मेथी मटर मलाई

  • कसूरी मेथी ५० ग्रॅम
  • फ्रोझन ग्रीन पीज ५०० ग्रॅम
  • अमूल फ्रेश क्रीम (२५० / ५०० मिली)
  • गायीचे दूध (६० / १२० मिली)
  • अमूल बटर ३० ग्रॅम
  • तेल २० मिली
  • हळद, हिंग, मीठ, गरम मसाला
४५ मिनिटे
चार जणांसाठी

मेथी मटर मलाई

सुमारे बारा तास आधी ग्रीन पीज डीप फ्रीजरमधून काढून फ्रीजच्या खालच्या (नेहमीच्या वापरातल्या) खणात ठेवावेत. वापरण्याआधी एकदा पाण्यातून काढून घ्यावेत.

कसूरी मेथी एकदा पाण्यातून काढून निथळून घ्यावी.

नॉन स्टिक पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे. तेल थोडे गरम झाल्यावर त्यात अमूल बटर घालावे. ज्योत बारीकच असू द्यावी.

तेल-बटर मिश्रण धुरावल्यावर त्यात निथळलेली कसूरी मेथी घालावी. त्यात हळद, हिंग, मीठ आणि गरम मसाला घालून ज्योत मध्यम करून नीट परतावे.

पाच मिनिटांनी ज्योत बारीक करून अजून पाच मिनिटे थांबावे.

मग त्यात मटार घालून ज्योत मध्यम करावी आणि परतत रहावे. मिश्रण कोरडे झाले की ज्योत बारीक करून झाकण ठेवावे. पाच पाच मिनिटांनी झाकण काढून परतावे.

पंधरा ते वीस मिनिटांत मटार जवळपास शिजतील.

आता त्यात क्रीम घालावे. इथे दोन फाटे फुटतात.

मेथीची कडवट चव आणि क्रीमचा ओशटपणा समसमान हवा असल्यास २५० मिली क्रीम आणि ६० मिली दूध घालावे.

मेथीचा कडवटपणा नेस्तनाबूत करून टाकायचा असेल तर ५०० मिली क्रीम आणि १२० मिली दूध घालावे. ही पद्धत टोकाला नेऊन वापरायची असेल तर १०० ग्रॅम काजू भिजवून त्यांची पेस्ट करून सुरुवातीला मेथीवर घालता येईल.

क्रीमचे कार्टन कोमट पाण्याने विसळून घ्यावे आणि ते पाणीही घालावे. २५० मिलीच्या कार्टनसाठी सुमारे २०० मिली पाणी (एकदा १०० मिली असे दोनदा) वापरावे.

बारीक ज्योतीवर हे मिश्रण ढवळत रहावे. सुमारे पंधरा मिनिटांत सर्व एकजीव होईल की झाले.