मूग मेथी दाणे भाजी

  • मेथी एक जुडी
  • मूग डाळ एक वाटी
  • कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी
  • लसूण एक गड्डी
  • हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे
  • तेल, मीठ गरजेप्रमाणे
  • मोहरी, हळद पूड, हिंग गरजेप्रमाणे
१ तास
दोन जणांसाठी

मूग डाळ आणि शेंगदाणे भिजत घालावेत.

मेथी निवडून आणि बारीक चिरून घ्यावी. लसूण सोलून आणि ठेचून घ्यावी.

एका तासातली ३० ते ३५ मिनिटे निवडणे-चिरणे-सोलणे-ठेचणे यांत जातील. मूग डाळ आणि शेंगदाणे तितका वेळ भिजतील.

हिरव्या मिरच्यांना फक्त मध्ये एक उभा काप द्यावा.

तेल मोठ्या ज्योतीवर तापवावे. धुरावल्यावर ज्योत बारीक करून मोहरी, हळद आणि हिंग घालावा.

लगेच ठेचलेली लसूण आणि अख्ख्या हिरव्या मिरच्या घालून हलवावे. लसूण खरपूस झाल्याचा वास यायला लागला की भिजवलेली मूगडाळ आणि शेंगदाणे घालून नीट परतावे. दोन दोन मिनिटांनी परतत रहावे.

दहा मिनिटांनी चिरलेली मेथी घालून नीट परतावे. गरजेपुरते मीठ घालावे.

दोन दोन मिनिटांनी परतत रहावे. सुमारे दहा ते पंधरा मिनिटांनी मेथी नीट शिजून खाली बसेल. अंदाज घेऊन ज्योत बंद करावी.


(१) सोबत तांदळाची भाकरी असल्यास उत्तम.

(२) (सुक्या) मत्स्याहारी मंडळींना याची एक पूर्ण वेगळी आवृत्ती करता येईल - भिजवलेली मूगडाळ नि दाणे यांच्या ऐवजी सुकट वापरून.

स्वप्रयोग