गावठी कोंबडीचा पुलावा

  • गावठी कोंबडी पाऊण किलो
  • इंद्रायणी तांदूळ अर्धा किलो
  • कांदे अर्धा किलो
  • कोथिंबीर अर्धी जुडी
  • गरम मसाला सहा चमचे
  • तेल तीन पळ्या
  • हळद दोन चमचे
  • एका लिंबाचा रस
  • तूप दोन चमचे
  • मीठ गरजेप्रमाणे
२ तास
चार जणांस

गावठी कोंबडीचा पुलावा

गावठी कोंबडी मध्यम तुकडे करून धुऊन घ्यावी. त्याला हळद, मीठ, तीन चमचे गरम मसाला आणि लिंबाचा रस लावून ठेवून द्यावे.

इंद्रायणी तांदूळ नीट धुवून घ्यावा. निथळून ओलसर ठेवावा.

कांदे चिरून पातळ काप करून घ्यावे.

मोठ्या कढईत तेल मोठ्या ज्योतीवर गरम करावे. धुरावल्यावर चिरलेले कांदे घालून कांद्यांपुरते मीठ घालून मध्यम ज्योतीवर गुलाबी करून घ्यावे. 

त्यावर कोंबडीचे तुकडे घालून परतावे. कोंबडीपुरेसे मीठ घालावे. कोंबडीला पाणी सुटू लागले की तीन चमचे गरम मसाला घालून परतावे.

कोंबडीचे पाणी आळू लागले की इंद्रायणी तांदूळ घालून परतावे. भाताच्या हिशेबाने मीठ घालावे. तूप घालून ज्योत बारीक करावी.

पंधरा मिनिटे परतत रहावे.

एक लिटर पाणी उकळवून घ्यावे. ते कोंबडी-तांदूळ मिश्रणावर ओतून नीट हालवून घ्यावे. वर झाकण ठेवावे.

पंधरा मिनिटांनी झाकण उघडून हालवावे. 

अजून पंधरा मिनिटांनी परत झाकण उघडावे नि कोंबडी कितपत शिजली आहे याचा अदमास घ्यावा. कोथिंबिरीची देठे बारीक कापून मिसळावीत. गरजेप्रमाणे झाकण ठेवून पुरते शिजवावे.

नीट शिजल्यावर ज्योत बंद करावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.