भास आणि निराभास

'आपण कुठे आहोत?' हा प्रश्न अत्यंत निरर्थक वाटतो कारण आपण देहात आहोत या बद्दल कुणालाही शंका नाही. म्हणजे कुणी सर्व देहाकडे हात दाखवून म्हणेल की मी इथे आहे. 'मी विचार करू शकतो, म्हणून मी आहे' हे देकार्तचं प्रसिद्ध विधान प्रमाण मानणारा मेंदूकडे बोट दाखवेल. तर एखादा रमण भक्त मोठ्या अभिमानानं हृदयाकडे हात दाखवून, 'मी इथे आहे' असं सांगेल आणि आपण बाजी मारली असं समजेल. पण सत्य इतकं व्यापक आणि सर्वसमावेशक आहे की त्याचा ठराविक असा स्थान निर्देश कदापिही होऊ शकत नाही. 

थोडक्यात, आपण ठराविक ठिकाणी आहोत हे भाषिक दृष्टीने व्यावहारिक आणि उचित असलं, तरी तसं वाटणं हा केवळ भास आहे. 

अर्थात, हा भास इतका सघन आहे की आयुष्यभर तो आपली साथ सोडत नाही आणि जोपर्यंत त्याचा निराभास होत नाही तोपर्यंत, आपण सत्य आहोत हा उलगडा होण्याची सुतराम शक्यता नाही.

या भासाची सुरुवातच मुल जेंव्हा हाकेला पहिली 'ओ' देतं तेंव्हा पासून होते. मुलाने हाकेला दिलेल्या या पहिल्या 'ओ ' नी आई-वडील आनंदून जातात पण सत्याला मात्र, आपण स्थानबद्ध झाल्याचा भास होतो. इथून झालेली सुरुवात मग देहान्तापर्यंत, आपण देहात आहोत ही धारणा कायम ठेवण्यात यशस्वी होते. 

आपण भाषा इतकी सर्रास वापरतो की त्यामुळे आपण देहात असल्यासारखे वाटतो, पण तो भास आहे हे लक्षात येणं, भाषेच्या अहोरात्र वापरामुळे अशक्य होतं. थोडक्यात, भाषिक 'मी' हा सदैव कुठे ना कुठे तरी असतोच आणि मी आहे या एकमेव गृहीतावरच भाषेचा सर्व डोलारा उभा आहे. भाषेचा उपयोग अनिवार्य आहे पण त्यामुळे आपण देहात आहोत आणि प्रकट काय की मनातल्या मनात काय, आपणच बोलतो आहोत अशी प्रत्येकाची धारणा आहे. प्रत्येक सिद्ध आणि धर्मग्रंथ एकतर मी शोधा किंवा मी हटवा हेच सांगत आलेत. इतकंच काय तर इतरांची ओळखही आपल्या मेंदूत प्रत्येकाचा आवाज आणि नंतर छवी अशीच नोंदली गेली आहे. 
 
अध्यात्मात, 'देहभान गेले पाहिजे' असा घोषा सर्व ग्रंथात आणि सर्व सिद्धांनी लावला आहे, पण सर्वांचा रोख देहापासून वेगळं होण्याकडे आहे. वास्तविकात, आपण देहात आहोत असं वाटणं, हा भास आहे हे एकाही ग्रंथात किंवा कुणाही सिद्धाने सांगितलेलं नाही.

रमण महर्षीनी 'मी कोण आहे?' (हू एम आय?) अशी पृच्छा करण्याची साधना सांगितली आहे. ती विचारणा करता करता; सर्व उत्तरं नाकारत गेल्यावर, एका क्षणी तुम्हाला आतून काहीही उत्तर येणार नाही आणि 'मी नाही' हा उलगडा होईल, अशी कल्पना या साधनेत आहे. पण आपण उच्चारण करू शकतो या धारणेमुळेच तर 'मी' चा भास होतो आहे. त्यामुळे उच्चारणावर आधारित कोणतीही साधना मग ती विचारणा असो, मंत्र असो की जप ; पूर्णतः निरर्थक आहे. कारण आपण निरवयव आणि निरिंद्रीय आहोत आणि उच्चारण किंवा श्रवण, मग ते प्रकट असो की मनातले, दोन्हीही इंद्रीयाधारित आहेत. तस्मात, त्या दोन्हीही क्रिया इंद्रिय शिवाय शक्य नाहीत आणि इंद्रीयांचा वापरच तर आपल्याला, आपण देहात असल्याचा भास घडवतो. म्हणजे पायांचा वापर करून पायपीट करत तिर्थाटनं किंवा परिक्रमा केल्यानं देह थकण्या पलीकडे काहीही साधत नाही. त्यापेक्षा आपण निरवयव असल्यामुळे चालूच शकत नाही हा उलगडा होता क्षणी स्थिरत्व प्रस्थापित होतं, कारण ती वास्तविकता आहे. तद्वत, आपण उच्चारण शून्य आहोत हे कळता क्षणी शांतता प्रस्थापित होईल आणि देहात कुणीही नाही हा उलगडा होईल.

निसर्गदत्त महाराजांनी 'मी वर स्थिर राहा' आणि तशी साधना दीर्घकाल केल्यावर; 'मी' शून्य होईल आणि नुसतं 'असणं' राहिल, असं सांगितलय. पण एकतर आपल्याला जो 'मी' जाणवतोय; तोच भास आहे आणि त्यावर स्थिर राहणं म्हणजे मनानी तो धारण करणं आहे. आपण धारण शून्य आणि धारणा शून्य आहोत त्यामुळे आपण देह काय की मन काय; काहीही धारण केलेलं नाही. तस्मात, 'मी वर स्थिर राहा' ही साधना 'मी' चा रात्रंदिवस होणारा भास निरस्त करू शकत नाही. वास्तविकात, महाराजांना जो उलगडा झाला, तो 'मी वर स्थिर रहाण्याचा' दीर्घ काल केलेला प्रयास नकळत थांबल्यामुळे झाला. कारण देहात, मी वर स्थिर राहणार किंवा त्याला धारण करणारा, कुणीही राहिला नाही.

आज पावेतो सर्वच्या सर्व सिद्धांनी मन आहे आणि त्या पासून मुक्ती मिळवायची आहे किंवा त्यावर विजय मिळवायचा आहे असं सांगितलं आहे. 'मना त्वांची रे पूर्व संचित केले, तया सारखे वागणे प्राप्त झाले' असा धसका सुद्धा घालून ठेवला आहे. त्यामुळे एकजात सर्व साधक मनाशी हुज्जत घालून बेजार झाले आहेत. 

पण मन असं काहीही नाही; मेंदू हा देहातला बायो कंप्युटर आहे. त्यात सगळा डेटा, चित्र आणि शब्द किंवा ध्वनी रूपात स्टोअर केलेला आहे. गंध, स्वाद आणि स्पर्श यांच्या स्मृती सध्या बाजूला ठेवू कारण त्यांचा मुद्याशी डरेक्ट संबंध नाही. मेंदूच्या बायो कंप्युटरमधे जाणिवेचा रोख माऊसच्या कर्सर सारखं काम करतो. थोडक्यात, एखादी व्यक्ती समोर आली की जाणिवेचा कर्सर, मेंदूतली साधर्म्य असणारी प्रतिमा आणि तिच्याशी जोडलेलं नांव (म्हणजे शब्द आणि ध्वनी) यांचा मेळ घालतो आणि आपल्याला कळतं; की ही आपली कॉलेज मधली मैत्रीण !

तर मेंदूमध्ये एक क्रॉस पॉइंट आहे जिथे दोन्ही कानातून येणारी काल्पनिक आडवी रेष; आणि शिरोभागाच्या बरोबर मध्यातून घशाकडे जाणारी काल्पनिक उभी रेष; एकमेकींना छेदतात. या बिंदूतून अगदी एखादा चित्रपट सुरू असावा तसं, सतत दृक-श्राव्य प्रक्षेपण चालू असतं. सततच्या दृक-श्राव्य प्रक्षेपणामुळे भासात्मक मी निर्माण होतो. आपल्याला असं वाटत राहतं की आपणच बोलतोय आणि या दृक-श्राव्य प्रक्षेपणाची दखल घ्यायलाच हवी. थोडक्यात, या बिंदूकडे पूर्णतः दुर्लक्ष करा, तिथून काय वाट्टेल तो धसका निर्माण करणारं विधान किंवा दहशत निर्माण करणारं दृश्य निर्माण झालं तरी ते संपूर्णपणे बेदखल करा. हा अविरत चाललेला चित्रपटच देहात भासात्मक मी निर्माण करत होता. त्या बिंदूतून प्रक्षेपित होणारा दृक-श्राव्य चलतपटच लक्ष वेधून घेत होता आणि तुम्ही सत्य आहात हा उलगडा होऊ देत नव्हता.   

तर थोडक्यात, मी असा कुणीही आणि कुठेही नाही. तस्मात, मी शोधणे, मी वर स्थिर रहाणे, मी पणा किंवा अहंकार हटवणे, आत्मस्थिती प्राप्त करणे; हे सर्व अज्ञानी सिद्ध आणि त्यांचे धर्मग्रंथ यांनी आजवर केलेली दिशाभूल आहे. 

तुम्ही फक्त एक करा, जे या क्षणी घडतय त्याची मजा घ्या ! एकदा कळल्यावर मजा घेऊ म्हणून अजिबात पुढे ढकलू नका आणि लिहीलेल्या वाक्याचा अनुवाद किंवा हे कुणी सांगितलय याचा शोध घेऊ नका. तो व्यर्थ आहे कारण आतापर्यंत हे कुणीही सांगितलेलं नाही.

एकदा का तुम्ही जे घडतय त्याची मजा घ्यायला लागलात तर तुम्हाला या सहा गोष्टी आपोआप कळतील:
१. जे घडतय ते आपोआप घडतय आणि ते आपल्याला फक्त कळतय, पण त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही.
२. ज्याला कळतय असाही कुणी नाही आणि ज्याला काही होईल असाही कुणी नाही.
३. व्यक्तिगत देह अशी काहीही चिज नाही आणि त्यामुळे हा माझा देह, तो तुझा देह असा कोणताही प्रकार नाही. सर्व अस्तित्व ही आपोआप चालू असणारी एक सर्व समावेशक आणि कर्ता विरहित प्रक्रिया आहे.
४. मन अशी कोणतीही भयावह चिज नाही. मेंदूतल्या क्रॉसपॉइंट मधून अविरत चालणारा दृक-श्राव्य चित्रपट तसा भयप्रद भास घडवत होता.
५. मी असा कोणताही बिंदू अस्तित्वात नाही. आपला जन्म झाला आहे म्हणून आपल्याला देह आहे या धारणेनी आणि मेंदूच्या क्रॉसपॉईंट मधून चालू असणाऱ्या चित्रपटाचा कायमचा प्रेक्षक बनलेला एक भ्रामक बिंदू , मी चा भास निर्माण करत होता.
६. सर्व अस्तित्व सत्य आहे, सत्यापरता इथे काहीही नाही. तस्मात, इथे कुणीही व्यक्ती नाही, व्यक्तीला दहशत घालेल असं मन नाही आणि ज्याच्या परिप्रेक्ष्यात काही घडतय असा भासात्मक मी सुद्धा नाही.  

या भासात्मक मी चा निराभास म्हणजे केवळ सत्यच आहे आणि सत्यापरता काही नाही हा अल्टिमेट उलगडा आहे.