स्पॅनिश ऑम्लेट

  • अंडी २ (न उकडलेली)
  • उकडलेले बटाटे २ (अंड्याच्या आकाराचे)
  • ओरेगॅनो एक सॅशे
  • तेल एक पळी
  • हिरव्या मिरच्या १/२ (आवडीप्रमाणे)
  • मीठ, मिरपूड
२० मिनिटे
एकासाठी

उकडलेले बटाटे सोलून बारीक चिरून घ्यावेत.

हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी.

चिरलेले बटाटे नि मिरची एकत्र करून त्यात मीठ घालून नीट एकत्र करावे. मीठ घालताना हे मिश्रण आणि चार अंडी यांच्यासाठी मिळून अंदाज घ्यावा.

अंडी फोडून या मिश्रणात घालावीत आणि नीट एकत्र करावे. हे मिश्रण अजिबात प्रवाही नसेल, त्यामुळे फेटता येणार नाही. काट्याने हलवून एकत्र करावे.

पॅनमध्ये तेल कडकडीत तापवावे.

धुरावल्यावर त्यावर हे मिश्रण घालावे नि शक्य तितके पसरवून घ्यावे.

ज्योत मोठीच ठेवावी. पॅन मधून अधून हलवावा आणि ऑम्लेट पॅनला चिकटणार नाही हे पहावे.

तीनचार मिनिटांनी बटाटे खरपूस परतल्याचा वास आल्यावर ज्योत बारीक करावी.

तीनचार मिनिटांनी अलवार हाताने ऑम्लेट अख्खे उलटावे.

ज्योत मोठी करून दोन मिनिटे ठेवावे.

ज्योत बंद करून ताटलीत काढावे. वरून मिरपूड नि ओरेगॅनो (पीटरडोनट्स वा पिझ्झा हट वा डॉमिनोज मध्ये मिळते त्यातला एक सॅशे) भुरभुरावे.

यात मुख्य चव ओरेगॅनोची आहे. त्यामुळे ओरेगॅनो नसल्यास आपल्या जबाबदारीवर करावे.

(१) हा पोटभरीचा प्रकार होतो. त्यामुळे सोबत टोस्ट घेणे ऐच्छिक आहे. टोस्ट घेतलाच तर साधा टोस्ट घ्यावा. गार्लिक टोस्ट नको. ओरेगॅनोची चव गडबडते.

(२) चीज घालायचे झाल्यास -

मोझ्झरेला/चेडार चीज असल्यास पॅनमध्ये मिश्रण घातल्यावर लगेच किसून घालावे.

पार्मेसान चीज असल्यास त्याची पावडर ऑम्लेट उलटण्याच्या दोनेक मिनिटे आधी भुरभुरावी.

नेहमीचे चीज असल्यास (अ) बारीक किसून ऑम्लेटच्या मिश्रणात ते मिश्रण तव्यावर घालण्याआधी घालावे वा (आ) ताटलीत काढल्यावर गरम असतानाच किसलेले चीज घालावे.

(३) पोर्क सॉसेज घालायचे झाल्यास सॉसेजच्या चकत्या करून खरपूस परतून घ्याव्यात आणि ऑम्लेटचे मिश्रण तव्यावर घातल्याघातल्या त्यावर पेराव्यात.