नृपस्य चित्तं, कृपणस्य वित्तम; मनोरथाः दुर्जनमानवानाम्।
स्त्रिया चरित्रं, पुरुषस्य भाग्यम; देवो न जानाति कुतो मनुष्यः।।
राजाचे मन, कंजुषाचे धन, दुर्जनाचे मनोरथ, स्त्रियांचे चारित्र्य आणि पुरुषाचे भाग्य देवही जाणू शकत नाहीत तर मानवासाठी तर (ते समजणे) अशक्यच.
या उक्तीचे प्रमाण महाभारत कथेमध्ये ठायी ठायी अढळते. भारतामध्ये पूर्वापार राजे आणि राजघराणी यांची सत्ता होती. अनेक लहान मोठी राज्ये होती, ज्यांचे आपसात वैर किंवा मैत्री असे. काही राजघराणी नातेसंबंधाने एकमेकांशी जोडलेली होती. पुत्र अथवा कन्येचा विवाह ही राजघराण्यांकरता वैयक्तिक घटना नसून त्यामध्ये राजकीय उद्देश साधण्याचं प्रयत्न असे. पुत्र संपत्तीचा, राज्याचा वारस असे तर कन्या परक्याचे धन अशीच धारणा होती. प्रजनन, संगोपन, आणि संवर्धन अशी स्त्रियांची कर्तव्ये निश्चित केलेली असत. निष्ठा, मर्यादा, संयम, सेवा, त्याग अशी उत्तम स्त्रीची लक्षणे समजली जात असत.
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
रक्षन्ति स्थाविरे पुत्राः न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ।।
आयुष्याच्या प्रत्येक स्थितीमध्ये स्त्रीचे संरक्षण केले जाते, (म्हणून) स्त्री स्वतंत्र असण्याच्या योग्यतेची नाही. अशी विचारसरणी असल्याने स्त्रियांचे अस्तित्व घराच्या उंबरठ्या पलीकडे फारसे दिसून येत नाही. ज्ञानार्जन करण्यास अनुमती नाही, अर्थार्जन शक्य नाही, विचार स्वातंत्र्य नाही आणि निर्णय स्वातंत्र्यही नाही. स्त्रीचे वर्तमान आणि भवितव्य तिच्या स्वाधीन नव्हतेच
आणि असे असले तरी हिंदू धर्म, संस्कृतीमध्ये स्त्रियांना देवतेच्या स्वरूपात पुजले जाते हा मोठाच विरोधाभास वाटतो.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:।
जेथे नारीची पूजा केली जाते (तिला सन्मानाची वागणूक देण्यात येते) तिथे देवतांचा वावर असतो असेही सांगितले जाते.
केवळ इतिहास, कथा वाचून त्या काळातील समाज आणि जीवनपद्धतीची कल्पना करणे अवघड आहे. पुराण काळात रामाने सीतेचा त्याग केला, अहिल्येला शापामुळे शिळा होऊन राहावे लागले अशा कथा ऐकलेल्या, वाचलेल्या आहेत पण महाभारतात मात्र देवयानी, गंगा आणि सत्यवतीच्या कथा येतात ज्या स्वतः निर्णय घेण्यासाठी सक्षम आणि स्वतंत्र देखील आहेत. कथेमध्ये त्यांचे अस्तित्व केवळ शोभेसाठी अथवा रंजकता वाढविण्यापुरते मर्यादित नाही, तर अनेक घटनांचे कारकत्व त्यांच्याकडे आहे. त्या परिस्थितीला धैर्याने सामोऱ्या जातात, दुःख, कष्ट, यातना सहन करतात.
महाभारतातील दोन वैशिष्ट्यपूर्ण स्त्रियांचा मला विशेष उल्लेख करावासा वाटतो त्या आहेत राजमाता कुंती आणि पांडवपत्नी द्रौपदी. दोघीच्या चरित्रांमध्ये अनेक साम्यस्थळे अढळतात. दोघीजणी राजपुत्री होत्या, त्यांच्या विवाहाकरता स्वयंवराचे आयोजन करण्यात आले होते. दोघीजणी प्रबळ राज्याच्या राजसिंहासनावर पतीसमवेत विराजमान झालेल्या होत्या. दोघीजणींना त्यांच्या पतीसमवेत वनवास भोगावा लागलेला होता.
पंडुराजाने राज्यत्याग करण्याचा निर्णय घेतल्यावर कुंती सर्व भोगविलासाचा त्याग करून त्याच्यासह वनवासामध्ये गेली. पतीनिधनानंतर पाच पुत्रांची जबाबदारी तिच्यावर होती. तिची सवत माद्री हिचे पुत्र नकुल आणि सहदेव यांना तिने कधी सापत्न वागणूक दिली नाही हे विशेष. पाच पांडवांना तिने उत्तम संस्कार दिले होते त्याच्याच परिणामस्वरूप सर्व दरबारी आणि प्रजाजनांना पांडवांबद्दल सहानुभूती वाटत असे आणि तेच राज्याचे योग्य वारस आहेत असे सर्वांना वाटत होते.
लाक्षागृहाच्या आगीतून निसटून पांडव आणि कुंती अरण्यांमध्ये लपले होते. दुर्योधनाचे सैनिक चारही दिशांना त्यांचा शोध घेत होते. त्याचवेळी द्रौपदी स्वयंवराची वार्ता त्यांना मिळाली. कुंतीने पांडवांना त्या स्वयंवरामध्ये सहभागी होण्यास उद्युक्त केले कारण संकटकाळी द्रुपदराजा सारखा सामर्थ्यवान पाठीराखा असणे फायद्याचे आहे असे तिला वाटत होते. अर्जुनाने लक्ष्यवेध करून द्रौपदीला जिंकून आणले तेव्हा कुंतीने सांगितले की द्रौपदीने पाचही बंधूंबरोबर विवाह करावा, असे केल्याने त्यांच्यातील एकोपा अभंग राहील असे तिला वाटत होते.
युद्धामध्ये तिचे पुत्र विजयी झाले होते, धर्मराजा आता चक्रवर्ती सम्राट होता पण कुंतीने राजप्रासादामध्ये राहणे नाकारले. युद्धामध्ये धारातीर्थी झालेले सारे तिचेच आप्तस्वकीय होते. त्यांचे मृत्यू पाहिल्यानंतर मिळालेल्या सत्ता आणि वैभवाचा उपभोग घेणे तिला नकोसे होते. शतपुत्रांच्या मृत्यूचे दुःख घेऊन वनवासामध्ये उर्वरीत आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेणाऱ्या धृतराष्ट्र आणि गांधारीसोबत तिनेही वानप्रस्थाश्रम स्वीकारला.
पांचाळ देशाच्या द्रुपदराजाची, यज्ञातून प्रकटलेली कन्या अशी द्रौपदीची ओळख आहे. तिच्या सौंदर्याचे, बुद्धिमत्तेचे वर्णन महाभारतामध्ये अनेकवेळा आढळते. कृष्णाने तिला बहीण मानले होते असे मानले जाते.. कारण प्रत्येक नात्याला काहीतरी नाव असलेच पाहिजे असा सर्वांचा अट्टहास असतो. कृष्णाचे आणि तिचे नातेही लोकविलक्षण आहे.
त्या काळातील नीती-अनीतीच्या कल्पना काय असतील? याचे आश्चर्य वाटते. पुरुषाला एक पेक्षा अधिक पत्नी असणे ही अगदी सामान्य रीत होती अगदी अलीकडील काळात सुद्धा बहुपत्नीत्व समाजमान्य प्रथा आहे. परंतु एक स्त्री अनेक पतींची पत्नी असणे हे क्वचितच असावे. द्रौपदी पाच पांडवांची पत्नी होती, ती पाच पुत्रांची माता होती. असे असूनही तिच्याशी विवाहाचे आमिष स्वतः कृष्णांनी कर्णाला दाखवावे हे अजब वाटते.
द्रौपदी पाच पांडवांची पत्नी आहे इतकीच तिची ओळख पुरेशी नाही. ती इंद्रप्रस्थाची सम्राज्ञी आहे, अलौकिक गुण असलेल्या पाच पतींची ती विश्वासू सल्लागारसुद्धा आहे. पांडवांमध्ये कधीही कलह घडू नये याकरता ती जागरूक आहे कारण जोवर ते एकत्र आहेत तोवर ते अजिंक्य आहेत हे ती जाणते. ती महत्त्वाकांक्षी आहे. पांडवांसह तिने वनवास भोगला पण वनवासातसुद्धा ती राणीसारखीच राहिली.
दुःशासनाने तिला केसाला धरून फरफटत दरबारामध्ये आणले तेव्हा तिची अवस्था खरेतर फार करुण होती. पण त्याही परिस्थितीत तिचे धैर्य अबाधित आहे आणि तिची प्रगल्भ बुद्धिमत्ता जागृत असलेली दिसते. तिने दरबारातील ज्येष्ठं सभासदांना विचारले की तिला पणाला लावले तेव्हा युधिष्ठिर स्वतंत्र होता? की दास झालेला होता? कारण तो दास असला तरी ती अजूनही महाराणी होती आणि म्हणून तिला पणाला लावायचा त्याला हक्क नाही. तेव्हा सभेतील आदरणीय ज्येष्ठांनी तिला सांगितले की तिला पणाला लावताना युधिष्ठिर दास होता हे खरे आहे कारण आधी त्याने स्वतःला आणि चार बंधूंना पणाला लावले होते. परंतु दास असला तरी तो तिचा पती आहे हे सत्य बदलत नाही. आणि धर्मशास्त्रानुसार पती त्याच्या पत्नीचा स्वामी असतो त्यामुळे त्याच्या आदेशाचे पालन करणे पत्नीचे कर्तव्य आहे.
त्यानंतर द्रौपदी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक सभासदांसमोर जाऊन मदतीची याचना करते. तिच्या त्या अवस्थेत देखील दुर्योधनाची निर्भर्त्सना करताना तिला कसलेही भय वाटले नाही, गांधारीला कुरुकुळाची अब्रू वाचविण्याची ती विनंती करते. ते सारे संवाद तिच्या धैर्याचे आणि संकटातही स्थिर असणाऱ्या बुद्धीचे दर्शन घडवतात. तिच्याजागी अन्य कुणी सामान्य स्त्री असती तर अशा संकटप्रसंगी सर्वांसमोर बोलण्याचे धारिष्ट्य तिला झाले नसते, पण द्रौपदी असामान्य होती.
पांडवांच्या सुखात आणि संकटकाळात देखील द्रौपदी त्यांच्यासमवेत होती. पांडवांच्या इतर स्त्रियांचे कथेमध्ये उल्लेख आहेत परंतु त्यांच्याबरोबर वनवासात आणि अज्ञातवासात मात्र द्रौपदीच असलेली दिसते. द्रौपदी फक्त सौंदर्यवती स्त्री नव्हती तर बुद्धिमान देखील होती. श्रीकृष्णाबरोबरचे तिचे संवाद आणि वनवासात आणि युद्धसमयीचे तिचे वर्तन त्याची साक्ष देतात.
कुंती आणि द्रौपदी या दोघीही राजस्रिया असूनही दुदैवी होत्या. आयुष्यभर त्यांना यातना आणि दुःख सहन करावे लागले होते. असे असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्वं आणि चरित्र प्रेरणादायी आहे हे निश्चित.
***