राम राम पाव्हणं. काय म्हनता? आज इथं कुनीकडं वाट चुकलात जनू? आता आलात तसे बसा थोडायेळ. अहो, हिरीत कशाला डोकावून बघताय? पानी असतं होय हल्ली तिथं? उडी मारलीत तर डोस्कं फुटंल उगा. गुडघापन डुबनार न्हाई तुमचा. इस्वास नाही माज्यावर? हे बगा. डोकीला जखम दिसत्येय न वं? कालच उडी मारली हुती हिरीत. खूप लागलंय बगा. अहो राव, पुन्हा हिरीत बगाया लागला तुमी? किती वार सांगू पानी न्हाई इथं.
हां, पन एक येळ व्हती जेव्हा ही हिर पान्यानं तुडुंब भरायची. माझा बाप मोट मारायचा आणि मी, पानी चारायचो ऊसाला. दुपारच्याला सगळे लोक इस्वाटयाला पडले की मी हळूच हिरीत उतरायचा. पवायला. ह्या हिरीनंच आपल्याला पवायला शिकिवलं. बाहेर रनरनतं ऊन असलं तरी आत गारेगार वाटायचं. इथंच अख्खा दिवस पडून राहावंसं वाटायचं. पन पुन्हा ऊनं उतरली की परत पान्याला लागायचं. बाप पुन्हा मोटंला भिडायचा, मी माझ्या हीरीचं थंडगार पानी ऊसाला चारायचा.
मंग? काय सोपं हुतं का राव? जरा हाताबुडी आलो, तसा मोट माराया शिकिवली बापानं. पयल्यांदा लै मजा यायची. वाटायचं, आता आपण बापया मानूस झालो. मोट माराया लागलो. हळुहळू त्याचाही कट्टाळा यायला लागला. पन बामनाला पोट अन मळेकऱ्याला मोट कधी चुकली व्हय? न्हाई न वं? मग मोट मारता मारताच मी माझ्या हीरीवर पंप बसवून घ्यायची सपान बघायचो. घरात बिजली, हीरीवर बिजली, आताच्या डबल टेपल रान. बराचसा ऊस, थोडी पालेभाजी, कधी रानं फिरवायला टमाटं. एकदम पाटलाच्या रानावानी सगळं फुलल्यालं दिसायचं. बैलं हिसडा द्याया लागली की माजी तार मोडायची.
मंग एक दिवस ह्या हीरीसमोरच्या खोपीत बसल्यालं असताना माय म्हनाली, लगीन ठरावलंय माजं. काय सांगू पाव्हणं? गुदगुल्याच झाल्या जनू. शेताच्या बांधाव पाय सोडून बसल्यावर पायाशी एकदम मांजराचं पिलू बिलगावं तशा गुदगुल्या. गावंदरीजवळचं रान करनाऱ्या महादू जाधवाची लेक, चंद्राक्का. काय लाजाया झालं मला? तसाच उठून हिरीकडे आलो. आपल्याला कुठलं जीवलग दोस्तं? ही हिर आणि दोन बैलं हीच आमची दोस्तं. त्यांनाच पहिली सांगिटली ही बातमी. मी न्हवरा अन चंद्री नव्हरी. पुढं चंद्राशी भांडाण झालं की हिरीलाच सांगायचो की मी. मग माझी चूक असंल, तर दुपारची भाकरी चंद्री कुनाबरोबर तरी लावून द्यायची रानाकडं. तिची चूक असंल तर मात्र सवता याची रानाकडं बुट्टी घेऊन. ती रांड, शाळंत शिकलेली. विंग्रजीत सोरी म्हनायची. मग मिरचीच्या ठ्येच्याबरोबर भाकरी ग्वाड ध्वाड लागायची. वर मी माझ्या हिरीचं पानी गटागटा प्यायचा.
अशीच एकदा नांगरणीची धावपळ चालल्याली. आभाळ उतराया झालं होतं. बरंच काम अडून राहिलेलं. दुपारच्याला खोपीत मी भाकरी खाऊन इस्वाट्याला पडलेला. पान्याला म्हणून हीरीकडं आलो. माय तेव्हा शेवंतीकडं गेली होती शेवगावाला. शेवंती म्हणजे थोरली बहीन माझी. तर चंद्री हीरीपाशी आली न म्हनाली मायला बलवून घ्या, अन येताना चिच्चा, बोरं घेऊन या. मी धाडलं बलवणं. हे चिच्चा, बोरं काय मला समजेनात. मग एकदम डोक्यात बिजली चमकली. कालपर्यंत पोरया असलेला मी आता बाप व्हणार होतो.
मोट मारता मारता परत इचार सुरू व्हायचे. मुलगा झाला तर बरं हुईल. त्याला मी शाळंत घालंन आमच्या चंद्रीवानी. मग तो हाताबुडी येईल. शिकून सायब हुईल. हां, पण तो रान करायचा सोडणार नाही. शेतीपन करेल. हिरीवर पंप बसवेल. मंग मला मोट नाही माराया लागनार. मग पंप पानी खेचंल, मी शेताला पानी पाजंन आणि तो गावाची सगळी कामं बघंल. नांगरणी, पेरणीला आम्ही दोघं झटक्यात रान उरकून टाकू. सोबतीनं कुळव हानू, बैलांना पाला कापू, शेणं भरू. जीवाला थोडा इस्वाटा पडेल. पण कसचं काय राव? झाली पहिली बेटीच. पण फुलासारखी नाजूक, मोगरीच्या फुलासारखी. आणि मधावानी ग्वाड लेक. पण हिच्या आईला काय धाड भरली जनू. रांडंनं दगडू नाव ठिवलं पोरीचं. नजर लागाया नगं म्हनून.
मग एकापाठोपाठ एक पाच प्वरं झाली. चार लेकी आणि योक ल्योक. घरचं रान कमी पडाया लागलं मंग शेजारचं रान फाळ्यावर घेतलं. तरीपण पैसं कमी पडाया लागलं. वाटलं पोरांची शाळा काही हुईत नाही. पण हिमतीनं पोरींना चवथी केलं. मंग काय करायची त्यांना शाळा. दुसऱ्याचं धन ते. पोराला मात्र फूडच्या शाळंत घातलं. येगळं मास्तर लावलं शिकवनीला. पोरगा शिकिवला पायजे. मग तो हीरीवर पंप आनंल. माझं कंबरडं तर पार मोडून गेलं की हो जलमभर मोट मारून मारून.
हळूहळू साठवनीचं पैसं संपाया लागलं. घरच्या रानातबी काही राम राहिला नाही. त्येच्या आईला त्येच्या, पूर्वीसारखं पीक देईना झालं. शेजारच्या रानाच्या मालकाने रानाचा फाळाबी वाढावला. त्या रानाच्या पिकात वरीसाचा फाळाबी निघेना झाला. मंग करावं तरी काय? बरं पावासाचं पन ठिकान राहिलं नाही. खतं, चांगलं बी बियानं आणाया पैसं नाहीत. आलेलं पीक शेरातला दलाल म्हणंल त्या भावाला इकायचं. शेवटी हातात काही उरायचंच नाही.
फार घोर लागून राहिला बघा जीवाला. घर ढांकंला लागलं जणू. अन हा घोर सांगनार तरी कुनाला? हल्ली मी माझं घोर या हिरीला सांगायचं बी बंद केलाय. ती बिचारी काय करनार? तेव्हा शेजारच्या रानातला शिरपा तिथं आला हुता. म्हनला मायबाप सरकार कर्ज देनार आहे मळेकऱ्यांना. निविडणुका आल्या हुत्या ना तेव्हा. ईजबी फुकाट मिळनार म्हणून सांगत व्हता. पाटलाला म्हनं तेव्हा फुकाट रकमेचं बिल मायबाप सरकारनं पाठिवलं होतं. कितीबी ईज वापरा पैसं द्याया लागनार न्हाई. त्येच्या आयला त्येच्या ह्या शिरप्याच्या बेनं नको त्या वाटंनं घिवून गेलं मला. आणि सुक्कळीचं हे मायबाप सरकार, निविडणुका सरल्याव फुकाट इजबी बंद करून टाकली.
मग शिरप्यासंगं मी ब्यांकेत गेलो. कर्ज मिळिवलं. एक सपान पुरं झालं. मी पंप घातला हिरीवर. इजेची लाईनबी घीतली. फुकाट इज म्हणून खोपीत, हीरीवर पन झगमाग दिवं लावलं. बरं दिवस आलं. जीवाला थोडा इस्वाटा पडायला लागला. ल्योकबी हाताबुडी आला. त्याची शाळा तर बंद झालीच हुती. त्येच्या आयला त्येच्या, बेणं शाळंत जायला मगायचंच न्हाई. पळून जायचं उकिरडा फुकायला. त्यालाबी रानात घेतला. त्या वरसी पीकपन चांगलं झालं. पंपाचं पानी गटगटा पिऊन ऊस तरारला. वाटलं जीवन रांकेला लागलं.
पुढच्या सालापासनं पावसाने दडीच मारली जनू. त्यात एकामागोमाग चार पोरींची लग्न. खर्चाचा मेळ जुळविता जुळविता कंबर खचली. त्यात मायबाप सरकारनं इज फुकाट द्येनार न्हाई म्हणून सांगिटलं. आता झाली का पंचाईत. इथून तिथून, सावकाराकडून कर्ज काढून बिलं भरली. पण हितं आभाळंच फाटलं तिथं ठिगळंतरी किती मारायची अन कशी?
त्यात मागल्या महिन्यात चंद्री आजारी पडली. दवाखाने झाले. भगत झाले. सगळं झालं. इथं दातावर माराया पैसा उरला नाही, औशिदासाठी पैसं आननार कुठून? मुलगा इथं तिथं रोजावर काम करून पैसं मिळवित होता. गांड खंजाळायला बी कुनाला सवड हुईत न्हवती, तिथं हिच्याकडं बघायचं तरी कोनी? पिकाचा सगळा पैसा तर कर्जाचे हप्ते देन्यात जात व्हता. आणि ल्योकाची बेगारी हिच्या औशिदात.
शेवटी गेल्या हफ्त्यात रान इकायचं ठरिवलं. निदान चंद्रीला शेरात चांगल्या डागदर ला दाखिवता येईल. परवाच रानाचं पैसं मिळालं. पोराला अन चंद्रीला शेराकडे लावून दिलं. त्याना म्हटलं तुम्ही हे पैसे घेवा आन तिथेच ऱ्हावा. मी मागचं सगळं आवरून यतो.
अहो पाटील मघाधरनं एवढं बोलून राहिलोय तुम्ही लक्षच देईना झालाय? सकाळधरनं पाहतोय जे बेणं येतंय ते सुक्कळीचं पहिलं हिरीत बघतंय चुक चुक करतंय अन वाटेला लागतंय. मी एवढं बोलतंय तर बोला की वाईस.................
अन हे कोणाचं मढं निघालं? अरे, ही चंद्री का रडून राहिल्येय तिथं. रांड मी मेल्याव रडावं तशी रडतिय.....................