हिरवे टॉमेटो अगदी कडक आणि हिरवे हवेत. लालसर छटा अजिबात नको. असे टॉमेटो बारीक चिरून घ्यावेत.
कोथिंबीर काड्या, आले, लसूण नि हिरवी मिरची बारीक वाटून घ्यावी. मिक्सर वापरल्यास वाटण काढून घेतल्यावर मिक्सरच्या भांड्यात २५० मिली पाणी घालून भांडे खळबळवून ते पाणी एका पात्रात काढून घ्यावे.
दोन हिरव्या मिरच्या वेगळ्या ठेवाव्यात नि मध्यातून चिरून घ्याव्यात.
काजूगर बारीक चिरून घ्यावेत (दोन/तीन मिमी).
भाजलेल्या शेंगदाण्यांचे भरड कूट करून घ्यावे.
कढईत तेल घालून मोठ्या ज्योतीवर ठेवावी. तेल धुरावल्यावर ज्योत बारीक करून मोहरी, ती तडतडल्यावर जिरे, भिजवलेले मेथीदाणे, भिजवलेली उडीदडाळ, हळद, नि हिंग घालावे. त्यात मध्यातून चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात.
मिरच्या नीट तळल्या गेल्या की कोथिंबीर काडी - आले - लसूण - मिरची वाटण घालावे. ज्योत अर्ध-मध्यम करून हलवत रहावे. तेल कडेने सुटू लागले की चिरलेले टॉमेटो घालावेत. ज्योत मध्यम करून गरजेप्रमाणे मीठ घालावे. हलवत रहावे. सर्व एकजीव झाले की गरम मसाला नि बारीक चिरलेले काजूगर घालावेत. ज्योत मोठी करावी. हलवत रहावे.
तेल कडेने सुटू लागले की ज्योत बारीक करावी. २५० मिली पाणी (मिक्सरचे भांडे खळबळवून घेतलेले वा साधे) घालून एकजीव करून घ्यावे. झाकण ठेवावे. एक वाफ येऊ द्यावी.
तोवर २५० मिली साधे पाणी उकळावे. वाफ आल्यावर हे उकळते पाणी घालून मोकळ्यावर (झाकण काढून) बारीक ज्योतीवर पंधरावीस मिनिटे शिजवावे.
शिजल्याचा अंदाज आल्यावर ज्योत बंद करून शेंगदाण्याचे भरड कूट नि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
सोबत साधी (बिनफोडणीची) डाळ-तांदूळ खिचडी (आणि तळलेला पोह्याचा पापड) वा तेला-तुपावर भाजलेला खरपूस पराठा वा होलव्हीट/मल्टिग्रेन टोस्ट असल्यास उत्तम.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.