नैऋत्य अमेरिकेची भटकंती - (भाग १) नमनाला घडाभर तेल

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी नऊ दिवस एकटाच नैऋत्य अमेरिकेच्या चार राज्यांत (ऍरिझोना, कोलोरॅडो, यूटाह आणि न्यू मेक्सिको) रेड इंडियन वसाहती आणि काही राष्ट्रीय उद्याने पाहत हिंडलो. अमेरिकेतल्या इतर प्रेक्षणीय स्थळांपेक्षा हा प्रवास निश्चितच वेगळा होता. त्यातले अनुभव मनोगतींनाही सांगावेत म्हणून हा लेखनप्रपंच.


मी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन डिएगो शहरात अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेणारा एक विद्यार्थी. शिक्षण घेताना येथीलच एका कंपनीत उमेदवारीची नोकरी (Internship) मिळाली. वर्षभरानंतर त्याच कंपनीत परंतु वेगळ्या विभागात कायमस्वरूपी नोकरीची संधी चालून आली. येथे विद्यार्थी देशांतर परवान्यावर (व्हिसा) असल्याने पूर्ण-वेळ नोकरी करायची असल्यास काही कायदेशीर सोपस्कार आवश्यक असतात. त्यांना सुमारे तीन महिने वेळ लागतो आणि तोवर काम करता येत नाही. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे तीन महिने मी जवळ-जवळ रिकामटेकडा होतो. हा मोकळा वेळ सदुपयोगी लावावा म्हणून सप्टेंबरचे दहा दिवस अमेरिकेचा पूर्व किनारा भटकून आलो. फिलाडेल्फिया - हर्शे - न्यूयॉर्क - वॉशिंग्टन - बॉस्टन - नायगारा - (आणि अपघाताने तासभर कॅनडाचे कस्टम ठाणे) अशी जिवाची अमेरिका केली.


बॉस्टनवरून परत येताना विमानप्रवासात, सोबत घेतलेले पुस्तक वाचून संपले म्हणून आसनाच्या पाठीमागे ठेवलेली नियतकालिके चाळायला सुरूवात केली. डेल्टा एअरलाईन्सच्या त्या स्काय मॅगझिन नामक मासिकात दक्षिण-पश्चिम अमेरिकेत वास्तव्य करून असणाऱ्या रेड इंडियन जमातीच्या वसाहतींवर एक सुंदर लेख आला होता. त्यासोबतच्या छायाचित्रांनी तर मला अक्षरशः भुरळ पाडली. मुख्यत्वे ऍरिझोना राज्यात लेखकाने ही भटकंती केली होती. मला काय वाटले कुणास ठाऊक, मी लेखकाने दिलेली सगळी माहिती एका चिटोऱ्यावर उतरवून घेतली.


पूर्व किनाऱ्याच्या सहलीनंतर दोनेक आठवडे उलटले न उलटले तोच मला अजून एकदा भटकून यायची खुमखुमी आली. सप्टेंबर महिन्यात लेबर डे ची तीन दिवसांची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे (होय, बाकी सारे जग १ मे हा दिवस 'जागतिक कामगार दिन' म्हणून साजरा करताना सॅमकाका मात्र सप्टेंबर मधे लेबर डे पाळतात.) माझ्यासोबत पूर्व किनाऱ्यावर प्रत्येक शहरात कुणी ना कुणी मित्र होता, परंतु आताची ही भटकंती माझी मला एकट्यानेच करायची होती.


एकट्याने सहज पाहून होतील आणि यूथ होस्टेल्स असल्याने रहायचा खर्च फार होणार नाही, या बेताने मी सिऍटल आणि त्याच्या आसपासची प्रेक्षणीय स्थळे म्हणजे पोर्ट टाऊनसेंड आणि माऊंट रेनिअर असा साधारण चार-पाच दिवसांचा बेत आखला. ( विद्यार्थी'दशे'तील प्रवासेच्छुंसाठी यूथ होस्टेल ही एक फार मोठी सोय आहे. न्यूयॉर्कच्या बाहेर म्हणजे न्यू जर्सीतील हॉटेल्सचे दर एका रात्रीला शंभर डॉलर्स कमीत कमी असे असताना न्यूयॉर्कच्या मध्यवर्ती भागातील (सेंट्रल पार्कला लागून) यूथ होस्टेलमधे मी केवळ पंधरा डॉलर्स भाडे भरून राहिलो होतो. )


तर सिऍटल शहरात तीनेक दिवस रहायचे, पोर्ट टाऊनसेंडला Oktoberfest हा मूळचा जर्मन पण अमेरिकेतही साजरा होणारा उत्सव अनुभवायचा आणि माऊंट रेनिअर पादाक्रांत करायचा असा काहीसा बेत होता. त्याप्रमाणे महाजालावर माहिती काढत असताना माऊंट रेनिअरला जाणाऱ्या टूर्स केवळ सप्टेंबर महिन्यापर्यंतच असल्याचे आढळले. मग त्यामुळे सिऍटल सहलीचा बेत बासनात गुंडाळावा लागला. वास्तविक एकीकडे माझे मन सिऍटलच्या सुरक्षित सहलीपेक्षा ऍरिझोनाची काहीशी वेगळ्या वाटेवरची भटकंती करण्याकडे धाव घेत होते, त्याला आयतेच कोलीत मिळाले. झाले, एक प्लॅन गुंडाळून तेवढ्याच उत्साहाने मी दुसऱ्या सहलीच्या तयारीला लागलो.


जेमतेम महिनाभरापूर्वीच पूर्व किनाऱ्याची सहल नीट आखून पार पाडल्यामुळे आत्मविश्वास होताच, त्यात जणू वेगळे जग शोधायला निघालेल्या कोलंबसच्या उत्साहाची भर पडली. परंतु जसजशी माहिती हाती येत गेली, तसतसे नवनवीन प्रश्न माझ्यासमोर उभे राहू लागले.


एक म्हण्जे या भागाबद्दल तुलनेने बरीच कमी माहिती उपलब्ध होती. ग्रँड कॅनियनचा अपवाद वगळता बाकीची लहान लहान शहरे ( चिन्ले, कॉर्टेझ, शिपरॉक वगैरे) माझ्या मित्रांनी सोडाच, पण येथे जन्म घालवलेल्या अमेरिकनांनीही ऐकली नव्हती. अतिशय विरळ लोकवस्ती - तीही मुख्यतः गौरवर्णीय आणि रेड इंडियन, तुरळक रस्ते आणि ओसाड हे विशेषणही सौम्य ठरावे असे मैलोनगणती पसरलेले अवाढव्य वाळवंट असे काहीसे या परिसराचे स्वरूप आहे. भ्रमणध्वनीचे जाळे (Network) सुद्धा येथील बहुतांश भागात अस्तित्वात नाही.


पूर्व किनारा काय किंवा सिऍटल काय - काही अडचण आल्यास ज्यांच्याशी संपर्क साधू शकेन असे परिचित तेथे होते. इकडे मी जेथे जायचा विचार करत होतो तेथे माझा वर्ण आणि परकेपणा अगदी ठसठशीतपणे उठून दिसणार होता.


एकटाच प्रवास करणार असल्याने सुरक्षिततेबरोबरच पैशांचाही प्रश्न होताच. आधीच दोन महिने घरी बसून काढल्याने आणि पूर्व किनाऱ्यावरील दहा दिवसांच्या सहलीमुळे (त्यात ब्रॉडवेवरील दोन नाटकांचा आणि अमेरिकन ओपनच्या तिकिटाचा खर्च आलाच.) आजवर साठवलेल्या बचतीला उतरती कळा लागली होती. त्यात अस्मादिकांनी अद्याप गद्धे-पंचविशी पार न केल्यामुळे या नऊ दिवसांच्या प्रवासासाठी गाडी भाड्याने घेतल्यास दर दिवसाला २५ ते ३० डॉलर्सचा Young driver's fee नावाचा जिझिया कर बसणार होता (मूळ आरक्षणशुल्काव्यतिरिक्त). वर पुन्हा ऍरिझोना राज्याच्या करासोबतच मला 'नावाहो नेशन'चाही कर भरायचा होता. (म्हणजे कर आणि डर अशी दोन्ही संकटे भेडसावत होती.) शिवाय या आडरानांत यूथ होस्टेल्स हा प्रकार नव्हता. एका गावात फार तर दोन हॉटेल्स. त्यामुळे ते जे भाडे आकारतील, ते गपगुमान द्यावे लागणार होते.


शिवाय मी असे कुठले कठोर परिश्रम केलेत की जेमतेम महिनाभराच्या अंतरात दोन मोठ्या सहलींना जाऊन श्रमपरिहार करावा? - ही नैतिक बोचणी होतीच. त्यामुळे एकीकडे सहलीची आखणी सुरू असताना 'अचपळ' मनाची समजूत घालण्याचे कामही सुरू होते. निघायच्या ३६ तास आधीपर्यंत माझी दोलायमान अवस्था होती. महाजालावरून सारी माहिती काढून झाली होती. कुठे जायचे - काय पहायचे - कुठे रहायचे हा सारा आराखडा तयार होता आणि महाजालावर केवळ काही टिचक्या मारून माझे काम होणार होते, पण मी करतोय ते योग्य आहे का याचा सतत विचार सुरू होता.


भटकंती करावी असे जे माझे एक मन सांगत होते त्यात फिरायच्या आणि नवीन ठिकाणे पाहण्याच्या आवडीबरोबरच अजूनही एक कारण होते. शिकत असताना कामे करून जे पैसे मिळायचे त्यातून राहण्या-खाण्याचा खर्च आणि शुल्क वजा जाऊन जे काही उरायचे त्यातून कुठे फिरणे शक्य नव्हते. कारण जे काही उरतील त्यातून भारतफेरीचे तिकीट काढणे आणि अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे शैक्षणिक कर्ज फेडण्याचा प्रयत्न करणे. त्यामुळे तेव्हा वेळ होता पण ऐपत नव्हती.


एकदा उमेदवारीची का होईना पण नोकरी लागल्यावर पैशांची ददात जरी काही प्रमाणात मिटली असली तरी रोजचे ९-१० तास काम आणि त्यापुढे अभ्यास या साऱ्या रहाटगाडग्यात वर्षभर साठवून साठवून दोन-तीन आठवडे मिळालेली रजाही भारतात यायचे म्हणजे अपुरी पडायची. तेव्हा अशी 'चाकरी आणि चाकोरी' सुरू असताना, दहा दिवस अधिकची रजा म्हणजे सर्वथैव अशक्य.


त्यामुळे हाच एक काळ असा होता, की जेव्हा माझ्याकडे वेळही होता आणि खर्च करायला थोडेफार पैसे होते. शिवाय एकटा जीव सदाशिव अशी स्थिती असल्याने मनात येईल तिकडे जाऊ शकणार होतो. अखेरीस हे कारण आणि मार्क ट्वेनचे हे आवडते वाक्य यांची मनाशी खूणगाठ बांधली आणि महाजालावर जाऊन टिचक्या मारायला सुरुवात केली. शुक्रवार सकाळचे सॅन डिएगो - फिनिक्स विमानप्रवासाचे आरक्षण आणि फिनिक्स विमानतळावरून पुढील नऊ दिवसांच्या प्रवासासाठी गाडी आरक्षित करायचे काम (आणि अर्थातच, पुढच्या दिवसांतली सारी आरक्षणे) मी बुधवारी संध्याकाळी केले आणि बॅगा भरायला लागलो.