तंदुरी चिकन पुलाव

  • तंदुरी चिकन फुल (खाण्यास तयार)
  • ब्राऊन बासमती तांदूळ दोन वाट्या
  • मध्यम कांदे तीन
  • हिरव्या मिरच्या चार/पाच
  • साजुक तूप २ टेबलस्पून
  • काळा गरम मसाला एक टेबलस्पून
  • मीठ
  • कोथिंबीर
२ तास
तीन जणांसाठी

ब्राऊन बासमती तांदूळ धुऊन कोरडा करावा.

सुरीने तंदुरी चिकनचे मांस वेगळे करावे. हाडांना चिकटलेले मांसही नीट खरवडून घ्यावे. फक्त हाडे शिल्लक ठेवावीत. मांसाचे तुकडे धारदार सुरीने मध्यम/बारीक करावेत.

एका पातेल्यात पाच वाट्या पाणी घ्यावे. त्यामध्ये ही हाडे घालून मंद आचेवर उकळायला ठेवावे. वरती झाकण ठेवावे. सुमारे अर्धा तास उकळावे. पाणी आळून सुमारे चार वाट्या झाले असेल.

खाली उतरून पाणी गाळून घ्यावे. हाडे टाकून द्यावीत. परिसरातील/परिवारातील कुत्री आणि/वा मांजरे खूष.

कांदा बारीक चिरून घ्यावा. मिरच्यांचे मोठे (तीन/चार सेंमी) तुकडे करून घ्यावेत.

कढईत दोन चमचे साजुक तूप गरम करावे. धुरावल्यावर ज्योत बारीक करून मिरच्यांचे तुकडे घालवेत. मिरच्या नीट तळल्या गेल्यावर चिरलेला कांदा घालावा. कांद्यापुरेसे मीठ घालून कांदा परतावा. कांदा गुलाबी झाल्यावर धुऊन कोरडा केलेला तांदूळ घालून परतावे. सर्व एकजीव झाल्यावर भातापुरेसे मीठ आणि काळा गरम मसाला घालून परतावे.

पाच मिनिटांनी हाडे उकळलेले पाणी घालावे आणि नीट ढवळून झाकण ठेवावे.

सुमारे पंधरा/वीस मिनिटांनी त्यात तंदुरीचे बोनलेस तुकडे घालून एकजीव करावे आणि झाकण ठेवून एक वाफ आणावी.

ज्योत बंद करावी. 

सोबत

(१) बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, दाण्याचे कूट, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करावे. त्यात फेटलेले सायीचे दही घालावे आणि मिश्रण एकजीव करावे.

(२) बटाट्याचे सिरेटेड वेफर्स (प्लेन सॉल्टेड)

स्वप्रयोग