एक मुलाखत:
“नमस्कार जयंतराव. सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की आपण फार मोठे खगोलशास्त्रज्ञ आहात! ... आणि अकलेचे तारे तोडणं याशिवाय माझा आकाशाशी संबंध आलेला नाहीये. तसं पाहता, शाळा सोडल्यापासून, विज्ञान या विषयाचा मला राग येत नाही. विज्ञान-वादी असणं म्हणजे काय ते बहुधा कळतं; पण मी विज्ञान-संवादी नाही. त्यामुळे ही मुलाखत घेणं मला जरा अवघडच वाटतं आहे.” पु. लं. नी सुरुवात केली.
“पु. ल., तुम्ही विनोदी लेखक आहात. मी विज्ञान अभ्यासक आहे. पण मला वाटतं आपल्या विचारांचा ‘वि’ हा या दोन्हींतला समान घटक आहे.” जयंत नारळीकर म्हणाले.
“हा आपला विनय आहे. मला अजून एक ‘वि’ दिसला बघा, ” पुलंनी विनोद केला आणि म्हणाले, “असो. पहिला प्रश्न. आपलं महान संशोधन आणि विज्ञान हा विषय घेऊन केलेलं अपूर्व लेखन, हे दोन्ही बघता तुम्ही ‘शून्यातून सृष्टी’ निर्माण केलीत असं म्हणणं योग्य आहे का?”
“या प्रश्नाचा आपण अनेक प्रकारे विचार करू शकतो. प्रथम मी वैज्ञानिकाच्या दृष्टीनं सांगतो. अहो,‘शून्यातून सृष्टी’ निर्माण होत नसते या मताचा मी आहे - ‘बिग बॅंग’ मधून विश्व तयार झालं नाही!”
नारळीकर पुढे म्हणाले,
“एक गंमत सांगतो. मी ब्लॉग लिहायचो अलीकडे. ‘Bang’ हा शब्द टंकलेखनात मराठीत सारखा ‘बांग’ असा बदलला जायचा!”
“अर्थातच, बांगेतून सृष्टी तयार झाली नाही हे वाक्यही बरोबरच आहे की!”
“थांबा, तो संशोधनाचा विषय नाहीये. का ते सांगेनच पुढे.”
“बरं, मग ‘शून्यातून सृष्टी’ हा ‘भ्रमाचा भोपळा’ आहे असं तुमचं म्हणणं आहे तर! भोपळा फुटल्यावर काहीच मिळणार नाही!”
“हो ना! त्यातून आम्ही ‘स्टेडी स्टेट थिअरी’ म्हणजे ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ वाले.”
“हा भोपळा अनादीपासून अनंतापर्यंत असाच ‘टुणुक टुणुक’ करत राहतो वाटतं.”
“हो! हो!” दोघेही हसले.
नारळीकर पुढे म्हणाले,
“आता या शून्याचीच गंमत बघा. तुम्ही म्हणता ‘शून्यातून सृष्टी’ निर्माण करणं. पण हे शून्य कुणी निर्माण केलं?”
“ब्रह्मगुप्तानं?”
“बरोबर! आणि विश्व कुणी निर्माण केलं?”
“ब्रह्मदेवानं?”
“मला वाटतं, ब्रह्मदेवानं विश्व निर्माण केलं असलं तर त्यात एक कमतरता राहिली होती... म्हणून ब्रह्मदेव गुप्त रूपानं आला आणि शून्य निर्माण करून अंतर्धान पावला...”
“आणि या ‘शून्यातून सृष्टी’ निर्माण झाली असं म्हणायला आपल्याला संधी मिळाली. आपल्याला म्हणजे,” नारळीकरांकडे निर्देश करून पु. ल. म्हणाले, “आपल्या विरोधकांना, ‘बिग बॅंग’ वाल्या!”
पुन: सगळे हसले.
“आपण पुन: मूळ प्रश्नाकडे गणिताच्या दृष्टीनं बघूया,” नारळीकर म्हणाले. “भागाकार म्हणजे सॉर्टिंग - वाटणी करणं. शून्याला वाटता येतं का? शून्याची किंमत बदलू शकते का? साधं बघा – एकावर शून्य दिलं की दहा होतात पण – तिथे एकाची किंमत बदलते, शून्याची नाही! मग शून्यातून कसं काय काही निर्माण करता येईल?”
“थोडक्यात, तुम्ही ‘शून्यातून सृष्टी’ निर्माण केलीत असं म्हटलेलं चालणार नाही का?”
“मला हा तुमचा प्रश्न खरोखर आवडला. ‘असं म्हटलेलं चालेल की चालणार नाही’ हा खरा मुद्दा आहे. त्याचे, ‘हो’ किंवा ‘नाही’ हे उत्तराचे हे दोन पर्याय आपल्याकडे आहेत. चांगली गोष्ट आहे! नाही तर सध्याच्या जगात ‘दुसरा पर्याय नाहीये त्यामुळे पहिला पर्याय(?)च योग्य आहे’ असा नियम रूढ होतो आहे...”
“खरं आहे; पण – आपण बराच वेळ असे फक्त शून्यात नजर लावून बसलो आहोत, नाही का?”
पुलंनी केलेल्या विनोदाला आपल्या स्मितहास्यानं दाद देत नारळीकर म्हणाले,
“तेच हिताचं आहे पु. लं.! चला, शून्य सोडून आपण सृष्टीबद्दल बोलून बघूया.”
“जयंतराव, खऱ्या सृष्टीबद्दल तुम्हांलाच बोलायचं आहे, मी फक्त कल्पनासृष्टीचा विचार करू शकतो.” पुलंनी खुलासा केला.
“तोच बरा. अहो, तिथे निदान आपण ती वाट्टेल तशी उभी करू शकतो. प्रश्न न विचारता. त्या कल्पनासृष्टीला खऱ्या सृष्टीत मिसळायची चूक आपण करू नये. तसं झालं की ब्रह्मास्त्र असलेल्या काळात घरोघरी वीज होती का असे प्रश्न पडतात मला....! एक विज्ञानाचा अभ्यासक म्हणून सतत ‘का’ असा प्रश्न येतो मनात.”[अ]
“तुमच्या ‘आयुका’ या संस्थेच्या नावातच ‘का’ आहे!” पु. ल. पुढे म्हणाले,
“आपलं खगोलशास्त्रही आर्यभट्टापासून सुरू झालं आणि भास्करापाशी संपलं असं तुम्ही म्हटलं होतं.” [आ]
“मान्य! कारण एकदा का परंपरा श्रेष्ठ म्हटलं की तीच बरोबर आणि तिच्याबद्दल प्रश्न विचारणं अयोग्य असं ठरवलं जातं. आपण ते आर्यभट्ट ते भास्कर यांचं संशोधन ‘का’ हा प्रश्न विचारून पुढे नेण्यापेक्षा फक्त तेवढंच श्रेष्ठ आणि पूर्ण आहे असं म्हणत बसतो. त्यात मुघल किंवा ब्रिटिशांनी कसं आपल्याला कंगाल केलं हे जोडत बसतो. जणू काही ते नसते तर आपण वैचारिक दिवाळखोरी सोडून विज्ञान जोपासलं असतं... एक गोष्ट सांगतो, अठराव्या शतकातली. कर्मनाशा नदीवर पूल बांधत होते आपले लोक. बांधकाम टिकत नव्हतं. ज्योतिषांनी पूजा करायचा सल्ला दिला आणि त्यासाठी निधी मागण्यासाठी नाना फडणवीसाला कळवलं. त्यानं पैसे दिले नाहीतच पण एक ब्रिटिश अभियंता पकडून पूल बांधून घेतला!” [इ]
“कर्मनाशा हे नाव काय प्रतीकात्मक आहे! नदीपेक्षा त्या कर्मकांड करणाऱ्या लोकांना दिलेलं वाटतं. कर्माचा नाश करणाऱ्या विचारांची जीवनधारा असणाऱ्या. असो - पण इथे ज्या एका नानाला कळलं ते परदेशांत नाना राज्यकर्त्यांना कळत होतं!” पुलंनी कोटी केली, खरं तर कोट्या केल्या!
“अगदी बरोबर! आपले राज्यकर्ते आज दोनशे वर्षांनी – इथे ब्रिटिश किंवा मुघल नसतानाही – गणपती दूध पितो अशा बातमीवर विश्वास ठेवतात!” [ई]
“त्याबरोबरच अनेक लोक फक्त हिंदू धर्माच्या लोकांनाच अंधश्रद्धा निर्मूलनाचा जाच होतो, इतर धर्मांबद्दल कोणी बोलत नाही अशी टीका करतात! मी स्वत: मदर तेरेसावर टीका केली होती आणि मुस्लिम सत्यशोधक समाजाचे हमीद दलवाई तर आता विस्मृतीतच गेले आहेत.”पु. ल. म्हणाले. [उ]
“अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नरेंद्र दाभोळकरांबरोबर मी काम केलं होतं. त्यांनी आणि त्यांच्या दुर्दैवी हत्येनंतरही त्या समितीनंही सगळ्या धर्मांतल्या अंधश्रद्धांना विरोध केला आहे,” नारळीकर म्हणाले. [ऊ]
“पण मग हे सगळं आपण आपल्या दृष्टीआड असलेल्या सृष्टीच्या शोधात असतो म्हणून होतं, असं तुम्हांला वाटतं का?” पुलंनी विचारलं.
“नाही, मला वाटतं आपल्या कल्पनेतल्या सृष्टीआड आपली दृष्टी अधू झालेली असते म्हणून. तिनं कल्पनासृष्टीत जे बघितलेलं असतं त्या पलीकडे काही नाहीये असंच ठरवलेलं असतं! अजून एक प्रसंग सांगतो. हबल जेव्हा कॅलिफोर्नियात टेलिस्कोप बसवत होता तेव्हा त्याला विचारण्यात आलं की, त्यातून त्याला काय दिसणार आहे? तो म्हणाला, ‘हे जर मला माहिती असतं तर मी ही दुर्बीण बसवलीच नसती!’ आणि इथे तर ठरवलेलं असतं काय आहे पलीकडे ते. मग काय शोधायचं?” [ए]
“आता शेवटचा प्रश्न. शून्यातून सृष्टी नाही पण सृष्टीतून शून्य निर्माण होऊ शकतं का?” पुलंनी विचारलं. [ऐ]
“सूर्य पृथ्वीला गिळंकृत करू शकेल, अगदी या शतकातही. ती वैज्ञानिक शक्यता मी संशोधनातून मांडली आहे. पण फक्त वैचारिक दृष्ट्या बघायचं तर... तर ते तुम्हीच संशोधन केलं आहे पु. ल.!” [अ]
“मी?”
“हो! तुमचा ‘एक शून्य मी’ हा लेख वाचला आहे मी... आणि हा खरंच तुम्ही म्हणता तसा ‘युरेका’ म्हणावं असा शोध आहे. जितके आपण चांगल्या गोष्टींनी धन होत असतो तितकेच क्लेशदायक गोष्टींनी ऋण होत असतो. आणि शेवटी विज्ञानवादी असूनही जगणं म्हणजे श्वसनक्रिया की प्रश्नांमागून धावणं असा प्रश्न पडतो! शिवाय, हाही प्रश्नच. आणि त्यांच्या पुढच्या प्रश्नचिन्हातल्या आकड्याखाली उरतं ते गोलाकार शून्यच!”
“मग? प्रश्न पडावेत कानाही?”
“तुम्हांला ते शून्य उत्तराचं वाटलं. पण मला वाटतं ते विरामाचंच असू द्यावं. विज्ञानाच्या अभ्यासकानं ही शून्यता स्वीकारू नये. उत्तर ही एक क्रिया आहे - न्यूटनच्या तिसऱ्या नियमासारखी.प्रश्न आणि प्रश्नचिन्ह हे त्याविना अपूर्ण असतात...”
मुलाखत संपली. आकाशवाणीवरच्या कुठल्याही कार्यक्रमाचा शेवट गाण्यानं झाला नाही तर तो ‘फाउल’ धरतात म्हणून त्यानंतर ही गझल लावण्यात आली -
‘जिंकण्याची, हारण्याची सारखी भाषा कशाला?
तारण्याची, मारण्याची सारखी भाषा कशाला?
देव किंवा देश दोन्ही कल्पना या माणसांच्या
व्यर्थ त्यांनी भारण्याची सारखी भाषा कशाला?
माणसांनी घेत जावी काळजी; पण - माणसांची
देवळे उद्धारण्याची सारखी भाषा कशाला?
सारुनी बाजूस साऱ्यावंचना-गरजा प्रजेच्या
भावना गोंजारण्याची सारखी भाषा कशाला?
धन किती अन् ऋण किती हे शोधताना आज माझी
शून्यता स्वीकारण्याची सारखी भाषा कशाला?’
- कुमार जावडेकर
(वरील पूर्ण मुलाखत काल्पनिक आहे. ती लिहिण्यासाठी वापरलेले काही दुवे पुढे दिले आहेत. कुणाचाही अपमान करणे अथवा कुणाला दुखावणे हा हेतू नाही. काही चूक राहिल्यास कृपया क्षमस्व.)
संदर्भ:
[इ] Why did we miss thebus? - by Prof. Jayant V. Narlikar
[ई] देवळात जाऊन चमत्काराचा फोलपणा सांगितला –अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र ®
[उ] पु. ल. देशपांडेयांचं भाषण (https://youtu.be/BTRFRCYUxwc?si=TY9PtsuOj79psi0J)
[ऊ] ‘काय अंधश्रद्धानिर्मूलन समिती फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धांवरच काम करते? | अंनिसआणि हिंदू धर्म’ (https://youtu.be/bvpJErz1aZo)
[ए] How objective are thescientists?(नारळीकरांच्या ब्लॉगवरील लेख)
[ऐ]एक शून्य मी पुल देशपांडे अभिवाचक शशिकांत लावणीस - YouTube