मराठी भाषा दिवस

जाणीव सामाजिक सेवा संस्था नवीन पनवेल व ज्ञानसाधना सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय नवीन पनवेल या सामाजिक भान जपणाऱ्या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र , (सी. के. टी विद्यालय शेजारील गार्डन ) येथे सकाळी ११ ते १२:३० या वेळेत मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य लक्षात घेऊन पुस्तक आदान - प्रदान व बौद्धिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या समारंभासाठी प्रमुख वक्ते माननीय श्री रोहिदास पोटे साहेब ( माजी शिक्षण सहसंचालक पुणे , श्रेष्ठ कवी , प्रभावी वक्ते , सिद्ध हस्त लेखक , कोंकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष) ज्ञानसाधना सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे सचिव श्री जनार्दन पुगावकर ,जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर अशी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
या समारंभाचे प्रास्ताविक करताना जाणीव चे विश्वस्त प्रा.श्री संजय पाटील यांनी या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला तर श्री विजय गोरेगावकर यांनी मराठी भाषादिन गौरवाचे महत्त्व आपल्या भाषणातून विषद केले. या समारंभाचे प्रमुख वक्ते श्री रोहिदास पोटे साहेबांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक कवींच्या लेखणीतून मराठी भाषा जतन आणि संवर्धनाचे मोलाचे कार्य झाल्याचे नमूद करताना विष्णू सखाराम खांडेकर , कुसुमाग्रज , विंदा करंदीकर , भालचंद्र नेमाडे या चारही ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक कवीच्या साहित्याचा परिचय करून दिला.
कुसुमाग्रजांच्या कवितांनी मराठी मनांना उभारीने जगण्याची दिशा दिली , माणसांना माणसात आणण्यासाठी शब्दाचे फटकारे मारून शहाणे केले. आज माणसातला माणूस हरवत चालल्याची खंत व्यक्त करतांना पोटे साहेब म्हणाले " आजकाल जाणीव ची उणीव भासते आहे म्हणून जाणीव संस्थेच्या ध्येय धोरणांचे कौतुक केले. "वाचन संस्कृती वाढल्याशिवाय मराठी भाषा तग धरणार नाही , मराठी भाषेचे नातं पोटाशी जुळले तर मराठी खऱ्या अर्थाने विकसित होईल , आमच्या नातवाला मराठी वाचता येत नाही पण इंग्रजी छान वाचतो आणि बोलतो असे सांगणारे मराठी माणसे पाहिल्यावर वाईट वाटते, ज्याची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट आपली मराठी माणसे अभिमानाने सांगतात तेव्हा अशी मानसिकता बदलली पाहिजे , एका बाजूला इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि शिक्षक वाढताहेत नि मराठी शाळा नि शिक्षकांची गळचेपी सुरू आहे . थोडक्यात सांगायचे तर दारूची दुकाने उघडायला परवानगी द्यायची नि दारूबंदीची घोषणा करायची असे विरोधी चित्र मराठी बाबत सुरू आहे. वाचलेली पुस्तक आणि भेटलेली माणसे आयुष्य घडवतात या मुद्यावर बोलतांना पोटे साहेब म्हणाले - पैसा आणि प्रतिष्ठेच्या हव्यासाने माणूस मनातून व माणसांतून उतरत चालला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या अंत्य समयी आयुष्याचे खरं स्वरूप सांगितलं , निव्वळ पद, पैसा , महत्त्वाचा नसून आयुष्यात खरे सुख आणि समाधान महत्त्वाचं आहे . घर वाचनाचे केंद्र बनले पाहिजे. मुलांना पुस्तक हाताळू द्या. मन मोकळं करा , विचार करा . ज्ञानसाधना करा , आपण साधना करायला कमी पडतो. उमेद बाळगा . दशरथ मानजीने २२ वर्षे बोगदा खोदला .लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, अविश्रांत काम करा , दशरथ मानजी टनेल नाव आणि चित्रपट कायमचा स्मरणात राहील असे वागा. शिक्षक एक जप असतो शिक्षक एक तप असतो. शिक्षक आचार- विचार असतो शिक्षक लाचार नसतो. शिक्षक एका माणसाचं सैन्य असतो ......... पोटे साहेबांच्या या त्यांच्या कवितेतून उपस्थित श्रोत्यांना विचारप्रवृत्त केले. जात ,धर्म पंथ यांच्या विळख्यात सापडलेला माणूस जेव्हा माणूस म्हणून स्वतःची जात सांगेल तेव्हा समाजाचे संतुलन टिकेल यासाठी त्यांनी त्यांची आवडती कविता ' प्रलय ' मधून आपल्या भावना व्यक्त केल्याची आठवण सांगितली.
आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उपस्थित ज्ञानसाधना चे संचालक,वाचक, साहित्यिक व श्री संत रोहिदास विकास मंडळाचे सदस्य , कोंकण मराठी साहित्य परिषद चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित श्रोत्यांनी आपल्या घरातील त्यांची वाचून झालेली पुस्तके सोबत आणली होती ती सर्व (किमान १००) लहान मोठी पुस्तके आदान - प्रदान करण्यात आलीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाणीव चे संचालक श्री महेश मुद्रस यांनी केले तर आभार प्रकटीकरण ज्ञान साधना वाचनालयाचे सचिव श्री पुगावकर व श्री संजय पाटील यांनी करताना कार्यक्रमाची सांगता व सार्थक झाल्याचे समाधान व्यक्त केले.
--------- शब्दांकन : प्रा. संजय पाटील -----