"हॅलो"
"हॅलो जीएस, वेदश्री बोलतेय."
"हं बोल गं.. काय म्हणतेस?"
"उद्याच्या सरसगड ट्रेकला यायचं म्हटले तर परवानगी मिळेल का मला? नाही... इतक्या ऐनवेळेस विचारते आहे म्हणून म्हटलं.."
"परवानगीचं काय घेऊन बसलीस.. ये की.. किती जणं आहात तुम्ही?"
"मी तरी एकटीच येत आहे. कसं यायचं सांगाल का?"
"पावणेसातला खोपोली बस स्टँडला पोहोच. बस्स.. "
"ओके ठीक आहे."
इतक्या ऐनवेळेस माझ्या इतर प्रवासप्रेमी दोस्तांना जर मी यायचं वगैरे म्हणून येण्याची परवानगी मागितली असती तर त्यांनी खूप भाव खाल्ला असता. नाकदुऱ्या काढणे काय प्रकार असतो ते मी शिकलेली असताना त्याचा वापर न करताच मला ट्रेकसाठी जाण्याची परवानगी जीएसनी दिली म्हटल्यावर मी खूप खुश झाले. मग सकाळी न्यायचं बोचकं भरून आणि सकाळी योग्य वाहनात बसवून द्यायची जबाबदारी सिकुर्टीवाल्या लक्ष्मणकाकांना सोपवून गजर लावून झोपले.
"... आणि वेदश्रीनी सरसगड फत्ते केला !" असा काहीसा गोंगाट ऐकू येत असताना काहीतरी हळूऽऽऽऽ आवाजात सायरन वाजत असल्यासारखं वाटत होतं. अनिच्छेनी मी डोळे उघडून त्या आवाजाच्या दिशेनी पाहिलं तर मोबाईलमधला गजर वाजत होता आणि सांगत होता की 'ऊठ बये.. सकाळ झाली !' स्वतःवर हसून सरसगड फत्ते केल्याचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आवरासावर करायला मी झटकन तयार झाले.
पावणेसहाला लक्ष्मणकाकांना गाठलं आणि त्यांनी शॉर्टकटने ( तिथूनच ट्रेकींगला सुरुवात झाली माझ्या ! ) मला खोपोलीकडे जाणारी बस मिळेल अशा रस्त्यावर नेऊन उभं केलं ! मिट्ट काळोख आणि रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा नाही, काका स्वतःहूनच थांबले तिथे माझ्यासोबत. गप्पांना सुरूवात झाली. तेवढ्यात जीएसचा एसेमेस आला '७.३०' ! इतक्का मोठ्ठा एसेमेस माझ्या मोबाईलवर येऊ शकतो मला माहितीच नव्हतं ! थोड्यावेळात बस आली आणि काकांना धन्यवाद देऊन मी बसमध्ये चढले. खिडकीजवळची जागा मिळाल्याने झोपेतून उठणाऱ्या निसर्गाला बघण्याचा आनंद लुटायला मिळाला. सगळीकडे एक अंधुक अंधार दाटला होता.. अंधार आणि प्रकाश यांची एकमेकांचा हात सोडायची वेळ आल्यासारखी वाटत होती.. पण त्यांचं ते एकत्र अस्तित्व बघायला, त्यांच्या साक्षीने दिसणारे ते धुक्याची दुलई ओढून झोपलेले डोंगर, माझ्या अस्तित्वाला मोहकपणे स्पर्शून जाणारे ते थंडगार वारे, धुक्याचे ढग, पाण्याचे ओहोळ सगळं सगळंच अत्तिशय वेडवणारं होतं. रोजच्या आयुष्यापासून दूर जात एका वेगळ्याच जगात प्रवेश करणार आहे याची नांदी बसमध्येच अनुभवायला मिळाली. काहीकाही ठिकाणी तर अगदी ढगातूनच जातेय असं वाटत होतं.. खूपच मजा येत होती. बस प्रवास करत करत खोपोलीला कधी जाऊन पोहोचली कळलंच नाही..
बसस्थानकावर पावणेसातलाच पोहोचले होते मी आधी ठरल्याप्रमाणे पण आता साडेसातपर्यंत वाट पहावी लागणार.. या वेळात काय करायचं? हा यक्षप्रश्न पडला. तिथल्याच दुकानात जाऊन काहीबाही विकत घेऊन झालं, इकडेतिकडे टंगळमंगळ करून झाली.. पण घड्याळाचा काटा खूपच आळसटल्यासारखं करत पटापट पुढे सरकायचं नावच घेत नव्हता. या ट्रेकमध्ये जीएस व्यतिरिक्त अजून कोणकोण येणार माहित नव्हतं मला, त्यातलं कोण कोण खोपोलीला येणार आहे की सगळेच पुण्याहून येणार आहेत काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे बसस्थानकावर मी स्पोर्टशूज, विंडचिटर, ट्रेकींगसाठी सोयीस्कर अशी बॅग असा वेष धारण केलेलं कोणी दिसतं का हे शोधायला सुरुवात केली आणि मला तशा तीन संशयास्पद व्यक्ती स्थानकावर इकडेतिकडे हिंडताना दिसल्या. माझ्या स्वभावानुसार मी मग त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष द्यायला लागले. आपापसांत बोलत, या दुकानात जा त्या दुकानात जा असं करतकरत ते लोकं स्थानकाबाहेर निघून गेले ! :(( काय करावं सुचेना.. जीएसना फोन लावला.. कुठे आहात चौकशी करता.. 'बोगद्यात' असं उत्तर मिळालं ! 'थोड्याच वेळात पोहोचतो आहोत' असं ऐकल्यावर हुश्श झाले. 'साधना तिथेच येणार होती. शोध तिला तोवर. आणि विजय आला का?' या त्यांच्या प्रश्नांनी माझा शोध अगदीच काही वाया जात नाही आहे, याचाही आनंद झाला. परत त्या संशयास्पद लोकांचा शोध घ्यायला सुरूवात केली. ते लोकं सापडले, त्यांच्याकडे जात मी त्यांच्यातल्या स्त्रीला विचारलं,"आपणच साधना का?"
"होऽ मीच.. "
"जीएसनी सांगितलं तुम्हाला शोधायला मला.."
"आम्हीही त्याचीच वाट बघतो आहोत कधीची.. तू कोण.."
"वेदश्री."
"वेदश्री जोशी ना म्हणजे तू.. बरं ओळख करून देते.. हा पंकज माझा नवरा आणि हा.. हाही पंकज.."
पंकजद्वयांपेक्षा साधना जास्त बोलकी वाटल्याने तिच्याशी गप्पा सुरू झाल्या. पण जीएस येईपर्यंत पंकजद्वयही बोलण्यात काही कमी नाही! असं मनोमन पटून गेलं.
क्रमशः
लेखनविषयात 'दुर्गभ्रमण' मिळाल्यास छान होईल असं वाटतं.