नुकतंच ट्रिशिआ स्ट्रिंगर ह्या ऑस्ट्रेलियन लेखिकेनं लिहिलेलं "हेड फॉर द हिल्स" हे पुस्तक वाचलं. सध्या महाराष्ट्रात टोरेन्ट कंपनी बांधत असलेल्या भीमाशंकराच्या खोऱ्यातल्या जलविद्युत प्रकल्पाची आणि त्यामुळे होणाऱ्या झाडांच्या कत्तलीची चर्चा आहे. योगायोग असा की हाच विषय एका वेगळ्याच विश्वात, एका वेगळ्याच पद्धतीनं ट्रिशिआ तिच्या "हेड फॉर द हिल्स" ह्या पुस्तकातून मांडते. धरण आणि जंगलं ह्याचा दुरान्वयेही उल्लेख नसूनही टोरेन्ट वादाची आठवण करून देणारी ही एका वेगळ्याच देशात घडणारी गोष्ट आहे.
ही गोष्ट घडते ऍडलेड शहराजवळील ऍडलेड हिल्स भागातल्या जेसरटन नावाच्या एका काल्पनिक गावामध्ये. ऍडलेड हिल्स हा अतिशय नयनरम्य परिसार आहे. उंचच उंच झाडं, वळणा वळणाचे रस्ते, आणि त्यात वसलेली छोटी छोटी गावं. त्यातलंच जेसरटन हे एक काल्पनिक गाव.
ह्या गावात दोन बहिणी राहतात. मोठी रोसलिन आणि छोटी मार्गो. ह्या दोघी जेसरटनमध्येच लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांच्या पूर्वजांनीच हे गाव अनेक वर्षांपूर्वी वसवलं त्यामुळे त्या गावाशी आणि त्या भागाशी त्यांचे पिढ्यानपिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. त्यांचं सगळं कुटुंबदेखील ह्याच गावात किंवा आसपासच्या गावात वसलेलं आहे. हे सगळं कुटुंब दर आठवड्याला एकदा रात्रीच्या जेवणासाठी भेटतं. बऱ्याचदा ते मार्गोच्याच घरी भेटतात, पण कधी कधी रोसलिन किंवा इतर कुणाच्या घरीही भेटतात.
ह्या गुरुवार रात्रीच्या गेट टु गेदर्समधून लेखिका ह्या गोष्टीतील वेगवेगळ्या पात्रांशी आपली ओळख करून देते.
मार्गो आणि तिचा नवरा डेनिस हे आता ज्याला आम्ही एम्प्टी नेस्टर्स म्हणतो तसे आहेत. त्यांची दोन्ही मुलं, निक आणि एमीली हे स्वतःच्या कुटुंबाबरोबर राहतात. निक आणि त्याची बायको केला ह्यांना दोन मुलं आहेत आणि एमिली आणि कॅमेरून ह्यांनाही. त्याचबरोबर जेराल्डीन नावाची त्यांची दूरची नातेवाईकही ह्या गेटटुगेदर्सना असते.
रोसलिन मात्र एकटीच राहते. तिचा मुलगा जेरेमी आणि त्याचं कुटुंब जपानमध्ये राहातात. रोसलिनचा नवरा रिचर्ड हा काही महिन्यांपूर्वीच वारलेला आहे.
मार्गो गावात एक जनरल स्टोअर कम कॅफे तिची मैत्रीण कॅथ हिच्यासह चालवते. डेनिसची कार डीलरशीप जवळच्याच गावात आहे. मार्गो आणि डेनिस हे एक खाऊन पिऊन सुखी असलेलं जोडपं आहे. रोसलिन उच्चशिक्षित आहे. तिनं अनेक वर्ष ऍनेस्थेटीस्ट म्हणून काम केलेलं आहे. पण आता ती निवृत्त झालेली आहे. मुलगा आणि नातवंडं सोबत नसल्याने, नवरा गेल्याने आणि नोकरी सोडलेली असल्याने तिला एक प्रकारचं रिकामपण आलेलं आहे.
लेखिका खूप सुंदर पद्धतीने ह्या सगळ्या पटाची मांडणी करते.
मार्गो आणि रोसलिन ह्यांची घरं बाजूबाजूलाच आहेत. त्या दोघींच्या वडिलांनीच जमिनीची तशी वाटणी करून दिलेली असते. त्या दोघींच्या घराला लागूनंच गुंटर नावाच्या त्यांच्या शेजाऱ्याची मोठी जमीन आहे. ह्या जमीनीवर गुंटरचं घर तर आहेच पण त्यानं वर्षानुवर्षाच्या कष्टानं फुलवलेले द्राक्षाचे मळे आहेत. ह्या मळ्यातील द्राक्षे ऍडलेड हिल परिसरातील वायनरीज घेतात आणि त्यांची सुंदर वाइन बनवली जाते.
एक दिवस अचानक हा गुंटर मरतो.
इथेच गोष्टीला खरी सुरुवात होते. मार्गोला अनेक दिवसांपासून गुंटरची प्रॉपर्टी विकत घ्यायची असते. तशी डेनिस आणि मार्गोची गुंटरशी बोलणीही झालेली असतात. पण ऐन वेळी काही कारणानं गुंटर त्याची प्रॉपर्टी विकायचा निर्णय बदलतो. आता गुंटरच्या मृत्यूनंतर त्याची मुलं ही प्रॉपर्टी विकणार हे नक्की असतं आणि ती आपल्याला मिळावी अशी मार्गोची मनापासून इच्छा असते. तिथं तिला तिची मुलगी एमिली आणि तिचा नवरा व मुलं ह्यांनी रहावं असं वाटत असतं.
गुंटरचं मृत्यूपत्र वाचलं जातं. त्यात गुंटरने एक वेगळीच कल्पना मांडलेली असते. गुंटरला त्याची प्रॉपर्टी विकून त्यातील काही हिस्सा त्याच्या मुलांना द्यायचा असतो. पण उरलेला हिस्सा हा एखाद्या चांगल्या कामाकरता दान केला जावा अशी त्याची इच्छा असते. आणि उरलेल्या हिश्श्याचं काय करायचं ह्याचा निर्णय तो रोसलिनवर सोडतो. हे सर्व काम करण्यासाठी म्हणून तो उरलेल्या वाटणीतला दहा टक्के हिस्सा रोसलिनच्या नावावर करतो.
इथेच रोसलिन आणि मार्गो ह्यांच्या नात्यात तेढ निर्माण व्हायला सुरुवात होते. गुंटरची प्रॉपर्टी मार्गोला मिळत नाही व ती एका मोठ्या कंपनीला विकली जाते. ती कंपनी त्या जागेवर एक नवीन हॉटेल बांधायचं ठरवते आणि मार्गोचं डोकं फिरतं. एकतर तिला हवी असलेली जागा तिला मिळालेली नसते आणि त्या जागेवर म्हणजे तिच्या घराच्या अगदी शेजारी एक हॉटेल बनणार असतं. तिच्या संथगतीनं चालेलेल्या आयुष्यात असं एक वादळ येतं. ह्या सगळ्यापाठी रोसलीन असावी असा ग्रह मार्गो करून घेते. खरतर प्रॉपर्टी विकायच्या निर्णयात रोसलिनचा कोणताही सहभाग नसतो.
एकातून एक गैरसमज वाढू लागतात. रोसलीन मार्गोचा मुलगा निक ह्याला त्याच्या इलेक्ट्रिकल बिअझनेससाठी व्हॅन घ्यायला मदत करते. रोसलीन आपल्या मुलांना आपल्यापासून तोडते की काय अशी भीती मार्गोला वाटायला लागते. जेराल्डीन आजारी असल्याने आणि रोसलीनला वैद्यकीय अनुभव असल्याने त्यांची जवळीक वाढते, त्यातून मार्गोचा न्यूनगंड अधिकच वाढायला लागतो. तेवढ्यात रोसलीन ऍम्बर नावाच्या एका वीस वर्षाच्या, नवऱ्याने टाकलेल्या गरोदर मुलीला आसरा देते. मार्गोला रोसलीनचं हे वागणंही पटत नाही.
दरम्यानच्या काळात येऊ घातलेल्या हॉटेलमुळे जेसरटनच्या शांततेलाच धक्का पोचतो. गावातल्या काही लोकांना हे हॉटेल हवं असतं, कारण त्यामुळे नोकऱ्या मिळतील, त्यांचा धंदा वाढेल असं त्यांना वाटत असतं, तर कही लोकांना ह्या हॉटलमुळे जेसरटनची शांतता, निसर्ग धोक्यात येईल असं वाटत असतं. मार्गो हॉटेल नको असलेल्या लोकांचं नेतृत्व स्वीकारते. एकमेकांसमोर गुण्या गोविंद्याने राहणाऱ्या रहिवाश्यांमध्ये तेढ निर्माण व्हायला लागते. गावातलं वातावरण बिघडायला लागतं. त्यात मार्गो आणि तिच्या स्टोअर मधली भागिदार आणि जीवाभावाची मैत्रीण कॅथ ह्यांच्यात वादावादी होते. कॅथला गावात हॉटेल व्हावं असं वाटत असतं आणि मार्गोला ते अजिबात नको असतं. तिला त्यांचं स्टोअर छोटसंच रहावं, त्याचा घरगुती बाज जाऊ नये असं वाटत असतं तर कॅथला स्टोअर आणि कॅफे मोठी करायची असतात.
दरम्यानच्या काळात रोसलीन गुंटरच्या इच्छेप्रमाणे हॉटेलसाठी विकलेल्या जमिनीतून आलेल्या पैशाचं काय करायचं ह्यावर काम करायला लागते. त्यासाठी तिला गुंटरची मुलं, त्याच्या मृत्यूपत्रावर काम करणारा वकील, नव्या होऊ घातलेल्या हॉटेलचे प्रतिनिधी ह्या सर्वांशी भेटायला लागतं. हे लक्षात आल्यावर मार्गोचा पारा अधिकच चढतो. आपली बहीणंच आपल्याविरुद्ध कारस्थानं करीत असल्याचा तिचा ग्रह होतो.
इतक्यात गावाची महापौर राजीनामा देते. मार्गो महापौराच्या निवडणुकीला उभी राहण्याचा निर्णय घेते. पण तिला राहून राहून असं वाटत राहतं की तिच्या कुटूंबातील कोणीच तिला पाठींबा देत नाही. हळू हळू ती एकटी पडत जाते. गुंटरची प्रॉपर्टी तिला आणि डेनिसला का मिळाली नाही ह्याचं खरं कारणंही तिला समजतं. डेनिसला ऑडीची नवी शोरूम उघडायची असते, त्यासाठी बरेच पैसे लागणार असतात, त्यामुळे त्यानं गुंटरच्या प्रॉपर्टीसाठी ऑफरच दिलेली नसते आणि मार्गोला खोटंच सांगितलेलं असतं की त्याने ऑफर दिली होती पण त्यांना प्रॉपर्टी मिळाली नाही.
इतक्यात निवडणुक आणि नवीन हॉटेल ह्यासंदर्भात मार्गोनं बोलावलेल्या एका सभेला हिंसक वळण लागतं. सख्खे शेजारी हाणामारीवर येतात. हे सगळं मार्गोला सहन होत नाही. हॉटेलमुळे गावाची शांतता हरवण्याऐवजी हॉटेल उभारण्याचा कल्पनेनेच ती भंगलेली असते. ती स्वतः एकटी पडलेली असते. तिचं कुटुंब, मैत्रीण, नवरा आणि आता गावतले तिचे शेजारी, सहकारीही तिच्या विरुद्ध गेलेले असतात.
अशा विचित्र, वाईट, अवस्थेत ती असताना रोसलीन व मार्गोची मैत्रीण कॅथ तिला मदतीचा हात देतात. एखाद्या विषयावर आपली मतं वेगळी असली तरी आपली नाती, मैत्री ही त्या उपर असावीत ह्याची जाणीव मार्गोला होते. हळू हळू तिचे गैरसमज दूर होतात. तिचं कुटूंबही तिच्या जवळंच असल्याचं तिला जाणवतं. ती डेनिसलाही माफ करते.
गुंटरच्या पैशाचा वापर ऍम्बरसारख्या निवारा नसलेल्या लोकांसाठी करण्याचा निर्णय रोसलीन घेते. तिला गुंटरकडून मिळालेली रक्कमही ती ह्याच कामी वापरायचं ठरवते. शेवटी मार्गोदेखील झालं गेलं विसरून रोसलीनच्या ह्या कार्यात सहभागी होते.
सरतेशेवटी निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागतो, त्यादिवशी हे सगळं कुटूंब पुन्हा एकदा रात्रीच्या जेवणासाठी एकत्र जमतं. मार्गो निवडणूक हरते पण तिचं कुटूंब तिला परत मिळतं. हॉटेलचं काय होतं? ते लेखिका आपल्याला शेवटपर्यंत सांगत नाही.
विकास हा एका दृष्टीने योग्य असला तरी त्या विकासाचा निसर्गावर, तेथे राहणाऱ्या माणसांवर परिणाम होतंच असतो. त्यामुळे ह्यात योग्य अयोग्यतेची बाजू घेणं कठीण आहे आणि लेखिकेला ते करायचं नसावं. पण ह्यामुळे एका शांत, झोपाळू, निसर्गरम्य गावातलं वातावरण कसं ढवळून निघू शकतं हे लेखिकेनं उत्तम प्रकारे दाखवलेलं आहे. मित्रा मित्रांमध्ये, नवरा बायकोमध्ये, बहिणी बहिणींमध्ये तेढ कशी निर्माण होते हे आपल्याला दिसतं. अर्थात सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत हे काही आपल्याला नवीन नाही, त्यामुळे वाचकांना आरसाच दिसतो असं म्हणायलाही हरकत नाही.
सध्याची परिस्थिती, सोशल मिडीआ, व्हॉट्सऍप ह्याचा बेलगाम वापर, त्यामुळे पसरणाऱ्या अफवा आणि एकंदरीच माणसावर, त्याच्या नात्यांवर ह्या सगळ्याचा होणारा अनिष्ट परिणामही लेखिकेनं प्रभावीपणे मांडला आहे. पण सरतेशेवटी काहीही झालं तरी ही नातीगोतीच आपल्याला तारून नेतात हेच खरं.
ऍडलेड हिल्सचा रम्य परिसर, जवळ येत चाललेला ख्रिस्तमस. त्या पार्श्वभूमीवर गावातला आणि मार्गोच्या विश्वात वाढत चालेला तणाव, रोसलीन व तिनं घरी ठेवलेली मुलगी ऍम्बर ह्यांच्यातील घट्ट होत जाणारं नातं. गावतली सर्व लोकं, मार्गोचं कुटूंब हे सगळं लेखिकेने आपल्या सक्षम लेखणीनं चित्रवत उभं केलेलं आहे.
थोडंसं मोठं , पण आजच्या परिस्थितीवर एका रंगतदार गोष्टीच्या माध्यमातून भाष्य करणारं असं हे एक वाचनीय पुस्तक. "हेड फॉर द हिल्स' बाय ट्रिशिआ स्ट्रिन्गर.