पंचायत राज्य

शिरोटीप: हे लेखन आत्मकथन/आत्मचरित्र याकडे संपूर्णतया झुकलेले आहे याची नोंद घ्यावी. यातील तथ्य नि सत्य हे 'माझे' तथ्य नि सत्य आहे. कुणास अजून दुसरे तथ्य नि सत्य माहीत असेल तर चडफडत/तणतणत बसावे.


पंचायत राज्य व्यवस्था (सरकारी हिंदीत 'पंचायत राज') हिचा उगम भारतीय उपखंडातला मानला जातो. तज्ञमंडळी त्याचे मूळ पार ऋग्वेदापर्यंत नेऊन भिडवतात. काहीजण सावधपणे दुसऱ्या-तिसऱ्या शतकापर्यंतच जातात. ते काय ते असो, पण 'पांचामुखी परमेश्वर'सारख्या म्हणींतून ही व्यवस्था इथे किमान काही शतके रुजलेली आहे असा अंदाज बांधायला तज्ञ असण्याची गरज नाही.

सरकारही गेल्या पंचाहत्तर वर्षांत मधून-अधून 'पंचायत राज' या नावाखाली अनेकानेक कार्यक्रम राबवायला बघते. सरकारी कार्यक्रम म्हणजे मुंबईत बसलेले अतितज्ञ बाबू आपल्या मनाप्रमाणे काय ते करतात. सुमारे अठरा वर्षांपूर्वीच्या उन्हाळ्यात या बाबू लोकांनी 'पंचायत राज इनिशिएटिव्ह' या वा तत्सम नावाचे एक सॉफ्टवेअर तयार करून घेतले वा त्याची सुधारित आवृत्ती तयार करून घेतली.

कुठलाही सरकारी कार्यक्रम जेव्हा केला जातो तेव्हा त्यात अनेक (जनतेला) अदृष्य खर्च समाविष्ट असतात. त्यातला एक खर्च म्हणजे प्रशिक्षणावर होणारा खर्च.

मी त्या काळात 'प्रशिक्षण' या सदराखाली मिळणाऱ्या कामांमधून माझा उदरनिर्वाह करीत होतो.

या सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण तालुका पातळीवरील निवडक तलाठ्यांना द्यायचे असा मूळ हेतू. हे प्रशिक्षण दोन वा तीन तासांत संपणार होते. नंतर या तलाठ्यांनी हळूहळू ते इतरांपर्यंत पोहोचवायचे किंवा नंतर अजून एका प्रशिक्षण कार्यक्रमाचा घाट घालायचा. फार पुढचा विचार करणे हे बाबूलोकांच्या रक्तात नसते.

मुंबईत मंत्रालयात ग्रामीण विकास आणि पंचायत राज या विभागात बसलेल्या सचिवांना हे फारसे पटले नाही. त्यांनी विचार करकरून असे ठरवले की या सगळ्या प्रशिक्षणार्थींना दोन दिवसांचे प्रशिक्षण गरजेचे आहे. दोन दिवस कसले प्रशिक्षण द्यायचे? तर संवाद कौशल्याचे (कम्युनिकेशन स्किल) प्रशिक्षण दीड दिवस आणि उरलेल्या अर्ध्या दिवसात सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण. ठरले.

सरकारी व्यवस्थेप्रमाणे हे काम मुंबईतल्या एका जाहिरात संस्थेला मिळाले. त्या जाहिरात संस्थेकडे सर्वप्रकारचे प्रशिक्षक उपलब्ध असत (असे सरकारला वाटे). त्या जाहिरात संस्थेने ते काम त्यांच्याहून छोट्या अशा एका दुसऱ्या जाहिरात संस्थेला सोपवले. ही दुसरी जाहिरात संस्था नागपुरात होती. या दुसऱ्या जाहिरात संस्थेने पुण्यातली एक जाहिरात संस्था निवडली. अशा रीतीने मुंबई, नागपूर आणि पुणे या तीनही शहरांना (राजधानी, उपराजधानी आणि सांस्कृतिक राजधानी) योग्य तो मान मिळाला. या पुण्याच्या संस्थेने अखेर कामाला सुरुवात केली.

माझा एक चुलत मित्र या पुण्याच्या संस्थेत कामाला होता. एकदा योगायोगाने गाठ पडली तेव्हा त्याने मला याप्रकारचे प्रशिक्षण घेण्यात रस आहे का विचारले. तोवर मी कुठलेच 'सरकारी' काम केलेले नव्हते. तसे पुण्यातील 'यशदा' मध्ये प्रशिक्षणाचे कार्यक्रम केले होते, पण 'यशदा' हे सरकारी कमी आणि संस्थान जास्ती आहे. तिथे गेलेल्या मंडळींना काय ते समजेल.

काहीतरी नवीन म्हणून मी हो म्हटले, पण ठिकाणे मी निवडणार हे मान्य करून घेतले. त्याप्रमाणे मी सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या तीन जिल्ह्यांतले प्रशिक्षण स्वीकारले. मिळणारे मानधन अगदीच माफक होते पण माझी हरकत नव्हती.

एक म्हणजे 'सरकारी' काम करण्याचा अनुभव मिळाला असता. दुसरे म्हणजे उन्हाळ्यात कोंकणात सुटीला जाण्याचा माझा बेत होताच. मानधनातून माझे पेट्रोल नक्की सुटले असते. पेट्रोलच काय, बिअरही सुटली असती. या तीन ठिकाणांच्या तारखा मी अशा जुळवून घेतल्या की गुरुवार-शुक्रवार सांगली, मग मध्ये एक आठवडा (माझी उन्हाळी सुटी) सोडून त्याच्यापुढचा सोमवार-मंगळवार सिंधुदुर्ग, आणि गुरुवार-शुक्रवार रत्नागिरी.

प्रशिक्षण सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच असणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी एक. असा दीड दिवस.

मी आदल्या संध्याकाळीच सांगली गाठली. सांगली-मिरज रस्त्यावरील जिल्हा परिषदेत प्रशिक्षण कार्यक्रम होता. मी जवळच एका हॉटेलात रूम बुक करायला सांगितली होती. रूम अगदीच साधी होती, पण बिअरच्या साथीने एक रात्र काढायला पुरेशी होती.

सकाळी साडेआठलाच मी तयार होऊन बसलो. पुण्याहून एक मित्रवर्य येणार होते.

ह्या मित्रवर्यांची कहाणी चित्तवेधक होती. हे मूळचे बंगाली. तत्वज्ञानात पीएचडी करण्यासाठी ऐंशीच्या दशकात आले नि पुणे विद्यापीठातून पीएचडी केली. तेव्हा विद्यापीठात तत्वज्ञान विभागात सुंदरराजन म्हणून प्राध्यापक होते त्यांच्याकडे डॉक्टरेट करण्यासाठी भारतभरातून विद्यार्थी येत. पीएचडी झाल्यावर मित्रवर्यांना कुठे लवकर नोकरी मिळेना (कॉलेज/युनिव्हर्सिटीमध्ये जागा रिकाम्या नव्हत्या. आणि डॉक्टर ऑफ फिलॉसफी इन फिलॉसफीला नोकरी इतर कोण देणार?) म्हणून त्यांनी पुण्यातल्या एका जाहिरात संस्थेत नोकरी पत्करली. ती त्यांना भलतीच जमली. मग त्या नोकरीच्या बरोबरीने त्यांनी मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केले.

तोवर ती जाहिरात संस्था हळूहळू मोडकळीस येण्यास सुरुवात झाली होती. विदेशी नावाच्या त्या संस्थेच्या देशी संस्थापकाच्या बायकोच्या बापाच्या पैशावर ती संस्था सुरू झाली होती. संस्था मोठी होत गेली तसे संस्थापकाचे बायकोशी बिनसत नि इतर बायकांशी जुळत गेले. या त्रिकोनाचा चौथा कोन होता मद्य. मग दशकभरातच संस्थापकाला आपली बायको, इतर बायका, आपला व्यवसाय हे सगळे कुठे नाहीसे झाले याचा बोध न होण्याची अवस्था आली. मग त्याने मद्य हा खांब घट्ट पकडून ठेवला नि अखेर लिव्हर सिऱ्हॉसिसने गेला.

त्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांना याची चाहूल अर्थातच लागली होती त्यामुळे त्यांनी इतर नोकऱ्या शोधल्या. मित्रवर्य तोवर मास्टर्स इन मार्केटिंग मॅनेजमेंट च्या जोडीने मास्टर्स इन पर्सोनेल मॅनेजमेंटही झाले होते. त्यांनी एका मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापकी पत्करली. मग मॅनेजमेंटमध्येही पीएचडी करून तिथला खुंटाही बळकट केला.

मित्रवर्य जाहिरात संस्थेत नोकरी करत असताना मंत्रालयात खेट्या मारून सरकारी कामे मिळवण्यात पटाईत झाले होते. त्यामुळे सरकारी कामातल्या खाचाखोचा त्यांना नीट माहीत होत्या. पुण्यातल्या ज्या जाहिरात संस्थेने मला काम दिले होते तिथे काम करणारा माझा चुलत मित्र आणि मी यांच्यात दुवा हे मित्रवर्य होते. असे ठरले होते की मित्रवर्य सांगलीला येतील, आपल्या नावामागच्या 'डॉक्टर प्रोफेसर' या पदवीचा उपयोग करून उद्घाटनाचे भाषण करतील आणि परत पुण्याला जातील. जाहिरात संस्थेने त्यांच्यासाठी पुण्यातून जाण्या-येण्यासाठी कॅब आणि एक दिवसाचे मानधन पुरवले होते. मित्रवर्य राहणार नव्हते. त्यांची मुलगी दहावीत गेली होती.

मित्रवर्य सकाळी पाचला पुण्याहून निघून नऊपर्यंत सांगलीत पोहोचणे अपेक्षित होते (तेव्हा चार तासांत सांगली गाठता येत असे). त्यांची वाट बघत मी बसून राहिलो. ते उगवले दहा वाजता (पुण्यातून निघायला सहा वाजून गेले होते). मी घाईघाईने जिल्हा परिषद गाठली. मित्रवर्य आवारात विल्स नेव्हीकट ओढत उभे होते.

"रिलॅक्श शर, ब्रेकफॉष्ट कॉर लिआ?" महाराष्ट्रात दोन दशके काढूनही मित्रवर्यांच्या जिभेचे बंगाली वळण अजिबात गेले नव्हते. त्यांना मराठी नीट येत होते पण तेही ते दाट बंगाली लहेजात बोलत.

त्यांच्याकडून कळाले की कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ जातीने हजर राहणार आहेत. आपल्याशिवाय कार्यक्रमाला सुरुवात करू नये असे त्यांनी बजावले आहे. आणि सीईओ सकाळीच मंत्र्यांबरोबरच्या एका (अर्थातच तातडीच्या) मीटींगसाठी इस्लामपूरला गेले आहेत, ते अकराशिवाय काही येणार नाहीत. मग मीही सैलावलो.

पुण्यात असूनही मी आणि मित्रवर्य वर्षातून एखाददोन वेळेस भेटत असू, पण ते काहीनाकाही कामानिमित्त. निवांत असा तासभर वेळ आहे म्हणताना आम्ही पुणे विद्यापीठातले दिवस यांवर नॉस्टॅल्जियासत्र सुरू केले. सुंदर राजन, व्ही जी भिडे, एम आर भिडे, पलसाने... वेळेचे भान राहिले नाही. अचानक घड्याळात बघितले तर साडेअकरा. चौकशी केली तर सीईओ बारापर्यंत येतील असे कळाले. आळसावून गप्पा कंटिन्यू केल्या.

बारा वाजले. साडेबाराही वाजले. प्रशिक्षणार्थीही कुठे दिसेनात. काय भानगड आहे म्हणून परत चौकशी केली आणि एक वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होईल असे आश्वासन घेऊन आलो.

दीड वाजता एकदम लगीनघाई सुरू झाली. लाल/पिवळ्या दिव्याच्या तीनचार गाड्या सटासट आवारात आल्या. तीनचार माणसे त्यातून उतरली. त्यातले एक गृहस्थ निर्ढावलेले गुन्हेगार वाटत नव्हते. ते सीईओ असावेत आणि बाकीचे मंत्र्यांचे चेले असा अंदाज बांधला. तो पंधरा मिनिटांनी खरा ठरला.

प्रशिक्षण होणार होते त्या सभागृहात सगळे पावणेदोनला जमले. पण माईक नि एलसीडी प्रोजेक्टर चालू नव्हता. संबंधित माणूस जेवायला गेला होता. त्याला ताटावरून उठवून आणण्यात आले (सीईओ साहेबांना मंत्र्यांच्या चेल्यांबरोबर शिराळ्याला जायचे होते) आणि एक पन्नासला मित्रवर्यांनी सुरुवात केली.

तोवर मी कावलो होतो. मित्रवर्यांना भरीला घालून त्यांना मराठीत बोलायला लावण्याइतपत कावलो होतो. मित्रवर्यांचे घट्ट बंगालीतले मराठी ऐकून सीईओ अवाक झाले. ही भाषा अझरबैजानी की स्वाहिली याबद्दल त्यांच्या मनात गोंधळ उडालेला दिसत होता. मध्येच मराठी भासणारे शब्द ऐकू येताहेत असा त्यांना भास होत होता.

प्रशिक्षणार्थींनाही काही कळत नव्हते. पण ते सगळे सीईओ साहेबांच्या तोंडाकडे नजर लावून होते. सीईओ साहेबांची सिस्टीम हॅंग झालेली असल्याने प्रशिक्षणार्थींचीही सिस्टीम हॅंग झाली होती. कंप्यूटरच्या भाषेत याला प्रायमरी हॅंग आणि सेकंडरी हॅंग म्हणतात.

मित्रवर्यांनी साताठ मिनिटांत छळसत्र आवरले. मग सीईओसाहेब उठले. सराईतपणे त्यांनी त्यावेळच्या शीर्षस्थ नेत्यांची नावे गुंफून एक भाषण ठोकले. त्याचा गोषवारा असा - संभाषण कला महत्वाची आहे. पंचायती राज महत्वाचे आहे. 'कखग' साहेबांच्या दूरदृष्टीमुळे, 'चछझ' साहेबांच्या नेतृत्वाखाली, 'टठड' साहेबांच्या सहकार्याने, 'तथध' साहेबांच्या अनुमतीने आणि 'पफब' मॅडमच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याहून खास प्रशिक्षक मागवण्यात आले आहेत (इथे 'खास' म्हटल्याने मी खुषावलो आणि 'मागवला गेलो' म्हटल्याने खंतावलो; एकूण शून्य) त्यांचा अमूल्य वेळ वाया न घालवता मी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो.

दोन दहाला हे सगळे संपले. सीईओसाहेब तरातरा बाहेर पडले. चपळाईने एका निवेदकाने माईक पटकावून 'जेवणाची व्यवस्था आरोग्य विभागाच्या आवारात केली आहे' असे जाहीर केले. सगळे प्रशिक्षणार्थी भसाभस बाहेर पडले. माझ्यासाठी आणि मित्रवर्यांसाठी जेवणाची व्यवस्था सीईओसाहेबांच्या ऍंटीचेंबरमध्ये केली होती. आम्ही तिथे गेलो तोवर सीईओसाहेब शिराळ्याला निघून गेले होते. दोन गारढोण थाळ्या आमची वाट पाहत होत्या. सीईओसाहेब गेल्यामुळे तिथल्या शिपायानेही आम्हांला दार उघडून देण्याखेरीज दर्शन दिले नाही. कसेबसे चार घास खाऊन आम्ही परत सभागृह गाठले. अडीच.

तीन वाजता हळूहळू प्रशिक्षणार्थी यायला सुरुवात झाली. तीन दहाला संयोजनाची जबाबदारी असलेले गृहस्थ आले. त्यांनी मृदू भाषेत आम्हा दोघांचा ईगो कुरवाळला. अखेर साडेतीनला सगळे प्रशिक्षणार्थी आले नि मी माईकपाशी जाऊन उभा राहिलो. मित्रवर्य पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

मंडळी भरपेट जेवून आली होती. काहीजणांनी तोंडात चुना-तंबाकू युती केली होती. माझे पहिले काही विनोद आणि प्रश्न भयाण शांततेत निधन पावले. अखेर मी थेट प्रशिक्षणार्थींपैकी एकेकाकडे बोट करून त्यांना बोलते केले. वीस मिनिटांनी हळूहळू मंडळी खुलू लागली.

आणि दिवे गेले.

जनरेटर असेलच म्हणून मी निवांत उभा राहिलो. पाच-दहा-पंधरा मिनिटे झाली. संयोजनाची जबाबदारी असलेले गृहस्थ आले आणि लगबगीने मला चहाचा आग्रह करू लागले.

"अहो, आत्ताच तर जेवलोय, चहा कशाला? जनरेटर आहे ना?"

"कसंए सर, जेन्शेट हाय की. करत्याल चालू. तोवर च्या तर घ्या".

दूध घालून उकळलेला उसाचा रस प्राशन केला. पंधरा मिनिटे गेली. अजून अंधार.

मी त्रागा करायला सुरुवात केल्यावर संयोजनाची जबाबदारी असलेल्या गृहस्थांनी खुलासा केला "कसंए सर, जेन्शेट हाय, पन त्यो हाय आरोग्य विभागाच्या ताब्यात. हे प्रशिक्षन हाय समद्या झेडपीसाटी. पन आरोग्य विभाग म्हनायलाय कुटल्या विभागाच्या नावानं डिजल लिव्हायचं त्ये कळाल्याबिगर जेन्शेट चालू व्हत नाय"

अखेर पाच वाजून पाच मिनिटांनी आरोग्य विभागप्रमुखांनी आपल्याच विभागाच्या नावाने प्रशिक्षण कार्यक्रमाच्या ललाटी कुंकू लावले नि जेन्शेट सुरू झाला. पण तोवर बहुतेक प्रशिक्षणार्थी अंतर्धान पावले होते.

"कसंए सर, लांबून लांबून आल्याती लोकं, साडेचाराला निंगाले तरी रात होतीया घर गाटायला".

अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ म्हणजे नऊला सुरू करू या वायद्यावर मी बाजार उठवला.

मी तीन प्रेझेंटेशन्स, एक क्वेश्चनेअर आणि दोन पार्टिसिपेटरी गेम्स अशी तयारी करून आलो होतो. त्यातल्या पहिल्या प्रेझेंटेशनच्या अठरा स्लाईड्सपैकी तीन स्लाईड्स संपल्या होत्या.

उन्हाळा छळत असूनही रात्री मी वैतागून 'ओल्ड मंक'वर भार टाकला.

आणि तिरतिरणाऱ्या डोक्याने का होईना, सकाळी पावणेनऊला जिल्हा परिषद गाठली.

"कसंए सर, येत्यालच की लोकं. लई लांबून येत्यात. धाला नक्की सुरू."

मी अखेर जाहीर केले की मी इथून एक वाजता निघणार आहे. तुम्ही कार्यक्रम दहाला सुरू करा किंवा बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी. माझी गाडी एक वाजून दोन मिनिटांनी जिल्हा परिषदेच्या गेटबाहेर पडलेली असेल.

अखेर अकराला कार्यक्रम सुरू झाला. मी केलेली सगळी तयारी (आयुष्यासारखीच) व्यर्थ आहे हे तोवर मला उमगले होते. त्यामुळे एलसीडी बंद करून मी प्रत्येक प्रशिक्षणार्थीला दोन दोन मिनिटे देऊन बोलते केले. 'तुमचे काम करताना तुम्हांला काय अडचणी येतात' हा ओपन एन्डेड प्रश्न टाकला. प्रत्येकाने तीनचार मिनिटे कैफियत मांडली.

माझे काम झाले. एक वाजला.

जाहीर केल्याप्रमाणे माझी गाडी (माझ्यासह) एक वाजून दोन मिनिटांनी आवाराबाहेर पडली. 'नवरत्न'मध्ये उदरभरण करून मी पश्चिमेला चाक वळवले. साडेपाचला रत्नांग्रीस पोहोचलो.

एकंदर प्रकरण वैतागवाणे होते. इतर जिल्ह्यांतून आलेले अनुभवही तसेच होते म्हणताना कार्यक्रम पत्रिकेत बदल करण्याचा घाट घातला गेला.

मला एक आठवडा सुटीच करायची होती ती मी संगमेश्वर नि देवरुखच्या मध्ये एका बेचक्यात वसलेल्या सोनवडे गावी केली. तिथे पूर्वी माझा मामा शिक्षक होता. तो आता निवृत्त होऊन साखरप्याला स्थायिक झाला आहे. त्याचे सोनवड्यातले सहशिक्षक दांडेकरमास्तर निवृत्त होऊन तिथेच स्थायिक झाले होते. पत्नी निजधामास गेलेली, मुलगा मुंबईत, त्याच्याशी फारसे जुळत नसे.

गृहस्थ चमत्कारिक होता, पण माझे त्यांचे जुळले होते. आमचे जुळण्याला कारणीभूत झालेली व्यक्ती होती सॉमरसेट मॉम.

वीसेक वर्षांपूर्वी मी दुचाकीवर सोनवड्याला गेलो होतो. तेव्हा सोनवड्याला जायला केवळ पायवाट होती. एस्टी खाली कोसुंब किंवा वरती बुरंबीपर्यंत. तिथून वन-टू वन-टू. स्कूटर घेऊन गांवात पोहोचलेला मीच बहुधा पहिला. त्यामुळे असला आचरटपणा करणाऱ्या गणेशमास्तरांच्या भाचराला 'बघायला' मंडळी जमली होती. दांडेकरमास्तर एका कोपऱ्यात तोंडात तंबाकू जमवून बसले होते. मी स्कूटरच्या डिकीमधून सामान काढताना तीनचार पुस्तके निघाली तशी दांडेकरमास्तरांचे निळे-घारे डोळे लकाकले. त्यात मॉमचे 'रेन ऍंड अदर साऊथ सी स्टोरीज' होते.

"तुम्ही 'अ रायटर्स नोटबुक' वाचले आहे का?" संथ, खर्जात प्रश्न.

त्यावेळी मी ते नुकतेच लकडीपुलाच्या फूटपाथवरून मिळवले होते. "वाचले नाहीये, आत्ताच मिळवले".

माझे खरे बोलणे त्यांना आवडले बहुधा. आमचे जुळले.

नंतर एकदा खुलून गप्पा मारताना त्यांनी आमचे जुळण्याचे कारण सांगितले.

त्यांच्या मते मॉम नको त्या पुस्तकांमुळे प्रसिद्ध झाला. रेन ऍंड अदर साऊथ सी स्टोरीज आणि अ रायटर्स नोटबुक ही दोनच पुस्तके खरी, बाकीची ठीकठाक असे दांडेकरमास्तरांचे मत. एकारलेले होते, पण त्यांचे होते.

तसेही मास्तरांचे आयुष्याबद्दलचेच मत एकारलेले होते. त्यामुळे त्यांचे कुणाशी जुळत नसे आणि त्यांना त्याची खंत नसे. आपली पुस्तके बरी नि आपण. रात्री रेडिओवरची संगीतसभा. तंबाकू हे चित्तवृत्ती अत्यंत माफक प्रमाणात उल्हसित करणारे व्यसन, तेही अगदीच नेमस्त. दिवसभर तोंडात बार भरून बसलेले नसत. ठरलेल्या तीन वेळा.

तर त्यांच्या मते मॉमची पुस्तके दोनच. त्यातले एक माझ्याकडे असल्याचे दिसत होते, दुसरे असल्याचे मी सांगत होतो. दांडेकरमास्तरांना एवढे पुरे होते.

त्यांचे घर झाडामाडांनी वेढलेले होते, विहीर बारमाही होती. त्यामुळे उकाडा जाणवला तरी कधी असह्य नसे. एखादी वाऱ्याची झुळूक पुरे. संध्याकाळनंतर खळ्यात दोन बाजली टाकली की रात्री चांदण्या मोजत झोपता येई.

तेव्हा त्यांच्याकडे सेलफोन नव्हता. सोनवड्यात तशीही रेंज येत नसे. पुढे बीएसएनएलची रेंज नीट येऊ लागल्यावर मुलाने हट्टाने सेलफोन हातात ठेवला. पण मास्तरांनी सेलफोन वापरण्याची जी अद्वितीय पद्धत शोधून काढली त्यापुढे मुलाचाही नाईलाज झाला. मास्तरांचा फोन कायम 'स्विच्ड ऑफ' असे. त्यांना कुणाला फोन करायचा झाला तर ते तो चालू करीत, फोन करीत आणि परत 'स्विच्ड ऑफ'. "फोन माझ्या सोयीसाठी आहे, लोकांच्या सोयीसाठी नाही" याला प्रत्युत्तर नव्हते.

तर दांडेकरमास्तरांकडे चार दिवस 'रेडिओ सायलेन्स'मध्ये काढून मी रत्नागिरी गाठली. सेलफोन रेंजमध्ये आलो. मित्रवर्यांना फोन केला. त्यांनी कार्यक्रमपत्रिकेतला बदल सांगितला.

प्रशिक्षण कार्यक्रम दोन दिवसांचाच होता. फक्त संवादकौशल्य एका दिवसात गुंडाळायचे होते. दुसरा दिवस सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण (एखाददोन तास) आणि कार्यालयीन अडचणींवर सहभागात्मक चर्चासत्र (पार्टिसिपेटरी डिस्कशन).

त्यामागचे तर्कशास्त्र असे होते - तालुक्याच्या गावाहून जिल्ह्याच्या गावाला येणाऱ्या प्रत्येकाचे जिल्ह्याच्या ठिकाणी काहीनाकाही काम असेच. काम नसले तर नातेवाईक असत. सहभागात्मक चर्चासत्र कागदावर, कामे आणि/वा नातेवाईक प्रत्यक्षात. रजा न मांडता हे सगळे. शिवाय प्रशिक्षण भत्ता. म्हणजे सगळे खूष.

मित्रवर्यांनी एक भविष्यवाणी केली, ती तंतोतंत खरी ठरली. प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यावर जो 'फीडबॅक' घेतला जातो तो फीडबॅक या नवीन कार्यक्रमपत्रिकेमुळे दहातले किमान आठ गुण देणारा असेल ही ती भविष्यवाणी. तसेच घडले.

सरकारी प्रशिक्षण वर्गांबद्दलचे मित्रवर्यांचे ज्ञान अफाट होते. तहसीलदार मंडळींसाठी त्यांनी एक चार दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम जोरदार यशस्वी करून दाखवला होता. यशस्वी म्हणजे दहापैकी नऊ गुणांचा फीडबॅक नि त्यांच्या (त्यावेळी ते काम करीत असलेल्या) जाहिरात कंपनीला कोट्यवधी रुपये. तो कार्यक्रम यशस्वी होण्यामागची त्यांनी केलेली तयारी त्यांनी क्रमवार सांगितली ती अशी.

पहिले म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रम उन्हाळ्यात आयोजित करायचा. दुसरे म्हणजे तो थंड हवेच्या ठिकाणी आयोजित करायचा. म्हणजे चिखलदरा किंवा पांचगणी-महाबळेश्वर. तिसरे म्हणजे चिखलदरा नि पांचगणी हे दोन केंद्रबिंदू घेऊन महाराष्ट्राच्या नकाशाचे दोन भाग करायचे. चौथे म्हणजे नोकरीच्या ठिकाणाहून त्यातले जे जास्ती लांब असेल तिथे प्रशिक्षणाला पाठवायचे. म्हणजे उत्तर-पूर्व भागातल्या लोकांना पांचगणी आणि दक्षिण-पश्चिम भागातल्या लोकांना चिखलदरा. यामुळे प्रवास भत्त्यात घसघशीत वाढ होते आणि एकेक अख्खा दिवस प्रवासात जातो (कामातून सुटका). चौथे म्हणजे शेवटचा पूर्ण दिवस सहभागात्मक चर्चासत्र ठेवायचे, म्हणजे सकाळी एकदा सह्या केल्या की सगळे बाजारात खरेदीसाठी जायला मोकळे.

एकूण काय, मला एक दिवस सिंधुदुर्ग नि एक दिवस रत्नागिरी. सिंधुदुर्गला जाण्यासाठी मी लांज्याला मुक्काम ठेवला. तिथून ओरोस (सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण) साधारण शंभरेक किमी (दीडेक तास). लांज्याला मुक्काम करण्यामागचे कारण लांज्याच्या मामेभावाचे तेव्हाचे घर. चार घरांची चाळ, प्रत्येक घराला तीन रेल्वेगाडी छाप खोल्या. बाहेर मोठा व्हरांडा. आणि व्हरांड्याला लागून बारा गुंठे भातशेती. चार गुंठे बाय तीन गुंठे असा आयत, एकेका गुंठ्याचा बांधाने बंदिस्त तुकडा. उन्हाळ्यात पूर्ण रिकामे. त्या खळ्यात बाजले टाकून झोपणे सुखाचे होते. रत्नागिरीला बाहेर झोपायचे म्हटले तर मरणाचे डास.

ओरोस हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण का याचे उत्तर मजेशीर आहे. कणकवली नि कुडाळ या दोन गावांत जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होण्यासाठी चुरस होती. सावंतवाडी एका टोकाला, वेंगुर्ला नि मालवण हमरस्त्यापासून लांब, त्यामुळे हे तिघे कटले. कुडाळ नि कणकवली दोघांचा सामना बरोबरीत सुटला आणि दोघांच्या मध्ये - कणकवलीपासून सुमारे २० किमी आणि कुडाळहून १५ किमी - असलेल्या ओरोस या खेड्याचे नशीब निघाले. नंतर थोडे मोठे झाले, पण कणकवली वा कुडाळएवढे नव्हे.

लांज्याहून चहापोहे करून सकाळी सातला निघालो नि साडेआठच्या सुमारास ओरोसला पोहोचलो. जिल्हा परिषदेचे आवार मोठे होते. आणि रिकामे. आणि कुलूपबंद. बाहेर एक चहाची टपरी होती तिथे टेकलो. बऱ्याच वर्षांनी चहात बुडवून बटर खाल्ले.

नवाला सुमारे दहा मिनिटे कमी असताना मुख्य दरवाजा उघडला. मी तत्परतेने आवारात गाडी घातली. एक फाटक्या अंगाचा इसम लगबगीने पुढे झाला "ट्रेनर? पुण्यासून इलंयत?" मी होकार दिल्यावर त्याने "नवाक ना, साडेनवाक सुरू होतलो हा कार्यक्रम. आदीच सांगलेला बरा. येवा, आत बसून वाईच च्या घेवंया".

मी साडेनऊ या वेळेविषयीही साशंक होतो, पण बाहेर करण्यासारखे काही नव्हते म्हणताना सभागृहात जाऊन बसलो. सभागृह बऱ्यापैकी थाटामाटाचे होते. स्टेजवर आणि प्रेक्षागृहात कार्पेट होते. मी एलसीडीला माझा कंप्यूटर जोडला. जोडी जुळली. बऱ्याचदा एखादा लॅपटॉप आणि एखाद्या कंपनीचा एलसीडी प्रोजेक्टर ही जोडी जुळवण्यासाठी महत्प्रयास करावे लागतात. ते टळाले.

नऊ वीस. आणि अचानक इन्कमिंग सुरू झाले. बघता बघता दहा मिनिटांत तीसेक माणसे जमली. यादी पाहिली तर तीसच जणांची होती. म्हणजे सगळे आलेच की.

इथे सीईओ वगैरे लबेदा नव्हता. माझे स्वागत करणाऱ्या फाटक्या माणसानेच प्रास्ताविक केले. तो कार्यालय प्रमुख होता. नऊ चाळीसला मी उभा राहिलो.

आणि मैफल जमली. प्रशिक्षकाला खरी भूक असते ती प्रशिक्षणार्थींसोबत होणाऱ्या संवादाची. एखाद्या वाक्याला येणारा हशा, प्रशिक्षणार्थींच्या चेहऱ्यावरचे अर्धवट प्रश्नचिन्ह पाहून लगेच सविस्तर स्पष्टीकरण केल्याने त्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, एखादा प्रश्न आधीच हेरून तो उमटण्याआधीच खुडल्यावर आपल्या आतून उमलणारी खुषी. प्रशिक्षण देण्याबद्दल पैसे मिळतात हा खरे तर दुय्यम फायदा.

अकरा वाजता चहासाठी पंधरा मिनिटे सुटी दिली. सव्वा अकराला सर्व मंडळी हजर. जेवायला एक वाजता सुटी केली. तेव्हा कार्यालय प्रमुखांनी बुजत बुजत 'संध्याकाळी साडेपाच ऐवजी सव्वापाचला संपवता येईल का' अशी पृच्छा केली. कारण सावंतवाडी नि वेंगुर्ल्याहून आलेल्या मंडळींना साडेपाचला एस्टी होती.

'मग हे बोलणे/विचारणे सकाळीच का नाही केले?' या प्रश्नाला उत्तर मिळाले ते असे - 'आधी म्हटले येणारे ट्रेनर कोण नि कसे आहेत ते पाहू. कुणीकुणी लगेच तक्रार करतात, कामचुकार म्हणतात. पुण्या-मुंबईहून आलेली तुम्ही लोकं, आम्ही कुठे पुरे पडणार तुमच्या तक्रारींना? तुमच्याशी बोलल्यावर माणसांतले दिसलात म्हणून विचारायची हिंमत केली. पुढली एस्टी आहे, पण ती आठ वाजताची.' मी हो म्हणायला काहीच हरकत नव्हती. पण मला उगाच माफक खडूसपणा करायची लहर आली. "काही हरकत नाही. एक काम करू, चहाचा ब्रेक घेऊया नको. म्हणजे आपोआप पंधरा मिनिटे वाचतील." तिसांपैकी एकानेही शब्दांत वा चेहऱ्यावर नाखुषी न दाखवता होकार दिला. माझा खडूसपणा वाया गेला.

शेवटी मी चहाची सुटी देऊनही पाचला संपवले. शेवटचा दीड तास एक 'रोल प्ले' घेतला त्याने मंडळी फारच खूष झाली. आणि त्यांचा परफॉर्मन्स बघून मी. काम घेऊन येणारे नागरिक किती अडेलतट्टूपणा करतात याचे एक मासलेवाईक उदाहरण एका चमूने सादर केले. आलेल्या नागरिकाकडे बीपीएल (बिलो पॉव्हर्टी लाईन - दारिद्र्यरेषेखालची जनता) कार्ड नव्हते. त्याबदल्यात तो 'माज्या बापाकडे होते' आणि 'मी काय खोटं बोलतो का?" एवढेच आलटून पालटून म्हणत होता. पण तलाठी बाईने त्याला न धीर सोडता सांगत समजावत हळूहळू वठणीवर आणले.

कार्यक्रम संपल्यावर सर्वांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. आणि मीही.

आनंदात तरंगत लांजा गाठले.

आता रत्नागिरी. रत्नागिरी जिल्हा परिषदेची इमारत समुद्रापासून किलोमीटरभर अंतरावर आणि उंचावर आहे. काही खिडक्यांतून समुद्र दिसतो, काही खिडक्यांतून नर्मदा सिमेंटच्या कारखान्याच्या चिमण्या. आणि सगळ्या पश्चिममुखी खिडक्यांतून हवेच्या झुळुकी येत असतात.

रत्नागिरीलाच मुक्काम केल्याने मला पाचेक मिनिटांत कार्यस्थळी पोहोचता येणार होते. पण सर्वात सोपे गणित चुकण्याची शक्यता सर्वात जास्त तसे मला पोहोचायला पाच मिनिटे उशीरच झाला. कार्यस्थळी सगळे प्रशिक्षणार्थी बसलेले. माझ्यामागे दोन बायका धावत धावत पोहोचल्या. मी शेवटचा नव्हे म्हणून मला जरा हायसे वाटले. नंतर कळाले की त्या बायका अनुक्रमे मंडणगड आणि दापोलीहून आल्या होत्या. एस्टीचा साडेतीन तासांचा प्रवास करून. मी नाचण्यातून, म्हणजे साडेतीन किलोमीटरवरून आलो होतो. हायसे वाटण्याचे लाज वाटण्यात रूपांतर झाले.

इथेही सिंधुदुर्गसारखाच उत्साह आणि उत्सुकता. मंडणगडवाल्या बाईंनी पाचला निघायची परवानगी अदबीने मागितली. दापोलीवाल्या बाई रत्नागिरी मुक्कामी राहणार होत्या.

इथल्या 'रोल प्ले' मध्येही इरसाल सादरीकरण झाले. एका 'नागरिका'ने तर "दलितांवर अन्याव करतांव?" असा चढा स्वर लावला. पण दुसऱ्या पार्टीने "अरे बापूस माजा बुद्दवाड्यातसून भाएर पडून शिकला म्हनून हिते पोचलो. तूपन बुद्द दलित करीत बसू नको, शीक जरा" असा डोस पाजून त्याला वठणीवर आणले.

इथेही तृप्त आनंदाची भावना घेऊन मी बाहेर पडलो.