एक जुडी कोथिंबीर निवडून मुळे छाटून उरलेल्या काड्या ३०० मिली पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घ्याव्यात. पाने इतर पदार्थांत सजावटीसाठी वापरता येतील.
मिरच्यांचे मध्यम/छोटे तुकडे करून घ्यावेत.
दोन पळ्या तेल तापवावे. धुरावल्यावर ज्योत बारीक करून फोडणीत मोहरी, जिरे, मेथीदाणे, हळद, हिंग, ओवा या क्रमाने पदार्थ घालावेत. त्यावर मिरच्यांचे तुकडे घालून दोन मिनिटे बारीक ज्योतीवर ते खरपूस होऊ द्यावेत.
त्यावर कांदा घालावा. कांद्यापुरेसे मीठ घालून मध्यम ज्योतीवर कांदा गुलाबी करून घ्यावा.
ज्योत बारीक करून त्यावर भाजणीचे पीठ घालावे. भाजणीपुरेसे मीठ घालून पाच मिनिटे मधून अधून हलवत रहावे.
त्यावर मिक्सरमधून काढलेले कोथिंबिरीच्या काड्यांचे पाणी घालावे. त्यावर खवलेले खोबरे घालावे. झालेला लगदा घोटत रहावा. ज्योत बारीकच असू द्यावी.
सगळे एकजीव झाले की झाकण ठेवून एक वाफ आणावी. मग झाकण काढून एक पळी तेल सोडावे नि परत हलवत रहावे. तेल भाजणीत पूर्ण जिरले नि कढईनजिक खरपुडी जमू लागली की अंदाज घेऊन गॅस बंद करावा.
(१) 'मोकळी भाजणी' करताना भाजणीच्या कोरड्या पिठाऐवजी भाजणीचे पाण्यातले मिश्रण घालतात. वा फोडणीवर आधी पाणी घालून त्यात भाजणी वैरतात. इथे सांजा करण्याची पद्धत वापरल्याने झालेला पदार्थ मोकळ्या भाजणीपेक्षा जास्ती उकडीसदृश होतो. म्हणून भाजणीची उकड.
(२) कोथिंबिरीची पाने पदार्थ शिजताना घातली तर त्यांचा स्वाद बराचसा निघून जातो. काड्यांमधील स्वाद शिजल्यावरही टिकून राहतो. एरवी काड्या वाया जातात त्या इथे सदुपयोगी येतात.
(३) यात कांद्याऐवजी ढबू मिरची वा वांगी घालता येतील.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.