देणाऱ्याचे हात हजारो...

आयुष्य हे अनेक भावभावनांनी, घटना प्रसंगांनी विणलेले वस्त्र आहे असे म्हणतात. साधे, सुरळीत, सरळ रेषेत चालणारे आयुष्य कुणाला लाभले असेल तर तो फारच नशीबवान माणूस आहे असे म्हणायला पाहिजे, कारण असे सहसा नसते. सुख आणि दुःख प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजलेले असते. चार दिवस सुखाचे आणि चार दुःखाचे हेच निर्विवाद सत्य आहे. धन, संपत्ती, बुद्धी, कौशल्य असे सारे काही असेल तरी सटवाईने लिहिलेला ललाटीचा लेख काही बदलता येत नाही.आयुष्यात फक्त सुख हवे असेल, दु:खे दूर ठेवायची असतील तर काय उपाय करायचे हे सांगणारे अनेक असतात. पण त्याचा काहीच उपयोग नसतो. आता हे वाचल्यावर कुणीही म्हणेल, 

"किती निराशावादी विचार आहेत हे? be positive."

नाही हे निराशावादी विचार नाहीत, तर उलट व्यावहारिक तत्वज्ञान आहे. जे सत्य आहे ते स्वीकारता आले, तरच परिस्थितीवर मात करणे, परिस्थितीतून मार्ग काढणे वगैरे करता येते. मराठीमध्ये एक शब्दप्रयोग आहे, "हवेत राहणे, हवेत असणे". याचा शब्दशः अर्थ घेण्याची गरज नाही. हवेत असणे म्हणजे पाय जमिनीवर नसणे, सत्य परिस्थितीला अनभिज्ञ असणे अथवा सत्य परिस्थिती नाकारणे. एखाद्याला वाटत असते, "मी हुशार, माझी इतकी गुणवत्ता म्हणजे मला इतके काही मिळायला हवे वगैरे.." पण जेव्हा अपेक्षेप्रमाणे काही मिळत नाही तेव्हा निराशा येते.. याचे कारण पाय जमिनीवर नसतात. सत्य परिस्थिती आणि अपेक्षा यांचा ताळमेळ बिघडलेला असतो.

आयुष्य जगताना अनेक प्रकारांची माणसे आजूबाजूला वावरत असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे म्हणतात आणि ते खरेही आहे. पण एका बाबतीत मात्र बहुसंख्यांमध्ये साम्य आढळते ते म्हणजे यशाचे श्रेय माझे आणि माझ्या अपयशाचे कारण मात्र अन्य कुणी असेच त्यांचे मत असते. असे म्हणणारा खरे तर निराशावादी असतो. तो त्याला काय मिळाले नाही याची वजाबाकी मांडत असतो.

"कर्मण्येवाऽधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहावे, असा उपदेश भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केला होता. हे फारच उच्च तत्वज्ञान झाले. सर्वसामान्यांना ते आत्मसात करणे अवघड आहे. कुठलीही कृती करताना त्याचा परिणाम काय होईल? फायदा मिळेल की नुकसान होईल याचा प्रत्येकजण विचार करतोच. पण अपेक्षा आणि सत्य यात फरक असतोच तो स्वीकारणे  कठीण वाटते आणि हेच दुःखाचे मूळ कारण असते. 

"मला संधी मिळाली असती तर मी..."

"माझ्या क्षेत्रात राजकारण इतके, त्यामुळे .."

"माझ्यावर इतक्या जबाबदाऱ्या नसत्या तर .."

"मला कुणी थोडी मदत केली असती तर ..."

असे संवाद आपण हरघडी ऐकतो. दुसऱ्याला दोष देणे अगदीच सोपे असते. दुसऱ्यांनी न केलेल्या मदतीचा, कृतीचा पाढा सगळ्यांना तोंडपाठ असतो. पण जे केले आहे ते स्मरणारे विरळाच. काहीजण परिस्थितीवर तोंडसुख घेतात तर काहीजण मदत न करणाऱ्यांना दोष देतात. मात्र त्या वेळी त्यांना मिळाले आहे त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करायला मात्र विसरतात. तुम्हाला अपेक्षा होती तितके मिळाले नसेल कदाचित पण जे मिळाले आहे त्याचा उल्लेखही करावासा वाटत नाही याला काय म्हणायचे? आयुष्य म्हणजे काही गणित नाही की दोन अधिक दोन केले की उत्तर चारच येईल. आयुष्यात अनेक घटक असतात जे चल असतात, म्हणजे कधीही बदलण्याची शक्यता असते. त्या घटकांवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे असे दिसते की अनेकदा समान कौशल्ये किंवा गुणवत्ता असलेल्या व्यक्तींच्या उपलब्धी (मिळालेले यश) मध्ये फरक दिसून येतो. काहीवेळा तर असेही दिसते की उच्च गुणवत्ता असलेले मागे राहतात आणि त्याच्यापेक्षा थोडी कमी गुणवत्ता असलेले मात्र यशाची शिखरे सर करतात. याचे कारण नशीब हा एक महत्त्वाचा घटक असतोच पण त्याचबरोबर व्यवहार चातुर्य आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता यांचा देखील त्या यशात सहभाग असतो. केवळ श्रेष्ठ बुद्धिमत्ता आणि उत्तम कौशल्य यश मिळविण्याकरिता पुरेसे घटक नसतात. त्याच्या जोडीला माणसे जोडण्याची कला, संवाद कौशल्य, प्रसंगी कमीपणा स्वीकारून तडजोड करण्याची तयारी हे गुण देखील उपयोगी ठरतात. यश किंवा अपयश सकारात्मक पद्धतीने स्वीकारण्याची क्षमता फार कमी लोकांकडे असते.

मला काय मिळाले नाही ते मोजत बसण्याऐवजी जे मिळाले आहे त्याची बेरीज केली तर किती नफा मिळाला ते सहज लक्षात येईल. कोणी कितीही कर्मवादी असो, नशिबात लिहिलेले चुकत नाही. म्हणून सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा.  सकारात्मकता म्हणजे फक्त चांगल्याचाच विचार करायचा, वाईट दृष्टीआड करायचे असा गैरसमज असतो. पण हे बरोबर नाही. सकारात्मकता म्हणजे चांगले आणि वाईट या दोनही बाजूंकडे समान तटस्थतेने पाहण्याची क्षमता. दुःखद विचार, आठवणी न टाळता आणि त्यांचा स्वतःवर नकारात्मक परिणाम होऊ न देता स्वीकारणे. काय मिळाले नाही हे सांगताना जे मिळाले आहे त्याचे विस्मरण होऊ देऊ नये.

देणारा श्रेष्ठ आहे, माझ्यासारखे सामान्य त्याला देव किंवा ईश्वर म्हणतात, काही बुद्धिमान लोक त्याला गूढ शक्ती, किंवा गूढ शास्त्रीय तत्त्व म्हणतील, अध्यात्माचे अभ्यासक परमतत्व किंवा ब्रह्म म्हणतील. तो उत्तम दाता आहे आणि अमाप देत असतो. जे दिले त्याची काही मोजदाद ठेवीत नाही. त्याच्या देण्यात आपपर भाव नसतो की कुठल्या अटीतटी नसतात. योग्यता, गुणवत्ता असे काही निकष नसतात. मागण्याची तो वाट बघत नाही आणि परतफेडीची अपेक्षा करीत नाही.

"देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी" हे अक्षरशः खरे आहे. मला तरी असा अनुभव नेहमीच आलेला आहे. जेव्हा टोकाची निराशा येते, सगळे शहाणपण निरर्थक वाटत असते. आता या परिस्थितीतून काही मार्ग नाही असे विचार व्यापून राहतात, अशावेळी कुठेतरी इवलासा उजेड दिसतो, सुटकेचा मार्ग नजरेत येतो. जर हिंमत करून, निराशा झटकून तो मार्ग पत्करला तर सुसह्य भविष्य दृष्टिपथात येते. हे घडण्यासाठी तुमचा स्वतःवर विश्वास हवा.

कृष्णजन्माची कथा आहे. देवकी कंसाच्या कैदेत असताना कृष्णजन्म झाला, त्या आधी कंसाने देवकीची सात बाळे ठार मारली होती. कारण आकाशवाणी झाली होती की देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल. देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण, त्याचा जन्म होताच कारागृहाचे दरवाजे उघडले गेले, यमुनेला पुर आलेला असताना, बाळाच्या पायाचा स्पर्श होताच यमुनेचे पात्र दुभंगले. वसुदेवाने बाळकृष्णाला नंदाघरी सुखरूप पोहोचवले आणि यशोदेची नवजात कन्या घेऊन मथुरेच्या कारागृही परतले. ती नवजात बालिका देखील दैवी अंश असलेली होती आणि तिने कंसाला सांगितले, तुझा वध करणारा सुखरूप आहे.

(**वसुदेव = श्रीकृष्णाचे पिताश्री, वासुदेव = वसुदेव पुत्र श्रीकृष्ण)

हे वाचताना तुम्हाला वाटेल मी दैवी चमत्काराचे दाखले देते आहे, म्हणजे मी अंधश्रद्धा पसरवते आहे, नाही तसे नाहीये. मी असे अजिबात म्हणत नाहीये की परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि हात जोडून बसा, मग चमत्कार घडेल आणि तुमची संकटातून सुटका होईल. मला असे काहीच म्हणायचे नाहीये. या कथेकडे जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहिले तर त्यातील सर्व रूपकांचा उलगडा होतो.  

देवकी, मथुरेचा राजा कंस याची भगिनी. तिच्या विवाह प्रसंगी आकाशवाणी झाली की देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल. कंसाने तातडीने देवकी आणि वसुदेव यांना कैदेत ठेवले. देवकी आणि वसुदेव, दुष्ट कंसाच्या कैदेत असतात. मोठ्ठाले लोखंडी दरवाजे आणि अहोरात्र पहारा देणारे पहारेकरी तिथे असतात. किती निराशाजनक परिस्थिती आहे ही? देवकीच्या सात बाळांची महाबळी कंसाने हत्या केली आहे. पण दोघांचा आकाशवाणीवर भरवसा आहे. त्यांचा आठवा पुत्र, दुष्ट कंसमामाचा कर्दनकाळ ठरणार आहे. म्हणून काही करून त्याला वाचवायचेच असा त्यांचा निश्चय आहे. अष्टमीचा दिवस, मुसळधार पाऊस आणि यमुना दुथडी भरून वाहते आहे. तरीही अशा काळरात्री वसुदेव त्यांच्या पुत्राला घेऊन निघाले, आणि तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले, त्यावेळी योगायोगाने पहारेकरी निद्रिस्त होते. वसुदेवानी धाडस केले, परिस्थितीतून मार्ग काढण्याकरिता पाऊल उचलले आणि दैवाने त्यांना साथ दिली. अंधाऱ्या रात्री, पडत्या पावसात यमुनेच्या तीरावर ते आले, यमुनेला पूर आलेला, मदतीला कुणीही नाही. पण वसुदेवांनी हार मानली नाही. बाळकृष्णाला ज्यात ठेवले ती टोपली डोक्यावर घेतली आणि रौद्ररूप धारण केलेल्या यमुनेच्या प्रवाहामध्ये प्रवेश केला. पाणी डोक्यावरून वाहू लागले आणि त्यावेळी बाळाच्या इवल्या पावलांचा पाण्याला स्पर्श झाला. प्रवाह दुभंगला, यमुनेने वसुदेवआणि बाळकृष्णाला सुखरूप पैलतिरी पोहोचवले     

या कथेतील ही बाजू मला नेहमीच आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी वाटते. अत्यंतिक निराशाजनक स्थितीत देवकी आणि वसुदेव दुसऱ्या कुणाला दोष देत राहिले नाहीत, कुणी मदत करेल याची वाट बघत राहिले नाहीत. कंसाचा मृत्यूदाता जन्माला येईपर्यंत सावधचित्ताने राहिले. आधीची सात अपत्ये कंसाने मारली म्हणून शोक करीत राहिले नाहीत, तर कंसाच्या जाचातून स्वत:बरोबरच सर्व जनतेची सुटका व्हावी म्हणून आठव्या पुत्राची त्यांनी प्रतीक्षा केली आणि त्याच्या संरक्षणासाठी जीवाचे रान केले.

मला तरी या कथेतून हाच बोध मिळाला की इच्छा असेल तर मार्ग मिळतोच. तसेच कुणाच्या मदतीवर अवलंबून न राहता प्रयत्न केले तर कुठून तरी साहाय्य मिळते. या करता इच्छाशक्ती बरोबरच प्रसंगी तडजोड करण्याची लवचीकता असायला हवी. माझ्यावर अन्याय झाला, फसवणूक झाली अशा तक्रारी करत राहण्याने काहीच साध्य होत नाही. तसेच मला जे पाहिजे ते मिळत नाही तर इतर काही नको असा दुराग्रह देखील नसावा. अपेक्षा आणि सत्य यातील अंतर जाणण्याची क्षमता असायला पाहिजे.

अर्थात या पौराणिक कथेत अनेक दैवी चमत्कार घडतात तसे सामान्य माणसाच्या आयुष्यात घडत नाहीत. तुम्हाला पाहिजे तेच मिळेल इतके साहाय्य कदाचित मिळणारही नाही, परंतु जे मिळेल ते स्वीकारण्याची तयारी असायला हवी. जे मिळाले नाही त्याचे दुःख असणे साहजिकच आहे, पण ते सतत उगाळून सर्व आयुष्य रडत जगायचे? की मिळाले आहे त्याचा आनंदाने स्वीकार करून समाधानी आयुष्य जगायचे? हे तुमच्यावरच अवलंबून आहे. तुम्हाला जे मिळवता आले नाही ते मिळविण्याकरिता इतरांना मदत करणे हा देखील सुखी होण्याचा एक मार्ग आहे.

एक मराठी कविता वाचनात आली होती,

"देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता घेणाऱ्याने, देणाऱ्याचे हात घ्यावे"

मी ही कविता वाचली तेव्हा प्रथम विचार केला, हे असे काय लिहिले आहे? घेणाऱ्याने सतत घेतच राहावे? आणि ते पुरले नाही तर देणाऱ्याचे हात घ्यायचे? (म्हणजे देणाऱ्याचे सर्वस्व घ्यायचे?)

पण नाही असा अर्थ नाहीये. घेणाऱ्याने, देणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणजे एक दिवस असा असायला पाहिजे की घेण्यासाठी पसरलेले हात देणारे हात व्हायला हवे. घेणाऱ्या याचकाच्या भूमिकेचा त्याग करून देणारा दाता व्हायला पाहिजे.  

जेव्हा तुमच्या मनात देण्याची इच्छा निर्माण होईल, सारखे घेणे योग्य नाही असा साक्षात्कार होईल तोच क्षण तुमच्या प्रगतीचा, उन्नतीचा असेल. कारण तुम्ही हीनदीन याचकाची भूमिका त्यागून देणाऱ्यांचा भूमिकेत जाऊ इच्छिता.

आता हे देणे म्हणजे तरी काय हे समजून घेणे जरुरीचे आहे. आजकाल दातृत्व, सामाजिक ऋण, समाजसेवा इत्यादी शब्द अगदी सवंग झाले आहे. माझ्या दातृत्वाचा चहूकडे डंका पिटला गेला तरच मी देईन नाहीतर नाही, असे म्हणणारे महाभाग आहेत. कॅमेरा, माइक इत्यादी असेल तरच समाजसेवा करणारे देखील असतात. थोडेफार वरवरचे काम करून, "आता मी दुसऱ्यांना उपदेश करण्यास पात्र आहे" असे समजणारे देखील काही उपदेशक दिसतात. अशा उथळ, सवंग समाजसेवकांमुळे समाजसेवेचे क्षेत्र बदनाम होते.

दातृत्व असे असावे की उजव्या हाताने दिलेले डाव्या हाताला कळू नये. गाजावाजा, जाहिरातबाजी करून दिलेले दान अथवा केलेले काम हे काही खरे नाही. अशा उथळ समाज सेवकांमुळे समाजसेवा हा शब्द काहीसा उपहासाने वापरला जातो. सामान्य लोकांनाही आता हे सवयीचे झालेले आहे. ते बरोबर ओळखून असतात, की वर्तमान पत्रातून नाव, फोटो दिसावेत, किंवा दूरदर्शन वर त्यांची छबी झळकावी याकरता हा सारा प्रपंच आहे. प्रसिद्धीचा झगमगाट बाजूला झाला की हे कचकड्याचे सेवेकरी देखील नाहीसे होतील. यात आणखीही एक प्रकार असतो तो म्हणजे फक्त फुकाचे उपदेश करणारे. हे महाभाग स्वत:च्या खिशातली दमडी सुद्धा देत नाहीत, फक्त कुणी काय करावे याचे मार्गदर्शन(?) करतात. त्याग करायला पाहिजे असे सांगतात पण तो त्याग दुसऱ्या कुणी करायचा असतो. "जनसेवे पायी काया झिजवावी, घाव सोसूनिया मने रिझवावी" असे सांगणाऱ्याचा आत्माभिमान भलताच टोकदार असतो. थोडीही असुविधा अथवा दुर्लक्ष त्यांना सहन होत नाही. पण ते असो ..  

तर लिहिण्याचा उद्देश असा आहे, की नशिबाला दूषणे न देता कर्तव्य करीत राहिले तर अनमोल असे दान तुमच्या झोळीमध्ये नक्कीच येईल. "प्रयत्नांती परमेश्वर" हा गुरुमंत्र समजावा. अपयशाने खचून जाऊ नये आणि यशाने उन्मत्त होऊ नये. तुम्ही यशस्वी झालात म्हणून यशासाठी धडपडणाऱ्यांना हिणवू नये. देणारा देत असतो, घेणारा जागरूक असायला हवा.

***