प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक विघटन

प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक विघटन
घरच्या घरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन शक्य आहे का?
अमोनियम कार्बोनेट वा बायकार्बोनेटच्या मदतीने मूर्तीचे रासायनिक विघटन करून मिळू शकते खत आणि इतर उपयुक्त पदार्थ!
किती प्रमाणात रसायन वापरावे आणि प्रक्रिया कशी करावी? जाणून घ्या हा वैज्ञानिक पर्याय.

घरगुती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती नैसर्गिक जलस्त्रोत वा कृत्रिम हौद यांत विसर्जित करण्या ऐवजी तिचे घरच्याघरी रासायनिक विघटन करता येऊ शकते.

प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे कॅल्शियम सल्फेट (रासायनिक संज्ञा CaSO4)

प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे विघटन करण्यासाठी अमोनियम कार्बोनेट (रासायनिक संज्ञा (NH4)2CO3) वा अमोनियम बायकार्बोनेट (रासायनिक संज्ञा 2(NH4)HCO3) वापरता येते.

अमोनियम कार्बोनेट वापरल्यास त्यातून कॅल्शियम कार्बोनेट (बांधकामाचा चुना) आणि अमोनियम सल्फेट (खत) तयार होते. अमोनियम सल्फेट हे क्षारपड जमिनींच्या पुनर्वापरासाठी विशेष उपयोगी आहे. इतर जमिनींमध्येही ते खत म्हणून वापरता येते. तसेच ते कीटकनाशके, तणनाशके आणि कवकनाशके यांच्यात मिसळून त्या नाशकांची उपयोगिता वाढवता येते.

अमोनियम बायकार्बोनेट वापरल्यास त्यातून वरील दोन पदार्थांखेरीज कार्बोनिक ऍसिड मिळते. हे एक सौम्य आम्ल आहे. आपण त्याला ओळखतो पिण्याचा सोडा म्हणून.

कॅल्शियम कार्बोनेट आता बांधकामात वापरत नाहीत. आपण नेहमीच्या जीवनात कॅल्शियम कार्बोनेट बघतो ते मैदानांवर आखलेल्या पांढऱ्या रेघांच्या स्वरूपात, विशेषतः कबड्डी, खोखो आदि खेळांत.

ऑनलाईन बघितले तर अमोनियम कार्बोनेट साधारण चाळीस रुपये किलो या किंमतीला मिळते. अमोनियम बायकार्बोनेट सुमारे पंचवीस रुपये किलो या किंमतीला मिळते. प्रत्यक्ष भाव व्यापाऱ्याकडून जाणून घेतलेला बरा.

अमोनियम कार्बोनेट वा बायकार्बोनेट वापरण्यासाठी आधी त्या पदार्थांचे पाण्यात मिसळून द्रावण करावे. दोन्हीपैकी जे वापरू त्याच्या वजनाच्या नऊपट वजनाचे पाणी द्रावण करण्यासाठी वापरावे.

घरगुती मूर्त्या साधारण एक ते दीड किलोच्या आसपास वजनाच्या असतात. या द्रावणात त्या विरघळण्यासाठी सुमारे चार दिवस लागतात.

मूर्ती संपूर्ण विरघळल्यावर ते द्रावण गाळून घ्यावे. फडक्यावर कॅल्शियम कार्बोनेट राहील आणि अमोनियम सल्फेट (वा अमोनियम सल्फेट + कार्बॉनिक ऍसिड)चे द्रावण मिळेल. एका छोट्या कुंडीसाठी (व्यास आणि उंची सुमारे एक फूट) एका दिवसाला शंभर मिली या प्रमाणात हे द्रावण खत म्हणून घरगुती झाडांना वापरावे.

अमोनियम कार्बोनेट वापरल्यास एक किलो प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून सुमारे पाऊण किलो कॅल्शियम कार्बोनेट मिळते. अमोनियम बायकार्बोनेट वापरल्यास सुमारे एक किलो. कॅल्शियम कार्बोनेटचा काही थेट उपयोग नाही. जमिनीवरची बाग असेल तर झाडांची आळी सुशोभित करण्यासाठी वापरता येऊ शकेल इतकेच. अन्यथा टाकून द्यावे लागेल.

याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास saadhan@disroot.org इथे संपर्क साधावा.