सहा अंडी तीन वाट्या कोलम किंवा इतर कोणताही कमी लांबीचे दाणे असलेला सुवासिक तांदूळ लवंगा, काळे मिरे, तमालपत्र, दालचिनी, चक्रीफूल, जिरे, हळद, धने पावडर, लाल तिखट, बिर्याणी मसाला, हिरव्या मिरच्या, पिकलेले टोमॅटो, कांदे, आले लसूण पेस्ट ,कांदे, तेल, तूप
काळे मिरे, तमालपत्र, दालचिनी, चक्रीफूल, जिरे, हळद, धने पावडर, लाल तिखट, बिर्याणी मसाला, हिरव्या मिरच्या, पिकलेले टोमॅटो, कांदे, आले लसूण पेस्ट ,कांदे, तेल, तूप, साईचे दही (ऐच्छिक), कोथिंबीर, पुदीना, लिंबू , तळलेला कांदा, थोडेसे दूध आणि केशर यांचे मिश्रण
२ तास
चार लोकांना एक वेळ
तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून ठेवा. एका मोठ्या पॅनमध्ये दोन मोठे चमचे तूप घ्या. गॅसवर ते चांगले गरम करा. त्यात तमालपत्र, काळे मिरे,चक्रीफूल, लवंगा आणि दालचिनीचा एक तुकडा टाकून हे सगळे चांगले तळून घ्या. त्यात भिजवलेले तांदूळ घालून हलक्या हाताने चांगले परतून घ्या.त्यात पाणी, एका लिंबाचा रस व चवीपुरते मीठ घालून तांदूळ ९०टक्क्यापर्यंत शिजवून घ्या. तांदूळातले पाणी व खडे मसाले काढून टाकून तांदूळ निथळून घ्या.
अंडी उकडून घ्या. ती चांगली गार झाली की मग त्यांवरील टरफले हलक्या हाताने काढून त्यावर वरच्यावर सुरीने उभे छेद द्या. मग एका जाड बुडाच्या पातेल्यात दोन मोठे चमचे तेल घेऊन त्यात एक चमचा हळद व एक चमचा लाल तिखट घाला. मग त्यात उकडलेली अंडी घालून चांगली परतून घ्या. अंड्यांवर तिखट-हळदीचा छान थर बसला पाहिजे. ही अंडी बाहेर काढून एका बाजूला ठेवून द्या.
त्याच पातेल्यात दोन मोठे चमचे तेल घाला. तेल चांगले तापले की त्यात चार उभे चिरलेले कांदे घाला. कांदे चांगले लाल होईपर्यंत परतून घ्या. मग त्यात दोन लहान चमचे आले लसूण पेस्ट आणि दोन किंवा तीन बारीक चिरलेल्या मिरच्या घाला. हे सगळे चांगले तेलावर परतून घेतले की गॅस मंद करून त्यात अर्धा चहाचा चमचा हळद, दोन टेबल स्पून लाल तिखट, दोन टेबल स्पून धने पावडर आणि दोन टेबल स्पून बिर्याणी मसाला घाला. करपू नये म्हणून थोडेसे गरम पाणी घाला आणि मसाल्यातून तेल वेगळे होऊ लागेपर्यंत परतून घ्या. यात दोन किंवा तीन बारीक चिरलेले टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्या.आवडत असल्यास यात थोडे साईचे आंबट दही घालू शकता. या मसाल्यात आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदीना घालून पातेले गॅसवरून खाली उतरवून घ्या. हे मिश्रण फार घट्ट वाटत असल्यास त्यात थोडे गरम पाणी घाला.
या मसाल्यात उकडलेली अंडी पसरवून ठेवा. त्यावर भरपूर चिरलेली कोथिंबीर,चिरलेला पुदीना व तळलेला कांदा घाला. यावर तांदूळाचा एक थर द्या. आवडत असल्यास यावर तळलेल्या अंड्यांचे तुकडे ( Scrambled Eggs) घालू शकता.त्यावर पुन्हा कोथिंबीर, पुदीना व तळलेला कांदा घाला. त्यावर उरलेल्या तांदूळाचा थर द्या. या थरांवर एका चमच्याने दूध आणि केशर यांचे मिश्रण नीट पसरवून टाका. त्याचबरोबर दोन तीन चमचे साजूक तूपही व्यवस्थित पसरवून टाका. .त्यावर पुन्हा कोथिंबीर, पुदीना व तळलेला कांदा घाला.मसाल्याचे मिश्रण खालून लागेल असे वाटल्यास सगळ्यात खालचा थर तांदूळाचा ठेवा.
एका तव्यावर हे पातेले ठेवून त्यावर घट्ट बसेल असे झाकण लावा. या झाकणात पाणी घाला. पाच मिनिटे तीव्र आचेवर आणि नंतर दहा मिनिटे मंद आचेवर ही बिर्याणी शिजू द्या.
पंधरा मिनिटे ही बिर्याणी मुरली की कांद्याच्या कोशिंबिरीबरोबर वाढून घ्या.
स्वानुभव
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.