'हिंसक' तेंडुलकर आता सेल्युलॉइडवर

महाराष्ट्र टाईम्स मध्ये तेंडुलकरांच्या वर प्रसिद्ध होणाऱ्या सीडी विषयी वाचायला मिळाले. मागेही तेंडुलकरांच्या अमेरिकेत होणाऱ्या नाटकांच्या महोत्सवाची आपण येथे चर्चा केली होती आताही आपल्याला ह्यावर चर्चा करता यावी ह्या उद्देशाने ही बातमी येथे उतरवली आहे.


मूळ बातमी : 'हिंसक' तेंडुलकर आता सेल्युलॉइडवर
मंगळवार दि ३० ऑगस्ट २००५


म. टा. प्रतिनिधी


/photo.cms?msid=1214946पुणे : हिंसा ही एका अर्थाने माणसाची आदिम प्रेरणा असून स्वत:चे अस्तित्त्व टिकवण्यासाठी तो त्याचा वापर करतो. पण सामाजिक आणि राजकीय पातळीवर शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच लैंगिक रूपाने जेव्हा ही हिंसा प्रकट होते, तेव्हा ती कदापि समर्थनीय ठरत नाही, असा संदेश आपल्या नाटकांमधून देऊ पाहणारे नाटककार विजय तेंडुलकर यांच्या नाटकांमधील हिंसाचाराची अनेक रूपे सेल्युलॉइडवर पकडण्याचा प्रयत्न प्रसिद्ध तरुण कलावंत अतुल पेठे याने केला आहे.


'तेडुलकर आणि हिंसा (काल आणि आज)' या नावाने पेठे यांनी तयार केलेला हा माहितीपट ऑक्टोबर महिन्यातील 'तेंडुलकर महोत्सवा'त प्रदर्शित होणार आहे. केवळ मराठीपुरताच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेला मोठा नाटककार म्हणून तेंडुलकरांचे पुनर्मूल्यांकन करणारा हा माहितीपट आहे, असे पेठे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले. पद्मविभूषण मिळालेल्या या महान नाटककाराबद्दल आपल्याकडे कोणतेही दृकश्राव्य डॉक्युमेंट नाही, म्हणूनच हा खटाटोप आहे. डीव्हीडीच्या रूपाने ती लवकरच प्रकाशित होईल.


'कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन'(कला) तर्फे निर्माण होणाऱ्या या माहितीपटाचे दिग्दर्शन पेठे करत असून आघाडीचे नाटककार मकरंद साठे यांनी त्याचे लेखन केले आहे तसेच तेंडुलकरांची मुलाखतही घेतली आहे. 'कला'चे मकरंद मराठे आणि अभय पाटील यांनी या प्रकल्पासाठी विशेष परिश्रम घेतले असून या माहितीपटाच्या इंग्रजी सबटायटल्सची संहिता प्रसिद्ध भाषातज्ज्ञ शांता गोखले यांनी लिहिली आहे.


तेंडुलकरांच्या नाटकातील हिंसा, लैंगिकता, पारंपरिक मध्यमवर्गाला छेद देणारी रोखठोक भाषा यासंदर्भात त्यांच्या 'घाशीराम कोतवाल', 'सखाराम बाईंडर', 'गिधाडे', 'कमला', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'बेबी' आणि 'कन्यादान' या नाटकांचा या माहितीपटातून विस्तृतपणे विचार केला आहे.


याबाबत स्वत: विजय तेंडुलकरांसह राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि विचारवंत राम बापट, राजकीय नाटककार गो. पु. देशपांडे, प्रसिद्ध दिग्दर्शिका विजया मेहता, सत्यदेव दुबे, डॉ. जब्बार पटेल, आणि निळू फुले यांची मनोगते आणि चर्चाही या माहितीपटात समाविष्ट करण्यात येत आहे.


शिवाय या माहितीपटात एनसीपीएच्या मदतीने तेंडुलकरांच्या नाटकातील व्हिडिओ क्लिपिंगही वापरण्यात येत आहेत.