बेडन पॉवेलचे चेले

शाळेत आठवी नि नववीत आम्हांला 'स्काऊट' हा कंपल्सरी विषय होता.

त्याला ऑप्शन म्हणून एनसीसी होती. पण माझ्यासारख्या बैठ्या वृत्तीच्या मुलांना एनसीसी फारच कष्टप्रद वाटे.

एनसीसीचे बाविस्कर सर आमचे गणिताचेही शिक्षक होते. ते गणिताच्या वर्गात जितकी मारहाण करीत ते पाहता एनसीसीत तर ते देहदंडापर्यंत जात असतील असे समजण्याला वाव होता. त्यामानाने स्काऊटचे सैंदाणेसर मवाळ होते. खुद्द बाविस्कर सरांचा मुलगा स्काऊटमध्ये आला होता.

तिशीत प्रवेशणाऱ्या सैंदाणे सरांचे स्काऊटचे ट्रेनिंग नुकतेच झाले होते. आणि ते ट्रेनिंग कुठे नि कुणी घेतले होते माहीत नाही, पण बऱ्याचदा सैंदाणेसर आमचा गोंधळ उडवून देत.

स्काऊटचा सॅल्यूट कसा असतो? तर उजव्या हाताची करंगळी अंगठ्याखाली दाबायची आणि तीनबोटी सॅल्यूट मारायचा.

पण मध्येच एकदा सरांनी फतवा काढला की करंगळीने अंगठा दाबायचा नि तीनबोटी सॅल्यूट मारायचा.

तसे करण्याचे 'तर्कशुद्ध' कारणही त्यांनी दिले. करंगळी ही अंगठ्यापेक्षा दुर्बळ. दुर्बळांना सबळांनी उचलून धरायचे/ टेकू द्यायचा म्हणून अंगठा खाली नि करंगळी वरती.

ते कुणाला नीटपणे जमेना.

मग आम्ही परत अंगठ्याखाली करंगळी यावर स्थिरावलो. यालाही सैंदाणे सरांनी 'तर्कशुद्ध' कारण दिले. करंगळी दुष्ट नि अंगठा सुष्ट. सुष्टांचा दुष्टांवर विजय म्हणून अंगठ्याखाली करंगळी.

लघुशंकेला जाण्याची इच्छा जाहीर करणे म्हणजे दुष्टांचा विजय हे माहीत नव्हते.

स्काऊटच्या नावाखाली आठवड्यातून दोनदा एकेक तास आम्हांला स्काऊटच्या इतिहासाबद्दल काही सांगितले जाई.

एकदा दोरीच्या गाठी मारायला शिकवण्याचा प्रयत्न झाला. पण प्रत्येकाने आपल्या ताब्यात आलेल्या सुतळीचा भारताच्या परराष्ट्र धोरणासारखा गुंता करून टाकला.

मग एकदा जखमी माणसाला उचलून कसे न्यायचे याचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. भानगड अशी झाली की आमच्या तीस जणांच्या वर्गात आम्ही सहा सुपर साईजचे गब्दुल ढोले होतो. आमच्यातल्या किशोर कोंडनानीला 'जखमी' माणसाची भूमिका सरांनी दिली. त्या जाड्याला उचलताना तिघेजण धडपडले नि खरोखर मुका मार लागून जखमी झाले. उचलणाऱ्यांनी अचानक सोडून दिल्याने कोंडनानीचे बूड शेकले नि तोही कोकलू लागला.

शाळा पातळीवर प्रात्यक्षिक करताना अशा प्रात्यक्षिक अडचणी येत होत्या याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून (वा त्यामुळे इरेस पेटून) सैंदाणे सरांनी स्काऊटचा कॅंप भरणादेवीच्या जंगलात नेण्याचे योजले. आमच्या गांवापासून सुमारे वीस किमीवर हिवरा नदीच्या काठाला भरणादेवीचे देऊळ होते. त्यामागे मोठीशी डोंगर रांग नि जंगल. कॅंपचा कालावधीही चांगला तीन रात्री चार दिवस असा ऐसपैस होता. दिवाळीची सुटी नुकतीच उरकली होती.

तेव्हां त्या देवळात एका साधू महाराजांचे वास्तव्य होते. साधू महाराज नावावरुन कल्पना करावी असे ते नव्हते. दाढीमिशी सफाचाट केलेले गोरेगोमटे गुटगुटीत असे हे महाराज बरेचसे विवेकानंदांसारखे दिसत. डोकेही पूर्ण तासलेले. महाराज मूळ बंगाली होते म्हणे, पण ते मराठी उत्तम बोलत. अगदी स्थानिक अहिराणी हेल काढीत बोलत. महाराजांना सत्चिदानंद स्वामी म्हणत.

नदी आणि जंगलाच्या मध्ये तंबू ठोकायचे आणि देवळाच्या आसपासचा परिसर झुडूप-झाडोरा तोडून स्वच्छ नि समतल करायचा (स्काऊट कॅंप आयोजित केला की अशी काहीतरी समाजसेवा वा श्रमदान करणे अपेक्षित असते) असा बेत सरांनी आखला.

आमचे पाच गट करण्यात आले. प्रत्येक गटात सहा विद्यार्थी. आमची शाळा मुले-मुली सहशिक्षण यासारख्या चावट प्रकारांना अजिबात थारा देणारी नव्हती. मुलींचे वर्ग (आणि त्यांच्या वेळा) वेगळ्या असत.

प्रत्येक गटाला एका वन्यप्राण्याचे नांव देण्यात आले. आम्हां सगळ्या सुपर साईज हिरोंचा गट अर्थातच झाला हत्ती गट. इतर गट वाघ, सिंह, कोल्हा नि चित्ता असे होते.

प्रत्येकाने घरून काय काय सामान नि शिधा सामग्री आणायची यातही सरांनी भरपूर घोळ घातला. सगळे एकत्र जमल्यावर लक्षात आले की आम्ही आणलेल्या शिधासामग्री आणि सामान या भक्कम आधारावर आपल्या सैन्याने लाहोर वा कराची सहज काबीज केले असते.

त्या काळी बेडिंग ऊर्फ होल्डॉल या प्रकाराची चलती होती. जवळपास प्रत्येक मुलाकडे होल्डॉल होता. याखेरीज स्टोव्ह, कंदिल, लाठी अशा वस्तू वेगळ्या. प्रत्येकाकडे. 'प्रासंगिक करार' असा बोर्ड मिरवणाऱ्या एका एस्टीने आम्हा सर्वांना सामानासकट सामावून घेतले नि आम्ही भल्या पहाटे निघालो.

तंबू शाळेने स्काऊटसाठी खरेदी केले होते. पण ते कधी वापरले (उभारले) गेले नव्हते. तंबू ठोकण्यासाठी पुरेशी सपाट जागा जेमतेम होती. पण तंबू ठोकण्याचे कौशल्य होते कुणाकडे? सरांकडे तर नव्हते. आम्ही सगळे लॉरेल हार्डी वा चॅपलिनचा मूकपटाचे शूटिंग चालू असल्यागत भरकटत राहिलो. शेवटी स्वामीजींच्या मठातून चार साधक आले नि त्यांनी आमचे तंबू ठोकून दिले. सैंदाणे सरांचे सहायक सोमवंशी सर. त्या दोघांना एक तंबू. बाकी एकेका गटाला एकेक. असे मिळून सहा तंबू गोलाकार ठोकले. मधल्या मोकळ्या जागेत कॅंपफायर.

मग स्वैपाकाची तयारी. तंबू ठोकण्याच्या फार्सदरम्यान स्वामीजींच्या मठातून आम्हां सर्वांसाठी कांदेपोहे, केळी आणि दूध असा अल्पोपहार आला होता म्हणून आम्ही इथवर तगलो होतो.

हत्ती नावाला न साजेश्या चपळाईने आम्ही कणिक मळायला घेतली. इतर गट अजून तांदूळ कुठे आहेत याचा शोध घेण्यात नि बटाटे किती आहेत याची मोजदाद करण्यात गुंगले होते.

कणिक मळायला घेतली, पण अनुभव होता कुणास? पातळ झाली, कणिक घाला, घट्ट झाली, पाणी घाला असे करत आम्ही सहाजणांनी चार दिवसांसाठी आणलेली सगळी कणिक वापरली गेली तेव्हां कुठे कणिक पोळ्या करण्यासरशी झाली.

सोमवंशी सरांचे आमच्याकडे लक्ष होते. त्यांनी तत्परतेने उरलेल्या गटांना 'कणिक मळू नका' असा आदेश दिला. आणि आम्ही मळलेल्या कणकेचे साम्यवादी पद्धतीने सगळ्या गटांत वाटप केले. प्रत्येक गटाला एकावेळेस पुरेल एवढी कणिक मिळाली. आमच्याकडे तरीही दोन गटांना पुरेल एवढी उरलीच.

मग पोळ्या करणे. पोळ्या लाटताना आपापल्या (आणि कधी कधी दुसऱ्यांच्या) आयांना पाहिले होते फक्त. मला तरी पापड लाटायचा अनुभव होता. इतरांना पोळपाट लाटण्यातला पोळपाट कुठला नि लाटणे कुठले इथपासून तयारी होती. त्यामुळे पोळ्या लाटण्याचे काम माझ्याकडे आले. स्टोव्हमध्ये रॉकेल भरून तो पेटवणे कोंडनानी आणी गट्टू चौधरीच्या वाट्याला आले. मग तव्यावर पोळ्या भाजायलाही तेच दोघे बसले. बाकी तिघे - राजा देशमुख, विज्या अहिरराव नि रणजित रेवसे - भाजी करायच्या मार्गाला लागले.

सुरुवातीला पोळ्या लाटणे ठीक जमले. पण पापडांची सवय असल्याने माझ्या पोळ्या अगदीच बाळक्या होत्या. त्या जेमतेम एका घासाच्या होतील असे सोमवंशी सरांचे मत पडले. मी शक्य तितक्या मोठ्या पोळ्या करायचा प्रयत्न करू लागलो. बराच वेळ गेला तरी मळलेल्या कणकेचा ढीग काही सरताना दिसेना. सवय नसल्याने माझे हात-खांदे भरून यायला लागले. शेवटी मला पोळ्या लाटवेनात. सोमवंशी सरांना माझी दया आली. त्यांनी आम्हांला लाकडे नि कोळसा (स्टोव्ह नि रॉकेलशिवाय लाकडे नि कोळसाही आमच्या सामग्रीत होता नि भरपूर होता) वापरून चूल पेटवायला लावली. उरलेल्या मळलेल्या कणकेचे टेनिसच्या चेंडूच्या आकाराचे गोळे केले, ते मध्ये दाबून थोडे चपटे केले नि त्या धगीत टाकले. आणि "ही आपली बाट्टी होऊ ऱ्हायली बरं का" असे जाहीर केले.
दालबाटी हा प्रकार नंतर जिभेवर अनुभवास आला. पण अर्धी कच्ची अर्धी जळकी बाटी त्याआधीच नशिबी अशी आली.

सगळ्यांचा स्वैपाक होईस्तोवर दोन वाजून गेले. नि जेवणे होईस्तोवर तीन. स्काऊट स्वावलंबी असल्याने नंतर भांडी घासणे हेही आमच्यावरच. सगळे निस्तरेपर्यंत आम्ही पारच भेंडाळलो. मग त्या दिवशीची योजलेले श्रमदान दुसऱ्या दिवसावर टाकून सरांनी आम्हांला बेडन पॉवेलबद्दल एक भलेमोठे व्याख्यान दिले. पेंगत आम्ही ते ऐकले.

मग सरांनी एक समूहगीत सर्वांना शिकवले. 'दो आंखे बारह हाथ' चित्रपटातल्या 'ऐ मालिक तेरे बंदे हम' या चालीवर 'बेडन पॉवेल तेरे चेले हम ॥ मानेंगे तेरे नौ नियम' असे ते गाणे होते.

सच्च्या स्काऊटने नऊ नियम पाळायचे असतात की असे काहीसे होते. सैंदाणे सर ते नियम समजावून सांगताना इतका घोळ घालीत की आम्हांला ते कधी नीटसे कळलेच नाही. मग एकदा सरांनी ते नियम नसून प्रतिज्ञा असतात असे जाहीर केले आणि आमचा सामूहिक शपथविधी उरकून टाकला. आम्ही विश्वसनीय, निष्ठावान, विनयशील, धैर्यवान असे सगळे मिळून नवगुण बाळगून होतो हे कळाल्यावर आम्हांला आमचा स्वतःचा अभिमान वाटला.

संध्याकाळी मठातून आम्हा सगळ्यांसाठी डाळतांदूळ खिचडी पाठवण्यात आली. सोबत खानदेशी लोणचे. आणि पत्रावळी. भांडी धुण्यासाठी अंधारात नदीकाठी जाणे टाळणे इष्ट असा सल्ला सरांना मिळाला होता. त्या परिसरात वाघ आहे अशी वदंता होती. तो वाघ नसून बिबट्या आहे अशी दुसरी वदंता होती. जे असेल ते असो, सरांनी आम्हांला धोक्यात घालणे टाळले.

नदीकाठी एरवीही एका कारणाने जाणे भाग पडले असते. पण कॅंपशेजारी एका पायवाटेला सरांनी 'स्वच्छतागृह' जाहीर करून टाकले.

एकदा गंमत झाली. आमच्यात वाघ नावाचा मुलगा होता. आठवीतच अपचन नि बद्धकोष्ठ यांचा रुग्ण. तो सकाळी आमच्याबरोबर येऊन नुसताच उकिडवा बसत असे. मग दिवसभरात दोनतीनदा "सर आता होईलसे वाटते" म्हणून जात असे. चोवीस तासांत मिळून एकदा जरी पोट साफ झाले तरी तो आनंदी असे.

एकदा तो संधिप्रकाशात एकटाच त्या वाटेवर जाऊन विकेटकीपींगची पोज घेऊन बसला. आणि त्याच्या म्हणण्यानुसार पंधरावीस मिनिटांनी (आमचा वाघोबा एकदा बसला की अर्धा तास उठत नसे) त्याच्या शेजारून (म्हणजे पंधरावीस फुटांवरून) एक चारपायांचा वाघ गेला.

आमच्या वाघोबांची बद्धकोष्ठाची समस्या क्षणार्धात नाहिशी झाली. त्याच्या पोट साफ होण्याच्या आवाजाने असेल, चारपायांचा वाघही घाबरुन पळाला.

सरांनी त्यापुढे कुणालाही 'जायचे' असेल तर किमान चारजणांनी जायचे असा नियम घालून दिला.

दुसऱ्या दिवशी श्रमदान सुरू झाले. झाडोरा-झुडपे साफ करण्याचा कुणालाच अनुभव नव्हता. बोटे रक्ताळली, ढोपरे नि गुडघे सोलवटले पण जमिनीत काही फरक पडताना दिसेना. आमच्या कामाची पहाणी करायला स्वामीजी आले. आमची एकंदर प्रगती आणि सरांचा एकंदर वकूब पाहून त्यांनी मठातून पाच साधक पाठवले.

एकेका साधकाने एकेका गटाला नीट कामाला लावले. आता तासातासाला जास्ती जास्ती मोकळी जागा नजरेला दिसू लागली. आणि फर्स्ट एड बॉक्सही बंद राहिला.

स्वामीजींनी अजून चार साधक पाठवून आमचा सगळ्यांचा शिधा ताब्यात घेतला. मग उरलेले दिवस आम्हांला मठाच्या भटारखान्यातून जेवण मिळत राहिले.

स्काऊट हा स्वावलंबी असतो. पण स्वैपाकात स्वावलंबी असतो असा उल्लेख नव्हता. त्यामुळे आम्ही घेतलेली शपथही तांत्रिकदृष्ट्या शाबूत राहिली आणि आमचे नवगुणही.

तीन दिवसांत आम्ही मठापासून मुख्य रस्त्यापर्यंत सुमारे अर्धा किमीचा जीप जाईल इतका रुंद रस्ता तयार केला. आता चारचाकी गाड्या मठापर्यंत येऊ शकत होत्या. पूर्वी त्या खड्डे-खळगे नि झुडूप-झाडोऱ्याने भरलेल्या शेताडीतून ट्रॅक्टर नाहीतर ट्रकच घुसवण्याचा विचार करता येई.

कॅंप उरकून घरी परतलो तो सगळ्यांची अंगे सामूहिक ठणकत होती. सैंदाणेसरांनी मुख्याध्यापक धांडे सरांना सांगून आमच्या वर्गाला एक दिवस सुट्टी दिली. 'ऊह आह आऊच' करीत आम्ही ती सुटी घालवली.

हिंदीच्या येवलेबाईंनी तेवढ्यात आम्हांला पिडून घेतले. 'भरणादेवी के जंगलमें सौ घंटे' असा निबंध लिहायला लावून.
खरेतर आम्ही तिथे सगळे मिळून ऐंशी तास राहिलो होतो. पण बाईंनी आपल्या मनाने त्यात वीस तास मिसळून आम्हांला निबंध लिहायला लावला. आमच्या वर्गात नितिन अग्रवालचे हिंदी चांगले होते. तो चंदामामा, चंपक अशी मासिके वाचत असे.
आम्ही सगळ्यांनी त्याचा निबंध कॉपी केला. येवलेबाई काही बोलल्या नाहीत.

अशा रीतीने आठवीतला स्काऊट कॅंप पार पडला.

नववीत गेलो तेव्हां आमच्या शाळेत येवलेबाईंनी पुढाकार घेऊन गाईड्स ही सुरू केले. म्हणजे महिला स्काऊट.
एकदोनदा आमचे एकत्र प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण वर्गातल्या जवळपास निम्म्या मुलांचा आवाज घोगरायला लागला होता नि ओठांवर लव उमटू लागली होती. समवयस्क मुलींबरोबर एकत्र प्रशिक्षण म्हणताना काही आवाज जरा जास्तीच घोगरे झाले. मग समूहगीत गाण्यावरच निभावले.

सैंदाणेसर नि येवलेबाई दोघांचे काय जमले होते कुणास ठाऊक. आमच्यातली 'प्रौढ' मंडळी त्या दोघांच्यातले नाते आम्हां अज्ञ जनांना शारिरिक भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करीत असत.

जे असेल ते, त्या वर्षी चक्क स्काऊट नि गाईड्स यांचा संयुक्त कॅंप नेण्याचे ठरले. भरणादेवीलाच. मठाच्या समोर आम्ही गेल्या वर्षी उतरलो होतो. तशीच एक सपाट जागा मठाच्या मागेही स्वामीजींनी एव्हाना करून घेतली होती.

यावेळी शिधासामुग्री प्रत्येकाने वेगवेगळी आणण्यापेक्षा सैंदाणे-येवले जोडीने प्रत्येक विद्यार्थ्याकडून (आणि विद्यार्थिनीकडून) पंधरा पंधरा रुपये गोळा केले नि केंद्रीय पद्धतीने दाणेबाजारातून खरेदी केली. ती पोती थेट एस्टी स्टॅंडवरच पोहोचली. आम्ही गेल्या वर्षीच्या अनुभवाने शहाणे होऊन आमच्याबरोबरचे सामान एक तृतियांश केले.

मुलींना वेगळ्या एस्टीत बसवल्याने आमच्यातल्या प्रौढांचा हिरमोड झाला. पण दुसऱ्या एस्टीत का होईना, स्त्रीवर्ग आहे या भावनेने चेकाळलेल्या आम्ही मग गाण्यांचा गलका उडवून दिला.

यावेळीही तंबू ठोकण्यासाठी मठातून मदत मिळाली.

सैंदाणे-येवले जोडीने कर्मविभागणी अशी केली होती की स्काऊट्सनी श्रमदान करावे नि रस्ता व परिसर अजून विस्तृत करावा. गाईड्सनी स्वैपाक सांभाळावा आणि उरलेल्या वेळात तिथल्या एका छोट्या वाडीवरच्या बायकांना स्वच्छतेचे धडे द्यावेत. जमले तर साक्षरतेचेही.

पहिल्या दिवशी आम्ही दणकून काम केले. आणि त्याहून दणकून जेवलो. त्या वाढत्या वयात तशीही भूक लागे. कष्ट केल्यावर आणि स्वैपाकाला समवयस्क मुली असल्यावर तर काय विचारायलाच नको.
कोंडनानीने अठरा पोळ्या खाल्ल्या. इतर त्याच्या जवळपास पोहोचले.
स्वैपाक संपला. आमच्यासाठी म्हणून परत करायला लागला.
आणि आमचे जेवण झाल्यावर गाईड्ससाठी अजून वेगळा.
मोठी मर्दुमकी गाजवल्यासारखे आम्ही वीर ढेकरा देत आणि गाईड्सना ऐकू जाईल अशा आवाजात शेरेबाजी करीत परत श्रमदानाला गेलो.

दुसऱ्या दिवशी पिठले भाकरीचा बेत होता. भाकरी बडवायला पोळ्या लाटण्यापेक्षा सोपी. नि एका भाकरीत दोन पोळ्यांचा ऐवज घुसवता येई.
दुसऱ्या दिवशी का कुणास ठाऊक, जेवणाचा उत्साह फार नव्हता. म्हणजे, बकासुरी जेवणाचा उत्साह नव्हता. नेहमीइतके वा त्याहून थोडे जास्त असे सगळे जेवलो.
जेवल्यानंतर अर्ध्या-पाऊण तासाने पहिला वीर लोटा घेऊन परेडला गेला.
त्याच्यानंतर पंधरावीस मिनिटांत आम्ही सगळे त्या यात्रेत सामील झालो.
यावेळेस आमच्यासाठी स्वच्छतागृह म्हणून मागल्या टेकडीचा एक भाग मुक्रर करण्यात आला होता. श्नमदान राहिले बाजूला, संध्याकाळपर्यंत तीनचार वेळा टेकडी गाठावी लागली. टेकडी सोनखताने समृद्ध झाली.

नंतर कळाले की गाईड्सनी सूड उगवला होता. तिथल्या छोट्या वाडीवरच्या बायकांकडून जमालगोट्याचे गुणधर्म असलेली रानटी मुळी मिळवली होती. आणि पिठल्यात सढळ हाताने वैरली होती.

सगळे स्काऊट्स चूप झाले. 'ठकास महाठक मिळाला की गप्प बसेन' अशी दहावी प्रतिज्ञा करून.