ओशोंचा मृत्यू लेख

ओशोंचा मृत्यू लेख

ओशोंचा मृत्यू लेख त्यांच्या समाधीवर लिहिलेला आहे. ही वाक्य ओशोंनी स्वतः लिहून ठेवली होती आणि ती त्यांच्या समाधीवर लिहिली जावीत असं सांगितलं होतं. 

मृत्यू लेख असा आहे: 

ओशो, कधी जन्मले नाहीत किंवा मृत्यू पावले नाहीत; पृथ्वी या ग्रहाला त्यांनी  १९३२ ते १९९० या कालावधीत भेट दिली.


वास्तविकात या ओळी म्हणजे ओशोंच्या आकलनाची परिसीमा आहेत आणि सर्व आध्यात्मिक साधकांना त्या मार्गप्रदिपक ठरू शकल्या असत्या; पण त्या मुळातच इतक्या भोंगळ आणि अर्थहीन आहेत की त्यांनी फक्त दिशाभूल होते.


जन्म देहाचा होतो, आपला नाही हा उलगडा होणं म्हणजे अध्यात्म आहे त्यामुळे ओशोंचा जन्म झाला नाही हे विधान पुरते व्यक्तिगत आहे. ज्याचा जन्मच झाला नाही त्याला मृत्यू नाही ही उघड गोष्ट आहे. शिवाय आत्मा (म्हणजे आपण) कधीही प्रकट होत नाही (केवळ देह प्रकट होतात, कालबद्धतेत वावरतात आणि विलीन होतात); त्यामुळे ओशोंनी पृथ्वीला भेट दिली हे विधान सर्वथा चूक आहे. देहाचा जन्म आणि मृत्यू या दरम्यानच्या घटना आपल्याला फक्त कळतात पण त्यांचा आपल्यावर कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे आपण जसेच्या तसे राहतो ही अध्यात्माची अंतिम शिकवण आहे. 

थोडक्यात, सर्व सत्यच असल्यानं आपणही सत्यच आहोत. सत्याचा जन्म होऊ शकत नाही त्यामुळे आपला जन्म झालेला नाही. जन्म देहाचा झाला आहे आणि मृत्यू देहाला आहे, आपल्याला नाही. आपण कळण्याची क्षमता आहोत त्यामुळे जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान जे काही घडतंय ते आपल्याला फक्त कळतंय; त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. हा अध्यात्माचा सारांश आहे. 

तस्मात, जर ओशोंचा मृत्यू लेख अचूक लिहायचा झाला तर तो असा होईल :


तुमचा जन्म झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला मृत्यू नाही. जन्म आणि मृत्यू या केवळ जैविक घटना आहेत. जन्म आणि मृत्यू या दरम्यान जे घडतं ते तुम्हाला फक्त कळतं, त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही.