तुका म्हणे प्रज्ञा परिणिली नोवरी

तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी । आता दिवस चारी खेळीमेळी ॥

असा मूळ श्लोक आहे पण मुक्तीशी परिणय साधता येत नाही कारण मुक्ती ही स्थिती आहे आणि प्रज्ञा त्यात घटना घडवते आहे. मुक्ती ही मोकळीक आहे तिचा काही त्रास नाहीये पण प्रज्ञेमुळे घडणाऱ्या घटनांनी आयुष्यात उच्छाद मांडला आहे ! त्यामुळे परिणय प्रज्ञेशी झाला आणि ती पत्नी झाली तर घडणाऱ्या घटना मजा म्हणून घेता येतील आणि आता दिवस चारी खेळीमेळी होतील.  पत्नीनं काहीही केलं तरी सुज्ञ पतीला तिच्याकडे केवळ घटना म्हणून पाहता येईल, तिचा दंश होणार नाही. पत्नी काही ना काही तरी करणारच, तीच तर प्रपंचाची मजा आहे या दृष्टीनं पाहायला लागलं तर जीवन खेळीमेळीचं होईल. मग पत्नीला ही संसाराची मजा येईल आणि जीवनातला कलह संपून जाईल.

आध्यात्मिक दृष्टीनं प्रज्ञा हा "कॉस्मिक इंटेलिजन्स" आहे ज्यामुळे मुक्त सार्वत्रिकतेत अनेकानेक घटना घडतायत; म्हणजे पृथ्वी फिरतेय, सूर्य प्रकाशतोय, देहाचा श्वास चाललाय, हृदय धडधडतंय, झाडं बहरतायत, नद्या वाहतायत आणि पक्षी गातायत. प्रज्ञा केव्हा काय करेल याचा नेम नाही, ती कधी रोगराई घडवेल, कधी अपघात घडवून कुणाचा मृत्यू घडवेल तर कधी एखाद्या अप्रतिम ललनेला जन्म देऊन प्रणयाला नवा बहर आणेल. प्रज्ञेचा खेळ अनाकलनीय आहे, तिच्या दृष्टीनं सज्जन, दुर्जन, नीती, अनीती, योग्य, अयोग्य असं काही नाही आणि ती स्वैर आहे, तिला विचारणारं कुणी नाही आणि ती काही सांगणार पण नाही. 

जर तुम्हाला सिद्ध व्हायचं असेल, म्हणजे तुम्ही सिद्ध आहातच पण त्याचा उलगडा व्हायला हवा असेल तर या चार गोष्टी समजायला हव्यात, खरं तर फक्त मान्य व्हायला हव्यात, कारण ती वस्तुस्थिती आहे. 

(१) तुम्ही अनिर्बध मोकळीक आहात, (२) तुम्ही आकारविहीन आहात (म्हणजे आपण देहात बंदिस्त असलेली व्यक्ती आहोत ही धारणा सर्वथा चुकीची आहे), (३) तुम्ही स्थानविरहित आहात (म्हणजे जिथे देह आहे तिथे आणि देहाच्या आत आपण आहोत हा केवळ भास आहे, ती वस्तुस्थिती नाही), (४) तुमच्यात कुणीही राहत नाही (म्हणजे तुम्ही देहात नाही आणि देहाच्या आत कुणाचा रहिवास नाही). 

या चार गोष्टींचं फक्त मनन करत राहा कारण चुकीच्या धारणा केवळ मनात आहेत. जितक्या एकतानतेनं तुम्ही या चार गोष्टी मनात दुमदुमवून टाकाल तितके तुम्ही वस्तुस्थितीशी समरूप व्हाल.

 रात्रंदिवस, निवांत वेळ काढून, मनानं कितीही विपरित प्रश्न निर्माण केले तरी त्यांना दाद न देता एखादं सुरेख गाणं गुणगुणावं तसे वस्तुस्थितीचे हे चार पैलू अंतर्बाह्य आपलेसे करा. काही दिवसात तुम्हाला एखादी जादू व्हावी तशी मोकळीक जाणवायला लागेल, जीला तुकारामानं मुक्ती म्हटलंय.

आता या मोकळिकीनं प्रज्ञेशी म्हणजे घटना घडवणाऱ्या जादुई परीशी परिणय करा, तिला आपली नोवरी करा ! मग घडणाऱ्या घटना तुम्हाला फक्त कळतील पण त्यांचा तुम्हाला स्पर्श सुद्धा होणार नाही. तुमचं जीवन स्वप्नवत होऊन जाईल. 


आयुष्यात जे  काही होतंय ते आपली नोवरी घडवतेय, आपण निरावयव आणि निरिंद्रीय आहोत त्यामुळे आपण काहीही करत नाही किंवा मनात आणलं तरी करू शकत नाही एवढं एकमात्र भान आलं की तुम्हाला आपण कायम एक स्थिर स्थिती आहोत, मुक्त स्थिती आहोत;  हा उलगडा होईल. 

घडलेल्या घटनांचं (म्हणजे भूतकाळाचं) मनावरचं सर्व दडपण शून्य होईल कारण आपण काही केलेलंच नाही, जे घडलंय ते प्रज्ञेनं घडवलंय. भविष्यात काय होईल याची चिंता उरणार नाही कारण आपल्याला काही करायचंच नाही, जे घडवायचंय ते प्रज्ञाच घडवणार आहे. आणि वर्तमान ही मुक्त स्थिती होईल ज्यात प्रज्ञा सर्व काही करतेय !

      तुका म्हणे प्रज्ञा परिणिली नोवरी । आता दिवस चारी खेळीमेळी ॥


आता या श्लोकाचा अर्थ तुम्हाला उलगडेल आणि तुमचं आयुष्य खेळीमेळीचं होईल.  त्या जीवनाचं यथार्थ वर्णन या शेरात होईल :


खबर तो मिल रही है हर बातकी लेकिन,

जिंदगी सपना बनी, अब असर नही होता ॥