कुसळ

शिवारभर गडी - माणूसराब राब राबायचा 

त्यांच्या घामाच्या धारांनी वाफा सहज भिजायचा ॥

शेत मळा फुलायचा हिरव्या गादीवर लोळायचा

सुगी सराईच्या दिवसाला खळ्यात बळीराजा खेळायचा ॥

धन धान्याच्या राशीची मनोभावे पूजा असे 

कणगीत जाण्या आधी दान धर्म केलेला दिसे ॥

गुरा ढोरांचा चारा पाणी वेळच्या वेळी होत असे

गुरांचं रवंथ सुरु होताच घरधनी जेवायला बसे ॥

सांजवेळचा गार वाराअंगात ठासून भरायचा

उधळलेल्या खोंडासारखा माणूस मस्तीत फिरायचा ॥

गेलं सगळं वैभव आता अंगातलं काम सरलय 

रानात आणि मनात फक्त कुसळ उरलय ॥