व्यंगचित्रकार ग्लासबर्गन

बऱ्याचदा व्यंगचित्रे म्हणजे शाब्दिक विनोदांना जोडलेले रेखाचित्र असा धेडगुजरी प्रकार असतो. बहुतेक वेळेस दुर्लक्षणीय आणि विस्मरणीय. त्यात राजकीय आवेश आणून काढलेली व्यंगचित्रे म्हणजे तर उबगवाणा प्रकार. उदाहरणार्थ इंडियन एक्स्प्रेसमध्ये येणारी उन्नी या व्यंगचित्रकाराची चित्रे.

राजकीय, पण आवेश न आणता काढलेली व्यंगचित्रे आपल्याकडे आर के लक्ष्मण यांनी रुजवली. आणि राजकीय आवेश आणून काढलेली आणि तरीही बरीचशी अर्थपूर्ण असलेली व्यंगचित्रे बाळ ठाकऱ्यांनी रुजवली. मग काही प्रमाणात श्रीनिवास प्रभुदेसाई, राज ठाकरे आदि.

अराजकीय व्यंगचित्रांत शतायुषी शि द फडणीस अर्थातच अग्रणी. खेरीज हरिश्चंद्र लचके, प्रभाशंकर कवडी इत्यादि.

ही आपल्याकडच्या सगळ्या व्यंगचित्रकारांची खानेसुमारी नाही. माझ्या स्मरणचाळणीत अडकून बसलेली नावे घेतो आहे.

पाश्चिमात्य व्यंगचित्रकारांत राजकीय व्यंगचित्रे कळण्याइतके तिकडचे राजकारण कधी आतवर झिरपले नाही. अराजकीय पात्राधारित व्यंगचित्रांत 'हीथक्लिफ' ही मांजराची व्यंगचित्रे आकर्षक वाटली. 'केल्व्हिन ऍंड हॉब्ज'ची व्यंगचित्रे वाखाणणे ही 'चोखंदळ' फॅशन होती. म्हणूनच बहुधा मला ती कधी कळाली नाहीत. मांजराचीच 'गारफिल्ड' ही शृंखला आवडली. 'हेगार द हॉरिबल' ही शृंखलाही.

नमन पुरे.

ग्लासबर्गन या व्यंगचित्रकाराशी ओळख होऊन सुमारे दोन दशके लोटली. नक्की गाठ कुठे पडली आठवत नाही. पण जीवनशैलीशी पूर्णपणे संबंधित अशी एका चौकटीतली त्याची व्यंगचित्रे लक्षवेधक होती. 

त्या काळात (खरेतर थोड्या आधीच्या काळापासून) तंत्रज्ञानाने जीवनात नुसता शिरकावच केला नव्हता तर 'अरब आणि उंट' या रुपकातल्याप्रमाणे आयुष्यरूपी तंबूत हा तंत्रज्ञानरूपी उंट घुसून बसला होता. मग अनुषंगाने आयुष्यात झालेले बदल, वेगळाली फॅडे (विशेषतः डायटिंग), अस्थिर नातेसंबंध, वेगळाली मॅनेजमेंट टेक्निक्स शिकून घेण्याची सर्वांची धडपड, हे सगळे ग्लासबर्गन एका फ्रेममध्ये पकडीत असे.

सेलफोन ऊर्फ वायरलेस टेक्नॉलजी पहिल्यांदा आल्यावर सेलफोनने स्वतःचे वेगळे अस्तित्व ठसवायला सुरुवात केली. ग्लासबर्गनने ते असे पकडले. 

सेलफोन पहिल्यांदा वापरायला अगदी महाग होता. मिनिटामागे रक्कम मोजावी लागे. त्याबद्दल

मोबाईल वापरून सतत 'ऑनलाईन' राहून इतरांना काव आणणाऱ्यांचा असा सूड घेण्याचा बेत आहे

अस्तंगत होत चाललेली मुद्रित माध्यमे पुढल्या 'डिजिटल सॅव्ही' पिढीला कशी दिसतात? त्याचे उत्तर

नवीन तंत्रज्ञान आले खरे, पण सुरुवातीला (तरी) सगळ्यांचा जो मामा झाला होता तो ग्लासबर्गनने असा पकडला.

स्मार्टफोनला शिस्त लावण्याचा असाही प्रयत्न

डायटिंगमधली वेगळाल्या प्रकारची डाएट्स नि त्याचे कट्टर अनुयायी हेही त्याच्या तावडीतून सुटले नाहीत. हे आणि हे चित्र.

डायटिंगच्या दुष्टचक्रात सापडलेला एक जीव कळवळून असे विचारतो आहे

डायबेटिस हा शब्दही तेव्हा बऱ्याच जणांच्या आयुष्यात घाऊकीत शिरला. त्यावर अशी नि अशी मल्लिनाथी.


अठ्ठावन्न वर्षांच्या आयुष्यात ग्लासबर्गनने अशी हजारो व्यंगचित्रे काढली. त्याच्या वेबसाईटचा पत्ता https://www.glasbergen.com/ 

येथे हजारो व्यंगचित्रे बघण्यासाठी (आणि उतरवून घेण्यासाठी) मोफत उपलब्ध आहेत. ग्लासबर्गनचे निधन होऊन नऊ वर्षे होऊन गेली, पण वेबसाईट अजून खणखणीत आहे. आणि त्यातली विषयांची सूची बघितली की थक्क व्हायला होते.

अवांतर:  पहिल्यांदा त्याच्या नावाची गंमत वाटली. रॅंडी या शब्दाचा अर्थ कामातुर (कामातुराणां न भयं न लज्जा). रॅंडॉल्फ या नावाचे लघुरूप रॅंडी. पण नंतर कळाले की रॅंडी हे एक स्वायत्त नावही आहे.

अनुराग माथुरच्या 'द इन्स्क्रुटेबल अमेरिकन्स' मध्ये या नावाची पहिल्यांदा ओळख झाली. त्यातल्या नायकाला रॅंडी नामक व्यक्ती भेटते नि स्वतःची ओळख करून देते. नायकाची एकशब्दी प्रतिक्रिया, "व्हाय?". दुसऱ्यांदा भेटल्यावर ती व्यक्ती नायकाला "हाय, आयॅम रॅंडी" म्हणून पुनरोळख करून देते तेव्हाची एकशब्दी प्रतिक्रिया "स्टिल?"