अल्फा मेल

“कळपाचं नेतृत्व करणारा नर. अल्फा मेल. एकदम आक्रमक. त्याच्याजवळच सगळी पॉवर आहे. तो म्हणेल तीच दिशा. सगळ्या माद्यांवर त्याचाअधिकार. तो म्हणेल त्या मादीनं  खुशीनं त्याच्या खाली आलं पाहिजे. नाही म्हणाली तर तिला तो रक्तबंबाळ करेल, तिच्या पोटात दुसर्‍या नराचा गर्भ असेल तर तो पाडून टाकेल. तिला दुसर्‍या नरापासून पिलं झाली असतील तर त्यांना रक्तबंबाळ करून, त्यांच्या माना मुरगाळून त्यांचा खून करून टाकेल असा तो अल्फा मेल. प्राणी काय की माणूस काय, सगळीकडचा अल्फा मेल सारखाच. त्याच्या दृष्टीनं मादी म्हणजे पालापाचोळा. उपभोगाची वस्तू.त्याची इच्छा होईल तेंव्हा ती त्याच्या शय्येवर पाहिजे. इतरवेळी बाईनं आपले बूट चाटले पाहिजेत. तो आपल्याच मस्तीत,आपल्याच नशेत गुंगलेला असतो. त्याला साधी सिगारेट दारूची नशा पुरत नाही. ते तर आहेच, शिवाय त्याला रक्ताची नशा लागते. उष्ण, लालभडक, दाट, बुडबुडे येणारं, चकचकीत रक्त. ते दिसलं की मग तो आनंदी होतो, उत्तेजित होतो. त्याची खुशी हिंसा, त्याचा प्रतिशोधही हिंसा. तो म्हणजे एक रक्ताला चटावलेलं जनावर आहे, नाही जनावरही नाही, श्वापद. संपूर्ण रानटी, क्रूर श्वापद. आपला नायक हा असा आहे.” दिग्दर्शक म्हणाले.

“पुढं?” लेखकांनी मांडी बदलली.

“पुढं काही नाही. एवढंच. गोष्ट म्हणाल तर एवढीच. ही काही गोष्ट नाही, पण मध्यवर्ती कल्पना ही एवढीच. बाकी उरते कलाकुसर. ती कशी काय करायची हे तुम्ही बघा. पण थीम ही अशी आहे.हिंसा. कथेत तुम्ही किती हिंसा घालता ते तुमचं कौशल्य. पण प्रत्येक फ्रेममध्ये हा लाल रंग पाहिजे. रक्ताचा लाल रंग. बाकी चार गाणी टाका,परदेशातलं शूटिंग पाहिजे. किसिंग सीन्स पाहिजेत.हीरोला एक कुठलं तरी जबरदस्त व्यसन असलेलं दाखवा. त्याच्या आणि हीरॉईनच्या प्रेमप्रसंगांमध्येही त्याची भूक, वासना, वखवख दिसली पाहिजे. कुठल्याही स्त्रीला, अगदी आपल्या बायकोलाही थोबाडीत ठेऊन देताना त्याला काही वाटत नाही. या कथेतली पुरुष पात्रं अशी जंगलातनं आल्यासारखी पाहिजेत. कायदा वगैरे गोष्टी त्यांच्या दृष्टीने फालतू दाखवा. त्यांना पटतो तो जंगलाचा कायदा. बळी तो कान पिळी.जिसकी लाठी उसकी भैंस.”

“सेन्सॉरचं काय?” निर्माते पहिल्यांदाच बोलले.

“काय?”

“सेन्सॉरबोर्ड मान्यता देणार नाही अशा चित्रपटाच्या प्रदर्शनाला.”

“ते बघू आपण. पण या चित्रपटात इतका हिंसाचार असला पाहिजे की त्यामुळे प्रेक्षक शॉक झाला पाहिजे. हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. सेन्सॉर कट करून करून किती करेल? जे उरेल तेही पुरेसं धक्कादायक असलं पाहिजे.” दिग्दर्शक म्हणाले. “अशी कथा लिहिता येईल तुम्हाला?”

“बघतो..म्हणजे...”लेखक चाचरत म्हणाले.

“जमत नसेल तर सांगा. मीच लिहितो कथा. तुम्ही फक्त पटकथा आणि संवाद लिहायचे.”निर्मात्याकडे विजयी नजरेने बघत दिग्दर्शक म्हणाले.

“नाही, आम्ही करतो ना प्रयत्न. फक्त ते तुम्ही हीरो बायकांना कसं ट्रीट करतो ते म्हणालात ना, म्हणजे त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचा भोग घेतो, त्यांना मारहाण करतो वगैरे.. हे प्रेक्षकांना किती आवडेल.. म्हणजे तसा विचार केला पाहिजे.” लेखक म्हणाले.

दिग्दर्शकांनी लेखकांकडे तुच्छतेनं बघीतलं.

“किती सिनेमे हिट झाले आहेत तुमचे? सुपरहिट? किती, दोनशे कोटी? पाचशे कोटी?”

लेखक काही बोलले नाही.

“हा एक हजार कोटींचा सिनेमा आहे, मिस्टर. जे सीन तुम्हाला अवघड वाटताहेत ना, त्या सीनला थियेटरमध्ये टाळ्या पडतात की नाही, बघा. बाईला अजिबात किंमत न देणारा म्हणजे तिला आपल्या बुटाखाली ठेवणारा हीरो पाहिजे. तो तिला आपले बूट पुसायला लावतो असा एक सीन घाला.तिच्या गर्भारपणाची तो टिंगल करतो असं दाखवा. तिच्या आईला एक सेक्सिस्ट शिवी घालतोअसंही दाखवा. ”

“अहो पण...”

“हे बघा, तुम्हाला जमणार नसेल तर तसं सांगा. इथं एकाला पन्नास बसले आहेत.”

“करतो, करतो.. तुम्ही सांगाल तशी कथा, पटकथा, संवाद सगळं कसं लालभडक करून आणतो.” लेखक म्हणाले.

ओशाळवाणेपणे लाचार हसून लेखक खोलीबाहेर गेले आणि दिग्दर्शकांनी त्यांच्या नायकासारखीच एक बेफिकीर सिगारेट पेटवली.

“काय, मला रस्त्यावरच आणायचं ठरवलंय वाटतं तुम्ही?”निर्मात्यांनी विचारलं.

“गुलशनसाहेब, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? माझा या आधीचा चित्रपट पाहिला आहे ना तुम्ही? बस. मग झालं तर. पब्लीकची नाडी ओळखता आली पाहिजे हो. आपल्याला गल्ला कोण देणार आहे?पब्लीक. शिट्ट्या कोण मारणार आहे? पब्लीक. तुम्हाला आदर्शवादी सिनेमे काढायचे आहेत का? मदर इंडिया काढायचा आहे का? काढा, पण मग माझे पैसे बुडाले म्हणून बोंब मारू नका. धंदा करायचा तर पब्लीकला काय पाहिजे ते देता आलं पाहिजे. तेमी देतो. तुमचं काम मी म्हणतो त्या घोड्यावर पैसे लावायचे. लावता की नाही ते बोला.”

“अहो, अहो.. अशी एकदम निर्वाणीची भाषा करू नका,दिग्दर्शकसाहेब. आम्ही नाही म्हटलंय का? तुमचं म्हणजे आपलं फारच बुवा ह्या ह्या ह्या.. बसा. ग्लास भरा.” निर्मातेलघळपणे म्हणाले.

*******************************************************************************************************************

“काय वाटलं ते असं एका वाक्यात सांगता येणार नाही.” ते गीतकार, लेखक म्हणाले. “ पण दोन पातळ्यांवर मी अस्वस्थ झालो. एकतर हा काय चित्रपटआहे, यातला हा एवढा हिंसाचार कशासाठी वगैरे, पण ते मुद्दे सगळ्यांनीच मांडले आहेत. दुसरं म्हणजे मी अधिक अस्वस्थ झालो ते या चित्रपटाला मिळणार्‍या प्रतिसादामुळं. एका मल्टीप्लेक्समध्ये मी हा चित्रपट बघीतला. हाऊसफुल होता. नायकानं नायिकेच्या थोबाडीत दिली आणि थिएटरमध्ये लोक किंचाळले, चीत्कारले, जणू काही एक सार्वजनिक, सामुदायिक पार्डन माय वर्ड्स, पण जणू काही एक सार्वजनिक, सामुदायिक उत्कर्षबिंदू, एक कॉमन ऑरगॅझम आल्यासारखे किंचाळले तेंव्हा मला हरल्यासारखं वाटलं. हे सगळं माझ्या शक्तीपलीकडचं, नियंत्रणापलीकडचं आहे असं वाटलं. मी फार दुबळा, नपुंसक आहे असं वाटलं.” याच चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आयोजित केलेल्या परिसंवादात या चित्रपटावर चर्चा सुरू होती.

“आयम सॉरी सर, पण तुम्हाला असं वाटलं याचं कारण कदाचित तुम्ही तसे आहात म्हणून असेल. लाईक आय सेड, आयमसॉरी.” एक समीक्षक म्हणाले. “हिंसा तुम्हाला घृणास्पद वाटली म्हणालात तुम्ही. तसंअसेल तर जीवनच तुम्हाला घृणास्पद वाटायला पाहिजे, कारण माणसाचं सगळं जीवन हाच हिंसेचा प्रवास आहे. माणसाचं जीवन हा जर प्रवाह असेल तरत्यातला द्राव पाणी नाही, रक्त आहे. हा चित्रपट काही एखाद्या संताच्या जीवनावर आधारित नाही. तो आहे एका जनावराच्या जीवनावर. मानवी आकृतीत सामावलेलं एक जंगली जनावर. मग त्याच्या मनातले, कृतीतले विचार कसे दाखवायचे? संकेतांतून? सॉरी सर, पण झोपडपट्टी दाखवायची असेल तर तुम्हाला प्रत्यक्षातली झोपडपट्टी लागते, फोरास रोड दाखवायचा असेल तर तुम्हाला खराखुरा फोरास रोड लागतो, मग हिंसेच्या जागी सांकेतिकता का? एरवी वास्तवाचे एवढे पोवाडे गाणारे तुम्ही, इथे वास्तव आलं की तुमची एवढी का फाटते?”

“तसंअसेल ना, तर साहेब,” दुसरे एक विचारवंत म्हणाले. “तर नुसती वास्तविकताच दाखवा. संकेताचा पडदा नकोच. कपड्याच्या आत प्रत्येकजण नागडाच असतो ना, मग कपड्यांचा संकेत नकोच. सरळ नागडीच पात्रं दाखवा.”

“आमची काहीच हरकत नाही.” आतापर्यंत काही न बोलता ऐकणारे चित्रपटाचे लेखक म्हणाले. “किंबहुना कलेची अभिव्यक्ती जर खरोखर नैसर्गिक स्वरुपात व्हायची असेल तर नग्नतेला विरोध नकोच. हा सेन्सॉर नावाचा विनोद नसता तरआम्ही आमच्या हीरोला कायम नग्नावस्थेतच दाखवला असता.”

“घ्या, म्हणजे आता उघडीवाघडी नायिका पुरेशी नाही म्हणून नायकही. अहो, काय म्हणायचं आहे तुम्हाला? कसला संदेश देऊ पहाताय तुम्ही?”

“संदेश? कसला संदेश? आम्ही एक कमर्शियल सिनेमा करतो आहोत.दॅट्स इट. आमची गुंतवणूक आहे, आम्हाला नफा पाहिजे.”

“टॉक्सिक असं या चित्रपटाचं वर्णन केलं जातंय. टॉक्सिक.” गीतकार, लेखक म्हणाले. “हे काही फार भूषणावह वर्णन नाही. तुम्हाला हेच अपेक्षित होतं का?”

दिग्दर्शक जरासे हसले. “साहिरला आदर्श मानता ना तुम्ही? तो काय म्हणतो? देंगे वही जो पायेंगे इस जिंदगी से हम. जे समाजात आहे त्याचंच प्रतिबिंब कलाकृतीत येणार ना? मंटोला अश्लील लेखक म्हणणार्‍यांना त्यानं काय उत्तर दिलं? पण यांना तुम्ही क्लासिक म्हणणार, आणि आमच्या चित्रपटाला टॉक्सिक?”

“ हे तुम्ही पूर्ण जबाबदारीनं म्हणताय अशी आम्हाला आशा आहे.” विचारवंत म्हणाले. “आणि साहिर, मंटो वगैरे नावं फेकून तुम्ही आमची दिशाभूल करत नसाल अशीही आम्हाला आशा आहे. तुमचा नायक मिसोजिनिस्ट आहे. स्त्रीबद्दल त्याला आदर तर सोडाच, पण निकोप दृष्टीकोनही ठेवता येत नाही, आणि तुम्ही म्हणताय की हे समाजाचं प्रतिबिंब आहे. याचा अर्थ सगळा समाजच असा आहे असा घ्यायचा का?”

“माणूस हा असाच असतो, साहेब.” दिग्दर्शक म्हणाले.“मानवी स्वभावाचे बारकावे मी तुम्हाला सांगावे असं नाही. कधी हळवा तर कधी उद्दाम, कधी संवेदनशील तर कधी बेफिकीर. तो जसा आहे तसा आहे. मी माझ्या नायकाला अगदी प्रामाणिकपणे रंगवला आहे. माझा नायक जर मिसोजिनिस्ट असेल तर तो काही कुठल्या परग्रहावरून आलेला नाही. त्याला लोक आयडेंटिफाय करतायत ते बघा ना. तसं नसतं तर हा चित्रपट इतका चाललाच नसतं. समाजातलाच एक तुकडा उचलून आम्ही त्याचा एक चित्रपट केलाआणि आमच्या या प्रामाणिकपणाचा मात्र तुमच्याकडून उल्लेखही होत नाही, हे विशेष आहे.”

“आणि हा तुमचा नायक, तुमचा मेल अल्फा हाच खरा पुरुष आहे, पौरुषाचं लक्षण म्हणजे त्याच्यासारखं असणं असा जो मेसेज समाजात जातोय त्याचं काय?”

“आम्ही काही जाणीवपूर्वक असा मेसेज समाजात पाठवत नाही. आता कुणी त्या नायकात स्वत:ला बघत असेल किंवा स्वत:मध्ये त्या नायकाला बघत असेल तर भाग वेगळा.”

विचारवंतांनी हताशपणे खांदे उडवले.

“आणि असा चित्रपट यशस्वी होईल असं वाटतं तुम्हाला?” निर्माते पहिल्यांदाच बोलले.

“शंभरटक्के. समाजात माणसाला जे करावंसं वाटतं, पण जे करतायेत नाही, ते पडद्यावर त्याचा नायक करतो आहे असं दिसलं की प्रेक्षक खूश.”

“हे भयानक आहे हो. हा, असला समाज आहे आपला?”

“समाजाचं जाऊ द्या. धंद्याचं बघा. शंभर कोटी काय, पाचशे कोटींचा धंदा करेल बघा हा चित्रपट.”

आणि त्याने तेवढा धंदा केलाही.