आपण धारण शून्य आहोत त्यामुळे आपण देह किंवा तत्सम काहीही धारण करू शकत नाही आणि आपण धारणा शून्य आहोत त्यामुळे आपण मनाने सुद्धा कोणताही विचार, गैरसमज (जसे की आपण देह धारण केला आहे) किंवा कोणतेही अज्ञान धारण करू शकत नाही. हा उलगडा 'धारण शून्य आणि धारणा शून्य' या लेखात झाला आहे.
तद्वत, आपण निरवयव असल्यानं कोणतीही हालचाल करू शकत नाही आणि निरिंद्रीय असल्यानं काहीही उच्चारण करू शकत नाही. हे एकदा मान्य झाले की देहात कुणीही नाही, किंबहुना कोणत्याही देहात कुणीही नाही हा उलगडा होतो.
या बरोबर आपण निरलंब आहोत हा पण उलगडा होतो.
आपण संपत्ती, सत्ता किंवा पद, झालच तर एखादा गुरु किंवा काही नाही तर देव; नातेसंबंध किंवा प्रसंगी उभे राहणारे मित्रमैत्रिणी यांच्यात आधार शोधत जगतो; पण आता असा कोणताही आधार लागत नाही.
याचा अर्थ आपण संसार त्याग करून संन्यस्त होऊ आणि रानात जाऊ, असा होत नाही. अशी गैरसोय, उलगडा न झालेले सिद्ध किंवा त्यांचे शिष्य करून घेतात. नातेसंबंध किंवा मित्रमैत्रिणी तसेच राहतात पण आपण त्यांच्यात आधार शोधत नाही.
इतकंच काय, आपण श्वासोच्छ्वास, आहार किंवा निद्रा यावरही अवलंबून नाही कारण त्या गरजा देहाच्या आहेत.
याचा अर्थ देहाला अडथळा समजून, आपण अन्न, श्वास अथवा निद्रा त्यागतो असा नाही, तर त्यांचा आपल्याला सतत असलेला धसका संपतो.
आपण श्वास त्यागत नाही कारण आपण श्वासोच्छ्वास करत नाही, आपण अन्नत्याग करत नाही कारण ती दैहिक गरज आहे आणि आपण निद्रेला आध्यात्मिक अडथळा समजत नाही किंवा तिचा खेदही करत नाही कारण ती सुद्धा दैहिक गरज आहे.
आपण देहात आहोत असा भ्रम होण्याचं कारण मेंदूत सतत चालू असलेले संवाद; देहाचं बोलणं आणि दैहिक हालचाली किंवा दैहिक संवेदना हे आहे.
अज्ञानी लोक मौन साधून मेंदूत शांतता प्रस्थापित करण्याचा व्यर्थ प्रयत्न करतात, पण तो काही मिनिटात विफल होतो. कारण सदर शांतता मेंदूतील संवाद थांबल्यानं प्रस्थापित होते आणि संवाद सुरू झाले की तत्क्षणी संपते.
आपण निरिंद्रीय असल्याने उच्चारण शून्य आहोत आणि त्यामुळे आपणच शांतता आहोत. हे लक्षात आलं की शांत होण्यासाठी साधना करावी लागत नाही.
भाषा अवगत करावी लागते आणि बोलणं ही अभिव्यक्ती आहे. या दोन्हीही मानसिक आणि शारीरिक क्रिया आहेत. पण शांतता अवगत करता येत नाही कारण ती निरवयव आणि निरिंद्रिय स्थिती आहे. थोडक्यात, शांतता प्राप्तीसाठी केलेली जगातली कोणतीही साधना व्यर्थ आहे कारण, आपण खुद्दच शांतता आहोत.
तद्वत, आपण निरवयव आहोत हे लक्षात आलं की स्थिरत्व आपोआप प्रस्थापित होतं, त्यासाठी कोणतीही दैहिक साधना करण्याची गरज नाही.
आपण निरवयव आणि निरिंद्रीय आहोत हा उलगडा, देहात कुणीही नाही, किंबहुना कोणत्याही देहात कुणीही नाही ही वस्तुस्थिती प्रस्थापित करतो. आणि या उलगड्या सरशी सर्व अस्तित्व ही एक कर्ता रहित प्रक्रिया आहे हा उलगडा होतो.
अगदी साधी गोष्ट आहे, श्वासोत्छवास आपोआप चालू आहे, तो करणारा देहात कुणीही नाही. देह स्वयेच ती क्रिया करतो आहे आणि आपल्याला ते फक्त कळतंय, ही गोष्ट तुम्हाला सहज मान्य होईल. म्हणजे कुणीही आणि कितीही श्वास रोखून धरला तरी ती क्रिया दैहिकच आहे.
श्वासोत्छवास चालू असणं या मूलभूत प्रक्रियेवरच सर्व दैहिक किंवा मानसिक क्रिया अवलंबून आहेत. श्वासोत्छवास ही कर्ता रहित प्रक्रिया आहे हा बोध झाला की सारे आयुष्यच एक कर्ता रहित क्रिया आहे हा उलगडा होतो.
विचार करून एखादी क्रिया केली आणि त्यामुळे कर्त्याचा भास झाला तरीही ती कर्ता शून्य क्रिया आहे कारण देहात कुणीही नाही. जे घडतंय ते फक्त कळतंय पण ज्याला कळतंय असा कुणीही नाही.
देह शांत बसला असेल तर आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते; हे निरींद्रीय जाणणं आहे कारण त्यात कोणत्याही इंद्रियाचा सहभाग नाही. ही निरिंद्रीय जाणण्याची क्षमता आपलं स्वरूप आहे, ते निर्वैयक्तिक आहे त्यामुळे जाणलं जातं पण जाणणारा असा कुणीही नाही.
ही निर्वैयक्तिक जाणण्याची क्षमता जेंव्हा इंद्रियांद्वारे काही जाणते (जी व्यावहारिक उपयोगिता आहे), तेंव्हा आपण देहात असल्याचा भास होतो.
इंद्रियांद्वारे एखादी गोष्ट जाणली जाते, जसे की पाहणे, ऐकणे, स्वाद, स्पर्श, किंवा गंध; तेंव्हा ती जाणीव मेंदूत डिकोड होते (ही सुद्धा व्यावहारिक उपयोगिता आहे), पण या इंद्रियगम्य जाणण्यानी आपण देहात असल्याचा भास होतो.
याचा अर्थ इंद्रियांवर सूड उगवायचा असा होत नाही, तर इंद्रियगम्य जाणण्यानी आपण देहात असल्याचा भास होतो; तो भास आहे पण वास्तविकात देहात कुणीही नाही हे लक्षात आलं की इंद्रियगम्य जाणणं सुद्धा निर्वैयक्तिक होतं.
आपलं सगळं आकलन ऑब्जेक्टिव होतं; म्हणजे इंद्रियगम्य जाणणं व्यक्तिमत्व सक्रिय करत नाही. त्यामुळे जगण्यात सहजता येते आणि मला काही तरी होतय किंवा माझ्या बाबतीत काही तरी घडतंय, हा सतत होणारा भास, नाहीसा होतो आणि कुठेही नसलेल्या 'मी'चा भ्रामक बिंदू विरून जातो.
थोडक्यात, श्वासोत्छवास जसा आपोआप चालू आहे तद्वत देहाच्या आणि मेंदूतीलसर्व क्रिया आपोआप घडतायत कारण देहात कुणीही नाही.
रोजच्या जगण्यात आपण ठरवल्या शिवाय काही करत नाही त्यामुळे आपण आत आहोत असा भास होतो आणि त्यामुळे आपणच सगळं करतोय असा विभ्रम निर्माण होतो. या ठरवाठरवीत सगळं बरोबर चाललय की नाही याचा कायम ताण असतो.
कुणीही कितीही आणि कसाही कर्मयोग साधला तरी ती अज्ञानातून आलेली कल्पना आहे कारण मुळात, 'आपण करतोय' ही चुकीची धारणाच ताण निर्माण करते.
एकदा, कोणत्याही देहात कुणीही नाही हे लक्षात आलं की संपूर्ण अस्तित्वच एक कर्ता विरहित प्रक्रिया आहे हा उलगडा होतो. ही प्रक्रिया ज्यात घडतेय ती कायम आणि अपरिवर्तनीय स्थिती आपण आहोत, त्यामुळे जे घडतंय ते आपल्याला फक्त कळतंय, पण आपल्याला त्याचा स्पर्श देखिल होत नाही.
ही घडण्याची क्रिया विश्वप्रज्ञेनी घडते, ती निर्वेयक्तिक आहे आणि सर्व प्रकटीकरणावर ती एकसारखं काम करते.
उदाहरणार्थ, गुरुत्वाकर्षण हे विश्वप्रज्ञेच एक अंग आहे. कुणीही कितीही सिद्ध असो, देवाचा निस्सीम भक्त असो की नास्तिक, त्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम माहिती असो किंवा नसो; उडी मारली की तो खालीच येणार. थोडक्यात, ज्या विश्वप्रज्ञेनी साऱ्या घटना घडतायत ती निर्वैयक्तिक आहे आणि ज्या प्रकटीकरणावर ती काम करते (उदाहरणार्थ, देह), त्या देहातही कुणी नाही. त्यामुळे जे घडतंय ते फक्त कळतंय पण कळणारा किंवा ज्याला काही होईल असा कुणीही नाही
.विश्वप्रज्ञेला देव मानणं ही बालिश कल्पना आहे कारण एक तर ती निर्वेयक्तिक आहे आणि सर्व प्रकटीकरणावर ती समानतेनं काम करते. त्यामुळे भक्त, हा सत्याला झालेला भ्रम आणि देव, हा भक्ताला झालेला भ्रम आहे. तस्मात, देव माझं भलं करेल किंवा देव पावला की भक्ताचं कल्याण होईल असं मानणारा भक्तीमार्ग हा सर्वत्र चाललेला टाईमपास आहे.
तद्वत, जोतिष म्हणजे ज्याला काहीही होऊ शकत नाही, अशा निर्वेयक्तिक सत्यानी, ग्रहताऱ्यांचा, नाहक घेतलेला धसका आहे.
थोडक्यात, अस्तित्व ही कर्ता शून्य प्रक्रिया आहे, जे घडतंय ते फक्त कळतंय पण कळणारा कुणीही नाही, आणि ज्याला काही होऊ शकेल असाही कुणी नाही, कारण कोणत्याही देहात, कुणीही नाही.