा या दोघांनी स्वीकारायला हवं म्हणजे झालं. अशा शंकेतच मी बाहेर पडलो.

आज मी नेहमीपेक्षा लवकरच यायचं ठरवलं. तरीही संध्याकाळचे सात वाजले. तसा मी नऊ नंतर येत असे. आल्या आल्या मी गुरुजींची चवकशी केली. तर ते आज जेवले नसल्याचं दिशा कडून कळलं. ती मला ताबडतोब त्यांच्या खोलीत घेऊन गेली . ते विमनस्क स्थितीत आढ्याकडे पाहात बसलेले दिसले. मला त्यांच्याशी काय बोलावं समजेना.

त्यावर दिशा काळजीने म्हणाली," हे असं रोज व्हायला लागलं तर यांना कसं सांभाळणार ? "

मी चिडून विचारलं, " मग काय त्यांना रस्त्यावर टाकायचं ? त्यासाठी आणलंय का त्यांना ? "

त्यावर ती अजिजीने म्हणाली, " छे हो, काहीतरीच काय? एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे आपण घेऊन गेलो, तर ते सुधारतील तरी."

माझा राग अजून शांत झाला नव्हता. " ते कालच आल्येत ना ? काही वेळबीळ लागतो का नाही माणसाला वातावरणाशी जमवून घ्यायला. ते काही वेडे नाहीत मेंटलमधे न्यायला " . . . . . 

" पण मी कुठे म्हंटलं सेंटरमध्ये घेऊन जायला. मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे डॉक्टरच असतात. " .

माझा पारा खाली आला. आम्ही दोघे खोलीबाहेर आलो. रात्रीचं जेवण मी त्यांना भरवण्याचं ठरवलं. मी नऊच्या सुमारास जेवणाचं ताट घेऊन त्यांच्या खोलीत आलो. ते बेडवर खाली मान घालून बसले होते. त्यांना मी प्रथम हळुवारपणे हांक मारली. " गुरुजी,मी आलोय. घाबरु नका. आता तुम्ही थोडं तरी जेवून घ्या पाहू. असं कसं न जेवून चालेल ?" . . . . असं म्हणून मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. 

ते हसले. आणि अचानक म्हणाले," अरे , मी ठीक आहे मला काहीही झालेलं नाही. बघ! आण बरं ते ताट. "

असं म्हणून त्यांनी जेवायला सुरुवात केली. मला एकदम हलकं वाटलं. त्यांच्यात अचानक झालेला बदल पाहून भीतीही वाटली. यांना सकाळी जेवायला काय झालं होतं ? मी त्यांना दुखवू इच्छित नव्हतो. पण त्यांचं ते वागणं पाहून मला हळूहळू दिशाचं म्हणणं पटू‌ लागलं. मग मी त्यांना जेवल्यावर गप्पा मारायला येईन असं म्हंटलं. अर्ध्या पाऊण तासात आमची जेवणं झाली. दहा वाजत होते. झोपण्याची तयारी केली. मी दिशाला भडकल्या बद्दल सॉरी म्हंटलं. मला रोजरोज लवकर येता येणार नव्हतं. मग दिशाला लवकर येण्याचं प्रॉमिस करून मी गुरुजींच्या खोलीत शिरलो. तशी ते माझ्याकडे पाहून गोड हसले. मला खूपच बरं वाटलं. मग ते म्हणाले," काल मी खाली झोपलेला दिसलो ना ? "

मी मानेनेच हो म्हंटले. त्यावर ते म्हणाले," काल रात्री तो. आला होता. म्हणजे सदाशिव. अरे असा काय पाहतोस,भूत पाहिल्यासारखा ?"

मी आश्चर्याने म्हंटलं, काहीतरीच काय? सदाशिव अमेरिकेत नाही का ?तो इथे कसा येईल ? "

त्यावर ते डोळे गरागरा फिरवत म्हणाले, " अरे त्यानेच तर मला खाली झोपायला लावलं. म्हणतो कसा, तुम्हाला मी आरामात झोपू देईन. आईला घालवलीत. मला अमेरिकेत जायला लावलंत. नोकरी घालवलीत. आणि तुम्हाला मी सुखाने झोपून देईन. मुकाट्याने खाली उतरा. आणि झोपा त्या कोपऱ्यात. . . . . . "

ते चांगलेच चार्ज झाले होते. ते शिव्याही देत होते. रडत होते. . . . मला आता दिनाचं बोलणं चांगलंच पटलं. त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. मी त्यांना कसंतरीच शांत केलं . लाईट मालवला आणी थोडावेळ त्यांच्या पाठीवर हात फिरवत राहिलो. अर्ध्या पाऊण तासाने ते शांत झाले. आणि त्यांना झोप लागलेली दिसल्यावर मी माझ्या बेडरुमकडे गेलो. दिशा झोपली होती माझी मात्र झोप काळजीने उडाली. पण मला एकदाही गुरुजींना आणल्याचा पश्चात्ताप झाला नाही. 

एका निराधार माणसाला सांभाळण्यात कसली आली आहे चूक ? उलट मी गुरुजींना मी वेळीच घरी आणलं होतं. 

(क्रमश:)