मोबाईलवेडेपणा! : नवलकरांचे निरीक्षण.

नवलकरांचा नेहमीप्रमाणेच आणखी एक हसत हसत टोपी उडवणारा महाराष्ट्र टाईम्समधला हा लेख वाचून मराठीत आस्वाद घेता यावा ह्यासाठी येथे उतरवून ठेवला आहे.

मूळ लेख : मोबाइल
लेखक : प्रमोद नवलकर
महाराष्ट्र टाईम्स
सोमवार दि. १५ नोव्हे. २००४ सायं. ५:३६:३७

हा मोबाइल नावाचा प्रकार नेमका काय आहे, हे अद्याप मला कळलं नाही. पण थोडक्यात म्हणजे धडधाकट माणसाला अपंग करण्याचे जे शोध गेल्या ५० वर्षांत लागले, त्यापैकी मोबाइल हा एक प्रकार आहे. पूर्वी टेलिफोन वाजला की चारसहा पावलं धावत तो अटेण्ड करण्यासाठी जावं लागे. रिसीव्हर उचलण्यासाठी हात पुढे करावा लागे. पुन्हा तो टेलिफोन योग्य ठिकाणी ठेवावा लागे. आता सर्वजण ते विसरले आहेत. परवा ट्रेनमध्ये माझ्या बाजूला एक तरुण बसला होता. मोबाइल कानाला लावून तो एवढंच म्हणाला, 'उतर, मी घड्याळाखाली उभा आहे.' बहुतेक लेडीज कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या मैत्रिणीला त्याने तो सिग्नल दिला असावा. या मोबाइलने समाजात सर्वत्र हॅवॉक उडवून दिला आहे. मोबाइलने तरुण पिढीला दिलेल्या अमर्याद स्वातंत्र्यामुळे ती पिढीदेखील वाजवीपेक्षा जास्त मोबाइल बनली आहे.

मोबाइल म्हणजे धारकाला खोटं बोलण्याचा परवाना असतो. त्या परवान्यासाठी काही शुल्क भरावं लागत नाही. माझा एक मित्र आहे. कधी आला तर दहादहा मिनिटांनी त्याचा मोबाइल वाजतो. त्या मोबाइलचा आवाज इतका कर्कश आहे की ज्ञानेवरीतल्या अभंग म्हणणार्‍या रेड्याची आठवण येते. फोन वाजला की तो लगेच सांगतो, 'आता बिलकुल वेळ नाही. विमानतळावर आहे. दहा मिनिटांनी मी दिल्लीला निघालो.' नंतर दोन तास तो मोबाइलला दाद देत नाही. नंतर मोबाइल वाजला तर न चुकता सांगतो, 'मी आता प्राइम मिनिस्टरबरोबर मिटिंगला बसलो आहे.' कोणाला टाळायचं असेल तर मोबाइलचा हा असा उपयोग होतो. फोर्टमधून फोन आला की सांगायचं, 'मी बोरिवलीत आहे' आणि बोरिवलीहून फोन आला तर सांगायचं, 'मी मुलुंडमध्ये आहे.' मी मात्र हा प्रयोग कधीच करत नाही कारण सगळ्यांनाच ते जमत नाही.

असं म्हणतात की बड्या लोकांना मोबाइलचा नाना प्रकारे उपयोग होतो पण तेवढाच उपद्रवदेखील होतो. माधवजी नावाचे माझे एक मित्र एका कंपनीचे चेअरमन आहेत. त्यांनी पार्किंग सुलभ होण्यासाठी ड्रायव्हरला मोबाइल घेऊन दिला. ऑफिसजवळ पार्किंगला जागा नसल्याने तो जिथे मिळेल तिथे गाडी पार्क करायचा आणि माधवजींनी बोलावल्यानंतर गाडी ऑफिसच्या पोर्चजवळ आणायचा. थोडे दिवस बरे गेले. पण नंतर त्या ड्रायव्हरचं मोबाइलचं बिल माधवजींच्या मोबाइलपेक्षा जास्त येऊ लागलं. एकदा तर ड्रायव्हराऐवजी हॉटेलमध्ये बसलेल्या त्याच्या मैत्रिणीने फोन उचलला. त्यानंतर माधवजींनी ड्रायव्हरचा आणि स्वतचा मोबाइलदेखील काढून टाकला.

[float=font:vijay;size:20;breadth:200;place:top;]मी मुख्यमंत्री झालो असतो तर मोबाइल वापरण्यावर किमान पंचवीस वर्षांची वयोमर्यादा घातली असती आणि रस्त्यात चालताना मोबाइल वापरण्यास बंदी केली असती.[/float] ज्याला आपण शिष्टाचार किंवा मॅनर्स म्हणतो त्याची मोबाइलने वाट लावून टाकली आहे.

मोबाइलचे जेवढे फायदे तेवढे तोटे असतात. अलिकडे फोन केल्यावर नंबर बदललेला असतो. आपली गैरसोय होते पण मोबाइलधारकाची बिल बुडवण्याची सोय होते. पूर्वी टेलिफोन कंपनीची मक्तेदारी होती. बिलाची थकबाकी राहिली की टेलिफोन कंपनी तत्परतेने टेलिफोन लाइन कापत असे. मोबाइलने ती मक्तेदारी मोडून काढली. केवळ टेलिफोन कंपनीचीच नव्हे तर कोणत्याही मोबाइल कंपनीची मक्तेदारी आता राहिलेली नाही. अर्धा डझन कंपन्या असल्याने त्यांच्यातच स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे बिल बुडवणार्‍या ग्राहकांची चांगलीच सोय झाली आहे. ग्राहकांच्या चातुर्याने मोठमोठ्या मोबाइल कंपन्या हैराण झाल्या आहेत. एक फायदा म्हणजे मोबाइल हरवला तर तो शोधून काढणं सोपं होतं. त्या मोबाइलवर फोन केल्यावर आवाजावरून त्याचा शोध घेता येतो. एकदा असाच माझा मोबाइल हरवल्यावर शोधून शोधून थकलो आणि अखेर तो माझ्याच सदर्‍याच्या खिशात सापडला.

मोबाइलमध्ये असलेल्या सुविधांपैकी मला एकही सुविधा हाताळता येत नाही. त्यात टेलिफोन नंबर कसे नोंदवायचे ते मला माहीत नाही. एसएमएसचे संदेश मला घेता येत नाहीत. क्रिकेटचा स्कोअर पाहता येत नाही. कोणतेही गेम खेळता येत नाहीत आणि फोटोदेखील काढता येत नाहीत. अनेकदा मी चुकून माझाच नंबर फिरवतो. पण माझ्या मते मोबाइलचं व्यसन म्हणजे केवळ एक स्टेटस सिम्बॉल बनलं आहे. टेबलावर दोनदोन फोन असतानादेखील माणसं खुचीर्ला पाठ टेकून मोबाइलवरून बोलतात. चारचौघांत मोठमोठ्याने बोलून शांततेचा भंग करतात. विधानपरिषदेत तर खोकला यावा त्याप्रमाणे अधूनमधून कोणाचा तरी मोबाइल वाजतो.

मोबाइलचा वापर करताना पलिकडची व्यक्ती कोणत्या वातावरणात आहे याचा कोणी विचार करत नाही. कोणत्याही ऑफिसमध्ये फोन करताना त्या अधिकार्‍याच्या टेबलावर लॅण्डलाइन असली तरी मोबाइलवर फोन करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने उपद्रव वाढत चालला आहे. एखादं तातडीचं काम असल्यास आपण समजू शकतो पण घरासमोर कचरा दिसल्यावर रात्रीअपरात्री अधिकार्‍यांना मोबाइलवर फोन करणारे लोक बरेच आहेत.

गेल्या आठवड्यात माझ्या हातून एक मोठी चूक घडली. घरी बसलो असताना शुभेच्छा देण्यासाठी मी चुकून सहआयुक्त जावेद अहमद यांना मोबाइलवर फोन लावला. अतिशय कार्यतत्पर आणि जॉलीगुड अधिकारी आहेत. त्यांनी फोन उचलताच मी 'हाय, हॅप्पी दिवाली' म्हटलं. 'बरेच दिवस भेटलो नाही, भेटू या,' म्हणाले. 'सध्या आहात कुठे?' विचारलं. पलिकडून जावेद अहमद जड आवाजात म्हणाले, 'मी लखनऊमध्ये आहे. नुकतीच माझी आई वारली...' तेव्हापासून आणि त्यापूवीर्देखील अत्यंत तातडीचं काम असल्याशिवाय मी कोणाला मोबाइलवर फोन करत नाही. विशेष म्हणजे माझ्याही मोबाइलचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी बडबडत नाही.

प्रमोद नवलकर