अंडा पराठा

  • अंडी (कच्ची) ४
  • कणिक - सहा मध्यम आकाराच्या पोळ्यांपुरती
  • काळी मिरी, ओवा प्रत्येकी एक मोठा चमचा
  • तेल, मिरची, मीठ गरजेप्रमाणे
३० मिनिटे
दोन जणांसाठी

तव्यावर काळी मिरी खमंग वास सुटेस्तोवर भाजून घ्यावी. खलबत्त्यात मध्यम भरड कुटून घ्यावी. मिक्सर नको.

त्यावर ओवा थोडासा भाजून घ्यावा (लक्ष न दिल्यास लगेच जळतो).

पोळ्यांसाठी कणिक (थोडी सैलसर) भिजवावी. भिजवताना कुटलेली काळी मिरी आणि ओवा घालावा. पंधरा मिनिटे रुमालाने झाकून ठेवावी. कणिक भिजवताना आवडी/सवयीप्रमाण तेल, मीठ आदि घालावे

अंडी फेटून त्यात अंड्यांपुरते मीठ घालावे.

तीन मध्यम आकाराच्या बिनघडीच्या पोळ्या लाटून घ्याव्यात.

तव्यावर पाव चमचा तेल ठिबक पद्धतीने शिंपडावे. तवा गॅसवर ठेवून गॅस चालू करावा.

एक पोळी तव्यावर एका बाजूने नेहमीपेक्षा एक चतुर्थांश आणि एका बाजूने नेहमीपेक्षा अर्धी भाजून घ्यावी. ज्योत मध्यम असावी.

अजून दोन पोळ्या लाटून तयार ठेवाव्यात.

पोळीची अर्धी भाजलेली बाजू तव्यावर असताना चमच्याने फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणापैकी एक चतुर्थांश मिश्रण चमच्याने एक चतुर्थांश भाजलेल्या बाजूवर हळूहळू पसरावे. त्यावर न भाजलेली एक पोळी अलगद ठेवावी. त्याच्या वरच्या बाजूवर वर अजून एक चतुर्थांश फेटलेले अंडे हळूहळू पसरावे. त्यावर तिसरी पोळी ठेवावी. कडेने चमचाभर तेल सोडावे, थालिपीठाला सोडतो तसे.

एक ते दीड मिनिटांनी अंदाज घेऊन हे पाचपदरी प्रकरण अख्खे उलटावे.

अजून दीड ते दोन मिनिटांत तयार होईल.

सोबत टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉसचे मिश्रण द्यावे. त्यात इच्छा असल्यास थोडे एगलेस मेयॉनीजही घालता येईल.

उरलेल्या फेटलेल्या अंड्यांसाठी आणि कणकेसाठी या कृतीची पुनरावृत्ती करावी.

(१) तव्यावरच्या तेलाचे प्रमाण आवडी/सवयीप्रमाणे बदलावे.

(२) तेलाबरोबर/ऐवजी टेबल बटर वापरता येईल.

(३) अंडे फेटताना त्यात किसलेले चीज घालता येईल. किंवा अंड्याच्या थरावर दुसरी/तिसरी पोळी ठेवताना मध्ये चीज स्लाईस घालता येईल.

(४) पोळ्या करत बसण्याचा खटाटोप टाळण्यासाठी तयार पोळ्या वापरता येतील. फक्त भाजण्याचा अंदाज बदलावा लागेल, कारण भाजणे हे केवळ अंडे शिजण्यापुरतेच करावे लागेल.

(५) तयार पोळ्यांऐवजी तयार मेथी ठेपले वापरले तर अजून वेगळी चव येईल. मेथी ठेपले वापरले तर अंड्यात काळी मिरी आणी ओवा याऐवजी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या नि कोथिंबीर जास्ती योग्य ठरेल.